महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,71,554

छत्रपती चिमासाहेब उर्फ शाहूमहाराज

By Discover Maharashtra Views: 3401 6 Min Read

छत्रपती चिमासाहेब उर्फ शाहूमहाराज –

करवीर १८५७ –

८ जाने १८३१  रोजी छत्रपती  चिमासाहेब उर्फ शाहू यांचा जन्म  छत्रपती शहाजी ऊर्फ बुवासाहेब महाराज आणि नर्मदाबाई राणीसाहेब  यांच्या पोटी झाला .चिमासाहेबांच्या जन्मानंतर पाच  आठवड्याच्या आतच नर्मदाबाई राणीसाहेब  निधन पावल्या. नर्मदाबाई राणीसाहेब  निधन पावल्या तेव्हा छत्रपती चिमासाहेब फक्त पाच महिन्याचे होते.छ. चिमा साहेबांना सांभाळण्यासाठी भाऊसाहेब चव्हाण, बापूसाहेब हिंम्मतबहाद्दर, खंडेराव बाबासाहेब निंबाळकर, आप्पासाहेब घाडगे, ज्योतीराम घाडगे ,भिमबहाद्दर  इत्यादीं दिग्गज मंडळीना ठेवण्यात आले होते.

१८४० साली छत्रपती चिमासाहेब महाराजांची मुंज झाली. लगेच त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी असे पोलिटिकल एजंटकडून सुचवण्यात आले होते.पण त्याकडे कारभार्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे शिक्षणाचा गाडा तसाच पडून राहिला. त्यानंतर १८४० मध्ये व्याकरणकार दादोजी पांडुरंग यांची नेमणूक करण्यात आली. इंग्रजी व ईतर विषय शिकवण्यासाठी एलफिन्स्टन काॅलेजमधील एका हुषार पदवीधर केशव नरसिंह देशपांडे यांची नेमणूक करण्यात आली. नंतर २६ एप्रिल १८४७ मध्ये चिमासाहेबांचा विवाह नरसिंगराव शिंदे नेसरीकर यांच्या मुलीशी झाला.

छत्रपती चिमासाहेब १३ वर्षाचे झाले होते .तेंव्हा १८४४  मध्ये कोल्हापूरात पन्हाळा, विशाळगड, सामानगड, भुदरगड येथील गडकऱ्यांनी एकाच वेळी इंग्रजांविरुध्द बंड पुकारले होते. त्यांची ताकद अपुरी पडल्याने इंग्रजांनी ते बंड मोडून काढले. या घटनेचा परिणाम छत्रपती चिमासाहेब महाराजांवर झाला, त्यांच्या मनात इंग्रजांविरुध्द असंतोषाचा ज्वालामुखी  भडकू लागला. बाहेरच्या लोकांनी येवून आपल्या राज्यकारभारावर अंकुश ठेवणे आपणांस आवडत नाही असे ते उघडउघड बोलू लागले.

राजबिंड्या व्यक्तीमत्वाच्या छत्रपती  चिमासाहेब महाराजांना लाठीकाठी सारखे मर्दानी खेळ खेळणे, शिकार करणे याची विशेष आवड होती. आपल्या या छंदांचा त्यांनी लोकसंग्रह करण्यासाठी उपयोग करुन घेतला. शिकारीच्या निमित्ताने करवीर राज्यात फिरत असताना त्यांनी चांगली माणसे पारखली आणि त्यांना सोबत घेतले.

फिरंगोजी शिंदे, रामजी शिरसाठ, रामसिंग परदेशी, हंबीरराव व दौलतराव मोहिते अशा सहकाऱ्यांना सोबत घेऊन छत्रपती  चिमासाहेबांनी उठावाची जय्यत तयारी केली. या  सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी छत्रपतींचे ‘रेड रिसाला’ लष्कर आणि इंग्रज सरकारची कोल्हापूरातील २७ वी पलटण या फौजांमध्ये फितुरी घडवून आणली.

उत्तरेत इंग्रजांविरुध्द उठावाला सुरुवात झाल्याच्या बातम्या कोल्हापूरात येऊ लागल्या, त्या बातम्या ऐकून छत्रपती चिमासाहेबांचा सहकारी रामजी शिरसाठ याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या २७  व्या पलटणीने १८ जुलै १८५७ ला कोल्हापूरात इंग्रजांविरुध्द उठावाला सुरुवात केली. त्यांनी पराक्रमाची शर्थ करत बर्‍याच इंग्रज सैनिकांना कंठस्नान घातले. इंग्रजांनी ताबडतोब बेळगाव, रत्नागिरी येथून आपल्या फौजा बोलावून घेतल्या. त्यांनी रामजी शिरसाठ आणि त्याच्या काही साथीदारांना पकडून फाशी दिले तर काहींना गोळ्या घातल्या. इंग्रज सैन्याचा सामना करण्यासाठी उठावातील काही सैनिकांनी मंगळवार पेठेतल्या घोड्यांची पागा असलेल्या राधाकृष्ण मंदीराचा आश्रय घेतला आणि ते इंग्रजांचा सामना करु लागले. इंग्रजांची मोठी फौज आणि तोफखान्यापुढे त्यांचा प्रतिकार तोकडा पडला. इंग्रजांनी त्यांनाही गोळ्या घालून ठार मारले.

या प्रकरणी रामजी शिरसाठला चिमासाहेब महाराजांची फूस होती याची खात्री करुन इंग्रजांनी चिमासाहेबांना राजवाड्यातच नजरकैदेत ठेवले.छत्रपती  चिमासाहेबांच्या काही साथीदारांनाही अटक करण्यात आली. त्या साथीदारांनी छत्रपती चिमासाहेब इंग्रजांविरुध्द उठावात सामिल आहेत अशी साक्ष द्यावी म्हणून त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. पण या स्वामिनिष्ठ मर्द मावळ्यांनी छत्रपती  चिमासाहेबांविरुध्द साक्ष दिली नाही. शेवटी इंग्रजांनी त्यांनाही फासावर लटकवले.

यानंतर ५ डिसेंबर १८५७  रोजी चिमासाहेबांचा एक विश्वासू सहकारी फिरंगोजी शिंदे याने पाचगाव व गिरगाव मधील आपले निवडक साथीदार घेऊन छत्रपती  चिमासाहेबांना सोडवण्यासाठी कोल्हापूरात शिरले. त्यांनी पराक्रम गाजवत कोल्हापूरच्या वेशी ताब्यात घेतल्या आणि आपला मोर्चा राजवाड्याकडे वळवला. राजवाड्यावर पहारा देण्यासाठी असलेल्या इंग्रज सैनिकांना कापून काढत फिरंगोजी शिंदे  राजवाड्यात शिरले व छत्रपती चिमासाहेबांना आवाज देऊ लागले पण लपून बसलेल्या एका इंग्रज सैनिकाने फिरंगोजी शिंदे यांच्यावर गोळ्या झाडल्या. फिरंगोजी शिंदे धारातिर्थी पडले. या कालावधीत इंग्रज अधिकारी कर्नल जेकब आपली फौज घेऊन राजवाड्यावर आला. जेकबने फिरंगोजी शिंदेच्या सगळ्या साथीदारांची धरपकड केली. त्या साथीदारांपैकी काहींना  राजवाड्याबाहेरच्या चौकातच गोळ्या घातल्या तर काहींना तिथेच तोफेच्या तोंडी देण्यात आले. त्या शूरवीर योध्यांच्या रक्ताने राजवाड्याच्या परिसरातली भुमी पवित्र झाली. रक्ताच्या थारोळ्यात सर्वत्र पडलेल्या या स्वातंत्र्य सैनिकांच्या मृत कलेवरांना अक्षरशः तूडवत कर्नल जेकब राजवाड्यात गेला. चिमासाहेब राजवाड्यातच आहेत हे पाहून त्याने सुटकेचा निःश्वास सोडला.

या सगळ्या प्रकाराचे सुत्रधार छत्रपती  चिमासाहेब यांनी पुन्हा काही हालचाल करु नये म्हणून इंग्रजांनी राजवाड्यावर आणखी कडक पहारे बसवले. छत्रपती चिमासाहेबांना कोल्हापूरात ठेवणे आपल्यासाठी घातक आहे याची खात्री झाल्यावर इंग्रजांनी १८५८ च्या मार्च महिन्यात त्यांना कोल्हापूरहून हलवले आणि रत्नागिरीहून बोटीतून समुद्रमार्गे कोल्हापूरपासून शेकडो मैल लांब असलेल्या कराचीला नेऊन नजरकैदेत ठेवले. चिमासाहेबांच्या पत्नीलाही त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी नाकारण्यात आली.

कराची इथे तब्बल अकरा वर्षे कैद भोगल्यानंतर १५ मे १८६९  साली कराचीमध्येच चिमासाहेबांचा दुर्दैवी अंत झाला.

नंतरच्या कालखंडात कोल्हापूरचे भाग्यविधाते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी १६  डिसेंबर १८९२ रोजी कराचीला जाऊन चिमासाहेब महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. आपल्या पुर्वजांच्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान असणार्‍या शाहू छत्रपतींनी चिमासाहेबांचा स्मृतीदिन मोठ्या प्रमाणात साजरा  करण्यास सुरुवात केली. नंतर चिमासाहेबांच्या नावाने शाहू महाराजांनी कराची येथेच एक बोर्डिंग सुरु केले. पुढे भारत व पाकिस्तान वेगळे होईपर्यंत करवीर छत्रपतींच्या वतीने कराची येथे चिमासाहेबांचा स्मृतीदिन साजरा केला जात होता.

१८५७ चे  स्वातंत्र्यसंग्राम म्हटले की आपल्यासमोर बहादूरशहा जफर, झाशीची राणी, तात्या टोपे यांची नावे प्रामुख्याने येतात.पण याच  संग्रामात शिवछत्रपतींचा वारसा लाभलेल्या  कर्तबगार घराण्यातील एक क्रांतिवीर होते .ज्यांनी १८५७  च्या लढ्यात कोल्हापूरचे नेतृत्व केले.त्या छत्रपती चिमासाहेब उर्फ शाहू महाराज यांचा आपणास विसर पडला आहे.

इंग्रजांची माफी न मागता छत्रपती असूनही इंग्रजांच्या कैदेतच मरण पत्करणे पसंत करणारे स्वातंत्रवीर  …

चिमासाहेब छञपती १८५७ च्या लढ्यातील कोल्हापूरच्या स्वातंञ योद्धांचे नेतृत्व करणारे , आकरा वर्षे इंग्रजांच्या कैदेत राहून ही माफी मागितली नाही . छञपती आसूनही कैदेतच मरण पत्करले . या सच्च्या स्वातंञवीरांना मानाचा मुजरा!

संदर्भ – करवीर रियासत, स.मा.गर्गे.

लेखन  – डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर.

Leave a Comment