तृतीय छत्रपती राजाराम महाराज

तृतीय छत्रपती राजाराम महाराज

तृतीय छत्रपती राजाराम महाराज

लोकराजा ही पदवी मिळालेल्या कर्तुत्ववान पित्याचे हे पुत्र.म्हणजेच राजर्षि शाहूमहाराज यांचे जेष्ठ चिरंजीव.राजर्षि शाहूंमहाराजानंतर कोल्हापूरच्या गादीवर ,त्यांचे पुत्र तृतीय छत्रपती राजाराम महाराज बसले.

छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म ३१ जुलै १८९७ रोजी झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी म्हणजे १९१२ मध्ये राजाराम महाराज आणि त्यांचे धाकटे बंधू प्रिन्स शिवाजी यांना शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविण्यात आले होते. इंग्लंडमध्ये असतानाच पहिले महायुद्ध सुरू झाले त्यामुळे १९१५ मध्ये त्यांना भारतात परत यावे लागले. अलहाबादच्या यंग ख्रिश्चन कॉलेजमध्ये शेतीविषयक अभ्यास करण्यासाठी त्यांना पाठविण्यात आले होते .तेथे ते एक वर्ष होते .अशाप्रकारे राजाराम महाराजांना परदेशातील शिक्षणाचा इंग्लंड, अमेरिका व जपान या प्रमुख देशांच्या प्रवासाचा आणि आपल्या देशातील एका प्रमुख शेती शास्त्राच्या महाविद्यालयातील अभ्यासाचा लाभ मिळाला.

युवराज राजाराम महाराजांचा विवाह १९१८ मध्ये बडोदे संस्थांनचे अधिपती सयाजीराव गायकवाड यांची नात ईंदुमती राणीसाहेब यांच्याशी १९१८ मधे झाला. राजाराम महाराजांचा द्वितीय विवाह १९२५ मध्ये तंजावरचे अमृतराव मोहिते यांच्या कन्या राजसबाई यांच्याशी कोल्हापूर येथे झाला.

छत्रपती राजर्षि शााहूमहाराजांचे सामाजिक सुधारणेचे कार्य राजाराम महाराजांनी पुढे चालू ठेवले.समाजातील मागासलेल्या लोकांची सुधारणा घडवून आणणे आणि शिक्षणाचा प्रसार करणे या दोन्ही कामांची त्यांना आवडत होती. १९२२ मध्ये सातारा येथे भरलेल्या बहूजन सामाजिक परिषदेचे अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. तसेच बेळगाव येथे अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे ते अध्यक्षही झाले.आणि अमरावती येथे अखिल भारतीय बहुजन सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होऊन महाराजांनी सामाजिक व शैक्षणिक कार्य चालू ठेवले .

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजहिताची कामे करणाऱ्या राजाराम महाराजांनी अनेक मोठमोठी कार्य पार पाडली . छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरणाचे बांधकाम सुरू केले होते ते बांधकाम शाहू महाराजांच्या पश्चात पूर्णत्वास नेण्याचे मोठे काम राजाराम महाराजांनी केले.आजही सुजलाम-सुफलाम असलेल्या कोल्हापूरची बीजे जणू राजर्षि शाहूराजांनी रोवली आणि त्यास वाढविण्याचे, राखण्याचे कार्य राजाराम महाराजांनी केले. समाजातील मागास असलेल्या लोकांची सुधारणा घडवून आणणे आणि शिक्षणाचा प्रसार करणे या दोन्ही कामाची त्यांना आवड होती. महाराजांच्या कारकीर्दीतच कोल्हापूरच्या प्रजाजनांना प्राथमिक स्वरूपाचे काही नागरी हक्क देण्यात आले. त्याचा एक महत्वाचा भाग म्हणून १९२५ मध्ये कोल्हापूरची नगरपालिका लोकनियुक्त केली. त्यानंतर दोन वर्षांनी इलाखा पंचायतीची स्थापना करण्यात आली. प्राथमिक शिक्षण ,देवस्थाने ,आरोग्य, दळणवळणाचे मार्ग इलाखा पंचायतीकडे देण्यात आले. १९३१ साली राजाराम महाराजांनी तीन न्यायमूर्तीचे एक स्वतंत्र हायकोर्ट व त्यावर अपील कोर्ट स्थापन केले.

आपल्या संस्थानात सामाजिक सुधारणा घडून यावी व व्यापार उद्योगधंदे वाढावे या हेतूने छत्रपती राजाराम महाराजांनी काही महत्त्वाच्या सुधारणा घडवून आणल्या. त्यासाठी जरूर ते कायदेही केले. बालविवाह प्रतिबंधक कायदा त्यांच्याच कारकिर्दीत करण्यात आला.अस्पृश्योद्धोर आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे काढून शिक्षणाला प्रोत्साहन देणे यासाठी राजर्षि छत्रपती शाहूमहाराजांच्या काळात सुरू झालेली महत्त्वाची कामे छत्रपती राजाराम महाराजांनी पुढे चालू ठेवली. शाहूपुरी व जयसिंगपूर या पेठा वाढविल्या. लक्ष्मीपुरी, ताराबाई पार्क व राजारामपुरी या नव्या वसाहती स्थापन केल्या. पाणीपुरवठ्याची योजना ,राजाराम तलाव ,कोल्हापूर येथील साखर कारखाना इत्यादी बर्याच लोकोपयोगी कामांना त्यांनी चालना दिली. राधानगरी येथे वीज उत्पादनाची योजना आखण्यात आली. सक्तीचे मोफत शिक्षण व स्त्रियांचे उच्च शिक्षण यांना प्रोत्साहन दिले. बनारस विद्यापीठाला एक लाख रुपयांची देणगी देऊन छत्रपती राजाराम महाराजांनी देशातील एका मोठ्या शिक्षण संस्थेला सहाय्य केले.

कोल्हापूरला १९३५ साली महाराष्ट्र साहित्य संमेलन भरले होते.त्याचे उदघाटन छत्रपती राजाराम महाराजांच्या हस्ते झाले.
छत्रपती राजाराम महाराज अश्वपरीक्षेत निपुण होते. घोड्यांच्या शर्यतीचा त्यांना शोक होता. शाहूमहाराजांप्रमाणे चिता हंटिंग ( चित्याकडून हरणाची शिकार ) व पीग स्टिकींगचीही (घोड्यावरून भाल्याने रानडुकराची शिकार) त्यांना आवड होती. कोल्हापूर संस्थानात या व अशाच विविध खेळांना प्रोत्साहन मिळत असल्यामुळे संस्थान त्या काळी क्रीडाविषयक कामगिरीबद्दल भारतात नावाजले गेले होते. मल्लविद्या ही तर त्याकाळी कोल्हापूरची खास विद्या मानली जात होती. देशातील अनेक विख्यात कुस्तीगीरांचे हे शहर आश्रयस्थान होते. राजाराम महाराजांनी इतर विविध खेळांनाही उत्तेजन देऊन या शहराचे वैशिष्ट्य कायम ठेवले.

२२ नोव्हेंबर १९४० रोजी छत्रपती राजाराम महाराज यांच्या हस्ते गाॅल्हेर येथे कै. श्रीमंत माधवराव शिंदे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले.गाॅल्हेरहून परत येत असताना मुंबईत छोटीशी शस्त्रक्रिया होऊन तेथेच त्यांचे २५ नोव्हेंबर १९४० रोजी निधन झाले.

लेखन डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here