नागशिल्प

नागशिल्प

नागशिल्प –

संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही कुठे ही गेलात तर तुम्हाला नागशिल्प बघायला मिळतात आणि आज त्याच नागशिल्पांना आपण प्रत्येक नागपंचमीच्या सणाला पुजतो.

कुठून आली ही शिल्प? नेमका ह्या शिल्पांचा अर्थ काय? खरच नागशिल्पांचा थेट संबंध नागपंचमी सणासोबत आहे का? अश्या बऱ्याच प्रश्नांचा डोंगर मनात उभा राहतो. प्रश्न तिथे उत्तर आणि इतिहास हा आलाच.

गावोगावी दिसणाऱ्या ह्या नागशिल्पांचा नेमका अर्थ आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासातून मिळतो. भारताचे नैसर्गिक स्थान , समृद्धता ह्यामुळे भारतावर कायमच आक्रमण होत राहिले. उत्तरेकडून होणारी आक्रमणं मोठ्या प्रमाणावर होती. सिंध प्रांत, खैबर खिंड इथून आक्रमणांचे येणारे लोंढे नागराजांकडून रोखले जायचे. आपल्याला इतिहासात ५ अश्या शूर नागराजांचे उल्लेख सापडतात जे नाग ह्या वंशाचे होते.

१) अनंत हा सर्वात मोठा

राज्यक्षेत्र : अनंतनाग

२) वासुकी नागराजा

राज्यक्षेत्र : कैलास मानसरोवर

३) नागराजा तक्षक

राज्यक्षेत्र : तक्षशीला

४) नागराजा करकोटक

राज्यक्षेत्र : रावी नदीच्या शेजारी

५) ऐरावत

राज्यक्षेत्र : रावी नदीच्या शेजारी

राज्यक्षेत्र जरी वेगवेगळी असली तरीही कोणावर ही परकीय शत्रू चालून आल्यास एकीचे बळ दाखवत शत्रूस तोंड देण्याचे काम ह्या राजांनी केले आणि आपले साम्राज्य अबाधीत ठेवले. कालांतराने पंचक्रोशीत शूर राजे असे नाव कमवून नागराजांनी जनतेच्या मनात खास अशी जागा निर्माण केली. ‘नाग’ हा वंश म्हणून ओळखला जाऊ लागला आणि संपूर्ण भारतभर नाग वंशाचा प्रचार होऊ लागला. नाग लोक जेव्हा आपल्या धर्मप्रचारासाठी संपूर्ण भारतभर भ्रमण करत होते तेव्हा त्यांनी आपल्या राजांची आठवण म्हणून मोठ्या मोठ्या शिळांवर

पाच राजांची प्रतिमा कोरली. कालांतराने बदल होत गेले पाच नागराजांचे प्रतीक असलेले नागशिल्प तीन , दोन आणि एक अश्या स्वरूपात कोरण्यात येऊ लागले. मध्ययुगीन काळात ह्याच नागशिल्पाचा वापर मंदिरांवर सुद्धा करण्यात आला. चपळता दर्शवण्यासाठी प्रतिकात्मक शिल्प म्हणून वापर करण्यात आला. ह्यात काळानुसार अनेक बदल होत गेले आणि नागपंचमी ह्या सणाला हीच नागशिल्प जी कधीकाळी नागराजांची आठवण होती नागपंचमीच्या सणाला पुजली जाऊ लागली.

माहिती साभार – सागर सुर्वे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here