गोदावरी तीरावरील मंदिरे, पुणतांबा

गोदावरी तीरावरील मंदिरे, पुणतांबा

गोदावरी तीरावरील मंदिरे, पुणतांबा –

नगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील पुणतांबा गावाला धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक अशी परंपरा आहे. गाव गोदावरी नदीकाठी वसले आहे. दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पुणतांब्याचा उल्लेख महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धार्मिक क्षेत्रांत होतो. प्राचीन काळी या गावाचे नाव पुण्यस्तंभ असे होते. ही राजा विक्रमादित्याची राजधानी. पुणतांबा गावाला पूर्ण तटबंदी असून गावाला अकरा वेशी आहेत. बऱ्याच ठिकाणी तटबंदी ढासळली आहे. महायोगी चांगदेव महाराजांची संजीवन समाधी येथे असून तसेच नदीकिनारी अनेक पुरातन मंदिरे आहेत.(गोदावरी तीरावरील मंदिरे, पुणतांबा)

पुणतांबा गावाच्या पश्चिमेला चारशे वर्षांपूर्वींचे याज्ञसेनी देवी मंदिर आहे. मंदिरात स्वयंभू देवीची मूर्ती आहे. देवी नगर जिल्ह्या समवेतच खानदेशातील भाविकांची कुलदेवता मानली जाते. यज्ञकुंडात देवी प्रकट झाली त्यामुळे देवीचे नाव याज्ञसेनी असे पडले अशी कथा ग्रामस्थ सांगतात.

पुणतांबे गावी पुरातनकालीन कार्तिकेय मंदिर आहे. या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेला कृत्तिका महोत्सव साजरा केला जातो. भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध करून त्रैलोक्याला त्याच्या जाचातून मुक्त केले. भगवान शंकराच्या या विजयाची स्मृती म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाऊ लागली. त्याच दिवशी कार्तिकेयाचा जन्म झाला. म्हणून कार्तिकेयाचीही पूजा केली जाऊ लागली. मंदिरात स्त्रियांना प्रवेश वर्ज्य आहे. मात्र त्रिपुरारी पौर्णिमा व कृतिका नक्षत्रांवर महिलांना मंदिरात प्रवेश मिळतो व कार्तिकेय स्वामींचे दर्शन घेता येते.

कार्तिक स्वामी मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे. मंदिराच्या गर्भगृहात मध्यभागी शिवलिंग असून मंदिरामध्ये दक्षिणमुखी कार्तिकस्वामींची मूर्ती, उत्तरेस गणपती तर पश्चिमेस पार्वती व गंगामातेची मूर्ती आहे. मंदिराबाहेर रावणाची मूर्ती आहे. जवळच त्रंबकेश्वर नावाने ओळखले जाणारे एक पूरातन शिवमंदिर देखील आपल्या दृष्टीस पडते.

कार्तिक स्वामी मंदिरापासून काही अंतरावर असलेले मामा-भाचे मंदिर आपले लक्ष वेधून घेते. दोन्ही मंदिराच्या सभामंडपात नंदी व एका गर्भगृहात शिवलिंग स्थापित आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर एक शिलालेख आपल्या दृष्टीस पडतो. जवळच शनी महाराज मंदिर व पुरातन असे महादेव मंदिर आपल्याला दिसून येते.

महायोगी चांगदेव महाराजांनी चौदाशे वर्षें घोर तपःश्चर्या केल्यानंतर माघ वद्य ३ शके १२९८ रोजी पुणतांबा येथे संजीवन समाधी घेतली. हे समाधी मंदिर गोदावरी तीरावर आहे. चांगदेव समाधी मंदिराच्या उजव्या बाजूला काशी विश्वेश्वर नावाने ओळखले जाणारे पुरातन असे शिवमंदिर असून या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे.

पुणतांबा गावात गोदावरी किनारी अनेक लहान मोठी मंदिरे व स्मृती मंदिरे आहेत. अनेक मंदिरावर असलेले  शिलालेख आपल्याला त्या मंदिराचा इतिहास सांगत आहेत. तसेच गोदावरी  किनारी असलेले अनेक भग्नावशेष, मूर्ती, स्मृती शिळा व काठी नांदलेल्या अनेक संस्कृती व सभ्यता गोदावरीचा समृद्ध इतिहास आपल्या उरात दडवून आहेत.

संदर्भ : ‘असे होते कोपरगाव’, श्रीमती बी.एम. मराठे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here