चिंतामणरावांनी सांगलीत स्थापन केलं गणेश मंदिर –
सांगलीतील कृष्णाकाठी असलेलं ऐतिहासिक गणेश मंदिर हे जिल्ह्यातील तमाम गणेशभक्तांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. पेशवाईतील प्रसिद्ध सरदार आणि सांगलीचे संस्थानाधिपती श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन (पहिले) यांनी हे मंदिर बांधले. पंचायतन स्वरूपाच्या या मंदिराच्या उभारणीचा इतिहासही वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. या मंदिर स्थापने संदर्भातील आणि त्याच्या बांधकाम विषयीची काही कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहेत.
पेशवाईमध्ये पटवर्धन सरदार गोविंद हरी यांना मिरजेचा किल्ला आणि भोवतालचा परिसर पेशव्यांनी सरंजामाच्या खर्चाकरिता दिला होता. मिरज हे कर्नाटकच्या सीमेवर असल्याने याठिकाणी पटवर्धन सरदारांना ठेवल्याने कर्नाटकमधील हैदर आणि टिपूच्या स्वाऱ्यांमध्ये त्यांचा उपयोग होईल या हेतूने हा सरंजाम त्यांना देण्यात आला होता. गोविंद हरीनंतर वामनराव, पांडुरंगराव यांच्या नावाने सरदारीची वस्त्रे झाली. पांडुरंगराव हे श्रीरंगपट्टणच्या लढाईत हैदरच्या लढाईत सापडले, व कैदेतच त्यांचा मृत्यू झाला. पांडुरंगरावांना चिंतामणराव हे पुत्र होते. ते लहान असल्याने सरदारीचा कारभार त्यांचे चुलते गंगाधरराव पाहत. पुढे चिंतामणराव मोठे झाल्यावर त्यांच्या नावाने पेशव्यांनी सरदारीची वस्त्रे दिली. सर्व पटवर्धन कुटुंब मिरजेच्या भुईकोट किल्ल्यात असणाऱ्या वाड्यात राहत होते.
कृष्णाकाठी मंदिराचे काम सुरू
याचकाळात गंगाधरराव आणि चिंतामणराव या चुलत्या-पुतण्यात सरंजामाच्या वाटणीसंदर्भात वाद सुरू झाला. सन १७९९ साली त्यांच्यामध्ये वाटणी झाली. त्यानंतर चिंतामणराव हे मिरज किल्ल्यातून बाहेर पडले आणि मिरज शहराच्या उत्तरेला असणाऱ्या मळ्यात जाऊन राहिले. त्यावेळी त्यांनी सांगली येथे नवी राजधानी करण्याचे ठरविले. त्यासाठी गणेशदुर्ग नावाचा नवा भुईकोट किल्ला बांधायला सुरुवात केली. तसेच आपले आराध्य दैवत असणाऱ्या श्री गणेशाचे मंदिर बांधण्याचा संकल्प त्यांनी केला. सन १७९९ मध्ये कृष्णाकाठी गणेश मंदिराचे काम सुरू झाले.
श्रीमंत चिंतामणराव पटवर्धनांनी सांगली संस्थानाची स्थापना करून राज्यकारभार सुरू केला. मात्र, हे सर्व श्री गणेशाचे आहे. आपण, केवळ त्यांचे मुखत्यार आहोत, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यामुळेच गणेश मंदिराचे बांधकाम होईपर्यंत त्यांचा मुक्काम किल्ल्यातील वाड्यात न होता, गणेश मंदिराजवळील वाड्यातच होता. मंदिराचे बांधकाम करण्यासाठी मिरज किल्ल्यातील माधवजी मंदिराचा नकाशा मागवण्यात आला. बांधकामासाठी ज्योतिबाच्या डोंगरातून काळा पाषाण आणला होता. सन १८१४ च्या सुमारास मंदिराचा पाया घातला गेला. सुमारे ३० वर्षे हे काम सुरू होते. सन १८४५ मध्ये चैत्र शुद्ध दशमी रोजी या मंदिराचा अर्चा विधि झाला.
पाथरवटांनी बनविली गणेशमूर्ती
अहिल्यादेवी होळकर यांनी महाबळेश्वर येथे आणलेल्या संगमरवरी दगडांपैकी काही दगड चिंतामणरावांनी आणले. त्यातून पंचायतनच्या पाच मूर्ती भिमाप्पा आणि मुकुंदा पाथरवट यासारख्या स्थानिक कारागिरांकडून बनवण्यात आल्या. सन १८४७ मध्ये मंदिराचे शिखर पूर्ण झाले. या शिखरावर मार्गशीर्ष महिन्यात सुवर्णकलशारोहण झाले. हा कलशारोहण कार्यक्रम मोठ्या समारंभाने करण्यात आला. मार्गशीर्ष शुद्ध नवमी छ. ७ मोहरम शके १७६९ म्हणजेच १६ डिसेंबर १८४७ रोजी हे कलशारोहण झाले. यासंबंधीच्या नोंदीमध्ये म्हटले आहे, ‘श्री गणपती महाराज पंचायतन संस्थान सांगली याचे देवालयाचे शिखरावरील कलस तांब्याचा केला होता. त्यावर सोन्याचा मोलामा करून आज सतावीस घटका दिवसानंतर पंधरा पळात बसविला. श्रीस पेढे व साखर वाटली. पाच तोफांचे बार केले.
त्यानंतर काही दिवसांनी तत्कालीन ब्रिटिश अधिकारी इनवरिटीसाहेब सांगलीत आले होते. त्यांना गणपती मंदिर दाखविले. त्यावेळी त्यांनी हे शिखर पाहिले. या संबंधी चार जानेवारी १८४८ ची नोंद उपलब्ध आहे, त्यामध्ये म्हटले आहे ‘देवलाचे कलस सोन्याचे मुलाम्याचे वर बसविले ते दाखविले’.
मुख्य मंदिर हे काळ्या पाषाणातील असून पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरात संगमरवरातील रिध्दी-सिध्दीसह असलेल्या श्री गणेशाची सुबक मूर्ती आहे. मुख्य मंदिराभोवती श्री चिंतामणेश्वर हे श्री महादेवाचे मंदिर, चिंतामणेश्वरी हे देवीचे मंदिर, श्री सूर्यनारायण मंदिर आणि श्री लक्ष्मीनारायण मंदिर अशी चार मंदिरे आहेत. दरवर्षी भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असा गणेशोत्सव येथे होतो. हा उत्सव प्रसिद्ध आहे. त्यावेळी कीर्तन, प्रवचने, लळीत असे कार्यक्रम होत. नामांकित हरदास, गवई आणि नृत्यांगनांचे कार्यक्रम होत.
©️ मानसिंगराव कुमठेकर
9405066065
