मराठ्यांचा मोगलांच्या संपन्न अश्या जुन्नर शहरावर बेसावध हल्ला..!!

Uploaded By: Discover Maharashtra
Views: 7
2 Min Read

मराठ्यांचा मोगलांच्या संपन्न अश्या जुन्नर शहरावर बेसावध हल्ला..!!

“वैशाख वद्य १२, शके १५७९, हेमलंबी नाम संवत्सर, गुरुवार दि.३० एप्रिल १६५७ रोजी रात्रीस मराठी फौजेने प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मोगलांच्या संपन्न अश्या जुन्नर शहरावर बेसावध हल्ला केला..!!” मराठ्यांचे वकील सोनोपंत डबीर अगदी आठवड्यापूर्वीच म्हणजे २३ एप्रिल १६५७ यादिवशी बिदरच्या मोगली छावणीत जाऊन मराठ्यांनी घेतलेल्या आदिलशाही मुलुखाच्या मान्यतेचा आणि मोगलांशी नव्याने मैत्रीचा ‘लोभस’ प्रस्ताव लेखी स्वरूपात मोगल शाहजादा औरंगजेबाकडून घेऊन आले होते, त्यामुळे मोगल आघाडीवर शांतता होती. अगदी ह्याच संधीचा पुरेपूर फायदा घेऊन महाराजांनी सुसंपन्न मोगली पेठ असलेल्या जुन्नरच्या ठाण्यावर छापा घालायचे ठरवले.

त्यानुसार २९ एप्रिलच्या मध्यरात्री मराठी फौजा जुन्नरच्या वेशीबाहेर जमल्या. मराठ्यांनी तटाला शिड्या लावून आत प्रवेश केला. तिथल्या पहारेकऱ्यांना कापून काढून शहरात घुसून त्यांनी लुटीला सुरुवात केली. लुटीत मराठयांना साडेदहा लाख रुपये नगद, हिरे-मोती, कापड आणि ७०० उमदे घोडे इतकी घसघशीत लूट मिळाली.

त्याचवेळी मिनाजी भोसले आणि काशी ह्या सरदारांनी श्रीगोंदयावर छापा मारून थोडी लूट केली. ह्या सर्व प्रसंगाचे वर्णन करताना कृष्णाजी अनंत सभासद म्हणतात – ‘..जुन्नर शहर मारिले. घोडे दोनशे पाडाव केले. तीन लक्ष होनांची मत्ता, खेरीज कापड जिन्नस, जडजवाहीर हस्तगत करून पुण्यास आले मग अमदानगर (अहमदनगर) शहर मारिले. मोगलांशी मोठे युद्ध केले. सातशे घोडे पाडाव केले. हत्तीही पाडाव केले. द्रव्य बहुत सापडले. ते समयी पागा बाराशे व शिलेदार दोन हजार जहाले अशी तीन हजार स्वारांची बेरीज जाली..’
अवघ्या काही तासापूर्वी जुन्नरच्या ठाण्यात लाखो रुपयांची दौलत होती आणि आता.? फक्त मौल्यवान शांतता मागे राहिली होती..!

© स्वराज्यसेवक

संदर्भ :
१) मराठी रियासत (पूर्वार्ध) – गोविंद सखाराम सरदेसाई
२) कृष्णाजी अनंत सभासद विरचित छत्रपति श्रीशिवाजीराजे यांची बखर – संपादक शंकर नारायण जोशी
३) राजा शिवछत्रपती : पूर्वार्ध – बाबासाहेब पुरंदरे
४) शककर्ते शिवराय : खंड १ – विजय देशमुख

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल
    Leave a Comment