महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

नागेश्वर शिवमंदिर, कर्जत | Nageshwar Shiva Temple, Karjat

By Discover Maharashtra Views: 1237 2 Min Read

नागेश्वर शिवमंदिर, कर्जत –

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत हे एक तालुक्याचे ठिकाण असून नगर जिल्ह्यापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर आहे. अलीकडच्या काळात कर्जत शहराची ओळख शिक्षण पंढरी अशी होत असली तरी प्राचीन काळापासून या शहराला ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेली आपणास दिसून येते. येथील पुरातन मंदिरे पाहिल्यानंतर शहराच्या समृद्ध व वैभवशाली इतिहासाची आपल्याला जणू खात्री पटते.

शहरातील पूर्वेकडील भागात नकटीचे देऊळ म्हणून ओळखले जाणारे यादवकालीन शिवमंदिर आहे. हे मंदिर भारतीय पुरातत्व खात्याने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. समोरच मल्लिकार्जुन या नावाने ओळखले जाणारे आणखी एक पुरातन मंदिर असून दोन्ही मंदिरापासून साधारण शंभर मीटर अंतरावर नागेश्वर नावाने ओळखले जाणारे शिवमंदिर आहे. ही सर्व मंदिरे आजही शहराच्या समृद्ध सांस्कृतिक इतिहासाची साक्ष देत आहेत.

नागेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असून नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गाभारा अशी मंदिराची रचना आपल्या नजरेस पडते. मंदिराची रंगरंगोटी करण्यात आलेली आहे तसेच गर्भगृहावरील शिखर नव्याने बांधले गेले आहे. मुखमंडप कक्षासनयुक्त असून दोन वामन स्तंभावर तोललेला आहे. सभामंडपात चार स्तंभ आहेत. गर्भगृहात आपल्याला दक्षिणोत्तर नागेश्वर महादेवाचे शिवलिंग नजरेस पडते.

मंदिराच्या डाव्या बाजूला सतीशिळा, वीरगळ, नागशिल्पं व काही शिल्पांवशेष आपल्याला दिसतात. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर परिसरात आपल्याला अनेक नागशिल्पं नजरेस पडतात. गावोगावी दिसणाऱ्या ह्या नागशिल्पांचा नेमका अर्थ आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासातून मिळतो.

नागवंशीय लोक जेव्हा आपल्या धर्मप्रचारासाठी संपूर्ण भारतभर भ्रमण करत होते तेव्हा त्यांनी आपल्या राजांची आठवण म्हणून मोठ्या मोठ्या शिळांवर या राजांची प्रतिमा कोरली. मध्ययुगीन काळात याच नागशिल्पांचा वापर मंदिरावर देखील करण्यात येऊ लागला. ह्यात काळानुसार अनेक बदल होत गेले आणि नागपंचमी ह्या सणाला हीच नागशिल्प जी कधीकाळी नागराजांची आठवण होती नागपंचमीच्या सणाला पुजली जाऊ लागली.

– रोहन गाडेकर

Leave a comment