धर्मवेडे पोर्तुगीज भाग २

By Discover Maharashtra Views: 1208 5 Min Read

धर्मवेडे पोर्तुगीज भाग २ –

जैसी हरळमाजी रत्नकिळा..!
की रत्नामाजी हिरा निळा..!
तैसी भासामाजी चोखळा..!
भासा मराठी..!!
जैसी पुष्पामाजी मुख्य मोगरी की परिमळामाजी कस्तुरी..!
तैसी भासामाजी साजिरी मराठिया..!!
पाखियामदे मयूर..!
वृखियांमधे कल्पतरू..!
भासामधे मानूं थोरु..!
मराठियेसी..!!

जेसुइटांनी चौल येथे इ.स. 1580 मध्ये मिशन स्थापले, त्यांच्या त्या ठिकाणी एक धर्ममंदिर, एक आश्रम व तीनशे मुलांची शाळा होती. त्याच वर्षी वसई व ठाणे येथे प्रत्येकी ऐंशी लोकांना व वांद्रयास (आताचे बांद्रा) दोन सहस्त्र कोळ्यांना बाटविण्यात आले, पोर्तुगीज लोक हिंदूंना बाटविण्याकरता जुलमांचा कळस करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी हिंदूंच्या अठरा पुराणांप्रमाणे ख्रिस्त पुराणही रचून थोड्या भाबड्या हिंदू लोकांचे मन ख्रिस्ती धर्माकडे वळविण्याचा प्रयत्न केला, हे पुराण फादर टॉमस स्टीफन्स याने प्रथम पोर्तुगीज भाषेत लिहून त्याचे मराठी भाषेत ओवीबध्द भाषांतर इ.स. 1614 मध्ये केले.(धर्मवेडे पोर्तुगीज भाग २)

फादर टॉमस हा जन्माने पोर्तुगीज नव्हता, तो मूळचा इंग्रज असून पुढे पोर्तुगालमध्ये जाऊन राहिला, तेथेच त्याने पोर्तुगीज भाषा आत्मसात केली, त्यांचा जन्म इंग्लंड मधील विल्टशायर परगण्यांतील वुलस्टन या गावी झाला, तेथून पोर्तुगाल मध्ये जाउन राहिल्यावर त्याने 4 एप्रिल 1579 रोजी भारतात येण्याकरता लिस्बन सोडले, व तो 24 ऑक्टोबर 1579 रोजी आफ्रिकेस वळसा घालून गोव्यात उतरला, म्हणजे त्याला भारतात येण्यासाठी सहा महिने लागले.

गोव्यात असताना त्याने कोकणी भाषेवर चांगले प्रभुत्व मिळविले, कोकणी ही मराठीचीच एक बोली आहे, तिच्यावर प्रभुत्व मिळविल्यावर मराठीवर त्याचे प्रेम बसून तिच्यात त्याची चांगलीच प्रगती झाली. मराठीची थोरवी त्याने पुढील ओव्यांत गायिली आहे.

जैसी हरळमाजी रत्नकिळा..!
की रत्नामाजी हिरा निळा..!
तैसी भासामाजी चोखळा..!
भासा मराठी..!!
जैसी पुष्पामाजी मुख्य मोगरी की परिमळामाजी कस्तुरी..!
तैसी भासामाजी साजिरी मराठिया..!!
पाखियामदे मयूर..!
वृखियांमधे कल्पतरू..!
भासामधे मानूं थोरु..!
मराठियेसी..!!
(मराठी ख्रिस्तपुराण, फादर स्टीफन )

फादर स्टीफनने गोव्यास कोकणीचे व्याकरण प्रसिध्द केले, या सुमारास मुद्रणकला पोर्तुगीजांनी भारतात आणली असून त्यांनी आपल्या राज्यात गोवे, कोचीन,इत्यादी ठिकाणी छापखाने सुरू केले होते, त्यातच ही व इतर पुस्तके छापण्यात आली, स्टीफनने गोव्यात चाळीस वर्षे काम केल्यावर इ.स. 1619 मध्ये वयाच्या सत्तराव्या वर्षी गोव्यातच मृत्यू झाला.

श्री.शिवछत्रपतींच्या जन्मापूर्वी दहा वर्षे म्हणजे 31 जानेवारी 1620 रोजी गोवे प्रांतातील कोणा ही हिंदूने हिंदूपध्दतीप्रमाणे विवाह करू नये,जो करील त्यास एक हजार मोहरा दंड असा कायदा अमलात आला, हा कायदा श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या भीतीने असो व अन्य कारणाने असो, महाराजांच्या कारकीर्दीच्या अखेरीस म्हणजे 19 जानेवारी 1678 रोजी त्यात बदल करून थोडा सौम्य करण्यात आला. तो असा की हिंदूंनी आपले लग्न राजरोस न करता गुपचुप घरात करावे, ते बाहेर कोणास दिसू न देण्याकरिता घराची दारे बंद करावी, हे मंगलकार्य दिलेल्या नियमाप्रमाणे चालते की नाही यावर देखरेख ठेवण्याकरिता घराबाहेर सशस्त्र सैनिकांचा पहारा ठेवीत व लग्नघरी दक्षिणा वगैरे घेण्यास जर कोणी भिक्षुक जाऊ लागले तर त्यास बंदी करण्यात येई.

धार्मिक बाबी सोडून दिल्या तरी इतर बाबतीत जनतेला पोर्तुगीजांचा म्हणजे फिरंग्यांचा किती तिटकारा आला होता व त्यांना कसा जाच सोसावा लागत होता याची उदाहरण चौल बंदराच्या इतिहासात अनेक सापडतात, चौल गावात पोर्तुगीज माणसास स्थावर मिळकत करता येऊ नये म्हणून तेथील स्थानिक लोकांनी कोणाही फिरंग्यास जमीन न विकण्याचा ठाम निश्चय केला होता, परंतु 1564 मध्ये तो निश्चय मोडून पिलोबा वर्तक यांच्या भावाने आपले एक शेत फिरंग्यास विकले, या अपराधाबद्दल त्याला त्याचाच शेतात नेऊन सुळी देण्यात आले.

फिरंग्यांच्या जाचामुळे चौलची माड, पोफळी, आंबा, फणस ही झाडे तुटली व रयत परागंदा झाली, तपे श्रीगाव व तपे परहर येथे फिरंग्यांनी दंगा केला, तेव्हा त्यांनी प्रजेपैकी कित्येकांना कैद केले, कित्येक परागंदा व मयत झाले, प्रजा उठून गेल्यामुळे आगरांची व्यवस्था पाहण्यास कोणी राहिले नाही, अशी तीन वर्षे गेली, अशा स्थितीत समुद्राचे पाणी आत शिरून बांध, खाड्या व सीले फुटून खांजणे झाली, रयतेवर जुलूम होऊ लागल्यामुळे कित्येक कुळे रेवदंड्यास व इतरत्र गेली, कोळयांची घरे जळाली, काहींना बंदी केलेव मुलूख खराब झाला, त्याच वर्षी फिरंग्यांची पुन्हा धाड आली तेव्हा व्यापारी, वाणी, उदमी पळाले.

रयतेस तहसिलाची तसवीस लागली म्हणून त्यानी गुरे, ढोरे व बी-बियाणे विकून साऱ्याची भरपाई केली, इ.स.1607 च्या सुमारास फिरंग्यांनी तीन वेळा चौल लुटले आणि चौथ्या वेळी खूनखराबा करून लोकांना कैद केले,या जुलुमाला भिऊन रयत रेवदंडा व दाभोळकडे पळाली.

संदर्भ -शि.च.सा.खं.9, पान क्र 24-31.

गोवा प्रांतातील पोर्तुगीजांचा राज्यविस्तार सर्वश्रुतच आहे, पण वसई प्रांतात त्यांनी खुप मोठे राज्य कमावले होते, बहादूरशहापासून पोर्तुगीजांनी वसई प्रांत घेतला तेव्हा त्यांनी वसई ही त्या प्रांताची राजधानी करून तिच्याखाली अंझोर, विरार, शाळगाव, वसई, ठाणे, करंजे, आगाशी, माहीम, सोपारे इत्यादी नऊ परगणे होते, त्यात 4 कसबे, 324 खेडी व 18 बागा होत्या. (धर्मवेडे पोर्तुगीज)

संदर्भ-:
1) शिवकालीन पत्रसारसंग्रह.
2) शिवदिग्विनजय.
3) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास / शिवकालीन महाराष्ट्र.

Leave a comment