उग्र नरसिंह | योग नरसिंह

उग्र नरसिंह | योग नरसिंह

उग्र नरसिंह –

हळेबीडू येथील होयसळेश्वर मंदिरावर बाह्य भागात ही आसनस्थ मुर्ती दिसली आणि माझे पाय खिळले. नरसिंहाची हिरण्यकश्यपुचे पोट फाडतानाची मुद्रा सर्वत्र आढळते. पण या ठिकाणी हिरण्यकश्यपुच्या पोटातील आतडे बाहेर काढून त्याची कलात्मक नक्षी दाखवली आहे ती पाहून मी चकित झालो. तिथे आलेल्या एका जर्मन अभ्यासकाने मला हेही सांगितले की या आतड्याची लांबी त्या आकाराच्या माणसाच्या आतड्या इतकीच शिल्पात दाखवली आहे. माझ्या जवळ मोजायची काही साधने नव्हती. पण ८०० वर्षांपूर्वी एका शिल्पकाराला मानवी शरिरशास्त्राची पोटातील अवयवांसह पूर्ण माहिती होती आणि ती तो कलात्मक पातळीवर दाखवून देवू शकत होता हे थक्क करणारे आहे. ही आतड्याची माळ डाव्या बाजूची पूर्ण आहे. उजव्या बाजूला तुटलेली दिसते आहे.(उग्र नरसिंह)

उग्र नरसिंह | योग नरसिंह

हा नरसिंह आठ हातांचा आहे. चार हातात विष्णुची आयुधं (शंख चक्र गदा इ. दिसत आहेत) दोन हातांनी हिरण्यकश्यपुचा पाय आणि डोके पकडले आहे. आणि बाकी दोन हातांनी नखाच्या सहाय्याने पोट फाडलेले दिसत आहे. वरील मुर्ती उग्र नरसिंह अथवा विदारण नरसिंह म्हणून ओळखली जाते. नरसिंहाच्या अजून दोन मुर्ती प्रचलीत आहेत. योगमुद्रेतील शांत सौम्य मुर्तीला योग नरसिंह म्हणतात. तिसरी मुर्ती लक्ष्मी बरोबरची तिला लक्ष्मी नरसिंह किंवा भोग नरसिंह असे म्हणतात.

नरसिंहाची जी प्राचीन मंदिरे आहेत त्यात गोदावरी काठी नांदेड जिल्ह्यात राहेर येथे आहे (बाकी बहूतांश मंदिरे तुलनेने अलीकडच्या काळातील आहेत).

नांदेड परभणी परिसरात या तीन प्रकारच्या नरसिंहाला बोली भाषेत आग्या नरसिंह, योग्या नरसिंह आणि भोग्या नरसिंह अशी नेमकी अनुप्रास जुळणारी नावे आहेत. प्रत्यक्ष मंदिरं कमी असली तरी बहूतांश विष्णु मंदिरांवर उग्र नरसिंहाचे शिल्प बाह्य भागात, देवकोष्टकात आढळून येते.

योग नरसिंह

योग नरसिंह

काल उग्र नरसिंहाच्या मुर्तीवर लिहिले होते. आज ही दूसरी अप्रतिम शिल्पकामाचा नमुना असलेली “योग” नरसिंह मुर्ती आहे. औंढा नागनाथ जवळ राजापुर इथे ज्या तीन मुर्ती आहेत त्यातील ही दूसरी (सरस्वतीच्या मुर्तीबाबत पूर्वी लिहीलं आहे). अर्ध सिद्धासनातील हा नरसिंह असून चेहरा सौम्य आहे. योग नरसिंह मुर्तीला योगपट्टा असतो. तो इथे दिसत नाही. हंपी येथील प्रसिद्ध जी मुर्ती आहे तिला योगपट्टा स्पष्ट आणि मोठा दिसून येतो.  ही मुर्ती साडेतीन फुटाची आहे.

अर्ध सिद्धासनातील नृसिंह मुर्ती फारच थोड्या आहेत. हा नरसिंह दोनच हातांचा आहे त्यामुळे पण याचे वेगळेपण दिसून येते (पैठण येथे १४ हातांची विदारण नृसिंह मुर्ती आहे). राजापुर येथील तिन्ही मुर्ती त्यांच्या विलक्षण शिल्पसौंदर्याने अभ्यासकांना चकित करतात. या मुर्तींचा कालखंड १३ व्या शतकापर्यंत मागे जातो. विष्णुच्या याच अवतारातील मंदिरे ११ व्या ते १४ व्या शतकात जास्त आढळून आली आहेत. बाकी विष्णु अवताराची मंदिरे जवळपास नाहीतच.

(फोटो सौजन्य हरिहर भोपी, औंढा)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here