टिळकांचा विंचूरकर वाडा

टिळकांचा विंचूरकर वाडा

टिळकांचा विंचूरकर वाडा –

सरदार विंचूरकर म्हणजे मुळचे सासवडचे ‘दाणी’. श्री विठ्ठल शिवदेव दाणी हे या घराण्याचे संस्थापक. थोरले बाजीराव यांच्या बरोबर अनेक लढायांत त्यांनी सहभाग घेतला. कालांतराने ‘दाणी’ चे ‘विंचूरकर’ झाले. थोरले बाजीराव यांनी शनिवारवाडा बांधायला घेतला, तेव्हा अनेक सरदारांनी स्वतचे वाडे बांधायला घेतले. सदाशिव पेठेत (आजच्या कुमठेकर रस्त्यावर) सरदार विंचूरकर यांनी दुमजली वाडा याच काळात बांधला.

पेशव्यांच्या सेवेत विंचूरकर घराणे शेवटपर्यंत होते. यानंतर या वाड्याला महत्त्व आलं ते टिळकांच्या काळात. १८९१ ते १९०५ अशी तब्बल १४ वर्ष टिळक या वाड्यात रहात होते. नंतर ते गायकवाड वाड्यात (केसरीवाडा) येथे रहायला गेले‌. या कालखंडात अनेक महत्त्वाच्या घडामोडी विंचूरकर वाड्याच्या साक्षीने पार पडलेल्या आहेत.

जून १८९२ मध्ये स्वामी विवेकानंद यांनी या वाड्यात टिळकांची भेट घेतली‌. ते इथे १० दिवस निवास करुन होते. यानंतर १८९४ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ टिळकांनी याच वाड्यात रोवली. टिळक या वाड्यात कायद्याचे शिकवणीचे वर्ग घेत, त्यामुळे या गणेशाला ‘लॉ क्लासचा गणपती’ असेही म्हणले गेले.

गणेशोत्सवाच्या काळात टिळकांबरोबर ह.भ.प पांगारकर, प्रो.जिनसीवाले, शिवरामपंत परांजपे, न.चिं.केळकर, खाडीलकर, इ. व्यक्तींची भाषणे होत. न्यायमूर्ती रानडे यांच्यावरील मृत्युलेख आणि केसरीतील “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” हे दोन्ही लेख याच वाड्यात लिहिले गेले.

१८९७ मध्ये केसरी-मराठा वृत्तपत्राची पहिली कचेरी होण्याचा मान विंचूरकर वाड्याला मिळाला. नंतर टिळक गायकवाड वाड्यात राहायला गेल्यावर विंचूरकर वाड्याचे महत्त्व कमी झाले. दि‌.०२ एप्रिल २०१४ मध्ये विंचूरकर वाडा पाडण्यात आला. आता त्याजागी मोठे संकुल उभे आहे. टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सवाची परंपरा आजही विंचूरकर घराणे पुढे नेत आहेत.

फोटो : The Deccan पेज वरुन साभार.

© वारसा प्रसारक मंडळी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here