इचलकरंजी संस्थान

इचलकरंजी संस्थान | echalkaranji sansthan

इचलकरंजी संस्थान…

स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांना शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी दिलेली जहागिर म्हणजे इचलकरंजी प्रांत होय. संताजींच्या पदरी नारो महादेव नावाचा एक कोकणस्थ ब्राह्मण मुलगा आश्रित म्हणून राहिला होता. या मुलास संताजी पुत्रवत मानत असत त्यामुळे त्यांनी इचलकरंजीची जहागिर नारो महादेवास प्रदान केली. नारो महादेवानेही ब्राह्मण असून देखील सेनापती संताजींचे “घोरपडे” आडनाव धारण केले. पुढे स्वराज्याच्या विभाजनानंतर इचलकरंजी जहागिर कोल्हापूर छत्रपतींच्या अंमलाखाली आली मात्र इचलकरंजीकर घोरपड्यांनी छत्रपतींच्या चरणी आपली स्वामीनिष्ठा कधीच दर्शविली नाही.

करवीरचे पहिले छत्रपती संभाजी महाराज यांचे काळापासून सदैव इचलकरंजीकर घोरपड्यांनी छत्रपतींना उपद्रव देण्याचेच धोरण अंगिकारले. छत्रपतींशी उघडपणे लढण्याइतपत घोरपडे प्रबळ नव्हते. थोरले बाजीराव पेशवे यांची बहिण “अनुबाई” ही इचलकरंजीच्या व्यंकटराव घोरपड्यांची पत्नी होती. अर्थातच या निकटच्या नातेसंबंधांचा गैरवापर करुन पेशव्यांच्या सहाय्याने वारंवार घोरपडे छत्रपतींच्या प्रदेशावर हल्ले करायचे. घोरपड्यांचा बिमोड करुन या प्रकरणाचा निकाल लावण्याच्या हेतूने महाराणी जिजाबाईंनी मोहिम उघडली. महाराणींच्या फौजेपुढे घोरपड्यांचे “पानिपत” झाले. जिजाबाईंनी इचलकरंजी जहागिर व घोरपड्यांचा सरंजाम जप्त केला. तेव्हा घोरपडे गडावर येऊन महाराणींना मुजरा करुन माफीची याचना केली. पुढे छत्रपती संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर अनुबाई घोरपडे या कारस्थानी बाईने पेशव्यांच्या संगनमताने कोल्हापूर राज्य जप्त करण्याचे षड्यंत्र रचले होते मात्र महाराणी जिजाबाईसाहेबांनी ते हाणून पाडले.

पुढे भारतामध्ये इंग्रजांचे वर्चस्व वाढल्यानंतर सातारकर छत्रपतींच्या सरदारांनी इंग्रजांच्या संगनमताने छत्रपती व पेशव्यांची सत्ता झुगारुन स्वतःस राज्याभिषेक करवून घेतले. इकडे करवीर राज्यातही कागलकर घाटगे व इचलकरंजीकर घोरपड्यांनी असे प्रयत्न आरंभिले होते. घोरपड्यांनी इंग्रजांस कळविले की, “आम्ही छत्रपतींचे सेवक नाही. इचलकरंजी हे आमचे स्वतंत्र संस्थान असून आम्ही इचलकरंजीचे स्वतंत्र राजे आहोत. इंग्रज सरकारने आम्हाला मदत केल्यास आम्ही इंग्रजांशी सामिल होण्यास तयार आहोत”. तेव्हा छत्रपतींनी घौरपड्यांस तंबी देताना म्हटले,

“तुम्ही आश्रित. सेनापती घोरपडेंनी तुम्हांस जहागिर दिली. ज्या इचलकरंजीचे तुम्ही राजे म्हणवत आहात ते इचलकरंजी शहर हे छत्रपतींनी तुम्हास दिले आहे. तुम्ही छत्रपतींचे जहागिरदार आहात. स्वतंत्र राजे नव्हे !” छत्रपतींनी इंग्रज सरकारासही सदर बाब निदर्शनास आणून दिली तेव्हा इंग्रजांनी घोरपड्यांची कानउघाडणी करुन तुमची जहागिर ही छत्रपतींचा प्रदेश आहे. त्यामुळे तुम्ही (कोल्हापूरच्या) छत्रपतींचे सेवक आहात. त्यांच्या आज्ञेत राहणे, असे बजावले. तेव्हा घोरपड्यांनी कोल्हापूरच्या राजवाड्यावर छत्रपतींची भेट घेऊन मुजरा केला व माफी मागून निरोपाचा मुजरा करुन इचलकरंजींस रवाना झाले.

छायाचित्र – इचलकरंजीकर घोरपड्यांचा वाडा
#अपरिचित_माहिती
#शिवशक्ती_प्रतिष्ठान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here