“राजश्रीस चौक्या बसवल्या..!!”
“मोगल बादशहा औरंगजेबाने राजश्रीस चौक्या बसविल्या ती अशुभ तिथी होती शके १५८८, पराभवनाम संवत्सर, ज्येष्ठ शुद्ध २, शुक्रवार दि.२५ मे १६६६..!!” दि.२१ ते २४ मे दरम्यानच्या घटनांमुळे आणि शिवाजीराजे औरंगजेब ह्यांच्यातील उलट-सुलट पत्रव्यवहारामुळे पारडे फिरले.
महाराजांनी मीरबक्षी महंमद अमीनखानामार्फत बादशहास विनंती केली की – “बादशहांनी माझे जे किल्ले घेतले आहेत, ते सर्व मला परत द्यावेत. मी दोन कोटी रुपये बादशहांना देईन. मला निरोप द्यावा (जाऊ द्यावे). आणि माझ्या मुलाला (संभाजी राजांना) मी इथेच (तुमच्या पायाशी) ठेवून जाईन आणि बादशहांना हवी तशी शपथ तुम्ही मला घ्यायला लावावी आणि मी बादशहांप्रती पूर्ण निष्ठेने त्यांच्या चरणी आलो आहे, माझी निष्ठा पक्की आहे. आणि जिथे कुठे बादशहांची मोहीम असेल तिथे मला बोलावून घ्यावे, तेव्हा मी हजर राहीन. एवढेच नव्हे तर विजापूरची जर बादशहांची मोहीम असेल तर तिथे जाऊन मी लढेन, मरेन, जाऊन बादशहांची चाकरी करेन.”
यावर औरंगजेबाने उलट जबाब पाठवला, “तो तर मूर्ख/वेडा (मुखबती दिवाना) झाला आहे. आताच निरोप देण्याचा काय प्रश्न.? त्याला सक्त ताकीद द्या की त्याने कोणाशीही बोलू नये (कोणालाही भेटू नये), एवढेच नव्हे तर कुमारच्या (रामसिंगाच्या) डेऱ्यातही त्याने जाऊ नये.” त्यामुळे ‘शिवा’वर (शिवाजी महाराजांवर) कडक पहारा ठेवण्याची मोठी ताकीद दिली आहे.” अशा तऱ्हेने औरंगजेबाच्या आदेशानुसार सिद्दी फौलादखान ५००० फौजेसह महाराजांच्या डेऱ्याजवळ आला आणि त्याने महाराजांचे निवासस्थान चहुबाजूंनी पक्के वेढले, ठिकठिकाणी चौक्या बसल्या.
राजधानी राजगडापासून शेकडो मैल परमुलुखात आपल्या पुत्रासह, मातब्बर मुत्सद्द्यांसह महाराज औरंगजेबासारख्या कर्दनकाळ अश्या शत्रूच्या कैदेत कोंडले गेले. सिंहासन प्राप्तीसाठी ज्या औरंगजेबाने प्रत्यक्ष त्याचा बाप व अन्य ३६ भाऊबंदांचे बळी घेतले तोच माणूस आता राजांना जिवंत सोडणे असंभवनीयच दिसत होते.
या घटनेची जेधे शकावलीतली नोंद अशी – ‘शके १५८८, पराभव संवछरे, जेष्ठ शुध द्वितीया राजश्री सिवाजी राजे अगरियास जाऊन औरंगजेबाची भेटी घेतली बिघाड होऊन राजश्रीस चौकिया दिल्या’
तर शिवापुरकर देशपांडे वहीतली नोंद अशी – ‘ज्येष्ठ शु|| २ सिवाजीराजे आगरियास जाऊन औरंगजेबाचे भेटी घेतली बिघाड होऊन राजास चौक्या दिल्ह्या..’
फौलादखानाच्या रुपाने जणू मृत्यूच उंबरठ्यावर आलेला होता. अगदी काही क्षणकाळ श्री शिवाजी महाराजांसारखा स्थितप्रज्ञ देखील या अनपेक्षित संकटाने कष्टी झाला. भावुक झालेल्या शिवाजी महाराजांनी शंभुराजांस पोटाशी धरून बहुत खेद केला. निराजीपंत, दत्ताजीपंत, त्र्यंबकपंत समीपच होते. त्यांनी महाराजांचे बहुत प्रकारे समाधान केले..
© स्वराज्यसेवक
संदर्भ :
१) Shivaji’s Visit to Auranzib at Agra – Jadunath Sarkar, Raghubir Sinh
२) शककर्ते शिवराय : खंड २, विजय देशमुख
३) छत्रपती शिवाजी महाराज – सेतू माधवराव पगडी
४) शिवचरित्रप्रदीप – संपादक – द.वि.आपटे, स.म.दिवेकर
५) शिवचरित्र निबंधावली – शिवचरित्र कार्यालय, पुणे
६) राणा जयसिंग आणि शिवाजी महाराज यांची राजकीय चढाओढ – वासुदेव सीताराम बेंद्रे
७) खरे जंत्री – गणेश सखाराम खरे
