सर्वतीर्थ टाकेद येथील प्रसिद्ध जटायू मंदिर –
सर्वतीर्थ टाकेद येथील प्रसिद्ध जटायू मंदिर हे प्राचीन मंदिर जटायूचे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. तसेच हे धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असलेले तीर्थक्षेत्र आहे. याच ठिकाणी श्रीरामाने जमिनीत बाण मारून जटायूसाठी गंगेचे पाणी आणल्याची समजूत प्रचलित आहे. तेव्हापासून हे ठिकाण ‘सर्वतीर्थ टाकेद’ या नावाने ओळखले जाते…
पुराणातील कथेनुसार, जटायूला गंगेचे पाणी पाजण्यासाठी म्हणून श्रीरामाने जमिनीत बाण मारून गंगेचे पाणी आणले आणि ते जटायूला पाजले. हे पाणी प्यायल्यानंतर जटायूने श्रीरामाच्या मांडीवरच प्राण सोडला. श्रीरामाने बाण मारल्यापासून पाण्याची अखंड धार या ठिकाणी सुरू असल्याचे मानले जाते. ही घटना नाशिक जिल्ह्यातील टाकेद येथे घडली आणि रामाने पृथ्वीवरील सर्व तीर्थांचे पुण्य सामावलेले पाणी येथे आणले. त्यामुळे येथील कुंडाला ‘सर्वतीर्थ’ असे नामाभिधान प्राप्त झाले…
एका खांबावर जटायूचे मोठे शिल्प आहे आणि त्यासमोर मंदिर आहे. छोटेखानी असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारावर रक्षकांच्या प्रतिमा आहेत. मंदिरात प्रवेश केल्यावर श्रीराम आणि श्रीरामाच्या मांडीवर प्राण सोडणाऱ्या जटायूच्या मूर्ती पाहावयास मिळतात. जटायू मंदिराच्या समोरच सर्वतीर्थ महाकुंड आहे. या कुंडात स्नान करण्यासाठी व येथील तीर्थ घेण्यासाठी शेकडो भाविक दररोज या ठिकाणी येतात. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात श्रीराम, श्रीदत्त, श्रीशंकर आणि श्रीहनुमान यांची मंदिरे आहेत. येथे जटायू मंदिराच्या बाजूला एक शिवपिंड आहे. या शिवपिंडीच्या मधोमध गोलाकार खड्डा असून जमिनीच्या आत, एका हाताच्या अंतरावर शिवलिंग आहे…
माहिती : टाकेद तीर्थक्षेत्र संस्थान.
