महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

कवीराज भूषण

By Discover Maharashtra Views: 3417 8 Min Read

कवीराज भूषण –

कवीराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पराक्रमांचे वर्णन वीररसयुक्त व अलंकारयुक्त छंदातून केले व आपल्या तेजस्वी वाणीने शिवाजी महाराज्यांची महती गायली. मुसलमाणी पातशाह आणि मराठ्यांचा राजकीय आणि धार्मिक संघर्ष आपल्या काव्यातून कवि भूषण यांनी मांडला. भूषणांनी अनेक रजपुत राजे, औरंगजेब, कुतुबशाहा, आदिलशाहा , छत्रसाल यांच्यावरती काव्य केले. परंतु शिवाजी महाराज्यांवर काव्य करून ते संतुष्ट झाले. कवी भूषण १६७० साली रायगडावर आले व तीन वर्ष रायगडावर वास्तव्यास राहिले. मराठ्यांचा पराक्रमी जाज्वल्य इतिहास आपल्या अलंकारिक व विररसयुक्त काव्याने लिहून १ जून १६७३ रोजी “शिवभूषण“ नावाच्या ग्रंथाने इतिहासात अजरामर केला.

कवी भूषणांची जन्मतिथी , त्यांचे मूळ नाव व त्यांचा मृत्यू याविषयी इतिहास मौन बाळगतो . भूषण ही पदवी त्यांना चित्रकूट नरेशाकडून प्राप्त झाली व तीच त्याची ओळख बनली. कवी भूषणांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपुर जवळ यमुनातीरि असणार्‍या त्रिविक्रमपूर या गावी कान्यकुब्ज ब्राम्हण परिवारात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रत्नाकर त्रिपाठी. अकबराच्या दरबारातील नवरत्न असणार्‍या बिरबलाचे हे गाव. कवी भूषण यांना चिंतामणि , मतीराम आणी निलकंठ नावाचे तीन जेष्ठ भाऊ होते. कवी भूषणांनी भूषण हजारा , भूषण उल्हास आणी दूषण उल्हास या काव्य ग्रंथांची निर्मिती केली परंतु हे ग्रंथ काळाच्या उदरात कोठे गडप झाले याविषयी इतिहास मौन बाळगतो. कवी भूषणांनी उत्तर भारतातील वज्र या बोली भाषेत आपल्या छंदांनचि निर्मिती केली.

कवी भूषण हे निरक्षर होते तसेच आळशी , निरोद्योगी व ऐतखाऊ होते . त्यांचे बंधु चिंतामणि हे औरंगजेबाच्या दरबारात राजकवी म्हणून प्रसिद्ध होते. एके दिवशी भोजनाच्या वेळी त्यांनी आपल्या वाहिनीकडे मिठ मागितले तेव्हा त्यांच्या वाहिनीने “ मीठ मिळवण्याची अक्कल नाही व त्रासाठी मला त्रास देत आहात “ अश्या शब्दात त्यांचा अपमान केला. वाहिनीचे हे अपमानजनक बोलणे ऐकूण ते भोजनाच्या ताटावरून उठले व क्रोधाने प्रतिज्ञा केली “ आता मीठ कमावून आणेन तेव्हाच घरी येईन. त्याक्षणीच भूषणांनी घरादारचा त्याग करून देवी शारदेची खडतर उपासना करून तिला प्रसन्न केले. देवी शारदेच्या कृपेने त्यांची महती विद्वान व्यक्तींमध्ये गणली जाऊ लागली. कुमाऊं राज्याच्या दरबारी कवी भूषणांनी आपल्या विररस काव्याने कुमाऊं राज्यास संतुष्ट केले. राजाने त्यांच्या काव्यांवर खुश होऊन भरपूर द्रव्य दिले. कवी भूषणांनी या द्रव्याच्या साह्याने मिठाची खरेदी केली व बैलगाडीवरुन हे मीठ घेऊन घरी आले व आपली प्रतिज्ञा पूर्ण केली.

कवीराज भूषण हे स्वाभिमानी होते. एकदा त्यांनी कुमाऊंच्या राज्यावर स्तुतिकाव्य केले त्यांच्या स्तुतिकाव्यावर प्रसन्न होऊन राजाने त्यांना एक लक्ष रुपये ईनाम दिले व म्हणाला “एक लक्ष रुपये ईनाम कवीला देणारा दूसरा राजा या जगात मिळणार नाही.” राजाचे ते बोलणे स्वाभिमानी भूषणांस खटकले व त्यांनी एक लक्ष रुपये ईनाम नाकरले व राज्यास म्हणाले “एक लक्ष रुपये ईनाम कवीला देणारे राजे अनेक मिळतील परंतु “एक लक्ष रुपये ईनाम नाकारणारा दूसरा कवि मात्र मिळणार नाही”

कवीराज भूषण त्यांच्या काव्यांनी उत्तरेत प्रसिद्ध झाले. त्यांची प्रशंसा एकूण औरंगजेबाने त्यांना त्यांच्या चिंतामणि या भावाच्या मध्यस्थीने मुगल दरबारी बोलावले. एके दिवशी औरंगजेबाने दरबारातील सर्व कवींना प्रश्न केला “ तुम्ही माझी प्रशंसा करता , माझ्यामध्ये दोष नाहीत का व माझ्या दोषांचे वर्णन करणारा कोणी कवी दरबारात नाही काय ?” औरंगजेबाच्या दुष्ट व कपटी स्वभावामुळे सर्व कवी शांत राहिले . परंतु एक तरुण कवी उभा राहिला तो म्हणजे कवी भूषण व म्हणाला “शहेंनशहा स्तुति ईश्वरास देखील प्रिय आहे मग ती मानवास प्रिय असल्यास नवल ते काय ? तथापि दैवच्या चमत्कारिक गोष्टी देवही ललाटात झाकून ठेवतो. म्हणून आम्ही कवी मोठ्यांचा मोठेपणा जगासमोर मांडतो व त्यांच्या व्यंगाविषयी मौन धारण करतो. परंतु आपली आज्ञा झाल्याने मला उठावे लागले., दोष सांगणारे पुष्कळ सापडतील परंतु आपले दोष एकूण घेणारा कोणी मर्द सापडत नाही. आपण तयार असल्यास मी आपले दोष सांगावयास तयार आहे. औरंगजेबाने अनुमति देताच प्रथम अभय मागून घेतले व पुढील छंद म्हटला.

किबले की ठौऱ बाप बादसाह साहजहां ताको कैद कियो मक्के आगि लाई है / बडो भाई दारा बाको पकरि कै कैद कियो मेहर हू नाहिं माँ को जायो सगो भाई है / बंधु तौ मुरादबक्स बादि चूक करिबे को बीच दै कुरान खुदा की कसम खाई है / भूषण सुकबि कहै सुनौ नवरंगजेब एते काम कीन्हे फेरि पातसाही पाई है //

( स्वत:चे वडील हे काबाच्या दगडाप्रमाणे श्रेष्ठ असतात , ही गोष्ट औरंगजेब तू विसरलास आणि वडिलांना कैद केलेस. तुझे हे कृत्य मक्केला आग लावण्यासारखे आहे. स्वत:च्या मोठ्या भावास कैद केलेस तोदेखील तुझ्याच आईच्या पोटी जन्माला आहे हे तू विसरलास त्याच्याबद्दल तुझ्या मनात कोणतीही दया आली नाही. तुझा भाऊ मुराद यास कुराणाची शपथ घेऊन विश्वासघात न करण्याचे वचन दिलेस व वचन विसरून त्यास कैद केलेस. औरंगजेबा अशी कृत्ये करून तू बादशहा झाला आहेस. )

हाथ तसबीह लिए प्रात उठे बन्दगी को आपही कपट रूप कपट सु जप के / आगरे में जाय दारा चौक में चुनाय लिन्हो छत्रहू छिनायो मांनो मरे बुढे बाप के // कीन्हों है सगोत घात सो मैं नाही कहौं फेरि पील पै तोरायो चार चुगुल के गपके / भूषण भनत छठछांदि मति मंद महा सौ सौ चुहाई खायके बिलारी बैठी तप के //

( औरंगजेबा तू रोज सकाळी उठून ईश्वराचे स्मरण करतोस ते तुझे ढोंग आहे. तू फक्त कपटाचे एक रूप आहेस. आग्र्यातील चौकामध्ये तू दाराला चिणून टाकलेस, तुझ्या म्हातार्‍या आईवडिलांचे छत्र हिरावून घेतलेस. चुगलीखोर लोकांचे ऐकूण तू स्वत:च्या आप्तजनांना हत्तीच्या पायी दिलेस. तू धूर्त व कपटी आहेस. शेकडो उंदीर खाऊन तपश्चर्येला बसलेल्या बोकयासारखा बसला आहेस. )

भूषणांचे कटू बोलणे ऐकूण औरंगजेबाने स्वत:चे वचन विसरून भूषणांचा खून करण्यासाठी तलवार उपसली. परंतु दरबारातील सरदार व मानसबदार यांनी मध्यस्ती केल्याने भूषणांचे प्राण वाचले. मुगलांकडे वास्तव्य करणे जीवास धोकेदायक आहे हे ओळखून त्यांनी शिवाजी महाराज्यांच्या आश्रयास जाण्याचे निश्चित केले.

भूषण यांची शिवाजी महाराज यांच्याबरोबर भेट ही रायगडावरील वाडेश्वर मंदिरात झाली. महाराज्यांनी भूषणांशी ओळख झाल्यावर त्यांना छंद म्हणण्यासाठी विचारणा केली असता भूषणांनी पुढील छंद आपल्या खड्या आवाजात गायला.

इंद्रजिम जंभपर,वाढव ज्यो अंभ पर रावन सदंभ पर रघुकुल राज है /
पौन बारिबाह पर संभु रतिनाह पर ज्यों सहस्त्रबाहू पर राम द्विजराज है //
दावा दृमदंडपर चीता मृगझुंडपर भूषन वितुंड पर जैसे मृगराज है /
तेज तम अंसपर कान्ह जिम कंसपर यौ मलेच्छ बंस पर सेर सिवराज है //

( जसा इंद्र जम्भासुरावर , वडवानल ( समुद्रातील अग्नि ) सागरावरती जसे राम दांभिक रावणावर , जसा वारा पावसाने भरलेल्या ढगांवर , महादेव कामदेवावर , परशुराम सहस्त्रबाहुनंवरती , जंगलातील अग्नि वृक्षांवर , चित्ता हरणांच्या कळपांवर , सिंह हत्तीच्या कळपांवर तुटून पडतो. जसे प्रकाशाचे किरण काळ्याकुट्ट अंधाराचा विनाश करतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज म्लेंछानवरती तुटून पडतात व त्यांचा विनाश करतात. )

वरील छंद ऐकून महाराज्यांसाहित सर्व मावळे रोमांचित झाले. सर्वांच्या विंनंतीवरून त्यांनी तो छंद १८ वेळा गायला अखेर कवि भूषण यांना थकवा आला व ते मौन झाले. त्यावेळी महाराज्यांनी कवि भूषणांना आपली खरी ओळख करून दिली व म्हणाले तुमचे काव्य ऐकून आम्ही मनाशी निश्चय केला तुम्ही जितक्या वेळा हे काव्य ऐकवाल तितके लक्ष मुद्रा, गाव व हत्ती आपणास ईनाम देवू त्याप्रमाणे महाराज्यांनी कवि भूषणांस ईनाम दिले व राजकवी म्हणून दरबारी नियुक्त केले.

छत्रसाल राज्याने भूषणांची पालखी स्वत:च्या खांद्यावर घेतली अशीही आख्यायिका आढळून येते. कवीराज भूषणनी छत्रपती शाहू महाराजथोरले बाजीराव पेशवे यांच्यावर केलेले छंद आढळून येतात त्याधारे त्यांचा मृत्यू १७३५ च्या दरम्यान झाला असावा असा कयास बांधता येतो.

संदर्भ :- शिवभूषण :- निनाद बेडेकर.
शिवराज भूषण :- केदार फाळके.

श्री नागेश मनोहर सावंत.

Leave a comment