गणेश मंदिर, कायर, यवतमाळ

Uploaded By: Discover Maharashtra
Views: 1
2 Min Read

गणेश मंदिर, कायर, यवतमाळ –

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील ऐतिहासिक कायर नगरीला मोठा पुरातन वारसा लाभलेला आहे. कायर हे नाव ऐकायला जरी वेगळे वाटत असले, तरी या गावात प्राचीन काळापासून मानवी वस्ती आणि संस्कृती नांदत असल्याचे पुरातत्त्वीय पुराव्यांवरून स्पष्ट होते. कायर येथे गढी, किल्ला तसेच अनेक पुरातन मंदिरे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे हे छोटेसे, पुरातन गणेश मंदिर. या मंदिरातील गाभाऱ्यात गणरायाची प्राचीन मूर्ती विराजमान आहे.

वणी शहरापासून सुमारे १९ किलोमीटर अंतरावर असलेल्या कायर या प्राचीन गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून पुरातत्त्वीय उत्खनन करण्यात आले. या उत्खननात सातवाहनकालीन वसाहतीचे अवशेष, टेराकोटाच्या फरशा, मातीची भांडी, मणी, सोन्याची बांगडी, तसेच सोने, चांदी आणि जस्ताचे शिक्के आढळले. याशिवाय सातवाहनकालीन मुद्रांचे ठसे असलेले सिलिंगही सापडले.

या पुरातत्त्वीय अवशेषांमुळे कायरचा इतिहास सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या सातवाहन काळापर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट होते. येथे सातवाहनकालीन शिलालेखही आढळले आहेत. तसेच १२व्या शतकातील हेमाडपंथी मंदिर आणि ७व्या–८व्या शतकातील गरुडस्तंभ यामुळे कायरचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व अधिक अधोरेखित होते.

उत्खननातून कायरच्या प्राचीन वसाहती, तटबंदी आणि तत्कालीन सांस्कृतिक जीवनाचे महत्त्वपूर्ण पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे कायर हे केवळ एक गाव नसून विदर्भाच्या प्राचीन इतिहासाची अनेक पाने जपणारे महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे. याच समृद्ध ऐतिहासिक वारशाचा एक भाग म्हणून कायर येथील हे पुरातन गणेश मंदिर आजही आपल्या प्राचीन परंपरेची आणि सांस्कृतिक वारशाची साक्ष देत उभे आहे.

Vidarbha Darshan

Written By: Vidarbha Darshan

Leave a Comment