महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,99,079

शाहिस्तेखानाला शिक्षा

By Discover Maharashtra Views: 4377 8 Min Read

शाहिस्तेखानाला शिक्षा.

राजमाता जिजाऊसाहेब ग्रंथमाला भाग २१.

इ.स.१६६० च्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रात उदयास येणाऱ्या मराठी सत्तेचा समूळ नाश  करण्याच्या हेतूने मुगल सुभेदार   शाहिस्तेखानाने पुण्यात प्रवेश केला. पुण्यात पावसाळ्यात छावणी करावी , असा खानाचा बेत होता.मराठ्यांनी पुण्याच्या आसपासचा सर्व मुलूख आपणहून बेचिराख केल्यामुळे खानाच्या सैन्याला धान्य व चारा मिळण्याची अडचण निर्माण झाली.(शाहिस्तेखानाला शिक्षा)

शाहिस्तेखानाजवळ सुमारे १ लक्ष लष्कर होते. त्यापैकी ७७ हजार घोडदळ व बाकीचे पायदळ होते. खानाचे सामर्थ्य प्रचंड होते. शाहिस्तेखान पुण्यात येउन जिजाऊंच्या आवडत्या लाल महालात मुक्काम ठोकून राहिला. आपल्या लाडक्या मुलाच्या बाललीलांनी फुललेला हा वाडा एका मोगलांने विटाळला .पुण्यासारखे जिजाऊंचे गाव मोगलांच्या हाती पडले होते. खान महाराजांच्या प्रदेशावर लष्करी तुकड्या पाठवून खेडी व परगणे जाळत व लुटत सुटला होता.

महाराज आपल्या सामर्थ्यानिशी शाहिस्तेखानाच्या लष्करावर जागोजागी हल्ले चढवीत होते. पण त्याचा फारसा परिणाम होत नव्हता. अशा परिस्थितीत कोंडी फोडण्यासाठी महाराजांनी अजब युक्ती अंमलात आणली. ती म्हणजे खुद्द शाहिस्तेखानावर छापा घालण्याची.

संकटा मागून संकटे येत होती.शक्तीपेक्षा युक्तीने शिवराय    त्यांच्यावर मात करत होते. शाहिस्तेखान लाल महालात राहून आजूबाजूला धुमाकूळ घालत होता. शाहिस्तेखानाच्या दहशतीने पुण्याचे व्यापारी, सर्वसामान्य लोक पुणे सोडून जाऊ लागले होते. जिजाऊंना अतिशय दुःख होते. मोठ्या कष्टाने उभे केलेले पुणे शहर स्वतःच्या नजरेसमोर उध्वस्त होताना त्यांना बघवत नव्हते. गनिमीकाव्याचा उपयोग करून खानाच्या सत्तेपासून स्वराज्याचे रक्षण करण्याचे महाराजांनी ठरवले. छाप्यापूर्वी पुण्याच्या छावणीची खडानखडा माहिती महाराजांच्या जवळ होती. त्या आधारे छाप्याची योजना आखली गेली. खानाच्या महालात आणि अवतीभोवती लष्कराच्या छावण्या पडल्या होत्या.सिंहगडाच्या रस्त्यावर प्रसिद्ध  राजपूत राजा जसवंतसिंग आपल्या दहा हजार घोडदळासहित  मुक्काम टाकून होता.तेव्हा  छावणीवर पहारे ओलांडून खासा खानावर हल्ला करणे म्हणजे साक्षात मृत्युच्या जबड्यात प्रवेश करण्यासारखे होते. महाराजांनी हा धोका पत्करून आणि या धोक्यापासून सहीसलामत बाहेर पडण्याची क्लृप्तीही शोधून काढली होती.

एप्रिल १६६३ रोजी रात्री  शिवरायांनी लाल महालावर हल्ला केला. महाराजांच्या सोबत १००० मावळे होते.त्यातील ४०० सोबतीला त्यांनी घेतले होते. राहिलेल्या मंडळींना खानाच्या छावणीच्या आसमंतात  रहावयास सांगून महाराज खानाच्या लालमहालाकडे आले होते. तेथे त्यांनी सोबतच्या लोकांच्या दोन तुकड्या केल्या. एक आपल्याकडे घेतली, व दुसरी बाबाजी मुदगलाकडे दिली. जवळ येताच महाराजांनी कानोसा घेतला .वाड्यातील खानाची मंडळी, नोकर-चाकर सर्वजण गाढ झोपेत होते .फक्त काही स्वयंपाकी उठले होते व त्यांची स्वयंपाकाची गडबड चालु होती. महाराज प्रथम त्यांच्याकडे वळले .काय होते आहे , हे त्या स्वयंपाक्यांना कळण्यापूर्वीच त्यांना कापून काढण्यात आले. स्वयंपाक घराच्या भिंतीला लागूनच खानाचा जनानखाना होता.भिंतीचे दार विटांनी चिणून घेतले होते. त्या विटा काढण्याचे काम आता मराठ्यांनी केले होते.दरम्यान काही मराठे नगारखान्याकडे वळले होते व तेथील मंडळींना कापून काढून स्वतःच मोठमोठ्याने वाद्यांचा गजर चालू केला होता.

आजूबाजूच्या लष्करी  छावण्यांना हा वाद्यांचा गजर नेहमीचा वाटत होता. विशेष म्हणजे हा  आठवडा औरंगजेब जन्मोत्सवाचा असल्याने दिवसा-रात्री दहा-पंधरा वेळा अशी वाद्ये वाजवली जात. मराठ्यांनी त्याचा फायदा घेतला. भिंतीला भगदाड पाडून महाराज आपल्या सहकाऱ्यांसह आत शिरले, तरी त्यांची चाहूल खानास लागली नाही. खानाच्या महालात महाराजांनीच पहिले पाऊल टाकले. त्यांना पाहिल्यावर खानाच्या जनानखान्यात मोठी घबराट व गोंधळ निर्माण झाला. जनानखान्यात अचानक गनिम शिरल्याचे पाहतात एकच आरडाओरडा सुरू झाला. मराठ्यांनी कापडाचे पडदे तलवारीने कापून टाकले. जनानखान्यातच कापडाचे पडदे करून छोट्या छोट्या खोल्या तयार केल्या होत्या. त्या खोल्यांमध्ये खान व त्याच्या बेगमा,दासी झोपल्या होत्या.खान जागा होऊन शस्त्राला हात घालणार इतक्यात खुद्द महाराजांनी त्याच्यावर वार केला. त्याने तो शिताफीने चुकवला .तरीपण त्याची बोटे तुटून गेली. इतक्यात बेगमांनी महालातील दिवे विझवून टाकले .सर्वत्र अंधार पसरला मग पुरुष कोण व स्त्री कोण हे कळेनासे झाले.

समोर दिसेल त्याला कापून काढ असे मराठ्यांनी सुरू केले. एवढ्यात बाबाजी मुदगल आपल्या दोनशे मावळ्यांसह वाड्याच्या पुढच्या दरवाजाने पहारेकऱ्यांना कापत महालात आले.या सर्व प्रकाराने उडालेल्या गोंधळाने खानाच्या जनान खाण्याच्या जवळच झोपलेले खानाचे पुत्र आणि काही लष्करी अधिकारी जागे झाले. गनिमांचा हल्ला खुद्द खानावरच झाल्याचे त्यांना समजून चुकले .तेव्हा ते शस्त्र घेऊन महालाकडे धावले. खानाचा पुत्र अब्दुलफत्ते हा मोठ्या त्वेषाने मराठ्यांवर चाल करून आला, व त्याने दोन-तीन मराठ्यांना लोळवले. पण लगेच तोही मारला गेला. आणखी एक मोगल अधिकारी ठार झाला .दरम्यान शाहिस्तेखानाच्या स्त्रियांनी अंधाराचा फायदा  घेऊन खानास लपवून ठेवले व त्यामुळे खान बचावला. महाराजांची व मराठ्यांची पूर्ण खात्री झाली होती की खान मारला गेला आहे.

अखेर शिवरायांनी शाहिस्तेखानाला प्रतिकार केला. गनिमी काव्याचा उपयोग करून खानाच्या जुलमी सत्तेपासून स्वराज्याचे रक्षण केले.

शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली.उजवा हात थोटा केला. कित्येक लोक मेले. हेराकडून शाहिस्तेखान  मेला नाही ही खबर ऐकुन महाराजांना वाईट वाटले. पण झालेला एकूण प्रकार फार मोठ्या दहशतीत झाला होता .महाराज खूप खुष झाले. जिजाऊंना ते म्हणाले की,” फत्ते होऊन आलो. शास्ताखानास शास्त केली.

गनिमी काव्याचे तंत्र महाराजांना जिजाऊंनी शिकवले होते. शाहिस्तेखानाच्या स्वारीत खान पराभूत होऊन महाराज विजयी झाले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महाराजांचा लाल महालावरील अचानक हल्ला व गनिमी कावा. या हल्ल्यामुळे आता जगातील कोणतीही जागा शिवाजी राजांपासून सुरक्षित नाही ,व जगातील कोणतेही कृत्य त्यांना अशक्य नाही, असे शत्रूला वाटू लागले. महाराजांच्या या छाप्यामुळे खानाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली.तसेच त्यामुळे खानाच्या ह्रुदयात भयंकर धास्ती निर्माण, शाहिस्तेखानाला शिक्षा झाली . परिणामी त्यांने पुण्यातून आपला गाशा गुंडाळला व दिल्लीकडे पळ काढला. खानाच्या पळून जाण्याने मराठ्यांवरील स्वारीतील हवा ही निघून गेली.

महाराजांच्या अंगी विलक्षण बुद्धिचातुर्य ,धाडस , चापल्य हे गुण असल्यामुळेच ते आपल्या योजनेत यशस्वी झाले होते. हजारो घोडदळ व पायदळ यांच्या गराड्यात सुरक्षित असलेल्या खानाच्या निवासस्थानावरच  हल्ला करून त्या यशस्वी छाप्यामुळे राजांचे नाव सर्वतो मुखी झाले. शाहिस्तेखानाविरूद्ध शिवाजीराजांचा विजय ही अशक्य कोटीतील घटना मानली जात होती. शिवाजीराजे हे असामान्य, सद्गुणी, अलौकिक बुद्धिचातुर्य, कल्पकता, समयसूचकता ,साफल्य, धाडस, पराक्रम ,नियोजन हे सर्व महत्त्वपूर्ण गुण राजांच्या अंगी होते.शाहिस्तेखानाला  पळवून लावे पर्यंत जिजाऊंनी स्वराज्याचा सर्व कारभार आपल्या हातात घेऊन तो पद्धतशीरपणे हाताळला होता. यातच त्यांचे मोठेपण, दूरदृष्टी, कणखर प्रशासन व मुत्सद्दीपणा दिसून येतो.

शाहिस्तेखानासारख्या महाबलाढ्य मोगल सरदाराला, दिल्ली पतीच्या मामाला शिवाजीराजेंनी जोरदार दणका दिला आणि जिजाऊ मातेच्या आदेशाप्रमाणे शाहिस्तेखानाला शास्त करून कायमचा धडा शिकवला. या हल्ल्याने शाहिस्तेखान चांगलाच घाबरला. शिवाजीराजांशी युद्ध करण्याचे तो पार विसरला. आपले मरण टळले केवळ बोटावर निभावले, याबद्दल त्यांने अल्लाहाचे आभार मानले. या घटनेमुळे राजांचा पराक्रम जगजाहीर झाला .याचे पडसाद मोगली साम्राज्यावर उमटले.औरंगजेब खुपच घाबरला.खानाच्या लाखभर सैन्याची दैना उडाली.औरंगजेबाने खानाची रवानगी बंगाल प्रांताकडे केली.औरंगजेब खूपच चिडला, संतापला पण काय करावे , हे त्याला समजत नव्हते. औरंगजेबालाही शिवाजीराजांच्या या धाडशी पराक्रमाची भीती वाटू लागली होती आणि हेच जिजाऊंचे शिवाजीराजांवरील संस्काराचे यश होते.

शिवाजीराजांच्या शौर्याला, धाडसाला ,पराक्रमाला ,जिजाऊंनी आकार दिला होता .राजांच्या सर्व जडण-घडणीत जिजाऊंचा सिंहाचा वाटा होता.शिवाजीराजांची  जडणघडण मोठ्या धीरोदात्तपणे व कुशलतेने जिजाऊंनी केली होती .या सर्वाचे श्रेय म्हणजे शाहिस्तेखानाचा खानाचा पराभव, शाहिस्तेखानाला शिक्षा होय.

लेखन –  डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

Leave a Comment