एडवण कोट

Discover-Maharashtra-Post | महाराष्ट्रातील कलचुरी राजघराणे

एडवण कोट

एडवन कोटास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने सफाळे स्थानकास उतरावे. सफाळे स्थानकापासून एडवन येथे जाण्यास एसटी बस व खाजगी रिक्षा उपलब्ध आहेत. एडवन नाक्याहून आत गावात शिरताना डाव्या बाजुस एक शाळा आहे. या शाळेच्या आवारातच एडवन कोटाचे मोजकेच अवशेष काळाशी झुंजत उभे आहेत. शाळेच्या भोवतालच्या भिंतीसाठी या कोटाच्या एका भिंतीचा वापर केला आहे. एडवन कोट सफाळे स्थानकापासून ११ कि.मी.वर आहे.

कोटाच्या नावाविषयी ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्याला स्थानिक गावाच्या नावाने एडवन कोट म्हणुनच ओळखले जाते. एडवन कोट गावामध्ये भर वस्तीत असुनही स्थानिक लोकांना याची जास्त माहिती नाही म्हणुन तिथे जाण्यापूर्वी या कोटाची पुर्ण माहिती घेऊनच जावे. शाळे शेजारील बोळातून आत शिरल्यावर एडवन कोटाचे अवशेष नजरेस पडतात. कोटाच्या सर्व भिंतीवर झाडांनी आपले साम्राज्य पसरवले आहे. कोटाच्या आवारातच एक विहीर आहे. एडवन कोट सभोवतालच्या अर्धवट भिंती व चौथरे अवशेषरूपाने शिल्लक आहे. सदर कोटातील उपलब्ध अवशेष व ऐतिहासिक संदर्भ पाहता सदर कोट या विभागातील पोर्तुगीजकालीन शासकीय व प्रशासकीय कार्यालय तसेच छोटेसे न्यायालय असावे. या कोटाच्या बांधणीत अघडीव दगड, चिकटमाती, चुना, यांचा वापर केला गेला आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हि वास्तू तीन मजली होती आणि ते कोटाच्या भिंतीवर लाकडी वाशाकरिता असलेल्या खोबण्यावरूनही लक्षात येते. ह्या वास्तुत संरक्षणाच्या रचना आढळत नाही. दातिवरे ते शिरगाव परिसरातील गढय़ा, कोट, वास्तू खाडीच्या समांतर रेषेत बांधण्यात आलेले आहेत. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या कोटांचा मुख्य उपयोग दातिवरे ते मनोर प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले.

इ.स १७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला. कोटाची सध्याची अवस्था फारच दयनीय असुन कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्यांना प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. किल्ले वसई मोहिमेचे प्रतिनिधी डॉ. श्रीदत्त राउत व त्यांचे सहकारी या कोटाची ओळख लोकांना करून देऊन एडवन गावाचा इतिहास जिवंत ठेउन गतवैभवाचे सरंक्षण करण्याची भक्कम कामगिरी करत आहेत. वसई प्रांतातील वास्तू व पराक्रम येणाऱ्या पिढीना कळlवा यासाठी धडपडणारी किल्ले वसई मोहीम कौतुकास पात्र आहे.

 


माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here