महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

शिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला ? भाग २

By Discover Maharashtra Views: 4720 7 Min Read

शिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला ? भाग २

  • ६. ९१ कलमी बखर (भारतवर्ष)-

वाकसकर यांनी छापलेल्या या बखरीचा सुद्धा एक महत्वपूर्ण साधन म्हणून उपयोग केला जातो. त्यात लिहिले आहे की,

““नंतर राजे स्वामीस नवज्वर प्राप्त झाला. शके १६०२ रुद्र नाम संवत्सरे चैत्र शुद्ध १५ दोन प्रहरा, राजेस्वमी कैलासवासी झाले. सावधपणे संस्कार करून हरिदास कीर्तन करीत असता देह ठेवला.”

  • ७. Storia Do Mogor (असे होते मोगल-मराठी अनुवाद,ज.स. चौबळ)

निकोलाओ मनुची हा इटालीयन प्रवाशी होता. त्याने आपल्या पुस्तकात शिवाजी राजांची तसेच संभाजी राजांची व त्यांच्या कारकीर्दिची टिपणे काढून ठेवली आहेत. तो म्हणतो,

“तो(शिवाजी)सारखा मोहिमेवर चहुकडे फिरे या दगदगीने तो थकून गेला आणि रक्ताच्या उलट्या होऊन १६७९ मध्ये मरण पावला.”

  • ८. मासिरे आलमगिरी-

साकी मुस्तैदखान हा मनुष्य औरंगजेबाच्या पदरी होता. त्याने मासिरे अलामगिरी हा ग्रंथ लिहिला. त्यात तो म्हणतो की,

“आमदानीचे २३वे वर्ष १०९१ हि.(मे १६८०) घोड्यावरून रपेट करून आल्यावर त्याला(शिवाजीला) उष्णतेमुळे दोनदा रक्ताची उलटी झाली”

  • ९. शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड २,लेखांक-२२८६,डाग रजिस्टर १६८०

ज्या डाग रजिस्टर मधील संदर्भ देऊन विषप्रयोग केला असा आरोप केला जातो तिथे विषप्रयोगाचा उल्लेख जरूर आहे परंतु तो सोयराबाई यांनी केला असा उल्लेख आहे.

“गोवळकोंड्याहून असे लिहून आले आहे की, शिवाजीराजाला त्याच्या दुसऱ्या बायकोकडून (म्हणजे सोयराबाई यांच्याकडून) विषप्रयोग झाला असावा”

  • १०. तारीखे शिवाजी (सर जदुनाथ सरकार प्रकाशित, अनुवाद वि. स. वाकसकर (९१ कलमी बखर) –

“as the maharajah’s destined period of life had come to its end the queen’s heart changed and she did an act (poisoning ?) Which made Shivaji give up his life”

  • ११. History of Aurangzib (V IV, Ssouthern India 1645-1689) –Jadunath Sarkar

सर जदुनाथ सरकार यांनी केलेला उल्लेख हा इंग्रजांच्या पत्रावरूनच केलेला दिसून येतो.

“On 23rd. of March 1680,the Rajah was seized with fever and blood dysentery. The illness continued for twelve days. Gradually all hopes of recovery faded away, and then after giving solemn charges and wise counsels to his nobles and officers ….the maker of Maratha nation performed the last rites of his religion and then fell into trance, which imperceptibly passed into death.”

आता या सर्व उल्लेखांमधून निष्कर्ष काय निघतात ते पाहू,

  • १. वर दिलेल्या ९ संदर्भांपैकी ८ संदर्भ हे सांगतात की राजांचा मृत्यू हा आजारी पडूनच झाला होता. अर्थात नेमक्या कोणत्या आजाराने याबद्दलच्या तपशिलात फराज जाणवतो हे नक्की. परंतु त्यावेळी असलेले वैद्यकीय ज्ञान आणि दळणवळणाची साधने लक्षात घेता हा फरक होणे साहजिक आहे. दळणवळणाची साधने यासाठी की महाराष्ट्रात असणाऱ्या तत्कालीन परदेशी व्यापारांची पत्रे पहिली तर असे लक्षात येते की मृत्यू झाला का नाही याच्या बद्दलच त्यांच्या मनात शंका होती. जे इच्छूक आहेत त्यानी शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड-२ मध्ये लेखांक २२४९ ते २२५३,२२५८ ते २२६१ ,२२७५,२२८१,२२८६,२३०२,२३०७ इत्यादी पत्रे जरूर वाचावी.
  • २. अनेक जण हा मृत्यू विष पाजल्यामुळे झाला असा बिनपुरावी आरोप करतात आणि त्याचे खापर अष्टप्रधान मंडळातील लोकांवर करतात. यासाठी पुरावा म्हणून ते डाग रजिस्टरचा उल्लेख करतात. आता वर त्या पत्रातील उल्लेख आहे. ते पत्र सांगते की विषप्रयोग हा सोयराबाई यांनी केला. अर्थात हा तपशील सुद्धा चूकच आहे. कारण एक तर ही बातमी गोवळकोंडा येथून आली होती त्यामुळे तिची विश्वासार्हता किती असेल याबद्दल शंकाच आहे आणि दुसरे म्हणजे इतर कोणतीही साधने विष पाजल्याचा उल्लेख करत नाहीत. उलट ते हेच सांगतात की राजांनी मृत्यूशय्येवर असताना जाणत्या लोकांना बोलावून घेतले आणि चार उपदेशाचे शब्द सांगितले. यासाठी संदर्भ म्हणून सभासद बखर,चिटणीस बखर,९१ कलमी बखर व भोसले घराण्याची बखर इत्यादी पाहू शकता.
  • ३. तिसरा आरोप असा केला जातो की विषप्रयोग केला म्हणून संभाजी राजांनी अष्टप्रधान मंडळातील काही लोकांना जीवे मारण्याची शिक्षा दिली. या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे की संभाजी राजांनी जानेवारी १६८० मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला. यावेळी अष्टप्रधानात त्यांनी जुन्या सर्व लोकांना जागा दिली होती. पुढे अण्णाजी दत्तो आणि काही लोकांनी पुन्हा संभाजी राजांविरुद्ध कट केला म्हणून त्यांना मृत्युदंड सुनावला. त्यामुळे जर शिवाजी राजांना विषप्रयोग झाला असता तर राजांचा मृत्यू झाल्यानंतर संभाजी राजांनी या सर्वांना देहदंड लगेचच का नाही सुनावला आणि त्यावर कडी म्हणजे अष्टप्रधान मंडळात पुन्हा सर्वांना का जागा दिली हा प्रश्न पुढे उभा राहतोच.
  • ४. भोसले बखर तसेच सभासद बखर यांमध्ये तर यादीच आहे की राजांच्या अंत्यसमयी कोण कोण उपस्थित होते अशी. ती वाचल्यावर दिसून येते की मोरोपंत, हंबीरराव मोहिते, अण्णाजीपंत दत्तो हे सर्व जण रायगडाच्या बाहेर होते. मृत्यूची वार्ता समजल्यानंतर ते रायगडी आले. अष्टप्रधान मंडळात ही तीन महत्वाची माणसे होती तीच अंतसमयी किल्ल्याच्या बाहेर स्वारीवर होती. त्यामुळे कट झाला असल्यास कधी झाला आणि कुणी केला हा एक प्रश्न पुढे उभा राहतो.
  • ५. सभासदाने ही बखर राजाराम महाराजांच्या सांगण्यावरून लिहिली असा उल्लेख तो करतो. आता महाराजांचे जेव्हा निधन पावले तेव्हा राजाराम महाराज रायगडावरच होते त्यामुळे सभासदाने लिहिलेले जर चूक असते तर मग राजाराम महाराजांनी त्याला विरोध नक्की केला असता.
  • ६. याव्यतिरिक्त सुद्धा अनेक पत्रे तसेच लेखक या घटनेचा उल्लेख त्यांच्या लिखाणात करतात. मात्र विस्तार भयास्तव ती सर्व साधने इथे देणे शक्य नाही परंतु जे जिज्ञासू आहेत त्यांनी ‘History of Sevagi and his successor, recent Conquerors in India by Father Pierre Joseph d’Orleans’, शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड-२ मधील वर उल्लेख केलेली पत्रे, चिटणीस बखर, तारीखे शिवाजी, मराठी साम्राज्याची छोटी बखर, इत्यादी ऐतिहासिक पुरावे वाचूनच निष्कर्ष काढावा.
  • ७. छत्रपती शिवाजी राजांचा मूत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे हे खरी आणि अशा घटनेवरून राजकारण केले जात आहे ही हे तर अतिशय धक्कादायक आहे. वर नमूद केलेल्या सर्व साधनांचा आणि पुराव्यांचा विचार करता हेच कळून येते की राजांचा मृत्यू हा अति थकव्यामुळे आजार होऊन झाला होता. त्यामुळे सोयराबाई यांनी विषप्रयोग केला किंवा अष्टप्रधान मंडळातील लोकांनी त्यांना मारले या बाजारगप्पांना काही अर्थ उरत नाही हेच खरे.

बहुत काय लिहिणे, आपण सुज्ञ आहात त्यामुळे आपण पुरावे वाचून निष्कर्ष काढाल असे वाटते.

संदर्भ साधने-

  • १. एक्याण्णव कलमी बखर-वि.स.वाकसकर
  • २. सभासद बखर- कृष्णाजी अनंत सभासद
  • ३. मराठी दप्तर,रूमाल पहिला(श्रीमंत महाराज भोसले यांची बखर)-वि.ल.भावे
  • ४. जेधे शकावली
  • ५. शिवकालीन पत्रसारसंग्रह
  • ६. English records on Shivaji
  • ७. History of Aurangzeb (vol. IV, southern India 1645-1689) -Sir Jadunath Sarkar
  • ८. History of the Marathas-Grant Duff (मराठी अनुवाद- कॅ.डेव्हीड केपन साहेब)
  • ९. Storia Do Mogor or Mogul India-Niccolao Manucci
  • १०. मासिरे आलमगिरी – साकी मुस्तैदखान
माहिती साभार:- © 2017, Shantanu Paranjape

भाग 1 वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment