महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,49,550

सौन्दर्य प्रसाधनांची जुनी पदचिन्हे दुसरा भाग | Antique Cosmetics

By Discover Maharashtra Views: 3557 8 Min Read

सौन्दर्य प्रसाधनांची जुनी पदचिन्हे दुसरा भाग | Antique Cosmetics

गेल्या शतकाच्या सुरुवातीपासून भारतीय समाजातील स्त्रिया आपल्या सौन्दर्य रक्षणासाठी आणि वर्धनासाठी वापरीत असलेल्या काही वस्तू आपण पहिल्या. या लेखाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण अशाच काही परिचित आणि अपरिचित वस्तू आणि त्यांची अगदी खास वैशिष्ठ्ये पाहणार आहोत. ब्रिटिशांच्या आगमनानंतर अनेक वेगळ्या वस्तू आणि पद्धतींचे आगमन झाले. पण त्या आधीच्या या गोष्टी खूपशा एतद्देशीय आणि इथल्या वातावरणाला अनुकूल अशा होत्या.

वज्री– पायाच्या खोटेवर त्वचेचा जाड थर साचल्याने पायांच्या सौंदर्याला बाधा येते. पायांना भेगाही पडतात. त्यामुळे स्नानाच्या वेळी इथली त्वचा नरम झाल्यावर ती हलक्या हाताने घासून काढली जाई. या खोट-घासणीला ” वज्री ” म्हणतात. पितळ, चांदी, पंचधातू यापासून बनविलेल्या वज्रींवर अत्यंत कलात्मक अशा मोर, हत्ती,पोपट यांच्या जोड्या असत.आंघोळीचे पाणी आत अडकून राहू नये म्हणून तळाशी या वज्री जाळीदार असत. त्यात एखादी धातूची गोळी किंवा घुंगुर असल्याने त्वचेवर घासताना त्यातून छानसा आवाजही येई. या वज्रीच्या तळाला मुद्दाम तयार केलेला खरखरीत भाग ओल्या त्वचेवर घासून जाड थर काढून टाकला जाई. आजसुद्धा या कामासाठी प्युमीस स्टोन, टेराकोटा किंवा फायबर स्क्रबर वापरले जातात पण त्याना अशा वज्रींची सर नाही ! आणि आता तर स्पा आणि आधुनिक रासायनिक क्रीम्स अवतरली आहेत त्यामुळे या वज्री आता फक्त वस्तुसंग्रहालयातच पाहायला मिळतील.

पानाचा आम्रडबा — भारताची पानविडा ( तांबूल) संस्कृती फार जुनी. ते एक व्यसन न मानता खानदानी शौक म्हणून मानला जाई. अगदी धार्मिक विधींमध्ये पानसुपारीला पहिला मान तर विडा उचलण्यावर शौर्याचे मोजमाप होई. मित्रमंडळीची बैठक पानसुपारीच्या भोवती फिरे. लावणीची बैठक, नृत्यांगनेची अदाकारी, संगीताची मैफिल, कवालीचा मुकाबला, शायरांचा मुशायरा, गायनाची जुगलबंदी या गोष्टी विड्याशिवाय रंगणेच अशक्य ! पूर्वी पुरुषांप्रमाणेच अनेक स्त्रियाही विडा खाण्याच्या शौकीन होत्या.त्यांच्यासाठी अत्यंत आगळेवेगळे आणि कलात्मक नजाकतीने पानडबे बनविले जात असत.

सोबतच्या चित्रात असाच हा एक आंब्याच्या आकाराचा पितळी पानडबा ! याच्या पितळी पानाच्या टोकाने विड्याच्या पानाला चुना लावायचा. त्याला बसविलेल्या घुंगुरामुळे नाजूक आवाज येई. नंतर छोट्या खणातल्या सुपारी,लवंग ,वेलची, कात अशा अन्य सर्व चिजा पानात भरायच्या. एक साग्रसंगीत विडा तयार .स्त्रीसुलभ विचार लक्षात ठेऊन या डब्याच्या झाकणाला एक छोटासा आरसाही आहेच ! त्यामुळे पान खाल्ल्यावर आपले ओठ किती रंगले हे लगेच पाहता येई. या आम्रडब्याशेजारचा मिथुन अडकित्ताही रंगत वाढविणारा आहे.

कट्यारीचा अडकित्ता — पान खाणाऱ्या शौकीन स्त्रिया नाजूक हाताने सुपारीही छान कातरतात. पण म्हणून त्यांनाच नाजूक समजण्याची चूक कुणी करायला नको. कारण सोबतच्या चित्रात दाखविलेला हा खास अडकित्ता ! या अडकित्त्यावर नाजूक कोरीवकाम असून त्याचा वेगळा घाट लक्षवेधक आहे. मात्र या अडकित्त्यापासून सावध ! एखाद्या संकटाच्या वेळी सुपारी कातरण्याचा हा छोटासा अडकित्ता क्षणार्धात एक जीवघेणे शस्त्र बनतो. त्याच्या दोन्ही मुठी उलट्या वळविल्या की स्वसंरक्षणाची कट्यार होत असे. स्त्रीच्या मुठीत उत्तमपणे बसणारी ही कट्यार तिचे संरक्षण करायला नक्कीच पुरेशी आहे .सोबतचे २ अडकित्ते हे पोलाद आणि जर्मन सिल्व्हर पासून बनविलेले आहेत.

चंची- सुंदर सुंदर पानडबे, नाजूक अडकित्ते, कलात्मक चुनाळी वगैरे गोष्टी अभिजनांना, चांगल्या आर्थिक स्तरातील मंडळींना ठीक आहेत. पण कष्टाची कामे करणाऱ्या आणि थोड्या कमी आर्थिक स्तरातील स्त्रियाही उत्तम अभिरुची जपत असत. त्यांची पानविड्याची कापडी चंची ही गोंडे, आरसे, घुंगुर, रंगीत काठ यांनी सजलेली असे. ४ / ५ खणांच्या या चंचीमध्ये कात, चुन्याची डबी, सुपारी आणि हो, चक्क तंबाकूसुद्धा असे. विड्याची पाने ताजी राहावी म्हणून मेणकापडाच्या छोट्या तुकड्यात गुंडाळून चंचीत ठेवत. चंचीच्या टोकाला लांब दोरी, घुंगुर व गोंडा असायचा आणि या दोरीने चंची गुंडाळून बांधली जाई. क्वचित याच दोरीला अडकित्ताही अडकविला जात असे. तर शेतात, वाडीत, मळ्यात अशा ठिकाणी काम करणाऱ्या स्त्रियांची चंची
आकाराने छोटी, सहज कमरेला खोचता येणारी आणि याच सर्व पदार्थांनी सज्ज असे. अनेक स्त्रिया अशाच सज्जतेचा बटवा वापरीत आणि तो देखील कलात्मकतेने सजलेला असे.

तांबोळा — भारतात प्राचीन काळापासून चालत असलेली तांबूल संस्कृती आणि नंतरच्या मुगल राजवटीतील पान –हुक्का पद्धतीमुळे या दोहोंच्या संयोगाने समाजात त्यावेळी एक वेगळाच सार्वजनिक शिष्टाचार रुजला. छोट्याछोट्या बैठकीत पानविडा बनविण्याच्या सर्व पदार्थांनी सज्ज असे तबक फिरविले जाई. प्रत्येकजण आपला विडा आपल्या आवडीप्रमाणे बनवून घेई. बैठकीला जास्त मंडळी असतील तर तबक सहजपणे फिरविणे अडचणीचे होई. त्यामुळे विमान, मोटारी, गाडीचे इंजिन अशा आकारांचे आणि चाके असलेले पानाचे नाविन्यपूर्ण डबे अस्तित्वात आले. त्याला असलेल्या चाकांमुळे असे डबे एकमेकांकडे सरकविणे सोपे होई . काही पानडब्यांना तर सिगारेट व काड्यापेटी ठेवण्याची सोय असे व ash trey बसविलेला असे. अशा नाविन्यामुळे यजमानांची शान वाढत असे. याच कारणांमुळे अडकित्ते, चुनाळी, चुनपट्ट्या, कातगोळ्यांच्या डब्या, तयार विड्यांसाठी छोट्या डब्या.तस्त ( थुंकदाणी ), यांचे असंख्य कलात्मक प्रकार अस्तित्वात आले. त्यापैकी एक अत्यंत दुर्मिळ असा प्रकार म्हणजे ” तांबोळा ” !

एका कडीत अडकविलेल्या नारळासारख्या निमुळत्या कलशाला सर्व बाजूंनी साखळ्या सोडलेल्या असत. या प्रत्येक साखळीच्या टोकाला एकेक काटा आणि त्या प्रत्येक काट्यात ३ / ४ विडे अडकविलेले असत. आणखी काही तयार विडे वरच्या कलशात सज्ज ठेवले जात असत. एका वेळी पूर्ण तांबोळ्यात ६० / ७० विडे ठेवण्याची सोय असे. नृत्य किंवा गाण्याच्या मैफिलीत गाद्यागिरद्यांवर बसलेल्या शौकिनांना तबकाऐवजी तयार विडे अत्यंत रसिकतेने घेता येतील अशी सोय असलेला हा तांबोळा.! .. तांबूल धारण करणारा म्हणून “तांबोळा “.. बसलेल्या शौकिनांसमोरून हा तांबोळा फिरविला जाई आणि ते त्यातून सहजपणे विडा काढून घेत असत. साखळीच्या टोकाला बसविलेल्या घुंगुरांमुळे विडा काढून घेऊन साखळी सोडून दिल्यावर एक नाजूकसा आवाज येत असे.वरच्या कलशावर आणि त्याच्या झाकणावर सुंदर नक्षी पाहायला मिळते. तांबूल संस्कृतीतील हे एक अत्यंत वेगळं लेणं म्हणायला हवे.

सुरमादाणी- अधिकतर मुस्लीम स्त्रियांमध्ये डोळ्यांमध्ये काजळाऐवजी सुरमा घालण्याची पद्धत आहे. पुरुषही आपल्या डोळ्यात सुरमा घालतात. गरज आणि उपयोग वाढत गेला तसतसे सुरमादाण्यांमध्येही कलात्मक बदल होत गेले.
अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या सुरमादाण्या आणि कांड्या पाहायला मिळतात. सुरमादाणीच्या फिरकीच्या झाकणालाच एक नाजूक शलाका जोडलेली असे. तशाच वेगळ्या नक्षीदार कांड्याही असत. यावरील नक्षीकाम मुस्लिम धाटणीचे असले तरी बरेचसे आकार मासा,आंबा, कोयरी, पिंपळ पान असे असत. सोनेरी रंगापेक्षा रुपेरी चमकदारपणा अधिक लोकप्रिय असे. त्यामुळे पितळी सुरामादाण्यांना चांदीचा किंवा नंतरच्या काळात निकेलचा मुलामा दिला जाई.
सुरमादाणीच्या मागे किंवा जोडून एखादा छोटासा आरसाही असे. सुरमा घालायच्या कांड्या धरण्यासाठी मधोमध अगदी छोटीशी मूठ आणि दोन्ही बाजूंना निमुळती गुळगुळीत टोके असत. त्यामुळे एकाचवेळी दोन्ही डोळ्यांमध्ये सुरमा घालणे शक्य होई आणि टोकांच्या गुळगुळीतपणामुळे डोळ्यांना इजा होत नसे. आज नटनट्यांचे तात्काळ अनुकरण केले जाते. पूर्वी राष्ट्रीय नेत्यांचे अनुकरण केले जाई. महात्मा गांधींच्या कमरेला साखळीत एक डबी सारखे घड्याळ असे. त्याचेच अनुकरण करणारी, तशीच साखळी असलेली आणि वरती घड्याळ कोरलेली एक सुरमादाणी सोबतच्या चित्रात पाहायला मिळते. अन्य दोन सुरमादाण्या आणि कांड्याही तशाच आकर्षक आहेत !

शेवटी सर्वांसाठी पुन्हा एकदा त्याच विनंतीचा पुनरुच्चार करतो – आज कित्येक उत्तमोत्तम आणि सांस्कृतिक ठेवा असलेल्या वस्तू जुन्या बाजारांमार्फत विदेशात जात आहेत. प्रत्येकाने आपल्या घरातील, जुन्या काळी वापरात असलेल्या, आपापल्या घराण्याचे वैभव असलेल्या, कुटुंबासाठी खास असलेल्या किमान ५ / ५ वस्तू तरी जपून पुढच्या पिढीपर्यंत पोचवीत राहिले तर हे सर्व वैभव आपल्या देशातच राहील.
( किस्त्रीम २०१६ च्या दिवाळी अंकातील माझ्या लेखाचा संपादित भाग )

माहिती साभार – Makarand Karandikar | मकरंद करंदीकर | [email protected]

Leave a comment