नरसिंह मंदिर, मेहकर, बुलढाणा
जगामध्ये पौराणिक ११ नृसिंह आहेत. त्यापैकी ६ वे नृसिंह मंदिर मेहकर (जि. बुलढाणा) येथे आहे. गीतेच्या अकराव्या अध्यायाच्या महात्म्यात या मेहकरच्या नृसिंहाचा उल्लेख आहे, एवढे हे स्थान प्राचीन आहे. म्हणून ते खूप प्रसिद्ध आहे. विष्णूच्या दशावतारापैकी ज्या अवताराची पूजा होते, असा नृसिंह हा पहिला अवतार आहे. मेहकरची ही नृसिंहमूर्ती खूप सुबक आणि रेखीव आहे. पाकिस्तानातील मुलतान येथे अवतार घेतल्यानंतर भगवान नरसिंहाने मेहकर येथे भक्त प्रल्हादाने दिलेले भोजन ग्रहण केले होते, अशी आख्यायिका आहे. अयोध्येहून लंकेकडे जाताना प्रभू रामचंद्रांनी मेहकरचा राजा मेघंकर याला नृसिंहरूपात दर्शन दिले होते आणि कायम वास्तव्य करण्याचे अभिवचन दिले होते, असाही संदर्भ आहे. या मंदिरात विष्णुसहस्त्रनाम स्तोत्राच्या पठणाचे विशेष महत्त्व आहे.
ही स्वयंभू श्रीमूर्ती अनेक शतके जमिनीखालील हेमाडपंती भुयारात बंदिस्त होती. (ते हेमाडपंती भुयार अद्यापही शाबूत आहे.) इ.स. १५६९ साली नागपूरचे नृसिंहभक्त श्री. श्यामराज पितळे यांनी ही श्रीमूर्ती त्या भुयारातून बाहेर काढून सध्याच्या मंदिरात प्रतिष्ठापित केली. तेव्हापासून साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाला साडेचारशे वर्षांची परंपरा आहे.
भुयारातल्या श्रीमूर्तीला प्रतिष्ठापित केल्यानंतर श्यामराज पितळे मेहकरलाच राहिले. पुढे तीनशे वर्षांनी त्यांच्या घराण्यात साक्षात्कारी संत बाळाभाऊ महाराज पितळे उर्फ श्वासानंद माऊली यांचा अवतार झाला. त्यांचे जीवनचरित्र अद्भुतरम्य आहे. सध्या त्यांचे चौथे उत्तराधिकारी विद्यमान गुरुपीठाधीश ॲड. रंगनाथ महाराज पितळे आहेत. त्यांच्या आदेशानुसार संस्थानचे वर्षभर सतत धार्मिक व सामाजिक उपक्रम सुरू असतात. श्रावण महिन्यात एक आठवडाभर विष्णुसहस्त्रनाम स्तोत्राचे रात्रंदिवस अखंड पाठ होतात. रात्रभर पुरुष आणि दिवसभर महिला एकही मिनिटाचा खंड न पडू देता या मंदिरात हे पाठ करतात. हा आध्यात्मिक क्षेत्रातला एक विक्रम आहे. विक्रमांची नोंद घेणाऱ्या संस्थेने या विक्रमाची नोंद घेतलेली आहे.
नृसिंह नवरात्रोत्सवामध्ये श्रीमूर्तीला दररोज वार देवतेच्या पोषाखाने सजविले जाते. या पोशाखाचे दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडते. यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे नवरात्रोत्सवातले जाहीर व प्रकट कार्यक्रम स्थगित केले आहेत. मात्र सर्व परंपरागत विधी यथाशास्त्र होणार आहेत.जगातील ११ पैकी ६ वे नृसिंह मंदिर असल्याने दूरवरून लोक मेहकरला दर्शनाला येत असतात. आणि सोबतच जवळच असलेल्या लोणार सरोवरालाही भेट देतात.
मेहकर येथील प्राचीन श्री नृसिंह मंदिर :
ज्याप्रमाणे शिवाची १२ ज्योतिर्लिंगे किंवा देवीची साडेतीन पीठे असतात, त्याप्रमाणे भगवान विष्णूचा चौथा अवतार असलेल्या नरसिंह देवतेची जगात ११ पौराणिक स्थाने असल्याची मान्यता आहे. यातील पहिले स्थान पाकिस्तानातील मुलतान येथे आहे. (मुलतान ही हिरण्यकश्यपूची राजधानी होती आणि नृसिंहाचा अवतार येथे झाला अशी प्रचलित धारणा आहे.) “प्रथमे मूलस्थानंच, द्वितीये ज्योतीर्मठे” या प्राचीन स्तोत्रात या अकरा स्थानांचा उल्लेख आढळतो. यापैकी सहावे स्थान बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरला वसलेले आहे. भगवद्गीतेच्या अकरावा अध्यायाच्या महात्म्यामध्ये मेहकरचा उल्लेख आहे, यावरून हे स्थान किती प्राचीन आहे याची कल्पना येते.
श्री नृसिंह भगवंताची ११ स्थाने :
नृसिंहभक्तांच्या पौराणिक मान्यतेनुसार पाकिस्तानातील मुलतान, उत्तराखंडातील ज्योतिर्मठ, उत्तरप्रदेशातील वाराणसी, मध्यप्रदेशातील नरसिंगपूर, महाराष्ट्रातील रामटेक, मेहकर आणि संगमेश्वर, तेलंगणातील सिंहाचलम्, आंध्रप्रदेशातील मंगलगिरी, अहोबिलम् आणि तामिळनाडू-कर्नाटकच्या सीमेवरील कोप्पर अशी नरसिंहाची ११ पौराणिक स्थाने आहेत. भारतवर्षाच्या प्राचीन इतिहासाच्या दृष्टीने या स्थानांचे महत्त्व म्हणजे ही ११ नृसिंहस्थाने उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणारा दुवा होती. केवळ नृसिंहभक्तांसाठीच नव्हे तर समस्त वैष्णवांसाठी ही अकराही स्थाने श्रद्धेय आहेत.
पैनगंगेच्या काठी नृसिंह मंदिर :
भगवान नरसिंहाने मेहकरच्या पैनगंगा नदीच्या तटावर भक्त प्रल्हादाने दिलेले भोजन ग्रहण केले होते आणि तृप्त होऊन प्रल्हादाला वर दिला होता, अशी आख्यायिका आहे. म्हणून मेहकरच्या नृसिंहाला ‘प्रल्हादवरद’ म्हटले जाते. मेहकरचे प्राचीन नाव आधी ‘महंकावती’ आणि नंतर ‘मेघंकर’ होते. येथील राक्षसकुलीन राजा मेघंकर हा परम नृसिंहभक्त होता. त्याच्याच उपासनाबलामुळे लंकेकडे जातांना प्रभू रामचंद्रांनी त्याला याठिकाणी नरसिंहरूपात दर्शन दिले होते. तेव्हापासून नृसिंह हे या पंचक्रोशीचे क्षेत्रदैवत आहे. या मंदिरामध्ये विष्णुसहस्त्रनाम स्तोत्राच्या पठणाचे विशेष महत्त्व आहे. नरसिंहाची श्रीमूर्ती खूपच सुरेख, रेखीव व मनोवेधक आहे. अप्रतिम कलाकुसर आणि बारीक कोरीवकाम असलेली ही मूर्ती पाहताक्षणी कोणाचीही नजर क्षणभर खिळून राहते. या अष्टभुजा मूर्तीची रचना, शिल्प आणि चेहऱ्यावरील भाव सर्व चित्ताकर्षक आहे.
आक्रमणापासून वाचविली मूर्ती :
अकराव्या शतकापूर्वी मेहकरला नरसिंहाचे भव्य दगडी मंदिर होते, अशी ऐतिहासिक धारणा आहे. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणापूर्वी श्रीमूर्ती सुरक्षित रहावी म्हणून गावकऱ्यांनी येथील माळीपेठ भागात जमिनीखाली एक भुयार खोदून तेथे ही मूर्ती लपविली होती. (हे चिरेबंदी बांधणीचे भुयार अद्यापही जसेच्या तसे शाबूत आहे.) नंतर या भव्य मंदिराचा आक्रमणात पुरता विध्वंस झाला असावा. मात्र गावकऱ्यांच्या सजग दृष्टीमुळे श्रीमूर्तीचा हा पौराणिक ठेवा आज सर्वांच्या दृष्टीपुढे आहे. त्यामुळे तत्कालीन ग्रामस्थांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. कालौघात या जमिनीखाली गाडल्या गेलेल्या भुयाराचे सर्वांना विस्मरण झाले.
तत्कालीन वदंतेनुसार सोळाव्या शतकात नागपूरला रहात असलेल्या श्यामराज पितळे या नृसिंहभक्ताच्या स्वप्नात नरसिंहाने दृष्टांत देऊन या भुयाराची माहिती दिली आणि बाहेर काढण्याची आज्ञा केली. त्यावरून या गावाचा शोध घेत श्यामराज पितळे मेहकरला आले आणि या स्वप्ननिर्दिष्ट भुयाराची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर १५६९ मध्ये येथे खोदकाम करण्यात येऊन भुयार मोकळे करण्यात आले आणि या श्रीमूर्तीचे तत्कालीन ग्रामस्थांना दर्शन झाले. मात्र तो काळसुद्धा मुघल आक्रमणाचाच असल्यामुळे या श्रीमूर्तीचे नवीन मंदिर न बांधता सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामस्थांनी एका छोटेखानी वाड्यामध्ये या श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना केली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या मंदिराला शिखर सुद्धा बांधले नाही. तेव्हापासून श्रीमूर्ती या छोटेखानी जागेत विराजित आहे.
(Photo – Mahesh Kote Patil)
Written By: Vidarbha Darshan