महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 8,380,911

भवानगड | Bhavangad

By Discover Maharashtra Views: 3800 3 Min Read

भवानगड…

पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा प्रसिध्द आहे. या केळवे गावापासून ३ किमी अंतरावर भवानगड किल्ला आहे. भवानगड १५० ते २०० फुट उंचीच्या छोट्या झाडीभरल्या टेकडीवर उभा आहे. किल्ल्याची लांबी १८८ फुट तर रुंदी ७० फुट आहे. किल्ल्याला ७ बुरुज व बालेकिल्ला आहे. ऐतिहासिक संदर्भानुसार वसई मोहिमेदरम्यान पोर्तुगिजांवर वचक बसविण्यासाठी जुलै १७३८ च्या सुरवातीला म्हणजे येन पावसाळ्यात दोन हजार मराठयांनी दंडाकातालच्या खताली परगण्यात जाऊन केळव्यापासून दीड मैलावर भवानगडची बांधणी सुरु केली.

कागदपत्रात ६०० जंजिरे अर्नाळापैकी २०० बराबर स्वारी मोरजी शिंदे देखील ४०० भवानगडपैकी १००० बराबर मल्हारी असाम्या अलीकडे आहेत असा संदर्भ मिळतो. इ.स. १५२६ साली पोर्तुगिजांनी वसई किल्ल्याची उभारणी सुरु केली. त्याच बरोबर या भागावर वर्चस्व ठेवण्यासाठी शिरगाव, माहीम, केळवे या परिसरात किल्ल्यांची साखळीच तयार केली. पोर्तुगिजांनी स्थानिक जनतेवर धर्मांतरासाठी अत्याचार केले. या जुलमाच्या तक्रारी पेशव्यांकडे गेल्यावर, इ.स १७३७ मध्ये नरवीर चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली गंगाजी नाइक, शंकराजी फडके, बाजी रेठरेकर इ मातब्बर सरदार पोर्तुगिजांचे समूळ उच्चाटण करण्यासाठी पुढे सरसावले.

पायथ्यापासून १० मिनिटात आपण भवानगडाच्या भग्न प्रवेशद्वारातून माचीवर प्रवेश करतो. माचीची तटबंदी मोठमोठे दगड एकमेकांवर रचुन केलेली आहे .किल्ल्याची उभारणी युध्द पातळीवर केल्यामुळे या बांधकामात चून्याचा वापर केलेला आढळत नाही. गडाच्या माचीवर भवानगडेश्वराचे जिर्णोध्दारीत मंदिर आहे. गडाच्या बालेकिल्ल्याचे पश्चिमाभिमूख प्रवेशद्वार गोमुखी पध्दतीचे आहे. याची कमान ढासळलेली आहे. परंतू बाजूचे बुरुज व तटबंदी शाबूत आहेत. बालेकिल्ल्याच्या प्रवेशव्दाराच्या बांधकामात चुन्याचा वापर केलेला आढळतो. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस पहारेकरयासाठी देवड्या आहेत. तेथून पुढे गेल्यावर दुसरया उध्वस्त प्रवेशद्वारातून आपला बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. समोरच पाण्याचे चौकोनी आकाराचे खडकात बांधलेले टाक दिसते. त्याच्या बाजूने गावकरयानी सिमेंटचा कट्टा बांधलेला आहे. टाक्यात भरपूर पाणी साठा आहे.बालेकिल्ल्यांचा परिसर दाट झाडीत लपलेला आहे. टाक्याच्या उजव्या बाजूस असलेल्या तटबंदीवरुन गडफेरी चालू करावी. तटबंदीच्या उत्तर- पूर्व बाजूने एक पायवाट खाली उतरते. या वाटेवर डाव्या बाजूस दगडात खोदलेल्या एकातएक दोन गुहा दिसतात. स्थानिक लोक त्यांना ऋषीगुहा म्हणतात. त्यांचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असावा, ही पायवाट पूढे दांडपाड्यात जाते.

आपण आल्या वाटेने परत तटबंदीवर जाऊन गडफेरी पूर्ण करावी. माहीम केळवे,दातिवरे दळणवळणाच्या वाटेवर वचक ठेवण्यासाठी हि एकच टेकडी आहे. वसई मोहिमेत दांडाखाडीच्या रक्षणासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. वसई मोहिमेत या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली. एडवन, कोरे, माथाणे, उसरणी या चौकीमार्फत पोर्तुगीजांना मिळणारी रसद अडवणे यासाठी भवानगडाची बांधणी केली गेली. केळवे परिसरात होणाऱ्या वाहतुकीवर व सैनिकी हालचालीवर लक्ष ठेवण्यास भवानगड महत्वाचा होता. भवानगडावरुन दांडा खाडी व आजुबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो. सध्या भवानगडावर असणारे शिवमंदिर शके १८३८ अनलनाम सवन्तसरे माहे चैत्र शुद्ध १ म्हणजे इ.स.१९१७ मध्ये बांधण्यात आले.दरवर्षी शिवरात्रीला या गडावर भवानगडेश्वराची मोठी यात्रा भरते.


माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a comment