महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

कमलादेवी | बादशाही जनानखान्यातील स्त्रियांपैकी एक

By Discover Maharashtra Views: 2439 11 Min Read

बादशाही जनानखान्यातील कित्येक स्त्रियांपैकीच एक: मी कमलादेवी –

संध्यासमयी अजाण सूर पश्चात, आपोआप पाय आता स्नानगृहाकडे वळू लागली.. तद्नंतर होणाऱ्या साजशृंगारातही मन आता रमू लागले.. कदाचित मला या अफाट वैभवाची भूरळ पडली असावी, त्यापेक्षा आता हेच माझे जीने, जीने कसले फक्त वाहणे,प्रवाह जिकडे नेईल तिकडे वाहने असा जणू मी चंगच बांधला होता.. कित्येक निरुत्तरीत प्रश्नलहरी समीप यायच्या, पण उत्तरे ती कोणाकडे मागायची?? ईश्वराकडे की अल्लाह कडे?? कर्णदेवाकडे की बादशहाकडे??? नेमकी कोणाकडे मागायची????(कमलादेवी)

विचारांच्या तंद्रीत असताना च,सेवकाकरवी वार्ता आली की, सोमनाथाचे मंदिर पुनश्च लूटले गेले,सारी लूट घेऊन बादशाही फौजा दिल्ली कडे कूच करत आहेत.. तो वार्ता देऊन ही गेला, पण मी मात्र अजूनही कसल्यातरी अंधुक तिमिरात चाचपडत होते, या वार्तेवर प्रतिक्रिया तरी काय द्यावी सोमनाथा!!!???

तुला ही लुटले.. आता कोण माझा पाठीराखा.. कोणाकडे याचना करावी?? कोणाकडे दाद मागावी?? अस म्हणतच माझा देह मी जमिनीवर टाकला.. मनातल्या अस्पष्ट वेदना स्पष्टपणे जाणवू लागल्या..मन आक्रंदू लागलं, विव्हळू लागल.. शेवटी संयमाचा तो बांध..सुटणारच… डोळ्यांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली मात्र माझ्या जगण्याला नवी वाट करून देणारा च आज पुनश्च लूटला गेला.. असंख्य वेदना मनी डसत होत्या, प्रथम: च मला मी अजूनही जिवंत असल्याची जाणीव झाली…होय खरोखरच मी जिवंत होते..मी जिवंत होते ते माझ्या सोमनाथासाठी… माझ्या चिमुकल्या देवलसाठी.. माझ्या कर्णदेवासाठी…. आसवं ढाळतच मी भूतकाळाच्या दालनात डोकावल.. अन् कित्येक स्मृतींना उजाळा दिला..

सहा मासापूर्वी मी दिल्लीत आलेली.. नव्हे आणली गेलेली.. बादशाही जनान्यातल्या कित्येक  स्त्रियांपैकीच एक.. “अनहिलवाड नरेश कर्णदेवाची पत्नी मी कमलादेवी”.. खरोखरच किती सुरेख दिवस होते ते.. सतत दरबारी कामकाज, मोहिमांत धावणाऱ्या माझ्या स्वारींची पावलं,माझ्या येण्याने आता महालातच घुटमळू लागली होती.. विवाहापश्चात माझ्या जगण्याला एक अनोखे रुपच आले म्हणायचे, स्वारींच्या प्रेमात जणू मी दररोज नव्याने पडायचे.. काही काळानंतर, माझ्या प्रेमवेलीवर एक नाजूक फुल बहरलं, ती माझी “देवल”.. खरोखरच अत्यानंद झाला होता स्वारींना.. अक्षरश:त्यांनी साऱ्या अनहिलवाड मध्ये सेवकाकरवी मिठाई वाटली होती.. सारा महाल देवू च्या पैंजणाने दुमदुमायचा… तिच्याशी खेळताना स्वारी स्वतः च अगदी लहान मूल होऊन जायची.. देवू ला घोडेस्वारी भलतीच आवडे, अाणि……….

त्या दिवशी ही देवल घोडेस्वारी चा हट्ट धरून बसली होती… त्यामुळे मी एकटीच स्वारींचा निरोप घेऊन, सोमनाथाच्या दर्शनास निघाले.. तत्क्षणी यत्किंचितही मनास वाटले नव्हते की स्वारींचा तो निरोप अखेरचा ठरेल.. किंतु काळाच्या मनात भलतेच म्हणायचे!!  सोमनाथाच्या दर्शनाहून येताना संध्या समय नुकताच झालेला होता, मात्र रस्त्याने एक चिटपाखरु ही दिसत नव्हते.. अनहिलवाड मध्ये प्रवेश करुनही कसलाच मागमूस दिसत नव्हता.. तत्कारणे मी भोईंना थांबवून तसदी घ्यावी म्हणनार तितक्याच समोरुन येणाऱ्या मुसलमानी फौजांच्या टापा भोईसमक्ष थांबल्या आणि त्यांनी क्षणार्धात माझ्या सोबत असणाऱ्या सर्व सैनिकांना जमिनदोस्त केले, आणि माझ्या असह्यतेचा फायदा घेऊन, त्या सरदारांनी त्यांच्या प्रचंड लुटीसमवेत माझा ही नजराणा बादशाही तख्तास पेश केला.. तत्तसमयी मी जोरजोरात आक्रोश करीत होते, सुटकेची याचना करत होते, मात्र माझे स्वर त्या भयान काळोखात विरून जात होते.. ऊन, वारा, पाऊस, दिवस, रात्र अशी आवर्तन येत जात अखेरीस दिल्ली आली.. मरणाला कवटाळण्याइतके धैर्य नसल्याने फक्त पाहत राहायचे, येईल त्या परिस्थितीला सामोरे जायचे, इतकेच मनी ठरवून मी दिल्ली निरखत होते.. उंचच उंच इमारती, महाल, मस्जिद अजानचे सूर कानी पडत होते.. हीच ती दिल्ली तिच्याविषयी बालपणी ऐकले होते, मात्र इथे येण्याची अशी वेळ येईल अस स्वप्नात सुद्धा चिंतले नव्हते..

केवढे हे प्रचंड वैभव!… मोठमोठी दालन… त्यास लांबच लांब तलम पडदे.. ठिकठिकाणी रम्य उद्याने, जलक्रीडेस्तव बनविलेले कृत्रिम तलाव, त्यात उमललेले कित्येक कमलपुष्पं.. माझी रवानगी ही अश्याच एका भव्य महाली केलेली, सेवार्थ कायम एक तृतीयपंथी.. तोच माझ्या सुख दु:खाचा भागीदार… ना स्त्री ना पुरुष… ना वासना ना आसक्ती.. या सर्वांच्या पलीकडे असलेला तो जीव केविलवाण्या नजरेने माझी होरपळ तगमग पाहायचा.. मात्र शेवटी तो धन्याचा चाकर.. त्याच्या तरी हाती काय होते, अन् माझ्या तरी हाती आता काय होते… फक्त पाहत राहणे, दैव जिकडे नेईल तिकडे जाणे…

बादशाही जनान्यात माझ्या सारख्याच कित्येक स्त्रिया होत्या, त्यात आता माझी ही नव्याने भर.. मन अगदी भरून यायच देवल, कर्णदेवाच्या आठवणीने.. मला या जीवघेण्या विळख्यातून वाचवायला कर्णदेव आणखी कसे आले नाहीत?? हा प्रश्न नेहमी मनास डंख द्यायचा.. शेवटी हा प्रश्नच हवेत विरला.. जेव्हा माझ्या कानी पडले, “एक बार गनिमोंके पास रहकर आई हुइ औरत परायी मानी जाती है, चाहे वो किसीकी बेटी हो या बेगम, उसे दोबारा मूडकर भी नही देखते ये हिंन्दूस्तानवाले”…. आणि अखेरीस माझा उरलासुरला धीर ही विरला.. तत्क्षणी मनी एक कटुसत्य रुजल, “आशेत जस सुख साठवल असतं, त्याप्रमाणे दु:ख ही गोठवलेल असतं”…

अखेरीस तो दिवस उजाडला… “अनहिलवाड महाराणी कमलादेवी” आणि “दिल्ली तख्ताधिश सुलतान अल्लाउद्दीन खिल्जी” यांचा विवाह सोहळा.. सारी दिल्ली नव्या नवरीगत सजली होती.. चोहीकडे रोशनाई, दावत मैफिली अगदीच जय्यत तयारी.. हा सगळा उहापोह कशासाठी? तर फक्त हिंदू राणीच्या उपयोगासाठी,कारण ते जाणून होते की, हिंदू स्त्रिया विवाहाशिवाय स्वत:ला समर्पन करीत नाहीत, तत्कारणे चालणारा त्यांचा काही लाखांचा हा चुराडा.. हीच खरी व्याख्या होती विवाहाची..

अखेर तो क्षण आलाच, रात्र गडद झाली मात्र गहीरी नाही.. अलंकार आभूषणांनी मी अगदी गुदमरून गेलेली,सारी दिल्ली शांत झोपेत होती. दालनातील दिवे ही विझले होते, आणि माझा देह बादशाहाच्या स्वाधीन केव्हाच झाला होता.. म्हटलं तर बलात्कार.. म्हटलं तर कर्तव्य.. विवाहापश्चात प्रत्येक स्त्री चा स्वसमर्पन हा भाव च आहे, तिच्या मनात असो नसो, त्याची तसदी इथे घेतली जात नाही…. पूर्वी कर्णदेव आता अल्लाउद्दीन.. काय फरक आहे दोघात?? दोघे ही पुरुष.. दोघांना ही मी हवी होते.. नव्हे शरीर हवे होते.. आणि ते मिळाले ही.. अशा कित्येक रात्री गेल्या..सवयच झाली अश्या जीण्याची.. डोळे ही आसवं ढाळून रिते झाले.. मन ही पाषाणासम झाल, अन् रोजचं च जीण मी अंगवळणी केल.. सुंदर नक्षीदार घागरा चोली त्यागून आता मुसलमानी पेहराव सलवार कमीज आपलासा केला.. केला नव्हे, करण्यास भाग पाडला.. रित च म्हणावी ती..

दिवसापासून दिवस जात होते, तशी मी ही रुळले होते, परंतु मनाचा एक कोपरा अजूनही माझ्या देवलसाठी, कर्णदेवासाठी, माझ्या सोमनाथासाठी जिवंत होता.. तत्कारणे च मला आज आसवं अनावर झाली, अन् माझा हा अतीत डोळ्यासमोरून तरळला…. बराच वेळ जमिनीवर पडून आसवं ढाळत असल्याने, माझ्या सेवार्थ रुजू असलेला तृतीयपंथी जवळ येऊन समजुत घालत होता, त्याच्या समजूतीला काळजीचा आर्त स्वर होता.. खरोखरच तो एकटाच व्यक्ती या सल्तनतीत माणूस म्हणून कमावला!!

एका बादशाही सरदाराने हजार नाण्यावर आणलेला गुलाम मलिक काफूर.. त्याच्या येण्याने बाहशहा माझ्या महाली येण्याचेच विसरले.. स्वत:तसदी घेतली, अन् पायाखालची जमिनच सरकली.. इस्लामी राज्यकर्त्यांच्या अशा शौकाविषयी फक्त ऐकले होते, मात्र आज डोळ्यांनी ही अनुभवले..कालांतराने, चित्तोड महाराणी पद्मिनी बद्दल ऐकताच बादशहाने चित्तोड मोहीम आखली, परंतु महाराणी पद्मिनी ने मोठ्या धिटाई ने अनेक दास्यांसहीत जोहर केला..त्यामुळे विजय जरी बादशाही फौजांचा जाहला, तरी अपयशाची ती सल त्यांना कायम डिवचत असे.. पद्मिनी च्या जोहर बद्दल ऐकून मन सुन्न व्हायच.. खरेच की सुटली ती… माझ्यासम रोज मरण्यापेक्षा हे उत्तमच म्हणावे..

एके रात्री का कोणास ठाउक,बादशहाने मला देवलला सोपवण्याचे वचन दिले.. त्या केवळ शब्दानेच माझे अंग अंग मोदाने शहारले.. कित्येक सुखद लहरी अंगाला भिनभिनत होत्या.. माझी देवू.. माझी मुलगी.. कशी दिसत असेल ती???… ओळखेल का मला? मी अशी प्रश्नावली सोडवत बसलेली पाहून बादशाहा स्वत:हसू लागले..

कर्णदेवाने देवलचा विवाह देवगिरीकर रामचंद्रराय यांच्या पुत्राशी करण्याचे योजिले होते.. मात्र तिस बादशाही सरदारानी हेरले, अन् दिल्ली रवाना करण्याचे योजिले.. देवल येणार ही बाबच मला प्रफुल्लित करणारी होती, तिच्या येण्याने माझ्या अशा जिण्यास नवा अर्थ येणार होता.. बऱ्याच काळानंतर मला “माँ” अशी साद मिळणार होती.. अखेरीस माझी देवू आली, आणि माझ्या वात्सल्याचा बांध सुटला.. तिला घट्ट मिठी मारून मी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.. अठरा वर्षे झाली होती तिला पाहून, खरोखरच किती सुरेख दिसत होती ती.. देवू च्या येण्याने मला मात्र आकाश ठेंगणे वाटू लागले..

बादशहाची संतती आता विवाह योग्य झाली होती, तरी देखील बादशाहने आणखी एक विवाह केला, तो देवगिरीकर रामचंद्रराय यांची कन्या झत्यपाली शी.. तिचे वय ही बहुधा माझ्या देवल एवढेच होते.. स्वत:च राज्य वाचवण्यासाठी देवगिरीकर मुलीचाच व्यवहार करताना दिसले.. एके रात्री बादशाहा प्रचंड नशेत होते, कित्येक मद्याचे प्याले त्यांनी रिते केले होते, तत्तक्षणी त्यांची नजर माझ्या देवलवर पडली.. त्यांच्या त्या नजरेत अस्पष्टशी वासनेची लहर दिसली, अन् खरोखरच धिक्कार आला त्या वासनांध नजरेचा.. तत्तक्षणी मी देवू च्या विवाहाचा निर्णय घेतला, बादशाहा चा महीरू पासून झालेला मुलगा “खिज्रखान” आणि माझी “देवल”यांच्या प्रितीची अस्पष्ट चाहूल मला पूर्वीच लागलेली, तत्कारणे मी ही या विवाहास मान्यता दिली.. पुढे खुस्रो नी त्यांच्या प्रेमावर ” आशिया”नावाच काव्य लिहिलं.. देवू अन् खिज्रखानाच्या आशिकीतील दिवानगी साऱ्या सल्तनीत नव्हती, हीच माझ्यासाठी अतिसुखद बाब होती..

आयुष्याच्या उत्तरार्धात बादशाहाला कसलातरी ज्वर जडला.. मलिक बहुधा विषकन्येची नशा करवत होता, अश्या अफवा ही पसरत होत्या.. बादशहा मृत्यू च्या शय्येवर आहे तोवरच तख्तासाठी आपापसांत वाद होत होते, त्यात राजकारणाची सुत्रे मलिक काफूर कडे होती.. असेच दिवस जात होते, अन् अखेरीस एवढ्या प्रचंड वैभवाचा स्वामी, दिल्ली तख्ताधिश सुलतान अल्लाउद्दीन खिल्जी अनंतात विलीन झाला.. सारी दिल्ली दु:खात न्हावून गेली.. माझ्या ही कानी वार्ता आलीच.. मन अगदी बधीर झालं.. बादशाहा गेले म्हणून रडावं, की मी सुटले म्हणून हसावं ? खरोखरच नियती अमाप खेळवते, सुन्न होउन मी पडले.. डोळ्यावरून हात फिरवला, मात्र डोळे तर लख्ख कोरडे.. माझ्या ही मनास उमजेना, की आपण खरेच विधवा झालो ?? यापूर्वी खरेच का सधवा होतो?? अशा कित्येक निरुत्तरीत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा निष्फळ प्रयत्न करत मी डोळे मिटले, ते नंतर कधीच न उघडण्यासाठी.

शब्दांकन – Shrimala K. G.

Leave a comment