महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,82,643

छत्रपति शहाजी महाराज : एक द्रष्टा राजा

By Discover Maharashtra Views: 1418 6 Min Read

छत्रपति शहाजी महाराज : एक द्रष्टा राजा –

छत्रपती शिवरायांनी अतुल्य पराक्रमातून उभे केलेले रयतेचे स्वराज्य व छत्रपति शाहू महाराजांच्या कर्तृत्वाने एक पवित्र महानता लाभलेली करवीर छत्रपतींची गादी…. या गादीवर छत्रपति शाहू महाराजांचे नातू व छत्रपतींच्या गादीचे दहावे वारसदार म्हणून श्रीमंत छत्रपति शहाजी महाराज विराजमान झाले. छत्रपति राजाराम महाराजांच्या मुशीतून घडलेले शहाजी महाराज अत्यंत शिस्तप्रिय, प्रजाहितदक्ष व तितकेच कर्तव्य कठोर होते. कोणत्याही कामात कोणत्याही प्रकारची कसर महाराजांना सहन होत नसे. महाराजांच्या अंगी असलेला सैनिकी बाणा, महाराजांची देहबोली, त्यांच्या भारदस्त पिळदार मिशा व विशेषतः महाराजांचा शिस्तबद्धपणा यांमुळे संपूर्ण कोल्हापूरात महाराजांबद्दल प्रचंड आदर व तितकाच दराराही होता.

छत्रपति राजाराम महाराजांनंतर शहाजी महाराजांनी छत्रपति म्हणून राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. छत्रपति शाहू महाराज व छत्रपति राजाराम महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून महाराजांनी राज्यकारभारास सुरुवात केली तोच कोल्हापूरात काही लोक व विशिष्ट जनसमूहांनी कोल्हापूरचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण करावे अशी मावळत्या इंग्रज सरकारकडे विनंती केली. इंग्रजांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही मात्र १९४८ साली गांधीजींची हत्या झाल्यानंतर संपूर्ण देशाप्रमाणेच कोल्हापूरातही तीव्र दंगली उसळल्या. याचा फायदा घेऊन छत्रपती घराण्याचे पारंपरिक विरोधक असणाऱ्या काहींनी सरदार पटेलांना कोल्हापूरची जनता सुरक्षित नाही त्यामुळे कोल्हापूरचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण करावे अशा मागणीच्या तारा पाठवल्या. याला प्रतिसाद म्हणून पटेलांनी चौकशीसाठी कोयाजी समितीची स्थापना केली. या समितीने कोल्हापूरची जनता पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला मात्र सरदार पटेलांनी इतर संस्थानांप्रमाणे कोल्हापूरही स्वतंत्र भारतात विलीन करावे अशी मागणी शहाजी महाराजांकडे केली. यास प्रजा परिषदेच्या माधवराव बागलांनी विरोध दर्शवून छत्रपतिंच्या नव्हे तर करवीरच्या जनतेच्या संमतीने कोल्हापूरचे विलीनीकरण करावे अशी मागणी केली.

कोल्हापूरच्या जनतेने हा निर्णय पूर्णतः शहाजी महाराजांवर सोपवून छत्रपति जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य अशी भूमिका घेतली. सरतेशेवटी छत्रपति शहाजी महाराजांनी दि. १ मार्च १९४९ रोजी कोल्हापूर राज्य स्वतंत्र भारतात विलीन करण्याचा निर्णय घेतला व छत्रपतिंचे मराठा लष्कर ( Rajaram Rifles ) बरखास्त करुन त्याचे रुपांतरण मराठा लाईट इंन्फंट्रीमध्ये केले.

विलिनीकरणानंतर छत्रपतिंचा कोल्हापूर राज्यावर कोणताही विशेष अधिकार असणार नव्हता, त्यामुळे नैतिकदृष्ट्या विचार केल्यास छत्रपति म्हणून शहाजी महाराजसुद्धा कोणत्याही प्रकारे कोल्हापूरच्या जनतेस बांधील नव्हते. इतर काही राजांप्रमाणे स्वतःचा काहीतरी व्यवसाय उभा करुन त्यामध्ये गुंतले असते अथवा परदेशात जाऊन तेथे स्थायिक होऊ शकले असते मात्र शहाजी महाराज असा संकुचित विचार करणारे नव्हते ! स्वातंत्र्यानंतरही महाराजांनी जनतेची सेवा ही आपली नैतिक जबाबदारी मानून ती अविरतपणे सुरुच ठेवली. जनतेच्या कल्याणासाठी सन १९५६ च्या सुमारास जवळपास दहा ते बारा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रस्टस् स्थापन करुन त्याकाळी कोट्यवधी रुपये किंमतीच्या स्वमालकीच्या जमिनी महाराजांनी मोफत उपलब्ध करुन दिल्या. कोल्हापूरमध्ये कुस्तीबरोबरच फुटबॉल खेळाच्या प्रसारासाठी महाराजांनी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनची सूत्रे हाती घेऊन फुटबॉल खेळास व खेळाडूंना आर्थिक मदती देऊन कोल्हापूरमध्ये फुटबॉल रुजविला. फक्त फुटबॉलच नव्हे तर कोल्हापूरच्या खेळाडूंनी सर्व खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राविण्य मिळवावे या हेतुने त्यांना प्रेरित करण्यासाठी जुन्या राजवाड्यामध्ये नगारखान्यासमोर स्वतः लाखो रुपये खर्च करुन “आंतरराष्ट्रीय क्रिडा किर्तीस्तंभा”ची उभारणी केली. या स्तंभावर आपले नाव कोरले जावे या हेतुने खेळाडूंमध्ये चुरस निर्माण झाली परिणामी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू कोल्हापूरमध्ये उदयास आले.

क्रिडा क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील महाराजांचे कार्यही तितकेच भरीव होते. शहाजी महाराजांनी #AISSMS या आपल्या आजोबांनी म्हणजेच छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या शिक्षणसंस्थेची मर्यादा व विस्तार वाढविला. कोल्हापूरमध्ये मेडीकल कॉलेज सुरु करण्यासाठी आपल्या मुलीच्या नावे असणारा “शालिनी पँलेस” महाराजांनी एका संस्थेस कोणत्याही अटींविना दान दिला. यातून पुढे छत्रपतिंची फसवणूक झाली हा भाग वेगळा पण palace दान करण्यामागे असणारा महाराजांचा हेतु हाच खरा छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा ! १९७४ साली शाहू महाराजांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने नवीन राजवाड्यामध्ये शाहू महाराजांचा पुतळा स्थापन करुन शहाजी महाराजांनी नवीन राजवाड्याचा जवळपास एक तृतीयांश भाग म्युझियमच्या रुपाने जनतेसाठी मोफत खुला केला.

छत्रपति शहाजी महाराजांना आपले पूर्वज व आपल्या घराण्याच्या इतिहासाचा फार अभिमान होता. मराठ्यांचा इतिहास जगासमोर यावा या हेतुने महाराजांनी राधानगरी येथे इतिहास मंडळाची स्थापना करुन ‘करवीर रियासत’ व अशा वीसहून अधिक ऐतिहासिक ग्रंथांची निर्मिती केली .

काहीकाळ विलीनीकरण व प्रजा परिषद या मुद्द्यांवर कोल्हापूरात वाद उद्भवले होते. या वादाला काही जणांनी वैयक्तिक रुप देऊन छत्रपतिंवर वाटेल ते आरोप केले, याविरुद्ध महाराजांनी कठोर पावले उचलली होती. महाराज कर्तव्य कठोर होते, शिस्तप्रिय होते. कर्तृत्ववान लोकांना महाराज जितकी मोठी बक्षिसे द्यायचे तितकीच मोठी शिक्षाही गुन्हेगारांस द्यायचे त्यामुळे महाराजांनी ज्यांना शिक्षा दिल्या, ज्यांची वतने जप्त केली, तनखे रद्द केले त्यांचे वंशज पूर्वग्रहदूषितभावातून महाराजांची खोट्या कहाण्या रचून संधी मिळेल तिथे बदनामी करीत असतात आणि याला भुलून काही लोक पूर्ण अभ्यास न करताच त्याचा प्रसार प्रचारही करीत असतात. असो ! महान लोकांची बदनामी होत नसेल तरच नवल !

जे लोक कर्तव्याला अधिक महत्त्व देत असतात त्यांचीच बदनामी होत असते. बदनामीच्या या फेऱ्यातून छत्रपति शिवराय, छत्रपति संभाजी महाराज, छत्रपति शाहू महाराजही सुटले नाहीत म्हणून ते कधीही आपल्या कर्तव्यापासून ढळले नाहीत. छत्रपति म्हणून गादीवर येण्यापूर्वी शहाजी महाराज Highly Decorated लष्करी अधिकारी होते. दुसऱ्या महायुद्धात महाराजांनी मराठा लाईट इंन्फंट्रीचे नेतृत्व केले होते. ते एक शूर व विजयी सेनाधिकारी होते. महाराजांनी आपल्या आयुष्यात अनेक चढऊतार सोसले, पण ते आपल्या ध्येयापासून कधीही ढळले नाहीत. महाराजांच्या काही योजनांस विरोधही झाला, पण कशाचीही पर्वा न करता आपल्या मनास जे योग्य वाटले ते महाराजांनी केले, आणि जे महाराजांस योग्य वाटायचे, तेच योग्य होते, हेही कालानीरूप सिद्ध झाले.

#KarvirRiyasatFB

Leave a comment