श्रीमंत यशवंतराव होळकर

श्रीमंत यशवंतराव होळकर

श्रीमंत यशवंतराव होळकर महाराज –

छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा स्वतःच्या रक्तमासाचे खतपाणी घालता घालता काही रोपट्यांचे वृक्ष झाले, ते फोफावले व त्यांच्या पारंब्याने अवघ्या हिंदुस्थानभर छाया धरली. याच पराक्रमी घराण्यापैकी होळकरांचे एक घराणे. मल्हाराव होळकर हे याच घराण्याचे मूळ पुरुष .माळव्याचे( ईंदोर ) सुभेदार म्हणून प्रसिद्ध होते. मल्हाररावांचे शौर्य आणि मुत्सद्देगिरी दोन्हीही मराठी दौलतीच्या कामी राबली.त्यांचा दबदबा पेशव्यांनाही वाटत होता.पुढे परिस्थिती झपाट्याने पालटली मल्हाररावांच्या हयातीतच त्यांचा मुलगा वारला .आणि होळकरी दौलत सांभाळण्याचे जोखमीचे काम अहिल्‍याबाईंकडे आले. अहिल्याबाईंच्या मृत्यूनंतर तुकोजी होळकर हे सुभेदारीच्या गादीवर आले .पुढे याच तुकोजी होळकर यांच्या पोटी श्रीमंत यशवंतराव होळकर यांचा जन्म १७७६ साली झाला .

श्रीमंत यशवंतराव होळकर हे मराठी इतिहासातला एक चमत्कार आहे. वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत होळकरांच्या दौलतीची मालकी आपल्याकडे येईल हे त्यांच्या स्वप्नातही नव्हते. त्यामुळे त्यांचे गुण आणि दोष हे त्यांच्या अनुभवातून त्यांच्या वाट्याला आले आहेत. मराठी इतिहासात त्यांचा झालेला आकस्मित उदय, त्यांनी उमटवलेला ठसा ,आणि अजिंक्य समजल्या गेलेल्या इंग्रजी फौजांना त्यांनी शिकवलेला धडा हे पाहिले की नेपोलियनची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. योगायोग असा आहे की नेपोलियन व यशवंतराव हे दोघे समकालीन होते, आणि दोघांनीही एकाच शत्रूला तोंड दिलेले आहे.

हिंदुस्थानभर आपल्या कवायती फौजांचा टेंभा मिरवणाऱ्या इंग्रजांचा नक्शा फक्त एका यशवंतरावांनी उतरवला होता. यशवंतरावाची बदनामी करण्याची एकही संधी इंग्रजांनी सोडली नाही. भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात असे कितीतरी क्रांतिकारी होऊन गेले ज्यांनी अज्ञात राहून देशाची सेवा केली. या भारत मातेला इंग्रजांच्या क्रूर शासनातून मुक्त करण्यासाठी कित्येक भारत मातेच्या सुपुत्रांनी आपले प्राण पणाला लावले त्यात यशवंतराव यांचे नाव आघाडीवर होते. त्यावेळी होळकरांचा प्रभाव मोठा होता.

होळकर साम्राज्याची समृद्धी इंग्रजांना त्यांना बघवत नव्हती. म्हणून त्यांनी यशवंतरावांच्या मोठ्या भावाचा मल्हाररावांचा कट रचून त्यांना ठार केले. मोठ्या भावाच्या अचानक झालेल्या मृत्यूने यशवंतराव हळहळले, पण त्यांनी लवकरच स्वतःला सावरले.

१८०२ मध्ये झालेल्या युद्धात त्यांनी पुण्याच्या पेशवा बाजीराव (द्वितीय) आणि सिंधिया यांच्या संयुक्त सेनेला नमवले. तेथे खरी यांच्या शौर्याची पताका फडकली. या दरम्यान इंग्रजांनी देखील भारतात आपले पाय पसरविण्यास सुरवात केली होती. तेव्हा यशवंतरावांसमोर आणखी एक मोठी आपत्ती येऊन ठेपली. ती म्हणजे भारताला या इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करणे.

यासाठी यशवंतराव यांनी नागपूरचे भोसले आणि ग्वालियर येथील सिंधिया या राजपरीवारांसोबत हात मिळविला. त्यांनी या धोकेबाज इंग्रजांना देशातून बाहेर फेकण्याचा निश्चय केला. त्यानंतर त्यांनी इतर शासकांनाही इंग्रजांविरुद्ध एकजूट होण्याची विनंती केली परंतु कोणीही त्यांना सहकार्य केले  नाही. अखेर त्यांनी स्वतःच इंग्रजांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. ८ जुन १८०४ ला त्यांनी पहिल्यांदा इंग्रजी सैन्याला पराभूत केले. त्यानंतर त्यांनी कोटा येथून इंग्रजांना हद्दपार केले. ते कायम त्यांच्या कार्यात सफल होत गेले. अखेर ११ सप्टेंबर १८०४ ला ब्रिटीश जनरल वेलेस यांने लार्ड ल्युक यांना पत्र लिहीले की,

जर यशवंतरावांना लवकर थांबविले नाही गेले तर इंग्रजांची भारतातून हकालपट्टी करतील..!

यशवंतराव आता इंग्रजांसाठी त्यांच्या मार्गाचा काटा बनले होते, त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्यावर हल्ला करविला. या युद्धात यशवंतरावांनी भरतपूरच्या महाराज रणजीत सिंह यांची सोबत घेत  परत इंग्रजांना पराभूत केले. पण महाराज रणजीतसिंह यांनी यशवंतरावांची साथ सोडून इंग्रजांची साथ देण्याचे ठरवले. तेव्हा यशवंतराव हतबल झाले, त्यांना कळेच ना की असे का होत आहे, का कोणी त्यांचा साथ देत नाही?

यशवंतरावांच्या शौर्याची कहाणी आता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरायला लागली होती. लोक त्यांच्या पराक्रमी आणि धाडसी व्यक्तिमत्वामुळे खूप प्रभावित झाले. त्यामुळे त्याचा सन्मानही वाढला. कदाचित याच कारणामुळे त्यांचे जुने  शिंदे राजघराणे यांनी त्यांची साथ सोडली होती, ते पुन्हा त्यांची साथ देण्यास समोर सरसावले. यामुळे इंग्रजांची झोपचं उडाली. त्यांना काळजी वाटू लागली की जर यशवंतराव यांच्या सोबत सर्व संस्थानिकांनी हात मिळवणी केली तर  काही खरं नाही. म्हणून त्यांनी एक डाव खेळला!

त्यांनी यशवंतरावांशी हातमिळवणी  करण्याचा निर्णय घेतला.  जेणेकरून यामुळे त्यांचा फायदा होईल. यावेळी इंग्रजांनी पहिल्यांदा विना अट   पुढाकार घेतला होता. त्यांनी यशवंतराव यांच्याशी तह करताना त्यांच्यासमोर एक प्रस्ताव मांडला की, त्यांना जे हवं ते देऊ, त्याचं जेवढ साम्राज्य आहे तेही त्यांना परत करू. फक्त या बदल्यात ते इंग्रजांशी लढणार नाहीत. पण यशवंतराव हे भारत मातेचे खरे सुपुत्र होते. त्यांनी इंग्रजांची ही संधी लाथाडली. त्यांचं केवळ एकच ध्येय होतं. इंग्रजांना भारतातून बाहेर काढणे. त्यांच्या या ध्येयपूर्तीसाठी त्यांनी देशातील सर्व संस्थानिकांना एकजूट करण्यास सुरवात केली. पण ते या कार्यात असफल ठरले.

दुसरीकडे त्यांचे एकमेव साथीदार सिंथिया यांनी देखील इंग्रजांशी हातमिळवणी  केली. त्यामुळे यशवंतराव आता एकटे पडले. अशा परिस्थितीत आता त्यांना काही मार्ग दिसत नव्हता. म्हणून त्यांनी स्वतःच इंग्रजांवर हल्ला चढवला. इंग्रजांना स्वतःच्या बळावर पराभूत करण्यासाठी त्यांनी पूर्ण तयारी केली. त्यासाठी त्यांनी भानपूर येथे दारू-गोळाचा कारखाना उघडला आणि त्यात ते दिवसरात्र झटत राहिले. त्यामुळे त्यांची प्रकृती देखील खालावू लागली. पण देशभक्तीच्या धुंदीत हरवलेले यशवंतराव यांना त्यांच्या ध्येयापुढे काहीही दिसत नव्हते.

अखेर २८ ऑक्टोबर १८११ साली इंग्रजांशी लढताना यशवंतरावांना वीरमरण आले, तेव्हा ते केवळ ३५ वर्षांचे होते. ते एक असे सुभेदार होते की, ज्यांच्यावर इंग्रज आपलं अधिपत्य नाही मिळवून शकले, ज्यांनी इंग्रजांना नाकीनऊ आणून सोडले. आपले जीवन त्यांनी भारत मातेच्या सेवेसाठी  अर्पण केले.

जर त्यांच्याप्रमाणेच भारतातील इतर संस्थानिकांनी भारतमातेला इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्याच्या संघर्षात त्यांची साथ दिली असती तर इंग्रज भारतावर एवढे वर्ष राज्य करू शकले नसते. भारतातील जनतेला त्यांची गुलामगिरी करावी लागली नसती. त्यांचे अत्याचार सहन करावे लागले नसते. जर यशवंतराव त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात सफल झाले असते तर आज देशाचे चित्र काही वेगळेच असते. इंग्रजांनी केलेल्या अत्याचाराच्या  कटू आठवणी आपल्या इतिहासात नसत्या, तर फक्त केवळ या शूरांची वीरगाथा असली असती.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here