राऊ ऊर्फ श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे

राऊ ऊर्फ श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे

राऊ ऊर्फ श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे –

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठी मुलखात जणू तेवढाच आत्मविश्र्वास व स्वराज्यनिष्ठा निर्माण करणारा ‘संस्थापक पेशवा’, दिल्लीच्या तख्तापर्यंत धडक मारणारा एकमेव मराठी लढवय्या म्हणजे राऊ ऊर्फ श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांचा आज (२८ एप्रिल) स्मृतिदिन ! (सन १७४०)

बाळाजी विश्वनाथ भट यांचा ज्येष्ठ मुलगा. आईचे नाव राधाबाई. बाजीरावांचे मूळ नाव विसाजी. ‘बाजीराव बल्लाळ’ व ‘थोरला बाजीराव’ या नावांनीही ते इतिहासात प्रसिद्ध आहेत. बालपणी वडिलांच्या बरोबर स्वारी-शिकाऱ्यांत राहिल्याने युद्धकलेचे व राजकारणाचे ज्ञान त्यास लाभले. सय्यद बंधूंच्या मदतीस दिल्लीला गेलेल्या (इ. स. १७१८) मराठी सैन्यातील एक तुकडी बाजीरावांच्या हाताखाली होती. छत्रपती शाहूंनी त्यांची कर्तबगारी ओळखून इतर ज्येष्ठ सरदारांच्या विरोधास न जुमानता १७ एप्रिल १७२० रोजी त्यांस पेशवेपदाची वस्त्रे दिली.

बाजीराव ‘पेशवे’ झाले त्या वेळी मराठी राज्याला चोहोबाजूंनी शत्रूंनी वेढले होते. दख्खनचा सुभेदार निजामुल्मुल्क १७२० मध्ये दिल्ली सोडून दक्षिणेस कायमचे ठाण मांडून बसला होता. त्याचा बंदोबस्त करणे, त्याच्याकडून दख्खनच्या चौथ-सरदेशमुखीस संमती मिळविणे, हे पेशव्याचे पहिले काम होते. त्याशिवाय मिरज, अहमदनगरसारखी  ठाणी मोगलांच्या ताब्यात होती. तसेच पश्चिमेकडील प्रदेश सिद्दी आणि पोर्तुगीज यांनी बळकावला होता. तो मुक्त करणे आवश्यक होते. माळव्यात १७०० पासून मराठी फौजा फिरू लागल्या होत्या. त्याचा फायदा घेऊन दिल्ली दरबारात वर्चस्व स्थापन करण्याचीही गरज होती.

बाजीरावांची प्रारंभीची तीन-चार वर्षे खानदेश –बागलाण-कर्नाटक या भागांत स्वारी-शिकारीत गेली. पेशव्याची फौज कर्नाटकात दूर गेली आहे, असे पाहून १७२७ मध्ये निजामाने कोल्हापूरच्या संभाजीमहाराजांशी संधान बांधले आणि छत्रपती शाहुंशी असा दावा मांडला की छत्रपतिपदाचा हक्क दोन्ही बंधूंनी निश्चित करावा, मगच चौथ-सरदेशमुखीसंबंधी धोरण ठरविण्यात येईल. शाहूच्या छत्रपतिपदास सुरुंग लावून मराठी राज्यात फूट पाडण्याचा निजामाचा हा डाव उघड होता. बाजीरावांनी निजामाचा हा डाव धुडकावून युद्धाची तयारी केली. १७२७ चा पावसाळा संपताच मोठ्या फौजेनिशी ते निजामाच्या मुलखावर चालून गेले. खानदेश, बऱ्हाणपूर, सुरत या भागांत चपळाईच्या मजला करून बाजीरावांनी निजामाचा तोफखाना निरुपयोगी केला आणि निजामाच्या सैन्याला बेजार केले. अखेर निजाम शरण आला. ६ मार्च १७२८ रोजी मुंगी-शेवगावच्या तहाने युद्धविराम झाला. शाहूंच्या छत्रपतिपदास निजामाने मान्यता दिली; कोल्हापूराच्या गादीशी संबंध सोडला आणि दख्खनच्या सहा सुभ्यांतून चौथ-सरदेशमुखीचे हक्क वसूल करण्यास मान्यता दिली. दक्षिणेत संचार करण्यास मराठी फौजांस हरकत राहिली नाही. निजामावरील विजयाने शाहूंच्या दरबारात बाजीरावांचे वजन वाढले.

राज्यविस्ताराच्या विभागणीत सेनापती दाभाडे यांच्याकडे गुजरात, अहमदाबाद, काठेवाड हा प्रदेश होता आणि पेशव्यांकडे बागलाण, खानदेश, माळवा आणि त्याजवळचा प्रदेश देण्यात आला होता; पण १७२५ पासून पेशव्यांच्या फौजा गुजरातेत जाऊ लागल्या. १७२७ मध्ये पेशव्यांच्या बाजी भिमराव, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर इ. सरदारांनी सुभेदाराशी चौथ-सरदेशमुखीची बोलणी सुरू केली आणि १७३० मध्ये खुद्द बाजीराव पेशव्याचे बंधू चिमाजी आप्पा यांनी गुजरातेत जाऊन चौथ-सरदेशमुखीच्या करारावर शिक्कामोर्तब करून घेतले. आपल्या टापूत पेशव्यांच्या फौजांनी फिरावे, हे सेनापती दाभाडे यास मान्य नव्हते. त्याने छत्रपतींकडे दाद मागण्याऐवजी फौजेची जमवाजमव केली आणि निजामाशी गुप्त बोलणी केली. या कटाची माहिती मिळताच बाजीराव गुजरातेत चालून गेले आणि त्यांनी १ एप्रिल १७३१ रोजी डभई येथे सेनापतीस गाठले व त्याच्या सैन्याचा पराभव केला. खुद्द त्रिंबकराव दाभाडे गोळी लागून ठार झाला. पेशव्यांनी छत्रपतींच्या कानावर वस्तुस्थिती घालून त्यांची समजूत घातली.

जंजिऱ्याचा सिद्दी कोकणपट्टीत शिवछत्रपतींच्या काळापासून अजिंक्य होता. सुरुवातीस सिद्दी आदिलशाहीचा नोकर होता; परंतु पुढे तो मोगलांचा सरदार बनला; संभाजीमहाराजांच्या वधानंतर महाड, रायगड, दाभोळ, अंजनवेल वगैरे बराचसा मराठी मुलूख सिद्दीच्या ताब्यात गेला. १७२७ मध्ये सिद्दीच्या एका सरदाराने छत्रपतींचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांच्या चिपळूण येथील परशुरामाच्या देवळाचा विद्ध्वंस केला, तेव्हा या शत्रूचा समाचार घेणे प्राप्त झाले. कुलाबकर आंग्रे यांना साताऱ्यास बोलावून मोहिमेची चर्चा सुरू झाली. त्याच सुमारास जंजिऱ्याचा किल्लेदार सिद्दी रसूल मरण पावला (१७३३) आणि त्यांच्या वारसांबाबत तंटा सुरू झाला. त्यातील एक पक्ष मराठ्याना येऊन मिळाला. त्याच्या साह्याने शत्रू बेसावध आहे, तोच त्याचे आरमार आणि दर्यातील मोक्याची जागा जंजिरा काबीज करण्याकरता छत्रपतींनी पेशव्यास तातडीने रवाना केले. रायगड आणि दक्षिण कोकणातील ठाणी घेण्याकरिता श्रीपतराव प्रतिनिधींच्या हाताखाली दुसरी फौज पाठविण्यात आली. पेशव्याची फौज त्वरेने कोकणात उतरून सिद्दीच्या मुलखावर चालून गेली. राजपुरीचे बंदर घेऊन बाजीरावांनी आरमाराचा काही भागही घेतला; पण जंजिरा मात्र त्यास जिंकता आला नाही. सरखेल आंग्रे यांचे आरमारी साह्य मिळविण्याचा पेशव्याने खूप प्रयत्न केला; पण सिद्दीने इंग्रज-पोर्तुगीजांच्या साहाय्याने आंग्र्यास शह दिला. जंजिरा किल्ल्याने दोन वर्षे लढूनही दाद दिली नाही. अखेर १७३६ च्या सप्टेंबरात दोघांत तह होऊन सिद्दीच्या अकरा महालांपैकी निम्मा मुलूख मराठी अंमलाखाली रहावा असे ठरले. सिद्दीकडील तळे, घोसाळे, बिरवाडी वगैरे ठाणी मराठ्यांकडे आली. जंजिरा, कासा, उदेरी हे जलदुर्ग मात्र मराठ्यांच्या हाती आले नाहीत.

पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगीजांचा मराठ्यांनी या सुमारास निकाल लावला. पोर्तुगीजांनी नाविक सत्ता आणि आधुनिक तऱ्हेची शस्त्रास्त्रे यांच्या जोरावर कोचीन, गोवा, चौल, वसई, दमण, दीव इ. ठाणी आणि त्यालगतचा मुलूख बळकाविला होता आणि प्रदेशांत ख्रिस्ती धर्माचा प्रसार त्यांनी केला. छत्रपतींनी पेशव्याकडे ही कामगिरी सोपविली. २६ मार्च १७३७ रोजी मराठी सैन्य साष्टी बेटात अचानक घुसले आणि त्याने किल्ल्यात प्रवेश केला. त्याच दिवशी दुसऱ्या तुकडीने वसईच्या किल्ल्यावर हल्ला चढविला. साष्टीची मोहीम त्वरित यशस्वी झाली. ठाण्याचा किल्ला आणि साष्टी बेट यांचा कबजा मराठ्यांनी आठपंधरा दिवसांत घेतला. वसईचा किल्ला मात्र पडेना, दोन वर्षे वेढा चालू राहिला. केळवे, माहीम, तारापूर, अशेरी या ठिकाणी तुंबळ युद्धे होऊन शत्रू अगदी जेरीस आला. शेवटी चिमाजी आप्पांच्या पराक्रमाने १२ मे १७३७ रोजी वसई मराठ्यांच्या ताब्यात आली.

बाजीराव पेशव्यांनी दक्षिण निर्वेध केली, पण त्यांच्या या यशाचे मर्म त्याच्या उत्तरेकडील राजकारणात शोधले पाहिजे. मोगल बादशाहीचा वृक्ष जीर्ण झाला आहे; फांद्यांवर कुऱ्हाड न चालविता बुंध्यासच हात घालावा, हे धोरण पेशव्यांनी पतकरले. पेशव्यांचा संचार सुरुवातीपासून नर्मदेपलीकडे सुरू होता. २९ नोव्हेंबर १७२८ रोजी चिमाजी आप्पांनी माळव्याचा मोगल सुभेदार गिरिधर बहादूर यास आमझेरा येथे गाठून त्याचा पराभव केला. याच सुमारास बाजीराव बुंदेलखंडात राजा छत्रसाल यांच्या साहाय्यास गेले. त्यांनी जैतपूर येथे सुभेदार मुहम्मदखान बंगश यास वेढले आणि त्याच्या सैन्याची वाताहात केली. हरसाल मराठी फौजांच्या उत्तरेकडे हालचाली सुरू झाल्या. १७३३ साली पेशव्यांनी सवाई जयसिंगाशी सामना दिला. १७३३ मध्ये बुंदी, दंतिया, ओर्छा या भागांतून पेशव्यांच्या सरदारांनी चौथ वसूल केला. पिलाजी जाधवाने मार्च १७३५ मध्ये वझीर कमरुद्दीनखान याच्याशी ओर्छानजीक लढाई केली. याच वेळी राजस्थानात मुकुंदरा घाट ओलांडून शिंदे-होळकरांनी मीरबक्षी खान-इ-दौरां याच्या सैन्यास घेरले. धावपळीच्या लढाईत मोगली सैन्याचा मराठी फौजांपुढे टिकाव लागेना. माळव्याचा चौथ म्हणून मोगल दरबाराने दरसाल मराठ्यांना बावीस लक्ष रुपये द्यावेत, या अटीवर युद्ध तहकुबी झाली.

मीरबक्षी आणि सवाई जयसिंग यांचे तडजोडीचे धोरण मोगल दरबारात मान्य होईना. तेव्हा फिरून एकदा बाजीराव आपल्या फौजांसहित उत्तरेत चालून आले (१७३६). जयसिंगामार्फत दिल्ली दरबाराशी बोलणी सुरू झाली. माळव्याची सुभेदारी मांडू, धार, रायसीन इ. किल्ले, काही जहागिरी, बंगालच्या वसुलात ५० लक्षाचा चौथ, अलाहाबाद, वाराणसी, गया, मथुरा इ. हिंदूंची पवित्र क्षेत्रे, दख्खनची सरदेशपांडेगिरी व दक्षिणेत ५० लाखांची जहागीर या मागण्या पेशव्याने दरबाराकडे केल्या.

पेशव्यांच्या वाढत्या मागण्या दिल्ली दरबारास मान्य होईनात. चालढकलीचे धोरण दरबाराने स्वीकारले. तेव्हा पुन्हा १७३७ च्या सुरुवातीस पेशव्यांनी उत्तरेकडे चाल केली. पेशव्यांचा रस्ता रोखून धरण्याकरिता दोन मोगली दिल्लीतून निघाल्या. दोन्ही सैन्यांची नजर चुकवून मराठी फौज २९ मार्च रोजी दिल्लीजनीक येऊन ठेपली. राजधानी आता उद्ध्वस्त होणार अशी धास्ती सर्वांस वाटू लागली. आपल्या मागण्यास अनुकूल असणाऱ्या पक्षाच्या विचाराने बादशाह वागेल, अशी पेशव्यांची अपेक्षा होती; पण दिल्ली दरबारात पेशव्यांचे वर्चस्व स्थापन झाल्यास, आपण निर्माल्यवत होणार हे ओळखून निजामाने उत्तरेस प्रयाण केले. मराठ्यांचे आक्रमण हाणून पाडण्याकरता मोठी फौज, जंगी तोफखाना आणि भरपूर खजिना निजामाच्या स्वाधीन करण्यात आला. निजामाची स्वारी पेशव्यांशी निकराचा सामना घेण्याच्या इराद्याने निघाली. पेशव्यांनीही भोपाळनजीक निजामास गाठले. १५ डिसेंबर १७३७ रोजी निजामाचा पराभव झाला. तो भोपाळच्या किल्ल्याच्या आश्रयाला गेला. पेशव्यांच्या फौजेने शत्रूची नाकेबंदी केली. निजामाचे प्रयत्न निष्फळ ठरले. तेव्हा त्याने पेशव्यांच्या मागण्यांस दरबाराकडून मान्यता मिळवून देऊ, या अटींवर संमती देऊन ७ जानेवारी १७३८ रोजी समेट केला. माळवा सुभा, नर्मदा आणि चंबळ यांमधील सर्व प्रदेश हे मराठ्यांना बहाल करावयाचे आणि त्याबाबतचे बादशाही फर्मान पेशव्यांस मिळवून द्यावयाचे, या अटींवर बाजीराव पेशव्यांनी वेढा उठविला.

भोपाळचा विजय हा पेशव्यांच्या कारकीर्दीतील सवोच्च बिंदू होय. या विजयाने माळवा-बुंदेलखंडात मराठी सत्ता प्रस्थापित झाली आणि मोगल दरबारात मराठ्यांचे वर्चस्व वाढले.

पुढील दोन वर्षांत बाजीराव पेशव्यांच्या खानदेश-माळव्यात हालचाली चालू होत्या. पेशव्यांनी निजामाचा थोरला मुलगा नासरजंग याचे पारिपत्य केले (१७४०). . नर्मदाकाठी रावेरखेडी येथे मुक्काम असता एकाएकी ज्वराचे निमित्त होऊन हा थोर पेशवा मरण पावला.

बाजीरावांचे चरित्र व चारित्र्य रोमांचाकारी घटनांनी भरले आहे. ते स्वभावाने तापट होते. सेनापतीस योग्य असे धैर्य व घाडस त्यांच्या अंगी होते. त्यांचे खासगी जीवन अत्यंत साधे, मराठी शिपाईगडयास साजेसे होते. वयाच्या तेराव्या वर्षी महादजी कृष्ण जोशी यांच्या काशीबाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला (१७१३). त्यांना चार मुलगे झाले. त्यांपैकी नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले. उत्तरेकडील स्वारीत त्यांचा मस्तानीशी संबंध आला (१७२९). मस्तानीविषयी अत्यंत विश्वासार्ह असे साहित्य अद्यापि उपलब्ध झाले नाही. मस्तानी एक नर्तकी होती. छत्रसालापासून ती पेशव्यास प्राप्त झाली. त्या वेळेपासून ती पुढे सर्व स्वाऱ्यात त्याच्याबरोबर असे. मस्तानीच्या नादाने पेशवे मद्यप्राशन आणि मांसभक्षण करू लागले. बाजीरावांनी मस्तानीचा नाद सोडावा, म्हणून चिमाजी आप्पा व नानासाहेब यांनी हरतऱ्हेने प्रयत्न केले; पण ते निष्फळ ठरले. बाजीरावांपासून मस्तानीस समशेर बहाद्दूर नावाचा मुलगा झाला. तो पुढे पानिपतच्या लढाईत (१७६१) ठार झाला. मस्तानी ही बाजीरावांच्या निधनानंतर लगेच मरण पावली. तिच्या नावाचा महाल शनिवार वाड्यात बांधला होता.

बाजीराव पेशव्यांनी मराठेशाहीची शान वाढविली. निजाम, सिद्दी, पोर्तुगीज यांसारख्या शत्रूंशी टक्कर देऊन मराठी राज्याचे आसन स्थिर कले आणि मराठी फौजांच्या पराक्रमाला नवी क्षितिजे निर्माण केली. पेशव्यांच्या चपळाईच्या हालचालींपुढे प्रचंड मोगली फौजा आणि त्यांचे तोफखाने कुचकामी ठरले, याबद्दल फील्ड मार्शल मंगमरी यांनी बाजीराव पेशव्यांची प्रशंसा केली आहे.

© प्रसन्न खरे.

संदर्भ :
१. प्रतापी  बाजीराव – ले. श्री. म. श्री. दक्षित.
२. पेशवे दप्तर – संपादक श्री. स. गो. सरदेसाई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here