वरंधची अजून एक घळ !!

वरंधची अजून एक घळ !!

वरंधची समर्थांची अजून एक घळ !!

समर्थ रामदास या व्यक्तिमत्वाचे गूढ काही केल्या उलगडत नाही. अखंड भ्रमंती, लोकजागर, बलोपासना, दासबोधासारख्या ग्रंथाची रचना अशा समाजोपयोगी निरनिराळ्या क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या या अनोख्या व्यक्तीचे वास्तव्य मात्र डोंगरात, कडेकपारी, गुहा, घळी अशा ठिकाणी असायचे.(वरंधची अजून एक घळ !!)

“दास डोंगरी राहातो, यात्रा देवाची पाहतो |”

या नीतीने समर्थांचे वास्तव्य हे गावात, मठात, मंदिरात कधीच नसायचे. ते नेहमी सांगायचे माझा प्रभू रामचंद्र सदैव माझ्या सन्निध असतो. त्यामुळेच त्यांनी वास्तव्य केलेल्या विविध घळी या रामघळी म्हणून प्रसिध्द झाल्या. अशीच एक समर्थांची रामघळ वसली आहे वरंध घाटात. शिवथरघळीच्या अगदी जवळ. या घळीचे नाव काय असे विचारले तर स्थानिक लोक सुंदरमठ असे सांगून हीच खरी शिवथरघळ असे सांगतात. ही घळ आहे वरंध गावाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरामध्ये.

पुण्याहून महाडला जाताना वरंध घाट लागतो. तो उतरून गेले की वरंध नावाचे गाव येते. याच गावातून काहीसे पुढे महाडच्या दिशेला जायला लागले की रस्त्याच्या उजव्या बाजूला काही दुकाने दिसतात आणि तिथे उजवीकडे आत एक रस्ता जातो. ‘प्रभू श्रीराम पथ’ असे या रस्त्याचे नाव लिहिलेली पाटी तिथे आहे. (मुंबईकडून आल्यावर वरंध गावाच्या काहीसे अलीकडे डाव्या हाताला ही जागा येते.) त्या रस्त्यावरून आत गेल्यावर अंदाजे ४ कि.मी. अंतरावर ही घळ आहे. आत जाण्याचा रस्ता काहीसा कच्चा आहे. आणि पुढे गेल्यावर अंगावरची चढण एक दोन ठिकाणी लागते. ऐन पावसाळ्यात तर तिथे पदभ्रमणच करावे लागते. पण सुंदर निसर्ग, समोरच दिसणारा वरंध घाटाचा डोंगर असा हा परिसर खूप रमणीय आहे. वाटेत एका जागी मोठ्या वाड्याचे अवशेष लागतात. खूप मोठे जोते आणि काही अवशेष तिथे पाहायला मिळतात. तिथून समोरच्या डोंगरात पहिले की समर्थांची ही घळ आपल्याला प्रथम दर्शन देते. घळीच्या तोंडाशी लावलेला भगवा झेंडा आपले लक्ष वेधून घेतो. या ठिकाणाहून जेमतेम १० मिनिटामध्ये आपण घळीच्या जवळ पोहोचतो.  पाण्याची एक टाकी आणि एक बांधलेली समाधी अशा ठिकाणी रस्ता संपतो.

वाहन तिथेच ठेऊन समोरच्या डोंगराच्या पोटातून गेलेली एक पायवाट आपल्याला दिसते. डोंगर आपल्या डाव्या बाजूला ठेवून ही पायवाट काहीशी पुढे पुढे जाते आणि आपण त्या घळीच्या खाली येतो. तिथून दगडात कोरलेल्या काही पायऱ्या चढून आपण घळीच्या तोंडाशी येऊन उभे राहतो. पाठीमागे पहिले की सह्याद्रीचे रौद्र रूप सामोरे येते. घळीच्या शेजारीच मोठा धबधबा आहे. त्याचे पाणी पडून खालच्या बाजूला एक डोह तयार झाला आहे आणि तिथून ते पाणी पुढे नदीचे रूप घेऊन पुढे वाहत जाते. घळीच्या दाराशी आता एक लोखंडी सरकते दार बसवले आहे. दक्षिणाभिमुख असलेली ही घळ आतमध्ये डाव्या बाजूला पूर्व-पश्चिम अशी जवळ जवळ ६० फूट लांबीला आहे. तसेच ती १० ते १२ फूट रुंद आहे. दारातून आत गेल्यावर समोरच्या भिंतीमध्ये दगडात कोरलेली बसण्याची जागा आहे. मूलतः ही नैसर्गिक घळ असणार नंतर मानवाने ती त्याला हवी तशी खोदून काढलेली दिसते. छिन्नीने घातलेले घाव आणि त्याची निशाणी ठिकठिकाणी जाणवते. आतमधे जाताना डाव्या बाजूला एक फूट उंचीचा आणि अंदाजे ३ फूट लांबीरुंदीचा एक दगडी चौथरा आहे. तसेच पुढे गेले की खडकामध्ये खोदलेले एक पाण्याचे टाके दिसते. आणि तिथून पुढे किंचित घळ वळते आणि मग दुसऱ्या बाजूने बाहेर येण्याचा मार्ग दिसतो. सध्या या घळीत कच्ची भिंत बांधून त्याचे दोन भाग केलेले दिसतात.

दुसरा रस्ता वरंध घाटातून शिवथरघळ फाट्यावरून आत जावे आणि पुढे शिवथरघळीकडे न वळता सरळ जावे. तो रस्ता जिथे संपतो तिथे एक मठ आहे. तिथे वाहन ठेवून तिथून खाली चालत गेल्यास या घळीपर्यंत जाता येते.

शिवथरघळीच्या अगदी जवळ ही घळ कशी काय असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो. या विषयातील काही तज्ञ मंडळींच्या मते हीच मूळ शिवथरघळ असणार. या त्यांच्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ ते काही गोष्टी सांगतात. एक म्हणजे या ठिकाणी कितीही पाउस आला, किंवा वारे सुटले तरी घळीमध्ये आत त्याचा परिणाम जाणवत नाही. ही घळ चांगली १२-१३ फूट उंच आहे तसेच आत मध्ये पाण्याची व्यवस्था आहे. बसायला एक चौथरा केलेला आहे त्यामुळे इथे बसूनच समर्थांनी त्यांचे लेखन केले असावे. लेखनासाठी लागणारी साधन सामुग्री या ठिकाणी अगदी सुरक्षित राहणार. घळीचा दरवाजा बंद केला की कोणी जनावर अथवा वन्य श्वापद आत येण्याची अजिबात शक्यता नाही.

रामदास पठार म्हणून जो भाग सध्या प्रसिद्ध आहे त्याच्याच पोटात ही घळ खोदलेली दिसते. मग रामदासांचे वास्तव्य असलेली घळ असलेले पठार म्हणून रामदास पठार असे नाव पडले का ? तसेच सात बाराच्या उताऱ्यामधे या ठिकाणाचा उल्लेख हा “मठाचा माळ” असा केलेला आढळतो. याचा अर्थ इथे मठ होता याची यावरून खात्रीच होते असे तज्ञ सांगतात. खाली असलेले वरंध गाव पण बरेच प्राचीन आहे. गावात काही वीरगळ पडलेले आहेत तर खूप जुन्या मंदिरांचे अवशेष सुद्धा गावात आढळतात.

एक गोष्ट मात्र खरी की ही घळ खरी का आधीची घळ खरी या वादात भटक्यांनी पडण्यापेक्षा एक अत्यंत सुंदर नवीन ठिकाण पाहायला अवश्य जावे. ऐन पावसाळ्यात गेलात तर ४ कि.मी. चालायची तयारी ठेऊन जावे.

आशुतोष बापट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here