त्रिविक्रम मंदिर, रामटेक, नागपूर –
रामटेकच्या गड परिसरात असलेले त्रिविक्रम मंदिर साधारण पाचव्या शतकातील वाकाटककालीन मंदिर मानले जाते. महाराष्ट्राच्या गॅझेटियरमध्येही रामटेकच्या त्रिविक्रम मंदिराचा प्राचीन वास्तू व शिल्पकलेच्या महत्त्वाच्या अवशेषांमध्ये उल्लेख आढळतो. भगवान विष्णूंनी राजा बळीला तीन पावलांची भूमी मागितली आणि विराट रूप धारण करून तीन पावलांत संपूर्ण विश्व व्यापले, त्या रूपाला त्रिविक्रम असे म्हणतात. त्यामुळे वामन आणि त्रिविक्रम हे दोन वेगवेगळे अवतार नसून, वामन अवतारातील पुढील विराट स्वरूप म्हणजे त्रिविक्रम, अशी पुराणपरंपरेतील संकल्पना आहे.
रामटेकच्या त्रिविक्रम मंदिरातील लालसर पाषाणातील भग्न मूर्ती विशेष आकर्षण ठरते. मूर्तीचे हात आज भग्न झालेले असले तरी तिची भव्यता स्पष्ट जाणवते. अभ्यासकांच्या मते मूर्तीला मूळतः आठ हात असावेत. शिराभोवती प्रभावळ, मुकुट, अलंकार आणि वस्त्रांचे शिल्पांकन तिच्या मूळ स्वरूपाची कल्पना देते. मूर्तीच्या पायाजवळ राजा महाबलीची अंजलीमुद्रेतील लहान प्रतिमा असल्याचेही वर्णन आढळते.
आज मंदिराची बहुतांश वास्तू काळाच्या ओघात नष्ट झाली असून मंदिराचा काही भाग, मंडपाचे अवशेष आणि त्रिविक्रमाची भग्न मूर्ती पाहायला मिळते. उपलब्ध पुरातत्त्वीय नोंदीनुसार हे स्थळ वाकाटककालीन वारशाशी संबंधित आहे आणि येथील लाल पाषाणातील शिल्पकला विशेष उल्लेखनीय आहे.
रामटेकमध्ये त्रिविक्रमासोबतच वराह, नृसिंह आणि इतर विष्णू अवतारांशी संबंधित प्राचीन मंदिरे आढळतात. त्यामुळे प्राचीन काळात रामटेक हे विदर्भातील महत्त्वाचे वैष्णव धार्मिक व सांस्कृतिक केंद्र असल्याचे या वारशातून दिसून येते.
विशेष म्हणजे, मराठी विश्वकोशातही रामटेकचा त्रिविक्रम वामन मंदिर आणि त्याच्या भग्न मूर्तीचा साहित्यिक संदर्भ आढळतो. कवी अनिल यांनी या भग्न मूर्तीपासून प्रेरणा घेऊन ‘भग्नमूर्ती’ हे खंडकाव्य लिहिल्याचा उल्लेख तेथे आहे. वामन जयंतीच्या निमित्ताने रामटेकच्या या प्राचीन त्रिविक्रम मूर्तीचे दर्शन म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नाही, तर जवळपास दीड हजार वर्षांपूर्वीच्या विदर्भातील शिल्पकला, वैष्णव परंपरा आणि वाकाटककालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या वारशाचे दर्शन आहे.
प्राचीन विदर्भाचा वारसा जपूया, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया.
Vidarbha Darshan
