महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,71,571

लेवा संस्कृती भाग ३

By Discover Maharashtra Views: 3420 25 Min Read

लेवा संस्कृती भाग ३ –

गॅझेटियर मधील माहितीचा सारांश कुणब्यांबद्दल –

कुणबी- कुणबी, कणबी किंवा कुळंबी अशीही या जातीचीं नांवें आढळतात. मनुस्मृतींच्या ७ व्या अध्यायांत ११९ वा श्लोक व त्यावरील कुल्लूकाची व्याख्या यांच्या आधारें कुळंबी यांची फोड पुढीलप्रमाणें होते. एकेक नांगरास सहा बैल लागतात याला षड्ग व नांगर म्हणतात. अशा दोन नांगरांनीं जेवढी जमीन वाहिली जाईल तेवढील कुल अशी संज्ञा आहे. यावरून कुल हा शब्द मनुसंहितेपासून भारतवर्षांत प्रचलित आहे. या कुल शब्दाचा उच्चार मराठींत आदेशप्रक्रियान्वयें कुळ असा होतो. एका कुळाचा म्हणजे १२ बैलांनीं वाहिलेल्या जमीनीचा जो कर्ता त्यांचें नांव कुळपति. कुळपति-कुळवइ-कुळवी- कुणबी असा हा शब्द बनला असावा. पूर्वी कुणबी ही जात नव्हती तर नुसता धंदा होता. तो सध्यां जात झाला आहे.(लेवा संस्कृती भाग ३)

गुजराथी कुणब्यांत मूळ गुजर जातीचाच भरणा जास्त आहे. आणि दक्षिणी व कोंकणी कुणब्यांत मराठा जातीचा भरणा आहे. अहमदाबादेकडे बहुतेक कुणब्यांनां (गुजराथींत कुणब्यांनां कणबी असें म्हणतात.) पाटीदार (पाटील) अशी संज्ञा आहे. खेडा जिल्ह्यांत फक्त लेवा कुणब्यांनां पाटीदार म्हणतात व बाकीच्या सर्वांनां कणबी म्हणतात. याशिवाय देसाई, अमीन आणि पटेल याहि अधिकारदर्शक पदव्या तिकडे प्रचलित आहेत. यांचा परस्परांत बेटीव्यवहार होतो. अशा कुणब्यांच्या खालील कुळ्या आहेत.

(१) अंजना, (२) डांगी, (३) गुजर, (४) कडवा, (५) लेवा, (६) मातिया, (७) मोमना, (८) पट्टाणी, (९) उड. यांपैकीं लेवा आणि कडवा या दोन जातींमध्यें रोटीव्यवहार आहे पण बेटीव्यवहार मात्र नाहीं. उड हे इतर कोणत्याहि कुळीशीं रोटी व बेटीव्यवहार करीत नाहींत. पट्टाणी हे लेवा आणि कडवा यांच्याबरोबर जेवतात पण लग्न करीत नाहींत. लेवा आणि कडवा हे मतिया, अंजना, मोमना आणि डांगी यांच्याशीं फारसा संबंध ठेवीत नाहींत. धर्माच्या आणि चालीरीतींच्या बाबतींत लेवा, कडवा, अंजना, डांगी, उड आणि पट्टाणी यांच्यांत फारसा भेद नाहीं. मतिया, मोमना या अर्धवट मुसुलमान असल्यामुळें इतर कुळ्यांपेक्षां त्यांचा विधि निराळा असतो. मोठ्या गांवांतील कुणबी हे साधारणत: वाण्याप्रमाणें पोषाख वगैरे बाबतींत दिसतात. खेड्यांतील कुणबी हे वर्णानें जास्त काळे पण मजबूत असतात.

गुजराथी कुणबी हे गुजराथी भाषा बोलतात. यांच्यात सर्वसाधारण पुढील नांवें आढळतात. अम्रा, भीमो, छोटा, दलसुक, हिरा, पुंजा, वाला वगैरे. अलीकडे या नांवाच्या पुढें जी, भाई, दास, लाल आणि चंद हीं उपपदें लावण्याची चाल पडली आहे; जसें भिमजी  इत्यादि. बायकांमध्यें पुढील नांवें सर्वसाधारण आहेत. अंबा, बेणा, दाही, दिवाळी, कुनवर, लाडू, मेघा, रुपाडी, तेजा वगैरे. या नांवानांहि अलीकडे बाई हा शब्द जोडूं लागले आहेत. आईकडून चवथ्या अथवा ५ व्या पिढींपूर्वीं एकच पूर्वज असेल तर दोन घराण्यांत शरीरसंबंध होत नाहीं. सख्या बहिणी सख्या जावा होऊं शकतात. बालविवाहाची चाल सर्रास प्रचारांत आहे. तसेंच बहुपत्‍नीत्वाची चालहि प्रचारांत आहे. मात्र पाटीदार लोक ती फारच क्वचित उपयोगांत आणतात. नवर्‍यानें बायकोला काडी मोडून दिली तर बायकोस कांही एक पैसा द्यावा लागत नाहीं. पण बायकोनें फारकत मागितली तर तिला मात्र नवर्‍याच्या दुसर्‍या लग्नाचा खर्च द्यावा लागतो.

मोठीं झालेलीं मुलें हीं बापाजवळ रहातात, व लहान मुलें आईबरोबर जातात. बाईच्या पहिल्या गर्भारपणामध्यें ७ महिन्यांत ज्योतिषानें ठरविलेल्या दिवशीं खोळोभरणीचा (ओटीभरण) विधि करतात. जिची सर्व मुलें जिवंत आहेत अशा स्त्रीकडून गर्भारबाईची ओटी तांदुळ, केळीं, सुपार्‍या, नारळ आणि कुंकू यांनीं भरतात. ही ओटी सात वेळ भरतात आणि आठव्या खेपेस ओटीमधलें तांदुळ मडक्यामध्यें ठेवतात. त्याच मडक्यामध्यें बकर्‍याच्या सात लेंड्या, उंदराच्या सात लेंड्या, कच्च्या सुताच्या सात गुंड्या, वडाचीं सात फळें, सात सुपार्‍या, सात खारका, तांब्याचीं सात नाणीं आणि एक रुपया हीं ठेवतात. मडक्याच्या तोंडाभोंवतीं सुताचा दोरा गुंडाळून त्यावर एक नारळ ठेवतात. नंतर कुलोपाध्यायानें सांगितल्याप्रमाणें ती गर्भार बाई त्या नारळाची आणि सुगडाची पूजा करते. नंतर त्या सुगडामधील तांब्याचे सात पैसे भिक्षुकास देतात. व इतर जिनसांचें व सुगडाचें मोठ्या काळजीनें रक्षण करतात. गर्भारबाईची नणंद तिच्या उजव्या मनगटाला एक चांदीची राखडी बांधते.

ही राखडी ती बाई प्रसूत होईपर्यंत हातांत बांधलेली असते. प्रसूतीनंतर ती राखडी पुन्हां तिच्या नणंदेला परत करतात; व त्याच वेळीं मुलगा झाल्यास आणखी कांहीं नजराणा करतात. गर्भारशीस तिच्या नातेवाईकांकडे डोहाळजेवणास बोलावतात. तेव्हा  एक रुपयापासून पांच रुपयांपर्यंत रोख अगर वस्त्राचा आहेर करतात. याला वायन् असें म्हणतात. पहिलटकरीण स्त्री ही आपल्या माहेरीच बाळंत होते. मूल झाल्यानंतर न्हावी अथवा दुसर्‍या कोणत्याहि जातीचा माणूस ती बातमी मुलाच्या बापास कळविण्यास पाठवितात. त्याच्या बरोबर नूतन मुलाच्या पायाचा कुंकवाचा ठसा कागदावर उठवून पाठवितात. याबद्दल त्याला दोनपासून पांच रुपयांपर्यंत देणगी मिळते.

पांचव्या दिवशीं संबंध नाळ कापतात. षष्ठीची पूजा नेहमीप्रमाणें सर्वसाधारणच असते. दहाव्या दिवशीं जरी सोहेर फिटला तरी मुलाच्या बाबतींत २५ दिवस व मुलीच्या बाबतींत ३० दिवसपर्यंत अशुद्ध मानतात. ३५ व्या अथवा ४० व्या दिवशीं बाळंतीण शुद्ध होते. मुलीचा बाप आपल्या नातवास पाळणा वगैरे देतो. नांव ठेवण्याचा विधि यांच्यांत नसतो. ब्राह्मण उपाध्याय सांगेल यावेळीं, सहाव्या किंवा बाराव्या दिवशीं किंवा पहिल्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या महिन्यांतील शुभ दिवशी नांव ठेवतात. बहुतेक कुणब्यांच्या गळ्यांत तुळशीच्या मण्यांची माळ असते. अलीकडे खेडा आणि भडोच जिल्ह्यांतील पाटीदार लोक जानवीं घालूं लागले आहेत. सात पासून अकराव्या वर्षांच्या आंत लहान मुलाच्या गळ्यांत जातीच्या गुरूकडून माळ बांधवितात. लग्नामध्यें मागणीचा प्रकार दोन्हीकडून होतो. वाङ्गनिश्चय वराच्या बापाकडून जर मोडला गेला तर वधूच्या बापानें जो पैसा पूर्वी दिलेला असतो तो त्याला परत मिळतो. परंतु मुलीच्या बापानें वाङनिश्चय मोडला तर मात्र पैसा परत मिळत नाहीं.

हुंडा हा कुळिआ अथवा अकुळिआ (कुलवान अथवा अकुलवान) घराण्यावर अवलंबून असतो. वर कुलवान असला तर १ हजारापासून २ हजारापर्यंत हुंडा मिळतो, आणि अकुलवान असेल तर पांचशें पासून हजारापर्यंत मिळतो. पाटीदार लोक अकरा वर्षाच्या आंत, आणि साधे कुणबी ११ ते १६ च्या आंत लग्ने लावितात. लग्न ठरल्यानंतर मुलीचा बाप उपाध्यायाबरोबर लग्नपत्रिका देऊन मुलीच्या बापाकडे पाठवितो. व त्याच्या आईला देण्यासाठीं एक रुपया देतो. लग्नापूर्वीं तिसर्‍या अथवा चवथ्या दिवशीं गणपतिपूजन आणि दोन दिवसांपूर्वी ग्रहशांति हीं दोन्हीं घरीं करतात. लग्नदिवशीं नवर्‍याचा मामा त्याला आणि नवरीचा मामा तिला दागदागिन्यांचा आहेर करितात. मुलीच्या घरीं शमीचा मांडव घालतात. नवरदेव लग्नाला निघण्यापूर्वी त्याच्या डोळ्यांत काजळ घालून आणि कपाळाला कुंकवाचा टिळा लावून त्याच्या ओंझळींत तांदूळ, सात सुपार्‍या, दोनतीन विड्याचीं पानें आणि एक रुपया देतात.

ज्वारी, विड्याचीं पानें, मीठ व पैसें वगैरेंनीं त्याची दृष्ट काढतात. पाटीदार लोकांमध्ये नवरदेवाच्या मागें बायका (खुद्द त्याची आईसुद्धां) नसतात. इतर कुणब्यांमध्यें या मिरवणुकींत बायका असतात. वरमाईच्या हातांत दिवा असतो, सीमांतपूजनाच्या नवरदेवाला व त्याच्या वर्‍हाडाला गूळ पाणी देण्याचा हक्क नाव्ह्याचा असतो. लग्नमंडपापाशीं नवरदेव आल्यानंतर नवरीची आई त्याला आंत घेऊन जाते व नांगर, बाण, रवी ह्या तेथें ठेवलेल्या वस्तू त्याला दाखविते व मंडपांत घेऊन जाते. नंतर दोन्हीकडील गणपतिपूजन झाल्यावर नवरदेवाच्या उजव्या आंगठ्याची पूजा वधूचे आईबाप करतात. नवरा आणि नवरी यांच्या गळ्यांमध्यें तांबड्या दोर्‍यांच्या माळा घालतात. त्यांचे हात जोडून त्यावर एक कापडाचा तुकडा घालून परस्परांच्या वस्त्रांची गांठ मारतात. नंतर वधूच्या आईनें केलेली गुळपापडी ही वर आणि वधू यांनां खाऊ घालतात. त्यानंतर नवरदेव हा आपल्या सासूचा पदर धरतो व कांहीं देणगी मिळाल्याशिवाय तो सोडीत नाहीं. यानंतर वधूवर गणपतीची पूजा करतात व येथें लग्नविधी संपतो. लग्नाच्या दुसर्‍या दिवशीं नवरीकडील पुरुषमंडळी नवरदेवाच्या घरीं जाऊन कुसुंबा (अफुचें पाणी) पानविधि करितात. जे कुसुंबा पीत नाहींत त्यांनां केशराचें पाणी प्यावयास देतात. पुढें मुलीचा बाप उपाध्याय, न्हावी, माळी आणि कुंभार यांनां बक्षिसें देतो. त्यानंतर तिसर्‍या दिवशीं नवरीच्या घरच्या मांडवाची पूजा करून नवरदेव नवरीला घरीं घेऊन जातो.

नात्र अथवा पाटाची चाल सर्व कुणब्यांत आहे; पण खानदानीच्या लोकांमध्यें ती क्वचितच उपयोगांत येते. खंबायत प्रांतांत लेवा, कडवा आणि पट्टाणी या कुळ्यांमध्यें धाकट्या दिराशीं पाट लावण्याची चाल आहे. विधवेच्या बापाला २५ पासून ७५ रुपयांपर्यंतची रक्कम भावी (दुसरा) नवर्‍याकडून मिळते. रविवार आणि मंगळवार याच दिवशीं रात्रीं पाट लावितात. विधवेला तिच्या घरून नवर्‍याच्या घरीं नेण्यासाठीं पांच आप्त लोक येतात. वधूवर एकमेकांकडे तोंड करून बसल्यानंतर दोहोंच्यामध्यें मातीच्या परळांत एक दिवा ठेवतात, आणि त्यांनां त्या परळाकडे खालीं पहाण्यास सांगतात. ते तसे पाहूं लागले असतां एकमेकांचीं डोकीं लागलीं म्हणजे हा विधि संपतो. त्यानंतर नवर्‍यानें दिलेल्या बांगड्या ती बाई हातांत घालते. यानंतर कांहीं ठिकाणीं पाण्यानें भरलेली पितळेची घागर डोकीवर ठेवून ती बाई आपल्या नवर्‍याच्या घरांत प्रवेश करते.

वाण्याप्रमाणे आणि इतर पांढरपेशा वर्गाप्रमाणें यांच्यांतहि पुढील अनेक धार्मिक पंथ आहेत. बीजमार्गी, दादूपंथी, कबीरपंथी, माधवगणी, प्रणामी, रामानंदी, स्वामीनारायण आणि वल्लभाचार्यी. कांहीं थोडे फार जैनही आहेत. मुसुलमान अवलियांनांहि हे मानतात. आपापल्या पंथाच्या देवांची हे पूजा करतात. हे ब्राह्मणाला श्रेष्ठ मानून त्यांचा मान ठेवितात. हे आपल्या धर्मगुरूला लग्न वगैरे प्रसंगीं एक रुपया, आणि कंठी (माळ)धारण प्रसंगीं सव्वा रुपया दक्षणा देतात. यांचा जादूटोणा आणि पिशाच्चादिकांवर भरंवसा असल्यामुळें आजारीपणांत अथवा संकटप्रसंगीं कोळी, वाघ्री अथवा ब्राह्मण जातीच्या देवर्षीचा सल्ला वगैरे घेतात. हे अक्षय्यतृतीयेच्या दिवशीं शेतीच्या कामाला प्रारंभ करतात. विहीर खणतांना किंवा पहिली नांगरट करतांना हळदी कुंकवांनीं जमिनीची पूजा करतात. बागांस प्रथम पाणी देतांना विहिरींतल्या पाण्याची पूजा करून विहिरीजवळ एक दिवा ठेवून तींत खोबरें टाकतात. पक्ष्यांमध्यें नीळकंठ (चास) याला ते पवित्र मानतात. अश्विनांतील वसुबारशींच्या दिवशीं कुणब्यांच्या बायका गाईंची पूजा करून गाईच्या शेणांत सांपडणारें हें धान्य गाईच्या दुधांत मिसळून खातात. यांचीं तीर्थयात्रेचीं ठिकाणें इतर प्रख्यात हिंदू क्षेत्रें आहेतच पण त्यांशिवाय त्या प्रांतांतील आंबाजी, बहुचराजी, डाकूर, द्वारका आणि उनाई या तीर्थांनां ते पवित्र मानतात.

मनुष्य मृत्यूपंथास लागला म्हणजे कुलोपाध्यायाच्या (हा बहुधा औदीच्य ब्राह्मण असतो) हातून अथवा इतर ब्राह्मणाच्या हातून तुपाचा दिवा त्या माणसाच्या अंथरुणाजवळ ठेवतात. प्रेताची हजामत करण्याची चाल यांच्यांत आहे. प्राण गेल्यानंतर जवळचे नातेवाईक मोठ्यानें शोक करतात. त्याला प्राणपोक (मृत जीवाला परत बोलावणें) म्हणतात. अहमदाबादकडील पाटीदार लोकांमध्यें मेलेल्या माणसाचें नांव कोळशानें कौलावर लिहून भंग्याच्या हातीं मेलेल्याच्या आप्तांकडे (तो प्रसंग कळविण्यासाठीं पाठवितात. मृताच्या तिरडीला चारी कोपर्‍याला चार नारळ बांधतात. तिरडीपुढें चालणार्‍याच्या हातांत मडकें किंवा ताब्याचें भाडें असतें. प्रेतामागून बायकाहि कांहीं अंतरापर्यंत जाऊन एके ठिकाणीं थांबून आपली छाती बडवितात व नंतर घरीं येऊन स्नान करतात. चितेवर प्रेताचें डोकें उत्तरेकडे करतात. सर्व प्रेत जळून गेल्यानंतर अग्नीमध्यें थोडेंसे तूप ओततात. तिसर्‍या दिवशीं राख भरल्यानंतर चितेच्या जागीं पाण्यानें भरलेलें एक मडकें ठेवतात. नंतर घरीं आल्यावर एक पाण्याचें मडकें त्यांत थोडेसें दूध घालून तें घराच्या छपरावर ठेवतात. दहाव्या दिवशीं सर्व पुरुष क्षौर करतात. १२ व्या व १३ व्या दिवशीं होणारें श्राद्ध कायतिया ब्राह्मणाच्या हातून करवितात. दहाव्या दिवसापासून तेराव्यापर्यंत भाऊबंद व मित्र यांनां आणि बाराव्या व तेराव्या दिवशीं सर्व जातीला जेवण घालतात. मेलेला माणूस जर वृद्ध असेल तर जातींतील बायका त्यांच्या घरीं सकाळ आणि संध्याकाळ रडण्यासाठीं म्हणून एक महिना जातात, आणि तरुण असेल तर सहा महिने जातात.

अंजना कुणब्यांशिवाय बाकीचे कोणतेहि कुणबी मद्यमांस खात नाहींत.

सर्वसाधारण कुणब्यांचा धंदा शेतीचाच आहे. कांहींजण मात्र कोष्ट्याचा, कापड आणि धान्य विकण्याचा, सरकारी नोकरीचा, व्यापाराचा आणि सावकारीचा धंदा करतात. पुष्कळजण खेड्याचे मुखीया (पोलिस पाटील) असून त्यांनां त्याबद्दल रोख अथवा जमीनीच्या रूपानें मुषाहिरा मिळतो. मुखी हे मातादार अगर वतनदार या वर्गांतून नेमतात. गुजराथी कणबी हे लष्करांत नोकरी करीत नाहींत. कणब्यांपैकीं कडवा आणि लेवा हे दोन वर्ग मालगुजारी करतात.

गुजर कणबी.- हे पूर्व आणि पश्चिम खानदेशांत आढळतात. यांच्यांत आठ पोटभेद आहेत. ते (१) अनाल, (२) दाळे, (३) दोरे, (४) गरी, (५) कडवा, (६) कापर, (७) लोंढारी, किंवा बाड. (८) रेवा अथवा लेवा. दाळे यांची वस्ती तापीच्या कांठीं शहादे, तळोदे आणि रावेर या तालुक्यांत व बर्‍हाणपूरकडे आहे. जामनेरचा देशमुख हा गरी गुजर आहे असें म्हणतात. परंतु तो स्वत:स रेवा गुजर असें म्हणवितो. इकडील रेवा अथवा लेवा हे गुजराथेंतील लेव्यांपैकीच असावे. ते आपल्याला श्रेष्ठ  म्हणवितात आणि फक्त ब्राह्मणांच्या हातचें खातात. कडवा, अनाल आणि दाळे हे लोक खानदेशांत फार थोडे आहेत. कडवा हे गुजराथेंतील कडव्यांपैकीच असून त्यांच्याप्रमाणेंच बारा वर्षांतून एकदां लग्न करण्याची चाल यांच्यात आहे. जे कापूस लोंढतात (कापसांतली सरकी चरकांतून काढतात) त्यांनां लोंढारी असे म्हणतात. कापर ही कुळीं थोडीशी हलकी मानतात.

कडवा.- अमदाबाद आणि कडी (बडोदे संस्थानानांतील एक तालुका) या दोन प्रांतांत यांची वस्ती आहे. लेव्यांचा व ह्यांचा निकटचा संबंध आहे. एका दंतकथेवरून कडवा हे सीता आणि राम यांचा मुलगा कुश याचे अनुयायी किंवा वंशज होते व दुसर्‍या दंतकथेवरून पार्वतीनें केलेल्या मातीच्या चित्रांत शंकरानें जीव घालून सजीव केलेल्या प्राण्यापासून यांची उत्पत्ति मानतात. शंकरानें यांनां अहमदाबादेच्या उत्तरेस २० कोस असलेलें उंज गांव वस्तीस दिलें. त्या ठिकाणीं एक पार्वतीचें देऊळ बांधलेलें आहे. सर्व कडवा कुणबी या देवळाला आणि खेड्याला आपल्या जातीचें मूलस्थान मानतात आणि आपले नवस फेडण्यासाठीं दूरदूर ठिकाणांहून येथें येतात. त्यांच्या शाखांच्या कांहीं नावांवरून त्यांचें म्हणणें असें आहे कीं, आपण काबूलहून पंजाबामधून गुजराथेंत आलों. यांच्यांत लालचुडावाला (यांच्या बायका लाल बांगड्या वापरतात), काळाचुडावाला आणि अहमदाबादी असे तीन भाग आहेत. लेवा कुणब्यांप्रमाणेंच यांच्यांतहि कुळी आणि अकुळी असे दोन भेद आहेत. उत्तर गुजराथेंत मूल झाल्यानंतर अथवा नवर्‍याची संमति घेतल्याशिवाय बायकोला फारकत मागतां येत नाहीं. यांच्यात ९।१० अथवा ११ वर्षांनीं एकदा लग्न करण्याची चाल आहे. अलीकडे ही चाल मोडून पांच अथवा एक वर्षांवर आणून ठेवण्याचा प्रयत्‍न सुरू आहे. पण सर्व जात ह्या सुधारणेस अद्याप कबूल नाहीं. यांच्यामध्यें मूळच्या ५२शाखा असून त्यांचीं नांवें पंजाबांतील त्या त्या गांवावरून पडलीं आहेत. या शाखांमध्यें गांवांतल्या गांवांत परस्पर बेटीव्यवहार होत नाहीं. हल्लीं सुद्धां हे कडवे आपल्या गांवाच्या बाहेरील दुसर्‍या शाखेशीं लग्न करितात, आणि आपल्याला गावांचेंच नांव धारण करितात; जसें नरोद गांवचे ते नरोदिया.

याप्रमाणें नव्या नव्या शाखा उत्पन्न होणें सुरूच आहे. या एकंदर शाखांचीं नांवें ज्यांनां पहावयाचीं असतील त्यांनीं ती एन्थोवेन याच्या ट्राइब्स् अ‍ॅन्ड कास्टस् ऑफ बाँबे या पुस्तकांच्या दुसर्‍या भागाच्या १४६, १४७, १४८ या पृष्ठांवर पहावीं. यांच्यांत सामाजिक चालीरीती पुष्कळ आहेत. थोड्या वर्षांपूर्वी १।१ महिन्यांच्या, एवढेंच नव्हे तर गर्भांतीलहि मुलांचे वाङनिश्चय लावीत असत. गर्भारशा बायका खरोखरच मांडवांतील बोहल्याभोंवतीं प्रदक्षणा घालून वाङिनिश्चयाचा विधि पार पाडीत. यांच्यांत लग्नें वर सांगितल्याप्रमाणें वार्षिक मुदतीचीं असल्यानें योग्य नवरा मिळण्यास पंचाईत पडते. त्यासाठीं पुढील प्रकार उपयोगांत आणतात. सामान्य लग्नाच्या मुहूर्तावर  मुलीचें लग्न एका फुलाच्या गुच्छाशीं लावतात व मग तो गुच्छ विहिरींत अथवा नदींत फेंकून देतात. यावर ती मुलगी विधवा बनते. यानंतर सवडीप्रमाणें मग तिचें दुसरें (नांवाचें) लग्न किंवा नात्र (पाट) करितात. एखाद्या विवाहित पुरुषाशीं, त्याला थोडेसे पैसे देऊन तिचे लग्न लावितात; परंतु त्याच्याकडून लागलीच तिचा घटस्फोट करून घेतात. लग्नापूर्वी उंजा येथील उमेची पूजा प्रथम करितात. नंतर जोशी लग्नासाठीं मुहूर्त पहातो. तो फाशानें पाहतो. ज्या वर्षावर फांसा पडेल तें अथवा त्यापुढील वर्ष लग्नासाठी ठरवितात. या वर्षांत बहुधां वैशाख तच लग्न लावतात.

लेवा.- हे गुजराथी कुणब्यांत सर्वांत जास्त आहेत. हे सर्वत्र गुजराथेंत (विशेषत: आनंद, नडियाद व बोरसल इकडे) पसरलेले आहेत. कच्छामध्येंहि हलाई व वाघदिआ या नांवाखालीं ते आहेत. गुजराथेंत यांचे पाटीदार व कणबी असे दोन भाग आहेत. पाटीदार हे आपल्या मुली कणब्यांनां देत नाहींत, त्यांच्या मात्र करतात. पुन्हां पाटिदारांत कुळी व अकुळी असून कुळी हे अकुळ्यांनां मुली देत नाहींत; यांच्या बायका बाहेर (बुरख्याशिवाय) पडत नाहींत, तसेंच यांच्यात पाटाची चाल नाहीं. यांच्यांत लग्नास, वाण्याप्रमाणें गोल (खेड्यांचा समूह) आहेत. एकाच गोलांत लग्नव्यवहार होतो. पूर्वी हे कुळी पाटीदार शेतकरी व सरकार याच्यांत मध्यस्त असून कर वसूल करण्यांत रयतेस फार त्रास देत असत. यांच्यांतील लग्नांत अतीशय खर्च करण्याच्या पद्धतींमुळें हे कर्जबाजारी असत. उत्तम कुळाशीं संबंध जोडण्यासाठीं फार चढाओढ लागे व पुष्कळ पैसा खर्च होई.

मतिआ.- मत या शब्दापारून मतिआ हें नांव पडलें. हे लोक जलालपूर आणि बार्डोली या तालुक्यांत असून धर्मानें अर्धवट हिंदू व अर्धवट मुसुलमांन आहेत. यांच्यांतील अडनांवांवरून व पूर्वीच्या लेवा कणब्यांशीं आढळलेल्या नात्यावरून हे मूळचे हिंदू लेवा कणबी हात असें ठरतें. सरासरी तीनशें वर्षांपूर्वीं लेवा कणब्यांची एक टोळी काशीयात्रा करण्यास जात असतां अहमदाबादजवळील गरमठ या गांवीं मुक्कामास राहिली. तेथें इमामशहा नांवाचा एक मुसुलमान फकीर होता. त्यानें चमत्कार करून काशींचे दर्शन त्या टोळीला बसल्या जागींच करून दिलें. त्यामुळें तिच्यापैकीं पुष्कळांनीं त्या फकिराला आपला गुरू केलें अशी दंतकथा आहे. हल्लीं यांच्यांत वैष्णव व पिरान असे दोन भेद आहेत. वैष्णव मतिआंनीं रामानंदी व दादूपंथी हे दोन पंथ स्वीकारले आहेत. हे सामान्य हिंदू उपास तापास पाळतात व यात्रा करतात. वैष्णव मतिआ यांनीं सर्व मुसुलमानी चालीरिती सोडून ते लेवाप्रमाणें वागतात. परंतु लेवा हे त्यांच्याबरोबर भोजन करीत नाहींत. आणि लग्नेंहि लावीत नाहींत. पिरान हे भाषा व पोषाख लेवा यांच्याप्रमाणे करितात. यांच्यांत विधवा हीं धाकट्या दिराशीं पाट लावते. पहिल्या वराला प्रथम शमीशीं लग्न लावल्याशिवाय घटस्फोट केलेल्या स्त्रीशीं अथवा विधवेशीं लग्न करतां येत नाहीं. यांच्या लग्नांत मोध ब्राह्मण लागतात. मतिआ बाईला मूल झाल्यानंतर १२ व्या दिवशीं ती. जवळच्या विहिरीची पूजा करून तिच्याजवळ दोन गवर्‍या एका दोरीला बांधून ठेवते. ती बाई ४० दिवस अशुद्ध असते व घरांतील कोणत्याहि वस्तूस शिवत नाहीं.

४० व्या दिवशीं बाळंतिणीच्या खालींतील जमीनसुद्धां खरडून काढितात, आणि त्याच दिवशीं मुलाचें नांव ठेवितात. हे स्वत:स अथर्ववेदी म्हणवितात. हे सत्पंथी मताचे अनुयायी आहेत. पिरान, अहमदबाद वगैरे ठिकाणच्या मुसुलमानी पिरांची पूजा करितात. पिरानचा इमामशहा याचें शिक्षापत्री हें धार्मिक पुस्तक ते पूज्य मानतात, आणि ते ज्यांना पाठ येतें त्यांनां काका म्हणतात. हे काका ह्या पंथाचीं सर्व धार्मिक कृत्यें करितात. यांच्यांत पंचिआ (सुरभाईचे अनुयायी). सतिआ (महमूदचे अनुयायी.) अठिया (बाकर अल्लीचे अनुयायी) असे तीन भेद आहेत. पाप नाशार्थ ‘लाहेउतारणी’ हा विधि करतात. हा विधीची साग्र माहिती वर दिलेल्या एन्थॉवेनच्या पुस्तकांत आहे. प्रत्येक मतिआ शेतकरी या काकांच्या तर्फे आपल्या गुरूला अर्धामण धान्य व एक रुपया दर एक नांगरापाठीमागें पाठवितात. हे लोक रमजानचे उपवास व इतर मुसुलमानीं सण पाळतात. मतिआ लोक आपलीं  प्रेतें पुरतात. ते प्रेताला मुसुलमानी धरतीच्या तिरडीमधून नेतात आणि मुसुलमानांप्रमाणेंच त्या प्रेताचें मातींत दफन करतात. नंतर देवाची प्रार्थना हिंदू व मुसुलमान दोन्ही पद्धतीची करितात. हें हिंदुप्रमाणें दहा दिवस सुतक पाळतात. तेराव्या दिवशीं मेलेल्याचा निकट आप्त बर्‍हाणपूर, नवसरी वगैरे ठिकाणच्या त्यांच्या पंथांच्या मुख्य पीरांनां कपडेलत्ते वगैरेंचे नजराणे पाठवितो. हे मद्यमांसनिवृत्त आहेत.

मोमना.- यांची मुख्य वस्ती कच्छमध्यें आहे. हे मूळचे हिंदू असून वर आलेल्या इमामशहानें यांनां मुसुलमान केलें. इ. स. १६९१ तील मोमनांचे गुजराथेंत बंड झाल्यानंतर कच्छ प्रांतामध्यें रहावयास गेले. यांनां मोमीन असेंहि म्हणतात. यांच्यांतील एका पंथाचा इमाम सद्रुद्दिन होता. हे लोक शेंडीं ठेवितात व गुजराथी भाषा बोलतात, पण यांचा पेहराव मुसुलमानी असतो. हे लोक शेती आणि मजुरी करितात हे नांवाचे शिया पंथी आहेत. यांच्या सर्व चालीरीती व आचारविचार हिंदूप्रमाणेंच आहेत. हे गोकुळअष्टमी, दिवाळी वगैरे सण पाळतात व एकमेकांना भेटण्याच्या वेळीं रामराम करतात. यांच्या जातींतील सर-पंच भुजजवळच्या मानकुव गांवीं रहातो. यांचे जातीविषयक सर्व तंटे तोच तोडतो. हे लोक मुसुलमानांत मिसळत नाहींत, मांस खात नाहींत आणि रमजानचे उपास पाळीत नाहींत. हे आपल्य स्वत:ला लेवा कणबी असें म्हणवितात. यांनां मुसुलमान म्हटलेलें खपत नाहीं. यांपैकीं हल्लीं पुष्कळ स्वामीनारायणपंथी बनले आहेत. यांच्या लग्नांत बोहालें किंवा होम वगैरे नसून वधूवरांच्यामध्यें एका चौरंगावर तीन दिवे ठेवितात. त्यांनां ब्रह्मा, विष्णु व महेश मानून त्यांच्यासमक्ष जातीचा मुखां (मुख्य) हा लग्न लावितो. या विधीला दुव असें म्हणतात. पाटहि याच रीतीनें लावतात. घटस्फोट फक्त नवर्‍यालाच करतां येतो. यांच्या देवळाला खान असें म्हणत असत परंतु हल्लीं ते धर्मशाळा म्हणूं लागले आहेत. या धर्मशाळेंत एका पाटावर एक मातीचा घट ठेविलेला असून त्यांत पिरान येथील माती व पाणी भरलेलें असतें. हे लोक प्रेतें पुरतात; जाळीत नाहींत. भाद्रपदमासीं इतर हिंदूप्रमाणें पितृपक्ष करितात. हे शाकाहारी असून मुसुलमानांबरोबर जेवीत नाहीत. रजपूत दर्जी व लोहार हे यांच्या हातचें खातात.

उदा.- उदा नांवाच्या एका भगताचे हे अनुयायी असल्यानें यांनां उदा असें म्हणतात. हे कबीरपंथी आहेत. या एकंदर गुजराथी कणब्यांची संख्या सव्वा नऊ लाख आहे. [बडोदा सेन्सस रिपोर्ट १९०१].

खानदेशी कुणबी.- यांच्यांत सात शाखा आहेत. (१) घाटोळे, हे अजंठाघाटावरून आले. हे तिरोळेबरोबर जेवतात पण लग्नें लावींत नाहींत. (२) लोणी, यांनां मूळचे रहिवासी (अनार्य) मानतात व ते गिरणा व तापी कांठीं रहातात. हे तिरोळे, पांजणे, गुजर व वाणी यांच्या हातचें खातात. मात्र आपआपल्यांतच लग्नें करतात. (३) कुंभार, ही शाखा फार थोडी व अतिशय दरिद्री आहे. (४) वंजारी, हे मूळचें चारण वणजारी जातींचे होते पण हल्लीं बरींच वर्षें त्यांनीं इकडे वस्ती करून व शेती करून आणि यांच्या चालीरीती उचलून स्वत:स कुणब्यांत गणून घेतलें आहे. (५) पांजणे, यांच्यांत चार पोटभेद आहेत ते कंडारकर, नवघरी, रेवे व थोरगव्हाणे हे होत. यांत मुख्य रेवेच असून बाकींच्या तिघांची उत्पत्ति भांडणतंट्यामुळें झाली आहे. सावदे तालुक्यांतील थोरगव्हाण या गांवचे ते थोरगव्हाणे व भुसावळ तालुक्यांतील कंडारीगांवचे ते कंडारकर होत. मुख्य जातींतून फुटलेल्या नऊ घरांच्या वंशजांपासून नवघरी निघाले. हल्लीं ते या जिल्ह्यांत सर्वत्र थोडथोडे आहेत. (६) तिडोळे किंवा तिरोळे, हे मूळचे उत्तर उत्तरहिंदुस्थानांतींल असून दादर पवार या जातीचे वंशज होत असें म्हणतात. (७) मदराज ही सातवी शाखा आहे. या सातीहि शाखा एकमेकांच्या हातचें खातात, पण आपलीच शाखा इतरांपेक्षां श्रेष्ठ आहे असें मानून परस्परांत लग्नें मात्र लावीत नाहींत. ज्ञानेश्वरींत ‘कुणबट कुळवाडी’ हा शब्द येतो.

वर्‍हाडी कुणबी.- मध्यप्रांतांत व वर्‍हाडांत यांची लो. सं. १४ लाखांवर असून गोंडाच्या खालोखाल यांचीच वस्ती त्या प्रांतांत फार आहे. हे गुजराथेंतून खानदेश व खानदेशांतून या प्रांतांत पुष्कळ वर्षांपूर्वीं आले (१४ वें शतक). मराठी राज्य झाल्यावर यांची भरती फारच झाली. इकडील कुणब्यांत पुढील शाखा आहेत. (१) झाडे, हे अगदीं प्रथम आलेले असून यांच्यांत गोंड रक्तांचें मिश्रण आढळतें. (२) मानवा, हे चांद्याकडे आढळतात, यांच्यांत माना लोकांचें मिश्रण सांपडतें. हे लग्नकार्यांत ब्राह्मणांस बोलावीत नाहींत. यांच्या बायकांचा पोषाख गोंड बायकांप्रमाणें असतो. (३) खैरे व (४) धानोरे (धनगरापासून झालेले) यांनां इकडे हलके समजतात. (५) तिरोळें, हे उच्च जातीचे असून यांच्यांतच देशमुखादि वतनदार आहेत. (६) छिंदवाड्यांत गाढव जातीचे कुणबी आहेत. हे पूर्वीं गाढवें पाळीत. नेमाडांत गुजर कुणबी आहेत. या कुणब्यांत लग्नप्रसंगीं न्हावी व धोबी यांचें फार महत्व असते. न्हावी वधूवरांचे पाय धुवून सर्व वर्‍हाडाला कुंकू लावतो.

तिरोळे जातींत हगरे, आगलावे वगैरे ६६ कुळें आहेत. नवरदेव लग्नास निघाला म्हणजे त्याच्या हातीं शिदोरी बांधलेली एक कुदळ असते. थाटाच्या लग्नास लालव्याह व गरीबीच्या लग्नास सफेदव्याह म्हणतात. नेमाडमधील कारवा कुणबी हेहि गुजराथी कुणब्यांप्रमाणें १२ वर्षांनीं एकदाच घरांतील व जातींतील सारीं लग्नें उरकून घेतात. सिंहस्थांतच लग्नें झालीं पाहिजेत असा त्यांचा नियम आहे. लग्नाच्या दिवशींच एखादी बाई बाळंत होऊन तिला मुलगी झाली तर त्या जन्मलेल्या मुलीचें लग्न तिच्या १२ व्या दिवशींच करतात. कुमारीनें व्याभिचार केल्यास प्रायश्चितानें ती शुद्ध होते. तिरोळ्यांत व वांदेकरांत राख ठेवण्याची चाल आहे. पाट लावण्याच्या वेळीं भावी वर आपल्या उजव्या पायानें चौरंगावर (विधवेच्या पहिल्या नवर्‍याच्या नांवानें) ठेवलेली एक सुपारी उडवितो व मग न्हावी ती अडकित्तानें फोडतो. यानें पहिल्या नवर्‍याच्या पिशाच्याचा कांहीं अडथळा होत नाहीं असें म्हणतात. मूल होईनासें झाल्यास यांच्या बायका अनेक जादूटोणे करतात. हे लोक प्रेतें जाळतात व पुरतातहि. विधवा आपलें मंगळसूत्र तोडते. मात्र १२ व्या दिवशीं पुन्हां बांगड्या भरते. पोळ्याचा सण हा यांच्यांत मुख्य आहे यांच्यांत मुसुलमानी चाली बर्‍याच शिरल्या आहेत. यांचीं घरें बहुधां कुडाचीं असतात. हे पावसाळ्याचे ४ महिने खेरीजकरून बहुधां नेहमीं शेतांत निजतात. हे मांसभक्षक आहेत. मध्यप्रांतांतील पोटजाती आपापसांत बेटीव्यवहार करीत नाहींत. [बाँबे ग्याझे. पु. १८ ट्राईब्स अँड कास्ट्स् ऑफ बाँबे व्हा. २; सी. पी. इ.]

माहिती संकलन  –

लेवा संस्कृती भाग २

Leave a Comment