महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

श्री बालाजी मंदिर, वाशिम

By Discover Maharashtra Views: 3902 6 Min Read

श्री बालाजी मंदिर, वाशिम-

विदर्भातील वाशिम हे शहर अतिशय प्राचीन काळात वसलेल्या शहरांपैकी एक आहे. ते तीर्थक्षेत्र असल्याचा उल्लेख पद्मपुराणात आढळतो.इथे वत्स नावाचे ऋषि वास्तव्यास होते व देव मंडळी इथे गुल्म ( समुदाय ) करून राहिली,म्हणून नाव वत्सगुल्म पडले. ह्या नावाचा अपभ्रंश होऊन वाशिम वा बासम हे नाव प्रचलित झाले. ज्योतिषतज्ञानी पृथ्वीची जी मध्यरेषा कल्पीली आहे ती वत्स गुल्म म्हणजेच वाशिमवरुन  जाते. वाशिम इथे मध्य रेषेवर खूण म्हणून पूर्वीच्या शास्त्रज्ञानी मध्यमेश्वर नावाच्या शिवलिंगाची स्थापना केली होती. ह्याशिवाय वाशिम शहर श्री बालाजी मंदिरासाठी पण प्रख्यात आहे. श्री बालाजी मंदिर, वाशिम त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

नागपूरकर भोसले यांच्या कारकीर्दीतील प्रमुख सरदारात भवानीपंत काळू हे एक होते.यांच्या वडिलांचे नाव काळोपन्त असे होते.भवानीपंतांच्या काळातच भवानीपंत मुनशी नावाचा अजून एक सरदार भोसल्यांकडे होता.एकाच नावाचे दोन सरदार असल्याने नामसाधर्म्या मुळे गोंधळ होऊ नये म्हणून भवानीपंत काळोजी,काळू असा उल्लेख होऊ लागला.पुढे हेच त्यांचे आडनाव झाले.भवानीपंत काळू हे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण असून मंगरुळपिर तालुक्यातील खडी धामणी इथे वतनदार पटवारी होते.जानो जी भोसल्यांच्या कारकि‍र्दीत भवानीपंतास विशेष महत्व मिळाले.भवानीपंतांची पहिली महत्वाची कामगिरी ओरिसात झाली.तेथील जमीनदारांचे बंड भवानीपंतानी मोडून शांतता प्रस्थापित केली. थोरले माधवराव आणि राघोबा दादा यांच्यातील संघर्षात जानोजी भोसल्यानी राघोबा दादाचा पक्ष घेऊन पेशव्यास नडणे सुरू केले होते.

जानोजी भोसल्यांचा दिवाण देवाजीपंत चोरघडे—साडे तीन शहाण्यातील एक—हा जानोजीस माधवराव विरुद्ध भडकवीत,कारस्थाने करीत असे.मराठा दौलतीचे सर्व घटक मध्यवर्ती सत्तेशी एकनिष्ठ असले पाहिजे ह्या भूमिकेतून थोरल्या माधवरावांनी जानोजीस धडा शिकविण्यासाठी इ. स.1768 अखेर नागपूरवर स्वारी केली. माधवरावांशी चर्चेला आलेल्या देवाजी पंतास माधवरावानी त्याचे पूर्वोद्योग लक्षात घेऊन अटक करून आपल्या ताब्यात ठेवून जानोजीवर सर्व बाजूनी चढाई करून त्यास जेरीस आणले. 23 मार्च 1769 रोजी दोन्ही पक्षात तह झाला.माधवरावांनी जानोजीस ` इत:पर देवाजीपंत तुमचे आमचे जाबसालात नसावा,नाश करील,सबब आम्ही त्यास समागमे नेऊन पारिपत्य करतो असे `सांगितले.पण जानोजीनी माधवरावांस दंड भरून,देवाजी पंतास शासन करण्याची हमी देऊन पेशव्यांच्या कैदेतून सोडविले आणि दिवाण पदावरून पण दूर केले. देवाजी पंताच्या जागी जानोजीनी भवानी पंत काळू यांची नेमणूक केली.यावरून भवानीपंताचे कर्तृत्व ध्यानात येईल.

भवानीपंत काळू ऑगस्ट 1777 मध्ये चिमणराजे भोसलेनी थकीत खंडणी वसुलीसाठी बंगालवर काढलेल्या मोहिमेत सहभागी होते.मोहीम प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी तत्कालीन वत्सगुल्म म्हणजेच हल्लीच्या वाशिम इथे एका राजपूत स्त्रीच्या अन्त्य संस्कारासाठी जमीन खोदत असताना अनेक मूर्ती सापडल्या ज्यात सांप्रत वाशिम येथील बालाजी मंदिरात स्थानापन्न असलेली बालाजीची मूर्ती सुद्धा होती.त्याकाळी वत्सगुल्म—वाशिम भागावर तीन सत्तान चा ताबा होता.पूर्वेकडील भाग निजामा कडे,मधला भाग पेशव्यांकडे व पश्चिमेकडील भाग नागपूरकर भोसले यांच्याकडे होते. मूर्ती सा पडण्याची घटना नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यातील पश्चिम भागात घडली.ही गोष्ट भवानीपंत काळूना कळताच ते ताबडतोब लष्करासहित वाशिम इथे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सापडलेल्या विष्णु,बालाजी च्या मूर्तीस बंगाल स्वारीत यशस्वी झालो तर तुझे भव्य देवालय इथेच,वत्सगुल्मला बांधीन असा नवस केला. बालाजीनी भवानीपंतांची कामना पुरी केली. बंगाल मोहिमेवरून परतल्यावर मोहिमेचा सर्व वृत्तान्त,हिशोब,वसूली दरबारात सादर केल्यावर त्यांनी वत्सगुल्म येथील हकीकत पण सांगितली.

मंदिराच्या बांधकामास श्रावण शुद्ध 13 शके 1700  म्हणजे 6 ऑगस्ट 1778 रोजी सुरुवात झाली. देवाळाचे गर्भगृह आणि सभा मंडप बांधून झाल्यावर मंदिरात श्री बालाजी व इतर सापडलेल्या सर्व मूर्तीनची प्राण प्रतिष्ठा भवानीपंत काळूणच्या हस्ते मोठ्या समारंभ पूर्वक श्रावण वद्य  10 शके  1705 अर्थात 22 ऑगस्ट 1783 रोजी करण्यात आली.

मंदिराचा वास्तु विशेष: ह्या मंदिरातील गर्भगृहात बालाजीच्या मूर्ती समोरील भिंतीवर वरच्या बाजूस एक कोनाडावजा खिडकी आहे.मंदिर हिंदू परंपरेनुसार पूर्वाभिमुख असले तरी पश्चिम-पूर्व रेषेशी उत्तरेच्या दिशेने विशिष्ट कोनात मध्यरेषा निश्चित करून मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे. ह्या विशिष्ट वास्तुशास्त्रीय रचनेमुळे सूर्याने उत्तरायणात प्रवेश केल्यापासून ते दक्षिणायन सुरू होईपर्यंत म्हणजे 21 डिसेंबर ते 22 जून ह्या काळात बालाजीच्या मूर्तीवर सूर्य किरणे पडतात.

भवानीपंतांना मिळालेले यश उत्तरायण काळातच मिळाले होते. उत्तरायण सुरू होताच ते नागपूरहून निघाले आणि उत्तरायणाच्या उत्तरार्धात कटक प्रांती पोहोचले. फारसे युद्ध,रक्तपात न होता दक्षिणायन सुरू होण्यापूर्वीच तह होऊन अकल्पित यश मिळाले.आपल्या कारकीर्दीतील संस्मरणीय काळ कायम स्मरणात राहण्यासाठी त्यांनी अशी वास्तुरचना करून घेतली.

मंदिराच्या बाहेरील भागात एक शिलालेख पण आढळतो. त्यावर बालाजी मंदिरास,रयतेस कुणी त्रास,इजा पोहोचवू नये म्हणून ताकीद देण्यात आली आहे. तो मजकूर खालील प्रमाणे आहे.

श्री

श्री निवास

( वत्सगुल्म )उर्फ खैरताबाद हवेली कसबे वासिम येथील वसूल महसूल व पटी पटियान वगैरा व खैराती सदावर्त हिंदुवान व मुसलमान अज सलाह नवाब हशमत जंग बहादर जागिरदार व सेनासाहेब सुभा व सरदेशमुख व जमीनदार मूकरर केली से अगर मुसलमानन व हिंदुवा न जो कोन्ही येथील एक कवडीची तमा बुलरुका ठेवील व रयतेस इजा देईल हिंदुस शेपत कासि मध्ये मात्रा गमन व गोहत्याचे पातक असे व मुसलमान तमा ठेवील तो महमंदचे उमदाचा नसे व मक्केत सुवर हत्तेचे पातक असे.

आज दारोगी मिरजा मजिदीबेग तयारी तलाव व देऊळ व आबादी पेठ मजकूर सन 1189 ता छ 11 रजब सके 1700 श्रावण शुध 13 त्रयोदसी नारायन मुरहार राजनकर महाजन पेठ मजकूर ||छ हस्ता अकशेर श्री रूसतमजी कारीगर .

संदर्भ:
1-मराठ्यांचा इतिहास खंड तीन. संपादक अ. रा. कुलकर्णी व ग. ह. खरे.
2-मराठी रियासत खंड 5 गो. स. सरदेसाई
3-वाशिम च्या श्री बालाजी देवस्थानाचा इतिहास-

संकलक – श्री ज्ञा. ना. काळू व बी. डी . काळू.

Leave a comment