महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 95,22,025

छत्रपती शिवाजी महाराजांची कर्नाटक मोहिमेची पार्श्वभूमी आणि राजकारण…

Views: 2
8 Min Read

छत्रपती शिवाजी महाराजांची कर्नाटक मोहिमेची पार्श्वभूमी आणि राजकारण…

छत्रपती शिवाजी महाराजांची कर्नाटक मोहीम अशा उथळ हेतूंसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली नव्हती. ती योजनाबद्ध, मुत्सद्दी, दूरदर्शी व एका अत्यंत व्यापक अशा उद्दिष्टपूर्तीसाठी महाराजांसारख्या क्रांतदर्शी पुरुषाने मांडलेली मोहीम होती. तिचे नीट आकलन होण्यासाठी काहीसा पुनरुक्तीचा दोष पत्करूनही तत्कालीन राजकारणाची व त्यातील उलथापालथीची ओळख करून घेणे आवश्यक आहे…

राजकारणाला विचारवंतांनी नेहमीच वारांगनेची उपमा दिलेली आहे. वारांगनेप्रमाणेच राजकारणही सदैव चंचल असते. एखाद्या उपायासाठी म्हणून घेतलेला एखादा राजकीय पवित्रा पुष्कळदा उपाय म्हणून तर सिद्ध होत नाहीच उलट, बिलक्षण गुंतागुंतीची स्थिती उत्पन्न करून ठेवतो. ही गुंतागुंत व्यापक होत जाऊन अनेक वेळा या गुंतागुंतीत उपाय योजणाऱ्याच्या गळ्याभोवतीच पाश आवळले जातात. अकल्पित विस्मय कारक असे काही वेगळेच निर्माण होते. नेमकी अशीच परिस्थिती या सुमारास विजापूरच्या आदिलशाहीत उद्भवलेली होती…

मुळात दक्षिणी विरुद्ध पठाण या अंतर्गत संघर्षात ती जर्जर झालेली असतानाच शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम सिंहासन निर्माण केले. त्यांच्या वाढत्या बळाला आवर घालण्यासाठी म्हणून वजीर खवासखानाने मोगली सुभेदार बहादूरखानासोबत तह केला. तहात मोगलांनी ८५ लक्ष रुपयांची थकित खंडणी विजापूरकरांना माफ केली. त्या मोबदल्यात २५ हजार स्वार व हशम एवढा जमाब घेऊन विजापूरकरांनी महाराजांवर चढाई करावी, पन्हाळा, सातारा काबीज करून कोकणप्रांत लुटाबा असे ठरले. या तहाला दाट स्नेहाच्या रज्जूंनी बांधण्यासाठी खवासखान व बहादूरखान परस्परांचे व्याही झालेत. स्वाभाविकच या तहामुळे आता शिवाजी महाराजांवरील संकट गडद होणार हे स्पष्ट होते. तशी शक्यता गृहित धरूनच महाराजांनी त्वरित आपला पवित्रा ठरविला. सातारा व पन्हाळ्याचा योग्य तो बंदोबस्त करून मोगली प्रदेशात रणक्षेत्र उघडण्यासाठी सरसेनापती हंबीरराव मोहिते वाई पुण्याहून थेट दौलताबाद (देवगिरी) जवळील लासूर या व्यापारी पेठेवर चालून गेले. लासूर पेठ त्यांनी पार वसूल केली. हंबीररावांचा मोड करण्यासाठी बहादूरखान लासूरकडे धावला. तेथे त्याची व हंबीररावांची गाठ पडून घनघोर लढाई जुंपली. दोन्ही बाजूंचे बरेच सैनिक ठार झाले. पण अखेरीस हंबीररावांने बहादूरखानाचा धुव्वा उडविला. खानाचे चार हत्ती मराठ्यांनी पाडाव करून नेले…

तिकडे मोगलांशी झालेल्या तहानुसार, खवासखानाने विजापुरहून महाराजांबर चालून जाण्याची सिद्धता केली. आणि इथून राजकारणाने एकदम रंग पालटला. दक्षिणी विरुद्ध पठाणी या अंतर्गत संघर्षाने विजापुरात नेमका याच वेळी पेट घेतला. मोगलांच्या मैत्रीमुळे वजीर खवासखानाचा होणारा संभाव्य वरचढपणा पठाणी पक्षाचा नेता नबाब बहलोलखान याला सहन होण्यासारखा नव्हता. त्यामुळे खवासखानाचे पारडे जड होण्यापूर्वीच त्याचा काटा काढण्याच्या उद्योगाला तो लागला. त्यात त्याला लगेच यशही प्राप्त झाले. खवासखान कैद होऊन विजापुरात राज्यक्रांती घडून आली. विजापूर पठाणांच्या ताब्यात गेले. म्हणजे मुळात दक्षिणी पक्षाच्या खवासखानाने महाराजांच्या बंदोबस्तासाठी केलेला उपाय त्याच्याच अंगलट येऊन पठाणी पक्षाने विजापुरी सत्ता काबीज केली. महाराज बाजूला राहून खवासखानच संकटात सापडला व विजापूर दरबारातील दक्षिणी पक्षाला हलाखीचे दिवस प्राप्त झाले. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. बहलोलखानाने खवासखानाची हत्त्या करवली व स्वतःचे आसन निर्वेध करण्याच्या मागे तो लागला…
पण राजकारणाने पुन्हा नवे वळण घेतले. मोगली सुभेदार नबाब बहादूरखान खवासखानाच्या हत्त्येमुळे चिडून गेला. औरंगजेबानेही बहलोलखानाची उचल बांगडी करण्याची आज्ञा त्याला केली. तह उधळला गेल्यामुळे विलक्षण डिवचला गेलेला बहादूरखान आता बहलोलखानाचा काटा काढण्यासाठी प्रचंड तयारीला लागला. पुन्हा विजापूरकरांचा ‘अस्तित्वासाठी संघर्ष’ सुरू झाला…

बिजापुरात अशी उलथापालथ सुरू असताना तिकडे दक्षिणेत तंजावर, मदुरा येथील हिंदू संस्थानिकांच्या राज्यात तसेच कुत्बशाहीतही राजकारणाने असेच रंग बदलले होते. विजयनगरचे हिंदू साम्राज्य नष्ट झाल्यानंतर सतराव्या शतकारंभी म्हैसूर पठार व कर्नाटकच्या मैदानी मुलुखात जिंजी, तंजावर, मदुरा, बेदनूर, म्हैसूर इत्यादी ठिकाणी स्थानिक संस्थानिक बळावले. विजयनगरच्या राजवंशातील यावेळचा बारस श्रीरंगराय हा बेल्लोरला राजदरबार सांभाळून होता. त्याचे आधिपत्त्य ही छोटी संस्थाने मानीनात. त्यामुळे आपसात ही हिंदू संस्थाने झगडू लागली. इ.स.१६४८ च्या सुमारास मदुरेच्या त्रिमलनायकाने श्रीरंगरायाविरुद्ध कुत्बशाहाची मदत मागितली. त्याप्रमाणे मीर जुम्ला कुत्बशाही सैन्यासह त्याच्या मदतीला आला. त्याने श्रीरंगरायाचा पराभव करून त्याला हुसकून लावले. यानंतर परत न फिरता त्याने जिंजीला वेढा दिला. हे पाहून मदुरेच्या त्रिमलनायकाचे धाबे दणाणले. कुत्बशाही सेना जिंजीच्या पाडावानंतर मदुरेवर चालून येईल अशी भीती त्याला भेडसावू लागली. परिणाम स्वरूप त्याने विजापूरकरांचे सहाय्य मागितले. त्यावेळी वजीर मुस्तफाखान जिंजीचा वेढा उठविण्याकरता आला. पण जिंजीकडे आल्यावर त्याने मीरजुम्लाशी तह करून ‘काफरांची’ पाळेमुळे खणून काढण्याचे व तो मुलुख बाटून घेण्याचे ठरविले. अशावेळी विजापूरकरांच्या तर्फे आलेल्या शहाजी महाराजांनी या हिंदू संस्थानिकांना अंतःस्थरीत्या धीर दिला व त्यांना नष्ट होऊ दिले नाही. मात्र त्यावेळी जिंजीचा किल्ला विजापूरकरांनी जिंकून घेतला व तंजावर आणि मदुरा येथील नायकांना खंडणीच्या बोलीवर मांडलिक म्हणून राहू दिले…

वस्तुतः मदुरा, तंजावर येथील संस्थानिकांनी यापासून धडा शिकून आपसातील दुही नष्ट करायला पाहिजे होती. पण दुर्दैवाने तसे घडले नाही. इ.स.१६७४ च्या एप्रिल महिन्यात मदुरेच्या नायकाने तंजावरवर हल्ला चढवून तेथील संस्थानिक विजयराघव याला ठार केले व तंजावर बळकावले…
विजयराघवाचा नातू सुदैवाने जिवंत होता. त्याने मदुरेच्या नायकाविरुद्ध विजापूरकरांकडे तक्रार केली. त्यावेळी वजीर खवासखानाने शहाजीराजांचे पुत्र व्यंकोजीराजे (महाराजांचे सावत्र बंधू) यांना विजयराघवाच्या नातवास तंजावरच्या गादीवर बसविण्याची कामगिरी सांगितली. व्यंकोजीराजे यावेळी विजापूरकरांचे सरदार म्हणून जिंजीला होते. इ.स.१६७५ हे संपूर्ण वर्ष व्यंकोजी राजे अनुकूल संधीची वाट पाहात जिंजीच्या परिसरात दबा धरून बसले. या काळात मदुरेचा नायक व तंजावरच्या गादीवर त्यानेच बसविलेला त्याचा दूध भाऊ आपसात झगडून दुर्बळ झाले. तेव्हा इ.स. १६७६ साली व्यंकोजीराजांनी तंजावरवर हल्ला चढवून ते काबीज केले. याच दरम्यान विजापुरात दक्षिणी विरुद्ध पठाण संघर्ष तीव्र झाला होता. तंजाव रसारख्या दूर असलेल्या प्रदेशाकडे दरबाराचे लक्ष नव्हते. वजीर खवासखान बहलोलखान पठाणाच्या हाती कैदेत पडला होता. या संधीचा फायदा घेऊन व्यंकोजीराजांनी तंजावर जिंकून विजय राघवाच्या नातवास तेथे प्रस्थापित न करता स्वतःच तंजावर बळकावले व पुढे ५ मार्च १६७६ रोजी तंजावरचा ‘महाराजा’ म्हणून अभिषेकही करवून घेतला..! जिंजीच्या सुभ्यापैकी काही प्रदेश (शहाजीमहाराजांपासूनच) व्यंकोजीराजेंच्या जहागिरीत होताच…
व्यंकोजीराजे सहजासहजी तंजावरचे स्वामी झाले. विजापुरी कर्नाटकात त्यावेळी जिंजीचा सुभेदार बजीर खवासखानाचा भाऊ नासीर मुहम्मदखान हा होता. त्याचे मुख्य स्थान जिंजी असून त्याच्या ताब्यात पांदेचरीपर्यंतचा मुलुख होता. दक्षिण कर्नाटकात शेरखान लोदी हा विजापूरकरांचा प्रमुख सुभेदार होता. त्याचे मुख्य स्थान त्रिचनापल्लीकडील बालीगंडापुरम् हे होते. शेरखान हा बहलोलखान पठाणाचा पुरस्कर्ता होता. म्हणजे जिंजी खवासखान पक्षाकडे तर बालीगंडापुरम् बहलोलखान पक्षाकडे होते. विजापुरात दक्षिणी विरुद्ध पठाण झगडा सुरू होताच त्याची प्रतिक्रिया कर्नाटकातही उमटली व शेरखान आणि नासीर मुहम्मद आपसात झगडू लागले. लवकरच विजापुरी सत्ता बहलोलखानाच्या हाती एकवटली. तेव्हा कर्नाटकात शेरखान बलिष्ठ झाला. नासीर मुहम्मद एकाकी पडला. शेरखान बिलक्षण महत्त्वाकांक्षी होता…

पांदेचरीच्या फ्रेंचांशी मैत्री करून त्यांच्या शस्त्रबळावर तो आता जिंजीच नव्हे तर सर्व हिंदू संस्थाने, फार काय गोवळकोंडाही जिंकून घेण्याची स्वप्ने पाहू लागला. दक्षिणेकडील कर्नाटक असे ढवळून निघत असता कुत्बशाहीतही आंतरिक अशांतता बाढू लागलेली होती. यावेळी गोवळकोंड्यांच्या कुत्बशाहीच्या सिंहासनाबर अबुल हसन उर्फ तानाशाहा बसलेला होता. राज्यकारभार प्रामुख्याने मुख्य दिवाण मुझाफरखान व सरखैल आणि खान-इ-खानान मुसाखान या दोघांच्या हाती एकवटलेला होता. इ.स.१६७३ मध्ये या उभयतात ईर्ष्या उत्पन्न होऊन दोघेही सर्वेसर्वा होण्यासाठी प्रयत्न करू लागले. कुत्बशाहाने त्यांच्या झगड्याकडे मुद्दामच दुर्लक्ष्य केले. कारण दोघेही त्याला डोईजड वाटत होते. शिवाय गादीच्या वारसावरून मोगली आक्रमणाची भीतीही त्याला वाटत होती. हळुहळू दोन वजिरांमधील झगडा चांगलाच पेटला. अखेरीस मुझाफरखानाने कुत्बशाहाची मनधरणी करून मुसाखानाचा काटा काढला. मुसाखान कैद् झाला. मुसाखान कैद होताच मुझाफरखानाने स्वैर कारभार सुरू केला. अखेर कुत्बशाहाने त्यालाही कामावरून दूर करून घरी बसवले आणि कुत्बशाहीचा संपूर्ण कारभार आपल्या विश्वासातील मादण्णाकडे दिला. (इ.स.१६७५ च्या मे महिन्यात) मादण्णा व त्याचा बंधू अक्कणा हे दोघेही अत्यंत कर्तृत्ववान कारभारी कुत्बशाहीला लाभले…

आर्ट @gadwat_official

Leave a Comment