महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

तर आमचे हातपाय तोडून टाकावेत…

By Discover Maharashtra Views: 2375 3 Min Read

तर आमचे हातपाय तोडून टाकावेत… | पहिले इंग्रज मराठा युद्ध –

पहिले इंग्रज मराठा युद्ध हे मराठ्यांच्या इतिहासातील एक अभिमानास्पद पर्व. हे युद्ध काही एकाच वेळी एकाच ठिकाणी झालेले युद्ध नव्हते. पहिल्या इंग्रज – मराठा युद्धात इ.स.१७७८ – १७८२ या काळात झालेल्या अनेक लहानमोठ्या चकमकी, हल्ले, छापे आणि काही मोठ्या लढाया यांचा अंतर्भाव होतो. पहिल्या इंग्रज – मराठा युद्धाची व्याप्ती फार फार मोठी होती. यात झालेल्या लढायांची ठिकाणं पाहिलीत की याला आपले महायुद्ध म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. यमुनातिरी कल्पि – ग्वाल्हेर – माळवा – बडोदा – मुंबई – ठाणे – पुणे तसेच दक्षिणेतही अर्काट, मद्रास वगैरे अशा विस्तीर्ण प्रदेशातील अनेक ठिकाणे; इंग्रज आणि मराठ्यांकडची अनेक मोठी पात्रं, शिवाय फ्रेंच, हैदरअली, टिपू, निजाम वगैरेंचाही संबंध या युद्धाशी येतो. युद्धाची प्रत्यक्ष पार्श्वभूमी १७७५ सालापासूनची आहे. पहिले इंग्रज – मराठा युद्ध हा फारच मोठा, एखाद्या लेखाचा नाही स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे.

हे युद्ध फक्त राघोबादादामुळेच झालं असं नाही; तर इंग्रजांच्या विशेषतः कोलकात्याचा गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्ज याच्या मुजोरपणामुळे, इंग्रजांच्या साम्राज्यवादाच्या महत्त्वाकांक्षेमुळे, त्यांच्या राज्यविस्तारातील एक टप्पा अशा अनेक कारणांनी झालं. या युद्धात मराठ्यांनी इंग्रजांना पूर्णपणे नमवले, त्यांची खोड मोडून पुरती जिरवली. या युद्धातील काही लढायांत मराठ्यांचा जय झाला तर काहींत इंग्रजांचा. पण निर्णायक मोठ्या लढाया मराठ्यांनी जिंकल्या. इंग्रजांचा शरण येऊन दोनदा तह करावा लागला. मराठ्यांनी एकजुटीने, शक्तीने आणि युक्तीने हे युद्ध लढले. सगळ्यांनी शर्थ केली. त्याचेच एक उदाहरण –

मराठ्यांनी या युद्धात दारूच्या बाणांचा अतिशय उत्तम वापर केला. हे दारूचे बाण बनविणाऱ्या कारागिरांनी चक्क प्रतिज्ञा केली होती की “जर युद्धात बाण चांगले निघाले नाहीत तर आमचे हातपाय तोडून टाकावेत !” बाण असे उत्कृष्ट बनवलेले होते आणि कारागिरांना त्याबद्दल असा दुर्दम्य आत्मविश्वास होता. ह्यासंबंधी सेनापती हरिपंत फडके नाना फडणविसांना एका पत्रात लिहितात :

“सेवेसी विज्ञापना. ‘बाण नवे शर्तीचे चारशें निराळे करून पाठविले आहेत. लढाईत सोडिल्यावर परीक्षा दृष्टीस पडेल. वाईट बाण निघाल्यास हातपाय तोडावे याप्रमाणे कारीगारांनीं प्रतिज्ञा केली आहे व दुसराही कारखाना करावयाचें पाहतों ह्मणून आज्ञा केली ती कळली. बाण येथे पावल्यावर परिक्षेस येतील तसे लिहून पाठऊं.’ इतके प्रतिज्ञेचे पाठविले, कारीगारांनीं शर्त केली, तेव्हां चांगलेच असतील. रवाना छ २२ जिल्हेज हे विज्ञापना.”

संदर्भ – ‘इतिहाससंग्रह’ अंक पहिला, ऑगस्ट १९०८, संपादक दत्तात्रय बळवंत पारसनीस.

पहिल्या इंग्रज – मराठा युद्धात मराठ्यांनी शक्तीयुक्तीचा योग्य वापर करून एकजुटीने इंग्रजांना हरवले. त्यानंतर वीस वर्षांनी झालेल्या दुसऱ्या व त्यानंतरच्या तिसऱ्या इंग्रज – मराठा युद्धात आपण हरलो. दुसऱ्या आणि तिसऱ्या युद्धात मराठे एकजुटीने लढले नाहीत. सगळ्यांकडून चुका झाल्यात, एकाला दोष देऊन उपयोग नाही. नको त्या गोष्टी घडल्यात. तो इतिहास फार क्लेशदायक आहे. मात्र पहिल्या इंग्रज – मराठे युद्धाचा इतिहास आपल्याला सदैव अभिमानास्पद आणि प्रेरणादायी राहील.

– प्रणव कुलकर्णी.

चित्रे, छायाचित्रे – महादजी शिंदे, नाना फडणवीस, सेनापती हरिपंत फडके, वडगाव येथील विजयस्तंभ, वडगावला असलेले इंग्रजांच्या शरणागतीचे भित्तिचित्र, दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचे एक चित्र (पहिल्या इंग्रज मराठे युद्धाचे चित्र उपलब्ध नाहीये), कोलकात्याचा गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्ज (याची महत्त्वाकांक्षा युद्धाला कारणीभूत झाली).

Leave a comment