गडदुर्ग संवर्धन

गडदुर्ग संवर्धन…

आज भरपूर दिवसांनी लेख लिहितोय , विषय तसा आता नवीन नाही पण दिशा असेल तर कार्य उत्तम होते . दिशाहीन लोकांचे आरमार बुडते आणि ज्यांच्याकडे ध्येय आणि दिशा दोन्ही आहेत तेच शिवकार्यात एक मोलाचे योगदान देऊन जातात . गड दुर्ग संवर्धन हे नाव घेतले , ऐकले किंवा वाचले तर डोळ्यासमोर उभे राहते ते एखाद्या गडाचे चित्र किंवा एखादी वास्तू . मुळात संवर्धन करणे किंवा संवर्धन या शब्दाची फोड करायचे म्हंटले तरी त्याचा अर्थ वर वर सोपा वाटत असला तरी त्याचा अर्थ खूप खोल आहे . गडदुर्ग संवर्धन हे कार्य एक दिवसाचे किंवा एका वर्षाचे नसून ती सातत्याने चालणारी आणि घडणारी प्रक्रिया आहे . यात फक्त भावनिक असून कार्य तडीस जात नाही , तर त्यात तुम्हाला अभ्यासू मनांची जोड पण द्यावी लागते . अभ्यास आणि भावना यांचा समतोल राखून इतिहास जपावा लागतो . वास्तू , अवशेष या फक्त भावनिक नजरेने न पाहता , त्यांचा अभ्यास करून त्यांची माहिती आणि महत्व जनमानसाला पटवून द्यावे लागते . इतिहासाचा अभ्यास करताना जसे समकालीन पुराव्याला , संदर्भाला महत्व आहे तसेच काही बाबतीत संदर्भ आणि पुरावे उपलब्ध नसताना समकालीन गोष्टींचा अभ्यास करून केलेल्या तर्कांना पण तेवढेच महत्व आहे , प्रत्येक अभ्यासकांचे तर्क वेगवेगळे असू शकतात , पण कोण त्यांना पटवून देते यालाही महत्व आहे .

माझ्या मते गडदुर्ग संवर्धन हे फक्त फक्त एखाद्या गडापुरता किंवा त्यावरील वास्तू जतन करण्या पुरता मर्यादित नसून गडाच्या परिसरातील गावे , मंदिरे , तेथील लोक , एखादे जुने बांधकाम , विरगळी , त्या गावातील लोकांचे गडाबद्दल असलेले नाते तसेच त्या गडाच्या जवळ इतर कोणता गड आहे आणि त्याचाही इतिहास या सर्व गोष्टींचा करण्यात येणारा सखोल अभ्यास करणे होय.

गडदुर्ग संवर्धन

मला अजून एक गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते ती म्हणजे अशी की आपण एक बाब स्वीकारली पाहिजे की गड म्हणजे फक्त शिवाजी महाराज यांनी बांधलेले दुर्ग नव्हे , तर शिवकाळापूर्वी सुद्धा गड होते आणि त्या त्या काळात तेथील राजवटी शिवपूर्व काळात नांदून गेल्यात हे सत्य आपण स्वीकारले पाहिजे . हेही तितकेच सूर्यकिरण इतके स्वच्छ सत्य आहे की गडदुर्गांचा वापर स्वराज्यासाठी छत्रपती शिवरायांनी केला जे इतर कोणालाही जमले नाही , आणि छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी केलेल्या बलिदान व त्यागमुळे आणि सांडलेल्या रक्तामुळे गडाला मंदिराचे स्वरूप आणि पावित्र्य प्राप्त झाले आहे .

गड संस्कृती हि प्राचीन आहे , त्या त्या काळातील राजवटीप्रमाणे गडांचा उपयोग झाला आहे . त्यामुळे गडावर शिवपूर्व काळाचेही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात . एखाद्या राजाने गड जिंकल्यावर तो पूर्ण गडाचे स्वरूप नाही बदलत , पण त्याच्या नुसार थोडे फार बदल किंवा नवनवीन बांधकाम करून घेतो . म्हणून अनेक राजवटीचे बांधकाम , त्यांचे स्थापत्य शास्त्र आपल्याला एकाच गडावर पाहायला मिळते . शिवकाळात या स्थापत्य शास्त्राला शिवरायांनी एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले . गड बांधणीत त्यांनी अनेक नवनवीन अविष्कार केले आणि शोध लावलेत . सोनोपंत डबीर , हिरोजी इंदूळकर यांच्या सारख्या अभियंत्यांना सोबत घेऊन शिवरायांनी अनेक अविश्वसनीय कार्य केले . ज्यासमोर आताचे तंत्र ज्ञान पण फिके पडेल , राजगड रायगड , सिंधुदुर्ग , विजयदुर्ग असे अनेक अभेद्य आणि अजिंक्य गडदुर्ग उभे केले .

म्हणून आपल्याला संवर्धन करताना शिवपूर्वकाळ आणि शिवकाळ या दोन्हींचा अभ्यास करणे गरजेचे असते जेणेकरून गडावरील प्रत्येक वास्तूबद्दल आपल्याला पुरेपूर माहिती मिळते आणि गड नव्याने पाहता येतो आणि गडदुर्गांच्या विश्वात रमता येते .

गडदुर्ग संवर्धन

सध्या गडदुर्गाना पर्यटनाच्या विळख्यातून बाहेर कडून त्यांचे ऐतिहासिक महत्व जपणे महत्वाचे आहे . महाराष्ट्रात अनेक पर्यटन स्थळ असताना गडांचा वापर पर्यटनासाठी करण्याचा सरकार आणि जनतेचा अट्टाहास का हेच कळत नाही . एक तर भारतातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राला ऐतिहासिक ठेवा लाभला आहे . अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज याच महाराष्ट्रात आणि इथल्याच शिवनेरी गडावर होऊन गेले मग तुम्हीच विचार करा कि गडदुर्ग हि प्रत्येक मराठी माणसासाठी एक अभिमानाची बाब आणि हक्काची डोकं टेकवण्याची जागा असली पाहिजे . तिथली पवित्र माती मस्तकी लावली पाहिजे पण दुनियाभरचे अज्ञान , जनजागृती चा अभाव , इतिहासाचे विकृतीकरण , मुद्दाम सांगितला जाणारा खोटा इतिहास तसेच शाळेतील पुस्तकातील शिवरायांचे असलेले मोजक्या पानांचे स्थान आणि फक्त आणि फक्त १९ फेब्रुवारीला आणि ६ जून ला जागे होणारे आताचे शिवभक्त या सर्वाना कारणीभूत आहेत . मुळात आपल्याच मातीत , आपल्याच गडांवर आपल्या लोकांना सिगरेट नका पिऊ , दारू नका पिऊ , कचरा नका करू , गडाचे पावित्र्य जपा या सूचना देण्याची वेळ येते हेच आपले अपयश आहे . हे चित्र बदलायचे असेल तर इथल्या प्रत्येक माणसात शिवराय आणि त्यांचा प्रेरणादायी ज्वलंत इतिहास रुजवला पाहिजे .

हवं तर आजपासून सुरुवात करा पण जो पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक गडदुर्ग मोकळा श्वास घेत नाहीत तोपर्यंत स्वस्थ बसू नका . कारण आज शिवराय असते तर त्यांच्या समोर आपण तोंड दाखवायच्या लायकीचे राहिलो नसतो . म्हणून जसे शक्य असेल तसे कोणत्याही जमेल त्या गडावर जाऊन त्याचा पूर्ण पणे अभ्यास करून तिथे संवर्धन कार्य सुरु करा. आणि काही मदत हवी असेल तर हक्काने कळवा .

#शिवस्वप्न_प्रतिष्ठान
#स्वराज्यातील_गडदुर्ग_संवर्धन_आणि_संरक्षण_चळवळ.

माहिती साभार:- Milind Mahale

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here