हरपलेले ज्ञान..!

marathi pdf book free download | इतिहास कसा अभ्यासावा? | बखर

हरपलेले ज्ञान..!

ज्या प्राचीन भारताच्या लखलखत्या, वैभवशाली खजिन्या विषयी आपण बोलतोय, तो ज्ञानाचा खजिना नेमका गेला कुठे..? हे अत्यंत अमूल्य असे प्राचीन ज्ञान कुठे हरवले Lost knowledge..? अनेक गोष्टी आपण भारतीयांनी सर्वप्रथम शोधल्या असे आपण म्हणतो, त्या गोष्टी नेमक्या कुठे विखरून गेल्या..? असे प्रश्न अनेक जण विचारतात. असे प्रश्न समोर येणे स्वाभाविकच आहे. एके काळी अत्यंत समृध्द असलेला आपला देश इतका गरीब कसा काय झाला..? त्या प्राचीन ज्ञानाचा काहीच उपयोग झाला नाही का..? असेही प्रश्न समोर येतात. काही जण तर खवचटपणे असेही म्हणतात की, ‘जगात एखादा नवीन शोध लागला की प्राचीन भारताची ही अभिमानी मंडळी ताबडतोप उसळी मारून समोर येतात आणि म्हणतात की हा शोध तर भारतीयांनी फार आधीच लावला होता…!’

असे अनेक प्रश्न आणि अनेक आरोप…
मग खरी वस्तुस्थिती काय आहे..?

पहिली गोष्ट ही की त्या काळात आपला देश हा संपत्तीने आणि संस्कृतीने सर्वात समृध्द असलेला देश होता. आणि ही माहिती जग भर होती. म्हणूनच जगज्जेत्या म्हणवल्या जाणाऱ्या सिकंदरला (अलेक्झांडर ला) अगदी लहानपणापासून वाटत होतं की भारताला जिंकून घ्यावं. अकराव्या शतकापासून भारतावर आक्रमण करणाऱ्या मुसलमान आक्रमकांना भुरळ पडली होती ती भारताच्या वैभवाची. भारताला जाण्यासाठी म्हणून निघालेला कोलंबस अमेरिकेला पोहोचला, तर वास्को-डी-गामा, मार्कोपोलो या लोकांना भारताचे प्रचंड आकर्षण होते.

थोडक्यात, आपल्या सारख्या समृध्द देशाबद्दल जगाचे कुतूहल असणे स्वाभाविकच होते. आणि ही समृद्धी आपण आपल्या ज्ञानाच्या बळावर मिळवलेली होती.

हे ज्ञान कश्या स्वरूपात आपल्या देशात जतन करून ठेवलं होतं..? त्या काळात छपाई चे तंत्रज्ञान अवगत नसल्याने ग्रंथ नकलून घेत. ते ग्रंथ लिहिणे, अर्थात नकलून घेणे, हा एक सोहळाच असायचा. रामायण / गीता / महाभारत / वेद / उपनिषदे या सारखे ग्रंथ नकलून घेण्यास महिनोन महिने लागत. अगदी व्युत्पन्न शास्त्र्यांच्या घरी ही फारसे ग्रंथ किंवा पोथ्या नसत.

हरपलेले ज्ञान..!

हे ग्रंथ किंवा पोथ्या ठेवण्याच्या जागा म्हणजे विद्यापीठं, गुरुकुल आश्रम, मठं, देवस्थानं आणि मंदिरं. या ठिकाणी हे ग्रंथ अगदी भक्तिभावाने आणि व्यवस्थित ठेवलेले असायचे.

विद्यापीठांमध्ये मोठमोठी ग्रंथालयं होती. नालंदा च्या ग्रंथालया बद्दल इतिहासात तुटक, तुटक माहिती आढळते. मात्र निश्चित आणि भरभक्कम पुरावा मिळाला तो हिंदीचे प्रसिध्द लेखक आणि संशोधक राहुल सांस्कृत्यायन (१८९३ – १९६३) यांना. हे बौध्द धर्माचे अभ्यासक होते. बौध्द धर्माच्या प्राचीन ग्रंथांसाठी यांनी तिबेट पासून श्रीलंके पर्यंत अनेक प्रवास केले. तिबेट ला तर ते अनेकदा गेले. त्या काळात तिबेट वर चीन चे आक्रमण झालेले नव्हते. तिबेट च्या तत्कालीन सरकार ने त्यांना विशिष्ट अतिथी चा दर्जा दिलेला होता आणि त्यांना कोणत्याही बौध्द मंदिरात जाण्याचा मुक्त परवाना होता.

हरपलेले ज्ञान..!

राहुल सांस्कृत्यायन नी याचा चांगला उपयोग करून घेतला. पाली आणि संस्कृत भाषेतले अनेक प्राचीन ग्रंथ त्यांनी वाचले आणि त्यातले बरेचसे भारतातही आणले. याच प्रवासात मध्य तिबेट च्या एका बौध्द आश्रमात त्यांना एक महत्वाचा ग्रंथ मिळाला. बाराव्या / तेराव्या शतकातील तिबेटी भिख्खू, ‘धर्मस्वामी’ (मूळ नाव – चाग लोत्सावा. ११९७ – १२६४) ने लिहिलेला हा ग्रंथ. हा धर्मस्वामी सन १२३० च्या सुमारास नालंदा ला भेट द्यायला गेला. बख्तियार खिलजी ने ११९३ मधे नालंदा ला उध्वस्त केले होते. त्यामुळे नालंदा चे ग्रंथालय आणि नंतर चा तो विध्वंस डोळ्यांनी बघितलेली माणसं तिथं होती. त्या उध्वस्त नालंदा च्या परिसरात फक्त सत्तर विद्यार्थी, ‘राहुल श्रीभद्र’ ह्या ऐंशी वर्षांच्या बौध्द शिक्षकाकडे विद्याध्ययन घेत होती. आणि या सर्वांची काळजी घेत होता, जयदेव नावाचा एक ब्राम्हण.

या सर्वांशी बोलून धर्मस्वामी ने जे चित्र नालंदा चे उभे केले आहे, ते भव्य आणि समृध्द अश्या विद्यापीठाचे आहे. दहा हजार विद्यार्थी, दोन हजार शिक्षक आणि संशोधक असलेले हे विद्यापीठ होते.

हरपलेले ज्ञान..!

विद्यापीठाचे ग्रंथालय देखील विद्यापीठा सारखेच प्रचंड होते. ‘धर्मगंगा’ नाव असलेल्या ह्या ग्रंथालय परिसरात तीन मोठमोठ्या इमारती होत्या. त्यांची नावं होती – रत्नसागर, रत्नोदधी आणि रत्नगंजका. यातल्या रत्नोदधी ह्या नऊ मजल्याच्या (होय, नऊ मजल्याच्या. धर्मस्वामी ने तसा उल्लेख त्याच्या पुस्तकात केला आहे. आणि ह्यूएनत्संग सकट काही चीनी प्रवासी-विद्यार्थ्यांनीही नऊ माजली उंच इमारतीचा उल्लेख केलाय). इमारतीत अनेक प्राचीन (त्या काळातील प्राचीन. अर्थात त्या काळापूर्वी दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीचे. अर्थातच ख्रिस्तपूर्व एक हजार वर्षांचे) ग्रंथ सुरक्षितपणे ठेवण्यात आलेले होते. या दुर्मिळ ग्रंथांपैकी ‘प्रज्ञा पर मिता सूत्र’ या ग्रंथाचा उल्लेख धर्मस्वामी करतोय.

प्राचीन चीनी संशोधक झुआन झांग हा ह्या ग्रंथालया संदर्भात लिहितो – ‘हा संपूर्ण ग्रंथालय परिसर, विटेच्या भिंतींनी बंदिस्त होता. या परिसराला एकच मोठे दार होते, जे उघडल्यावर आत आठ मोठमोठी दालनं दिसायची.

ह्या ग्रंथालयात किती ग्रंथ असतील..? अक्षरशः अगणित. हजारो. कदाचित लाखो पण. आणि ग्रंथ म्हणजे हस्तलिखित. भूर्जपत्रांवर, ताम्रपत्रांवर आणि कागदांवरही लिहिलेली. दुर्मिळ, प्राचीन अशी ही अमाप ग्रंथसंपदा.

बख्तियार खिलजी ह्या क्रूरकर्म्यानं ही सारी ग्रंथसंपदा जाळली. आणि हे सर्व ग्रंथ भांडार जाळून नष्ट करायला त्याला तीन महिन्यांपेक्षाही जास्त वेळ लागला..!

कोण होता हा बख्तियार खिलजी..?

‘इख्तीयारुद्दिन मुहम्मद बिन बख्तियार खिलजी’ या लांबलचक नावाचा हा प्राणी आताच्या दक्षिण अफगाणीस्तानातल्या ‘गर्मसीर’ ह्या लहानश्या गावातला एक टोळी प्रमुख. पुढे हा कुतुबुद्दीन ऐबक च्या सैन्यात सेनापती झाला आणि दिल्ली बळकावल्यावर ऐबकाने त्याला बिहार आणि बंगाल जिंकायला पाठवले.

११९३ मध्ये याने नालंदा विद्यापीठाचा विध्वंस केला आणि विद्यापीठातील अत्यंत दुर्मिळ असा ग्रंथ संग्रह अक्षरशः जाळून टाकला. सतत तीन महिने त्याचं सैन्य ग्रंथालयातून पुस्तकं आणू आणू आगीत टाकत होतं. पण तरीही पुस्तकं उरतच होती. इतका विशाल ग्रंथ संग्रह होता तो.

बख्तियार खिलजीनं फक्त नालंदाचं ग्रंथ भांडारच नाही जाळलं, तर बंगाल मधल्या विक्रमशीला आणि उड्डयनपूर या विद्यापीठांना ही जाळून उध्वस्त केलं. तिथलाही असाच मोठा ग्रंथ संग्रह नष्ट केला गेला. दुर्दैवाने हा क्रूरकर्मा बख्तियार खिलजी आज ‘बांगला देशाचा’ राष्ट्रीय नायक आहे..!

हरपलेले ज्ञान..!

नालंदा विश्वविद्यालय हे त्या काळातील सर्वात मोठं विद्यापीठ असल्याने त्याला नष्ट करण्याची, त्यातील पुस्तक जाळून टाकण्याची बातमी इतिहासकारांनी नोंदवून घेतली. मात्र आपल्या खंड प्राय असलेल्या विशाल देशात अशी अनेक लहान मोठी विद्यापीठं आणि कितीतरी गुरुकुलं होती. पुढच्या दोनशे – तीनशे वर्षांच्या काळात या ठिकाणची ग्रंथ संपत्ती ही, मुस्लीम आक्रमकांद्वारे अश्याच प्रकारे नष्ट करण्यात आली.
बाराव्या शतकानंतर, भारतात विद्यापीठं नष्ट झाल्याने वेगवेगळ्या विषयांवर होत असलेले संशोधनाचे प्रकल्प बंद पडले. भारतीय ज्ञानाचा हा ओघच थांबला. उच्च स्तरावरचं ज्ञान घेणं आणि देणं, नुसतं कठीणच नाही, तर अशक्य झालं. ग्रंथांची निर्मिती थांबली. आणि म्हणूनच अगदी अपवाद वगळता, बाराव्या शतकानंतर लिहिलेले महत्वाचे अथवा मौलिक ग्रंथ आढळत नाहीत.

अकराव्या शतकात, माळव्याचा राजा भोज याने संकलित केलेला ‘समरांगण सूत्रधार’ हा महत्वाचा ग्रंथ. यात ८३ अध्याय असून अनेक विषयांसंबंधी लिहिलेले आहे. पुढे अठराव्या शतकात जगन्नाथ पंडिताने ‘सिद्धांत कौस्तुभ’ हा खगोलशास्त्रावरचा ग्रंथ लिहिला आहे. पण हे तसे अपवादच. आपलं प्रचंड मोठं ज्ञान भांडार मुस्लिम आक्रामकांनी नष्ट केल्या मुळे ज्ञानाचा जिवंत आणि खळाळता प्रवाह आटला. थांबला.

हरपलेले ज्ञान..!

त्यातूनही जे तुरळक ग्रंथ शिल्लक होते, ते इंग्रजांनी आणि इतर युरोपियनांनी आपापल्या देशात नेले. खगोल शास्त्रावरील ‘नारदीय सिद्धांताचा’ ग्रंथ आज भारतात उपलब्धच नाही. अर्थात त्याचे कोणतेही हस्तलिखित आपल्या जवळ नाही. मात्र बर्लिन च्या प्राचीन ग्रंथ संग्रहालयात हा ग्रंथ (त्याच्या मूळ हस्तलिखित स्वरूपात) उपलब्ध आहे. (Webar Catalogue no 862). खगोल शास्त्रावरचाच ‘धर्मत्तारा पुराणातील’ सोम – चंद्र सिद्धान्तावरील ग्रंथ भारतात मिळतच नाही. त्याचे हस्तलिखित बर्लिन च्या संग्रहालयात आहे (Webar Catalogue no 840). प्राचीन खगोलशास्त्रात ‘वशिष्ठ सिद्धांत’ महत्वाचा मानला जातो. या सिद्धांताचे उल्लेख अनेक ठिकाणी येतात. या ग्रंथाचेही हस्तलिखित भारतात उपलब्ध नाही. ते आहे – इंग्लंड मधल्या मेकेंजी संग्रहालयाच्या विल्सन कॅटेलॉग मध्ये १२१ व्या क्रमांकावर..! आर्यभटाचे ‘आर्य अष्टक शतः’ आणि ‘दश गीतिका’ हे दोन्ही दुर्मिळ ग्रंथ बर्लिन च्या वेबर कॅटेलॉग मध्ये ८३४ व्या क्रमांकावर उपलब्ध आहेत.

एकुणात काय, तर ग्रंथांच्या रुपात असलेलं आपलं बरचसं ज्ञान मुसलमान आक्रामकांनी नष्ट केलं, उध्वस्त केलं. जे काही ग्रंथ शिल्लक राहिले, त्यांना इंग्रजी शासनाच्या काळात इंग्रज, डच, फ्रेंच आणि जर्मन संशोधकांनी युरोप ला नेलं. मग ज्ञानाचा साठा आपल्या जवळ राहील तरी कुठून..?

हरपलेले ज्ञान..!

आपली हिंदू परंपरा ही वाचिक आहे. आणि ह्या परंपरे मुळेच आपले अनेक ग्रंथ, पुराणे, उपनिषदं, वेद इत्यादी एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे वाचिक स्वरूपात हस्तांतरित होत राहिले. मात्र शाहजहा आणि औरंगजेबाच्या काळात, ज्या क्रौर्याने आणि बर्बर्तेने मोठ्या प्रमाणात ब्राम्हणांना मारण्यात आले, त्यामुळे ही वाचिक परंपरा ही पुढे काहीशी क्षीण झाली…!

मात्र इतकं सारं होऊनही आज जे ज्ञान आपल्या समोर आहे, ते प्रचंड आहे. अद्भुत आहे. विलक्षण आहे. ‘सिरी भूवलय’ सारखा ग्रंथ आजही आपण पूर्ण वाचू शकलेलो नाही. आजही दिल्लीचा ‘लोह स्तंभ’ कश्यामुळे गंजत नाही, हे कोडं आपण सोडवू शकलेलो नाही. ‘अग्र भागवताच्या’ अदृश्य शाईचे रहस्य आजही आपण उकलू शकलेलो नाही.. थोडक्यात काय, तर आपल्या प्राचीन ज्ञानाचा शोध घेण्याचा हा अद्भुतरम्य प्रवास असाच चिरंतन चालू राहील असे वाटते..!

– प्रशांत पोळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here