महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,76,531

लोकशाहीर जंगमस्वामी

By Discover Maharashtra Views: 1324 3 Min Read

लोकशाहीर जंगमस्वामी –

महाराष्ट्र ही शूरवीर, पराक्रमी योद्ध्यांची जननी तर संत, साधूंच्या आचार विचारांची कर्मभुमी. कला, साहित्य, अध्यात्म, शोध, इत्यादींच्या माध्यमातून समाजाच्या विविध अंगाचा विकास करणाऱ्या महान प्रभूतींनी याच महाराष्ट्राच्या मातीत  जन्म घेतला आणि आपल्या कर्तृत्वाने हिंदुस्थानाच्या जडणघडणीत मोलाचा सहभाग नोंदविला.महाराष्ट्राच्या सर्वांगीन प्रगतीसाठी अनेक पिढ्यांनी आपापल्या क्षेत्रातील कार्यात सर्वोच्च योगदान दिलेले आहे. लोकशाहीर नागसेन उर्फ शिवलिंग आप्पा विभूते म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राच्या सदैव स्मरणात असलेले लोकशाहीर जंगमस्वामी.

लोकशाहीर जंगमस्वामी यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९०७ साली पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भोंगवली या लहानशा खेडेगावातील सामान्य कुटुंबात झाला.त्यावेळी संपूर्ण हिंदुस्थानावर गो-या इंग्रजांची सत्ता होती.स्वामींचे वडील हे वारकरी असल्यामुळे त्यांच्या घरात संत विचारांचा वारसा होता.वडीलांच्या संत विचारांचा पगडा लहानपणापासून त्यांच्या मनावर नकळत होत होता.प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

अतिशय कठीण परिस्थितीत त्यांनी इंग्रजी विषय घेऊन प्रथम श्रेणी मधे पदवी घेतली कारण इंग्रज अधिकाऱ्यांना त्याच्याच भाषेत संवाद साधण्याची गरज होती.ज्या काळात सातवी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर शाळेतील मुख्याध्यापक म्हणून नोकरी मिळत होती.अशावेळी ते इंग्रजी विषय घेऊन पदवी घेतात म्हणजे मोठ्या पदावरील सरकारी नोकरी हमखास करणार हे गृहीत होते.मात्र ह्या अवलियाला स्वहिता पेक्षा राष्ट्रहिता महत्त्वाचे वाटत होते.आपल्या शिक्षणाचा उपयोग पारतंत्र्यात असलेल्या सर्वसामान्य जनतेला व्हावा म्हणून प्रवचन व किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याची सुरूवात केली. देशात स्वातंत्र्य चळवळी सुरू झाल्या होत्या.ते देखील या स्वातंत्र्य चळवळी सहभागी झाले होते.त्यांची प्रभावी संवाद कौशल्य,इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व,आवाजातील कणखरपणा इत्यादी गुणांमुळे प्रवचन व किर्तनास सर्व वयोगटातील श्रोते मोठ्या प्रमाणात हजेरी लावत.

एकदा त्यांच्या किर्तनास क्रांतीसिंह नाना पाटील उपस्थित होते.त्यांची प्रभावी वकृत्व शैली पाहता,त्याचा जन जागृतीची क्षमता फार मोठी असल्याची जाणीव क्रांतीसिंहाना झाली.त्यांनी जगंमस्वामींना शाहीरीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याची सुचना केले.स्वामींनी क्रांतीसिंह नाना पाटलांना आपले गुरू मानून शाहीरीच्या माध्यमातून समाज प्रबोधन सुरू केले.इ.स.१९४२ च्या चले जाव आंदोलनाच्या काळात “गो-यांनी हिंद सोडा” हा त्यांचा पोवाडा महाराष्ट्रात फारच गाजला.

महाराष्ट्राच्या कानाकोप-यात फिरताना समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा,दारिद्रय पाहून त्यांनी त्यावर विकासाचा मार्ग दाखविणारे “गावगाडा” वगनाट्य लिहले.”कला ही आपली आई आहे” ही त्यांची धारणा होती म्हणून तिचा नेहमीच सन्मान कसा होईल हे आयुष्यभर कसोशीने सांभाळले.क्रांतीसिंह नाना पाटील,क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी,जी.डी.बापू लाड यांच्या बरोबर त्यांनी पत्री सरकारच्या माध्यमातून खुल्या व भूमिगत स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला.

माझगांवच्या सभेत आचार्य अत्रे यांनी त्यांना “लोकशाहीर “ही उपाधी बहाल केली.त्यांनी मोठ्या रकमेचे कोणतेही पुरस्कार कधी स्वीकारले नाहीत मात्र “शाहीर पठ्ठे बाबूराव” व “शाहीर अमर शेख” हे दोन्ही पुरस्कार स्वीकारले.

जंगम स्वामी हे लिंगायत समाजात जन्माला आले होते मात्र १९५७ साली त्यांनी बौद्ध स्वीकारला.समाज प्रबोधनकार,स्वातंत्र्य सैनिक,संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी योद्धा म्हणून महाराष्ट्राला परिचित होते.अशा या स्वातंत्र्य सेनानीला हयातभर व नंतरही स्वातंत्र्य सैनिक म्हणून शासनाने गौरविले नाही ही दुर्दैवी बाब आहे. शतक पार आयुष्य समाज प्रबोधनासाठी व्यतीत केलेल्या लोकशाहीरांची ११३ वी जंयती १२ फेब्रुवारी २०२० रोजी आहे.आजही धोतर,बाराबंदी,डोक्यावर मुंडासे,हातात स्टिलची लहान बादली व खांद्यावर एका धोतराची वळी घेतलेली जंगमस्वामींची मूर्ती नकळत डोळ्यासमोर येते.अशा या लोकशाहीरांस त्यांच्या जयंती निमित्ताने तमाम महाराष्ट्र जनांच्या वतीने विनम्र अभिवादन!

© सुरेश नारायण शिंदे,भोर

Leave a comment