नागनाथ मंदिर, कामरगाव, ता. पारनेर

नागनाथ मंदिर, कामरगाव, ता. पारनेर

नागनाथ मंदिर, कामरगाव, ता. पारनेर –

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पारनेर शहरापासून २० किमी अंतरावर कामरगाव नावाचे गाव आहे. गावात कामक्षा तथा कामाख्या देवीचे मंदिर आहे. कामरगाव हे इतिहासातील प्रसिद्ध अंताजी माणकेश्वर यांचे गाव. माणकेश्वर यांचे मूळचे आडनाव गंधे. कामरगाव येथे त्यांची किल्लावजा गढी आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे हिंदुस्थानातील मुत्सद्दी व दिल्लीत मराठा राज्य अबाधित ठेवणारे पानिपतवीर सरदार अंताजी माणकेश्वर गंधे यांच्या गौरवार्थ दिला जाणारा ‘सरदार अंताजी माणकेश्वर राष्ट्रीय पुरस्कार’ देखील थोर लोकांना बहाल केला जातो.(नागनाथ मंदिर कामरगाव)

गावात प्रवेश केल्यानंतर भव्य दगडी वेस व वेशी जवळ असणारे गजलक्ष्मीचे शिल्पं आपल्या मनात कुतूहल निर्माण करतात. वेशी समोर मारुतीचे एक मंदिर आहे. मारुती मंदिरापासून काही अंतरावर ओढ्याच्या पलीकडे दिसणारे नागनाथाचे सुंदर पुरातन मंदिर आपले लक्ष वेधून घेते. मंदिरा समोर बारव असून बारवेत देवनागरी लिपीतील एक शिलालेख आहे. बारवेतील एका देवकोष्टकात मारुतीचे सुंदर शिल्पं असून दुसऱ्या देवकोष्टकात शिव व गरुडारुढ विष्णू प्रतिमा आहेत. गरुडारुढ विष्णू प्रतिमेत केवळ भगवान विष्णू चे वाहन गरुड आपल्याला दिसून येतो बाकी मुर्ती भग्न स्थितीत आहे.

मंदिराला रंगरंगोटी जरी केलेली असली तरी मंदिराचे मूळ सौंदर्य कुठेही उणावलेले दिसत नाही. मंदिरा समोरील नंदीमंडपात असणारा नंदी सभामंडपात असून नंदीमंडपात शिवलिंग स्थापित केलेले आपल्याला दिसून येते. नंदीमंडपा शेजारी सुंदर तुळशी वृंदावन आहे. मंदिराचा सभामंडप स्तंभविरहित असून गाभाऱ्यात सुरेख शिवलिंग स्थापित आहे. मंदिराचा परिसर वट वृक्षांनी  वेढलेला असून अत्यंत सुंदर व प्रसन्न असा आहे.

कामरगावातून काही अंतर पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला एक सुंदर मारुतीचे मंदिर असून मंदिराच्या बाह्य भिंतीवर असणारे शरभ शिल्पं आपल्याला आकर्षित करतात. इथे मंदिरा बाहेर एक भग्न वीरगळ देखील आपल्या नजरेस पडते. कामरागावात नागनाथ मंदिर, बारव, शिल्पं, विविध समाधी, वेस, गढी, विहिरी, मंदिरे, वाडे, अशा पुरातन अनेक वास्तू आहेत. या वास्तू म्हणजे गावाचा पुरातन इतिहासकालीन ठेवा आहे.

Rohan Gadekar

1 COMMENT

  1. कामरगाव नगर तालुक्यामध्ये आहे, पारनेर तालुक्यात नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here