सह्याद्रीच्या रांगेत आढळतात हेमाडपंती 12 जोतीर्लिंगे

12-jyotirligi

सह्याद्रीच्या रांगेत आढळतात हेमाडपंती 12 जोतीर्लिंगे

मी आज जो लेख आपणास सादर करत आहे त्या लेखाशी आपण किती सहमत असाल हे सांगणे कठीणच आहे. परंतु माझे निरीक्षण आणि वैचारीक पातळी या 12 जोतिर्लिंगाबाबत लिहीण्यास मला वारंवार सतावत आहे. नेहमीच नवीन नवीन शोधने व ते वाचकांपर्यंत लेखनीच्या माध्यमातून पोहचवीताना खुप समाधान मिळत असते.
मी तर म्हणेन महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीत हेमाडपंती 12 ज्योतिर्लिंगाचे निर्माण नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिरापासून केले असुन त्या शृखलेचा शेवट भिमाशंकर मंदिराशी केला आहे.

या मंदिरांविषयी अनेक माहीती वेगवेगळ्या स्वरूपात व वेगवेगळ्या माध्यमातून आपणापर्यंत पोहचलेली आहे.
सह्याद्रीने आपल्या ह्रदयात अनमोल असा नैसर्गिक व ऐतिहासिक ठेवा जतन केलेला असून आज तो शोधताना व मांडताना उजागर होत आहे. व तो वाचकांना उपलब्ध होत आहे. जुन्नरहुन ज्या ज्या वेळी माझी सह्याद्रीच्या कुशीत शिरून भटकंती सुरू होते, तेंव्हा तहान भुक आपोआपच हरपून जातानाचा अनुभव मला कित्येक वेळा आला आहे. कधी कधी तर पुर्ण दिवस दोन घोट पेलेल्या पाण्यावरच काढलेले आठवतात. याही पेक्षा मजेशीर गोष्ट म्हणजे पक्षी निरीक्षण करण्यासाठी किंवा त्यांचे छायाचित्र काढण्यासाठी तास दोन तास न हालता एकाच जागेवर उभे राहिलेले क्षण मलाच माझ्या वेडेपणाची आठवण करून देतात. माझे मित्र मला नेहमीच म्हणतात काय राव तुम्ही एकटेच फिरता. कधी कधी आम्हालापण घेऊन जात जा की ? अशा वेळी माझ मन मला उत्तर देत तु तर वेडा झाला आहेस कशाला उगाच दुसर्‍याला वेड लावतोस. क्षणभर चेहर्‍यावर स्मित हास्य येत व क्षणात काही न बोलताच विरून जाते. असो.

सह्याद्रीच्या रांगेत आढळतात हेमाडपंती 12 जोतीर्लिंगे

हातविज (जुन्नर) येथील भटकंती चालु होती. येथील गाव व परिसर न्याहाळताना एक गोष्ट लक्षात आली की हा परीसर अतिदुर्गम आहे. हा जुन्नरपासुन साधारण 45 कि.मी अंतरावर असुन येथे नेहमीच एस.टी सेवा संपूर्ण विस्कळित झालेली असते. अशा या गावात वेगवेगळ्या स्वरूपाची शिवलिंगे व कोरीव दगडी शिल्पे आढळुन येतात. हि शिल्पे अस्तव्यस्त पडलेली असून येथील पौराणिक इतिहास सांगण्यास मदत करतात. यावरून असा तर्क बांधला जातो की त्र्यंबकेश्वर (नाशिक) अमृतेश्वर (रतनगड) हरिश्चंद्र गड, नागेश्वर (खिरेश्वर) माणकेश्वर (माणकेश्वर ) कुकडेश्वर (पुर) कपर्दिकेश्वर ( ओतूर) ब्रम्हनाथ (पारूंडे) डिंभे धरणातील आंबेगावाच्या ठिकाणी असलेले मंदिर, भिमाशंकर मंदिर ( भिमाशंकर ) आणि दोन मंदिरांचे अवशेष जुन्नर शहरात दिसुन येतात.

यावर असे समजते की, नाशिक ते भिमाशंकर हा सह्याद्रीच्या कुशितील त्या काळी असलेला एक पैदल व जवळचा मार्ग होता.जो मार्ग हरिश्चंद्र गड, खिरेश्वर, आंबोली , ढाकोबा, हातविज, डोनी, आहुपेहून पुढे भिमाशंकरला जाऊन मिळतो. मध्यवर्तीत ठिकाण म्हणजेच पुरातन व्यापारी मार्ग व व्यापाराची राजधानी अर्थातच “जुन्नर” होय. म्हणूनच या ठिकाणी सहा हेमाडपंती मंदिरे दिसत असून ती जुन्नर शहराच्या पश्चिम पट्यात दिसतात. सर्वात जास्त सात किल्ले, सर्वात जास्त लेणी समुह, त्या व्यतिरिक्त जुन्नर,ओतूर, नारायणगाव, बेल्हे या ठिकाणी असलेले भुईकोट किल्ले या परीसराच्या संरक्षणाची साक्ष देतात. आणि म्हनूनच आपणास त्यावेळी येथे असलेला राबता किती मोठ्या प्रमाणात होता याची खात्री पटते. या आधीच्या लेखात जुन्नर म्हणजे हेमाडपंतीयांची राजधानी असा त्यात मी उल्लेख केलेला आहे.
मित्रांनो हा ऐतिहासिक वारसा जाणून घ्यायचा असेल तर आपणास सह्याद्रीच्या प्रेमात पडून, सह्याद्रीच्या रानावनात पायपीट करून तो जाणुन घ्यायला हवा. त्यांच्याशी गप्पा मारायला हव्यात. त्यांच्याकडे पाहताना एक वेगळ्याच दुरदृष्टीने निरीक्षण करायला हवे.

सह्याद्रीच्या रांगेत आढळतात हेमाडपंती 12 जोतीर्लिंगे

मला खात्री आहे की या सह्याद्रीच्या कुशीत राजे श्री. शिवछत्रपती शिवाजी महाराजांसारखे सुवर्ण रत्न जन्माला आले तो सह्याद्री आपणास कसाकाय निराश करेन.आजपर्यंत हजारो इतिहासकार, कवी,लेखक, संशोधक जगासमोर आणले आहेत ते फक्त या सह्याद्रीने. लाखो परीवार आपला उदरनिर्वाह याच अफाट पसरलेल्या सह्याद्रीच्या उदात्तीकरणानेच करतात. हजारो वेगवेगळ्या स्वरूपाची मंदिरे उभारली गेली ती याच सह्याद्रीच्या रागांवर का? कशासाठी? हे आपण कधी जाणूनच घेतले नाही. हा संकेत आहे. की मित्रांनो आपण नेहमीच सह्याद्रीच्या संपर्कात रहा. आपले आयुष्य सुखमय करनारा दुसरा तिसरा कोणी नसून मीच तो सह्याद्री आहे.मी रोगवर्धक आहे, मी शोधक आहे, मी सत्मार्गी आहे, मी सन्याशी आहे, मी आपला भक्त आहे हे तो नेहमीच सांगतो. पण त्याकडे लक्षच देणारा कुणी नाही. असो.

इतिहासकार प्रेमींना एक विनंती करू इच्छितो की जुन्नर तालुक्यात असलेल्या प्राचीन इतिहासावर आपण एकदा सहज नजर टाकण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितच आपल्या हातून एक अतिशय मोठ्या प्रमाणावर येथील इतिहास लिहीला जाऊ शकतो यात शंकाच नाही. असा ठाम विश्वास मला वाटतो.

लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here