महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,22,457

मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार भाग ३

By Discover Maharashtra Views: 1312 7 Min Read

मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार भाग ३ : जनरल पेरॉन –

मित्रानो, आज आपण पेरॉन या आपल्या कथानायकाच्या दुसऱ्या व शेवटच्या भागात पोचलो आहोत. मागच्या भागात आपण पहिले की जनरल पेरॉन हा शिंद्यांच्या अजिंक्य कवायती फौजेच्या सरसेनापतीपदी आरूढ झाला आणि त्याच्या महत्वकांक्षेला अजून धुमारे फुटले. जरी वरकरणी तो स्वतःला दौलतराव शिंद्यांचा अंकित समजत असला तरी मनोमन तो आपल्याला तो दौलतराव शिंद्यांच्या बरोबरीने समजू लागला. शिंद्यांचे आदेश धुडकावणे बाह्यतः त्याने दाखविले नाही तरी पण त्याच्या मनात असेल  तसेच तो वागत राहिला. याचा परिणाम म्हणजे शिंद्यांच्या सत्तेचे खच्चीकरण करण्यात झाले व मराठयांच्या उत्तरेतील वर्चस्वाला सुरुंग लागला.(मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार भाग ३)

डी बॉयन भारत सोडून गेल्यावर त्याने आपल्या मागे जी कवायती फौज ठेवली ती अशी होती:२४हजार पायदळ, ३हजार घोडदळ, १२० तोफा, शिवाय शेकड्याने गरीसन ट्रूप्स आणि कंत्राटी फौज !! अशा अप्रतिम, बेजोड, शत्रूस धडकीच नव्हे तर असूया पैदा करणाऱ्या फौजेच्या शिरस्थानी पेरॉनची निवड झाली हे त्याचे महान भाग्यच होते. सेनेची सारी सूत्रे हातात आल्यावर प्रथमतः त्याने पहिल्या ब्रिगेडची सूत्रे दुद्रेनेकच्या (Dudrenec) हाती सोपवली व तो १७९७च्या मार्चमध्ये मेवाड प्रांतात गेला  व त्याने मराठ्यांचा सेनापती जगोबाबापूकडून सूत्रे स्वीकारली. डी बॉयनच्या सैन्याची धुरा ताब्यात आल्यावर त्याने डी बॉयनच्या दुआबातील जहागिरीकडे लक्ष पुरवून ती ताब्यात घेतली.येथे त्याने आधीच परिपूर्ण असलेली तटबंदी अजून मजबूत करून घेतली आणि अलिगडच्या किल्ल्याची  डागडुजी करून आपली सुरक्षितता वाढवली.डी बॉयनकडून चार्ज घेतल्यावर त्याला सुरुवातीचे एक वर्ष आराम करायला अजिबात वेळ नव्हता कारण तो सैन्याची माहिती करून घेण्यात आणि बाहेरील घडामोडीवर नियंत्रण ठेवण्यात गर्क होता.

आपल्या घराची डागडुजी केल्यावर पेरॉन याने आपले लक्ष दिल्लीवर केंद्रित केले. त्यावेळेस तेथे मराठ्यांचा सरदार बाळोबातात्या यांचे पूर्ण नियंत्रण होते, परंतु बाळोबा आपला अधिकार पेरॉनकडे सोपवण्यास राजी नव्हते. तेव्हा पेरॉन याने ४-५ आठवडे सावधपणे दिल्लीची नाकेबंदी करून शेवटी काही महत्वाच्या लोकांना लालूच दाखवून दिल्लीचा ताबा मिळवला. त्या प्रसंगी दिल्लीचा सम्राट अंध बादशहा याला कोणताही त्रास होणार नाही याची त्याने पुरेपूर काळजी घेतली होती. पेरॉन याने ले मर्चंट (Le Merchant) याला आपल्या वतीने दिल्लीचा अधिकारी नेमले. नंतर पेरॉन दुआबमध्ये आपल्या दुसऱ्या ब्रिगेडकडे गेला.सुथरलँड (Sutherland) हा दुसऱ्या ब्रिगेडचा प्रमुख होता. तिसरी ब्रिगेड कर्नल पेहलमान (Pohlman) च्या अधिपत्याखाली मेडत्याला ठेवलेली होती.

दिल्ली येथील बाळोबातात्या यांचे उदाहरण त्यांच्या भावाने आग्रा येथे गिरवले आणि पेरॉनच्या ताब्यात आग्र्याचा कारभार देण्यास टाळाटाळ केली. तेव्हा पेरॉन याने अचानक १७फेब्रुवारी१७९९ रोजी आपल्या सहा  बटालियन आग्र्यात आणून शहराचा ताबा घेतला. त्यावेळेस पेरॉनला अजिबात विरोध झाला नाही खरा पण किल्ल्याचा ताबा सहजासहजी मिळेना. जवळपास ५८दिवसाच्या किल्ल्याच्या नाकेबंदीनंतर त्याला किल्ल्यात प्रवेश मिळाला.या लढ्यात पेरॉनचे फक्त ६शे सैनिक कामी आले. आग्र्यासारख्या भारतातील सर्वात मजबूत किल्ल्यासाठी एव्हढे कमी सैनिक मरण पावणे ही डी बॉयनच्या सैन्याला मिळालेली अभिमानाची सार्थ पावती होती. कारण त्या किल्याच्या रक्षणार्थ त्यावेळेस ४ हजाराची फौज तैनात केलेली होती. अशा तऱ्हेने पेरॉन याने हिंदुस्थानात आपले वर्चस्व पूर्ण प्रस्थापित केले. यामुळे दौलतराव शिंद्यांची त्याच्यावर पूर्ण मर्जी बसली. चंबळेपासून पतियाळा पर्यंतच्या सर्व मुलुखावर पेरॉन याने आपली हुकूमत बसवली आणि नवीन सैन्य उभारणे वा कमी करणे असे सारे अधिकार त्याला मिळाले. साधारणतः दहा लक्ष पौंड उत्पन्नाचा मुलुख त्याने ताब्यात घेतला होता.(मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार भाग ३)

पेरॉनची ही भरभराट निश्चितपणे थक्क करणारी होती परंतु त्याला परिस्थितीने पण साथ दिली होती. गादीवर आल्यावर दौलतरावाने स्वतःला दक्षिणेच्या राजकारणात पूर्णतः झोकून घेतले होते. पुण्यात आपले वर्चस्व स्थापित करणे त्याने आपले मुख्य उद्दिष्ट ठेवले होते आणि यात त्याला दोनच अडचणी होत्या, एक म्हणजे हुशार व अनुभवी असा नाना फडणीस आणि दुसरे म्हणजे त्याचे स्वतःचे अनियंत्रित असे वर्तन होय. आपल्या काकांची म्हणजे महादजींची हुशारी त्याच्याकडे नव्हती. त्यामुळे पेरॉन यास उत्तरेत रान मोकळे मिळाले. त्याने अलिगढ आणि सोबतच परिसर मजबूत करून घेतला आणि दिल्ली व आग्रा  दोन्हीवर पूर्ण ताबा मिळवला. अलिगडच्या तटबंदीबाहेर त्याने आपल्यासाठी एक ऐसपैस महाल बांधून त्यात तो ऐषारामात राहू लागला. अगदी आतापर्यंत म्हणजे १८७१ पर्यंत तो राजमहाल अस्तित्वात होता.

बायांचा’ गोंधळ:उत्तरेत पेरॉनची म्हणजेच दौलतराव शिंदे यांची अबाधित सत्ता स्थापन झाली तरी दक्षिणेत ‘बायांचा’ गोंधळ सुरु झाला. महादजींच्या मृत्यू पश्चात त्यांच्या तीन बायका जिवंत होत्या. त्यापकी भागीरथीबाई ही सर्वात वयाने लहान व सुंदर होती. दौलतरावांचे तिचे संबंध असल्याच्या संशयाने इतर दोघीनी बंड केले. तसेच शिंद्यांची गादी मिळाली तेव्हा दौलतरावाने तिघींचे यथोस्थित पुनर्वसन करायचे मान्य केलेले होते पण त्यात त्याने ढिलाई केली. शिंद्यांच्या दरबारातील पिढीजात शेणवी मंडळींचा या बायांना पूर्ण पाठिंबा होता.(मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार भाग ३)

दरबारातील बऱ्याच चर्चेनंतर त्या तिघींची बऱ्हाणपूर येथे व्यवस्था लावून देण्याचे मान्य करण्यात आले. त्यांचे बिऱ्हाड बऱ्हाणपूरकडे जात असताना वाटेतच अहमदनगरजवळ त्यांना कैद करून किल्ल्यात बंदिवान करण्यात आले. या घटनेमुळे पुन्हा शिंद्यांच्या घरातील वादावादीस तोंड फुटले व तिन्ही बायांना परत पुण्यात आणण्यात आले. या गडबडीत दौलतरावाने सर्जेराव घाटगे यांच्या मुलीशी लग्न करून सर्जेरावचे आपल्या दरबारातील वजन वाढवून नवीन संकट ओढवून घेतले. त्या वेळेस तिन्ही बायांनी पेशव्यांचा भाऊ अमृतराव याचा आश्रय घेतला. तेव्हा घाटगेंनी कवायती फौजेच्या सात बटलायनी आणून त्यांच्या बंडाचा बिमोड केला. यामध्ये पेरॉनचा कॅप्टन दु प्रात(Du Prat) हा मुख्य होता.परंतु दु प्रातचा हा बेत फसला आणि पुन्हा अमृतरावाची सरशी झाली. यावेळी पेरॉनच्या दुद्रेनेक नावाच्या अधिकाऱ्याच्या हाताखाली अजून दोन पलटणी पाठवण्यात आल्या. त्यांनी अमृतराव बेसावध आहे पाहून त्याच्यावर तोफा डागल्या व त्याची बरीच हानी केली. त्यावेळेस अमृतरावावरील हल्ला हा प्रत्यक्ष पेशव्यांवरील हल्ला आहे हे जाणून पेशव्यांनी लढाईची तयारी सुरु केली. अशा प्रकारे वातावरण चिघळत गेले. शेवटी दौलतरावाने आपल्या दोन गोऱ्या सरदारांना फिलोझ आणि घेसिंग याना आपले सासरे घाटगेंना कैद करण्याची आज्ञा केली.

मित्रानो, पेरॉन यांच्या बऱ्याच भानगडी अशाच चालू राहिल्या. या सगळ्यांची दखल येथे घेणे जागेअभावी केवळ अशक्य आहे आणि ते सांगणे अगदी गरजेचे आहे असे ही नाही. एक गोष्ट मात्र खरी होती आणि ती म्हणजे दौलतरावांचा आपल्या सरदारांवरील किंबहुना प्राप्त परिस्थितीवरील नियंत्रण ढळत चालले होते.  आपण आता सरळ १५एप्रिल१८०० मध्ये झालेल्या मालपूरच्या लढाईबद्दल थोडेसे बोलू या.

जनरल पेरॉन | मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार भाग २
मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार | जनरल पेरॉन भाग १

संदर्भ:
Military Adventures of Europeans in Hindusthan, Herbert Compton,
शिंदेशाही इतिहासाची साधने भाग ८ (शिंदेशाहीतील शेणवी मंडळींचा अस्सल पत्रव्यवहार) ,
मराठी रियासत भाग ७, सरदेसाई गो. स.

संकलन व लेखन: प्रमोद करजगी

Leave a Comment