तीन श्रेणींचा खान

By Discover Maharashtra 4 Min Read

तीन श्रेणींचा खान –

तीन श्रेणींचा खान हि पदवी कोणात्याही सरदारास किंवा कोणत्याही व्यक्तीस नसून एक कुत्र्यास होती. मुसलमानी परंपरेत कुत्र्यास नापाक म्हणजे अपवित्र समजले जाते . परंतु ह्या कुत्र्याने मुगल सैन्यापासून गोवळकोंड्याचे रक्षण केले त्यानिमित्ताने गोवळकोंड्याचा सुलतान अबुलहसन याने एका कुत्र्याचा सत्कार करून त्यास तीन श्रेणींचा खान अशी पदवी दिली.

७ फेब्रुवारी १६८८ रोजी आलमगीर औरंगजेबाने गोवळकोंड्याच्या किल्यास वेढा दिला होता. गोवळकोंड्याच्या किल्यातून सतत तोफांचा मारा चालू होता. त्यामुळे मोगल सैन्याची दरोरोज जीवितहानी होत होती. मृत्यू पडलेल्या सैनिकांची व जखमी सैनिकांची आकडेवारी रोज वाढत होती. गोवळकोंड्याच्या किल्याच्या सभोवती संरक्षणाची व्यवस्था म्हणून खोल खंदक खोदण्यात आले होते त्यामुळे मोगली सैन्य पुढे सरकू शकत न्हवते . तीन महिने वेढा चालवून देखील मोगल सैन्यास अपेक्षित यश मिळत न्हवते. मोगल सरदार साफ शिकान खान याने मोगली सैन्यास गोवळकोंड्याच्या किल्यावर हल्ला करण्यासाठी पुढे कूच करता यावी म्हणून हे खंदक भरून काढण्याची योजना तयार केली परंतु ह्या योजनेस वेळ लागणार होता.

मोगलांचा प्रमुख सरदार फिरोज जंग याने गोवळकोंड्यावर विजय मिळवण्यासाठी एक धाडसी योजना तयार करून अंमलात आणली. १६ मे रोजी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत किल्यावरील पाहरेकरी झोपलेले असताना किल्ला चढून जिंकण्याचा त्याने निर्णय घेतला. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सरदार फिरोज जंग आपल्या छावणीतून कोणासही आपल्या योजनेचा थांगपत्ता लागू न देता बाहेर पडला. आधीच हेरून ठेवलेल्या किल्याच्या बुरुजापाशी येऊन त्याने किल्याच्या तटास शिडी लावली व प्रथम दोन मोगल सैनिक त्या शिड्यांच्या साह्याने वर किल्यावर चढले व व इतर सैन्यास किल्यावर येण्यासाठी त्यांनी किल्ल्यावरून दोरखंड खाली फेकले. मोगल सैन्याचे दुर्दैव इथे आडवे आले. मोगल सैन्य त्या दोरखंडाच्या साह्याने वर येण्यास सुरवात करणार इतक्यात किल्यावरील एक बेवारस कुत्रे अनोळखी व्यक्ती पाहून जोरजोराने भुंकू लागले. कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने पहाऱ्यावरील कुतुबशाही सैनिक जागे झाले व त्यांनी किल्यावर चढून येणाऱ्या मोगल सैन्याचा हल्ला परतवून लावला.

कुत्र्याने गोवळकोंड्याच्या किल्याचे रक्षण करून कुतुबशाहिचे रक्षण केले होते. गोवळकोंड्याचा सुलतान अबुलहसन याने त्या कुत्र्याचा जाहीर सत्कार करून त्यास “तीन श्रेणींचा खान” म्हणजे तीन पदव्यांचा सरदार अशी पदवी दिली. कुत्र्यास हिरेजडीत गळ्यातील पट्टा , सोन्याची साखळी व अंगात घालण्यासाठी जरीकाम केलेला अंगरखा भेट स्वरुपात दिला. मोगलांचा प्रमुख सरदार फिरोज जंग यास औरंगजेबाने “ खान “ , “ बहादूर “ आणी “ जंग “ अश्या तीन पदव्या बहाल केल्या होत्या. अश्या मोगली सरदाराचा पराभव ह्या कुत्र्यामुळे झाला होता. त्यामुळे त्याचा अपमान व टिंगल करण्यासाठी सुलतान अबुलहसन याने त्या कुत्र्यास “तीन श्रेणींचा खान” अशी पदवी देवून “ फिरोजजंग सारखाच मोठा प्रराक्रम ह्या कुत्र्याने केला असून तो योग्यतेने फिरोजजंगपेक्षा कमी नाही “ अश्या विनोदी शैलीत मोगलांच्या प्रमुख सरदाराचा अपमान केला.

गोवळकोंड्याचा सुलतान अबुलहसन याच्या या विनोदी शैलीचे आणखी एक उदाहरण म्हणजे औरंगजेबाच्या वकीलाने सुलतान अबुलहसन यास भर दरबारात बादशहा म्हणण्यास नकार दिला. कुतुबशाहने त्या वकिलास सुनावताना सांगितले तुझ्या बादशाहाला स्वतःला “ बादशाहोंका बादशहा म्हणवून घेण्यास आवडते . त्यासाठी तरी तुला मला बादशहा म्हणावेच लागेल. कारण हिंदुस्थानात आता तो आणि मी असे दोघेच बादशहा उरलो आहोत. “

संदर्भ :- औरंगजेबाचा संक्षीप्त इतिहास :- डॉ . जदुनाथ सरकार.
औरंगजेब शक्यता आणि शोकांतिका :- रवींद्र गोडबोले.

नागेश सावंत

Leave a comment