महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

विदर्भातील अष्टविनायक भाग ३

By Discover Maharashtra Views: 1246 3 Min Read

विदर्भातील अष्टविनायक भाग ३ –

५ – वरद विनायक अर्थात टेकडीचा गणपती –

वैदर्भीय अष्टविनायकांमध्ये नागपूरच्या वरद विनायकाचा अर्थात टेकडीच्या गणपतीचा समावेश होतो. शहराच्या मध्यवर्ती भागात टेकडीवर असलेल्या या देवस्थानाला ऐतिहासिक महत्त्व आहे. रघुजी भोसले यांच्या कार्यकाळात नागपूरला राजधानीचा दर्जा मिळाला. भोसल्यांनी जुम्मा तलाव अर्थात आताच्या गांधीसागर तलावाजवळ राजवाडा बांधण्याचे काम सुरू केले. यासाठी लागणारा काळा बॅसॉल्ट दगड मिळविण्यासाठी सीताबर्डीतील टेकडीचे खोदकाम सुरू झाले. याचदरम्यान, प्राचीन हेमाडपंती मंदिराचे अवशेष आणि याच अवशेषात सध्या प्रतिष्ठापित गणेशमूर्तीही सापडल्याची मान्यता आहे.(विदर्भातील अष्टविनायक भाग ३)

ही मूर्ती बाराव्या शतकात यादव राजांच्या कार्यकाळातील असून ती स्वयंभू आहे. गजाननाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे, हे विशेष! क्रिकेट विक्रमादित्य आणि राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर यांचे आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणपती मंदिराच्या परिसरात आता मोठया प्रमाणावर विकास करण्यात आला असून सामाजिक कार्यांसाठीही देवस्थानच्या उत्पन्नाचा उपयोग करण्यात येतो. वड-पिंपळाच्या महाकाय वृक्षांनी टेकडीचा परिसर समृध्द आहे. आजवरच्या कोणत्याही शासकीय गॅझेटियरमध्ये या मंदिराचा समावेश नाही.

वरद विनायक अर्थात टेकडीचा गणपती

जवळचे विमानतळ : नागपूर
जवळचे रेल्वेस्थानक : नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूर

६ : अष्टदशभुज, रामटेक

नागपूर जिल्ह्यातील रामटेक हे गांव नागपूरहून सुमारे ४७ कि.मी. अंतरावर आहे. संपूर्ण विदर्भात मंदिराचे गांव म्हणून तसेच अनेक राजवटीचे सत्ताकेंद्र म्हणून प्राचीन इतिहास लाभलेले, निसर्गरम्य वनराईने नटलेले व प्रभू श्रीरामाचंद्राचे पावनस्पर्शाने पुनीत झालेले रामटेक संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. रामटेक गडाच्या पायथ्याशी एक प्राचीन अष्टदशभुजा गणपती मंदिर असून हे विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असल्याचे म्हटल्या जाते.

या मंदिराची निर्मीती १६ व्या शतकातील असावी असे सांगतात. मंदिरात भव्य सभामंडप आणि गर्भगृहाची विभागनी तीन विभागात करण्यात आली असून मध्यभागी वीर विध्नेशाची मूर्ती आहे. तर डावीकडे अठारभुजा गणेश आणि उजवीकडे रिद्धीसिद्धी महागणपती मंदिर आहे. एकाच गणेशाचे तीन रूपे येथे पहावयास मिळतात. उजव्या बाजूला महालक्ष्मीची सुंदर मुर्ती आहे. अठराभुजा गणेश हे अत्यंत जागृत देवस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. अष्टदशभूजा गणेशाची सोंड वेटोळी उर्ध्व उदर असून झोकदार आहे. ही मूर्ती साडेतीन ते चार फूट उंच आहे. गणेशाची मुर्ती पद्मासनात बसलेली असून गणेशाच्या 18 हातात अंकुश, पाश, त्रिशुल, खटवांग, परशु, मोरपंख इत्यादी आयुधं व मोदक आहे. डोक्यावर नागफणा आहे तर कमरेला नागपट्टा आहे.

अठरा भुजा असलेला अद्वितीय गणपती विदर्भात प्रसिद्ध आहे.

विदर्भातील अष्टविनायक भाग ३ | अष्टदशभुज, रामटेक

(फोटो – प्रकाश मांजरेकर)

जवळचे विमानतळ : नागपूर
जवळचे रेल्वेस्थानक : नागपूर
जवळचे बसस्थानक : नागपूरहून भरपूर आणि सतत बससेवा उपलब्ध.

@Vidarbha Darshan

Leave a comment