महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

शिवरायांच्या एका शब्दाखातर ऐतिहासिक पराक्रम गाजवणारे नरवीर तानाजी मालुसरे!

By Discover Maharashtra Views: 1358 8 Min Read

शिवरायांच्या एका शब्दाखातर ऐतिहासिक पराक्रम गाजवणारे नरवीर तानाजी मालुसरे!

तानाजी मालुसरे यांचे नाव ज्यांना माहीत नाही असा मराठी माणूस सापडणे कठीण! लहानपणापासून शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेत असताना आपल्याला नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेची ओळख होते आणि त्या नरवीराचे शौर्य आपल्या मनात कायमचे घर करून बसते. त्याच शौर्यगाथेला पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी हा छोटासा लेख!

वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली. आपल्या काही निवडक सवंगड्यांच्या साथीने महाराजांनी स्वातंत्र्याचा एल्गार पुकारला. त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी लढण्याची शपथ घेतली होती. शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक होते तानाजी मालुसरे!

जून १६६५ रोजी मोघलांसोबत केलेल्या पुरंदर तहानुसार शिवाजी राजांना कोंढाणा किल्ल्यासह इतर २२ किल्ले मोघलांच्या हाती सोपवावे लागले. या तहामुळे मराठ्यांच्या स्वाभिमानाला कोठेतरी ठेच पोचली होती. राजमाता जिजाऊ आईसाहेब देखील या तहामुळे व्याकूळ झाल्या होत्या. जे किल्ले शिवाजी महाराजांनी इतक्या कष्टाने प्राण धोक्यात घालून मिळवले होते, जे किल्ले कित्येक मावळ्यांच्या रक्ताने पावन झाले होते असे स्वराज्याची संपत्ती असणारे किल्ले सहज शत्रूहाती जाऊ देणे त्यांना पटत नव्हते. मुख्य म्हणजे त्यातील कोंढाणा हा किल्ला पुण्याच्या तोंडाला व जेजुरीच्या बारीला असल्याने तेवढ्या प्रांतावर देखरेख राही.

शिवाजी महाराजांना देखील जिजाऊ आईसाहेबांच्या मनातील सल कळत होती, परंतु त्यांचा देखिल नाईलाज होता. मोघलांच्या प्रचंड मोठ्या संरक्षण कवचामुळे कोंढाणा परत मिळवणे वाटत होते तितके सोप्पे नव्हते. परंतु मातेच्या हट्टासमोर राजे नमले आणि त्यांनी कोंढाणा परत मिळवण्याचा प्रण केला.

शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक शूरवीर होते जे कोंढाणा जिंकून आणण्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार होते, परंतु या मोहिमेचा विचार करताना महाराजांच्या मनात एकाच वीराचे नाव आले- तानाजी मालुसरे!

नरवीर तानाजी मालुसरे म्हणजे शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि महाराजांच्या अतिशय विश्वासातील साथीदार. महाराजांच्या प्रत्येक संकटाच्या काळात तानाजींनी मोलाची साथ दिली होती. सुरुवातीला जेव्हा महाराजांनी किल्ले हाती घेण्याची मोहीम चालवली होती तेव्हा प्रत्येक मोहिमेत तानाजी आघाडीवर होते. ऐतिहासिक अफजल खान वधाच्या वेळी सय्यद बंडा नावाच्या अंगरक्षकास छाटण्याचे काम तानाजींनीच केले होते. शाहिस्तेखानचा फडशा फाडण्यासाठी जेव्हा महाराज १०-१२ विश्वासू साथीदारांना घेऊन लाल महालात घुसले होते त्या १०-१२ जणांमध्ये देखील तानाजी मालुसरे यांचा समावेश होता. शिवाजी महाराजांनी तानाजींचा पराक्रम प्रत्येक वेळेस जवळून पाहिला होता त्यामुळे कोंढाणा फत्ते करण्याचा पराक्रम केवळ तानाजी करू शकतात याची त्यांना खात्री होती.

तानाजी हे बारा हजार हशमाचे (पायदळ) सुभेदार होते. त्यांना पालखीचा व पांच कर्ण्यांचा मान होता. जेव्हा शिवाजी महाराजांनी तानाजींना तातडीने बोलावणे धाडले तेव्हा तानाजी उमरठे गावात आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. परंतु आपल्या राजाचे बोलावणे आल्याबरोबर हातची सर्व कामे सोडून त्यांनी थेट राजांची भेट घेतली. त्यांच्या सोबत शेलारमामा आणि बंधू सूर्याजी देखील होते. महाराजांनी आपला मनसुबा तानाजींना बोलून दाखवताच तानाजी धन्य झाले. महाराजांनी अत्यंत कठीण प्रसंगावेळी आपली आठवण काढली या पेक्षा मोठे भाग्य ते काय या विचाराने त्यांची छाती गर्वाने फुलून गेली.

त्यावेळेस शेलार मामांनी सांगितलें की, आधी लग्न उरकून घेऊ. मग कामगिरीसाठी निघू. तेव्हा तानाजींनी उत्तर दिले,

आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे –

महाराजांची भेट घेतल्यावर तानाजी जिजाऊ आईसाहेबांना जाऊन भेटले. जिजाई आईसाहेबांनी देखील तानाजींना यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला. तानाजींनी आपला मुलगा रायबाची जबाबदारी शिवाजी महाराजांच्या हाती दिली आणि म्हटलें की,

जर कोंढाण्याहून परत आलो तर मी त्याचे लग्न लावून देईन, जर मेलो तर तुम्ही त्याचे लग्न लावून द्या

माघ वद्य अष्टमीला #४ फेब्रुवारी १६७० रोजी रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. सिंहगडावर उदयभान नावाचा अतिशय शूर सरदार तैनात होता. हा उदयभान मूळचा राठोड रजपूत होता पण पुढे बाटून मुसलमान झाला होता. त्याच्या हाताखाली रजपूत सैन्य देखील बरेच होते.

तानाजी आपल्या सैन्यासह गडाच्या कल्याण दरवाज्याखाली आले. रात्र बरीच झाली होती. सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता. तानाजींनी कोंढाण्यावर जाण्याचासाठी एक मार्ग निवडला,  तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा! हा कडा उभा तुटलेला होता. त्यास साखळी, दोराची शिडी लावून तटावर चढता येणे शक्य होते. तानाजींनी आपली यशवंती घोरपड घेऊन तिच्या कमरेस साखळी बांधून तिला ठरविलेल्या कड्याच्या वर चढविले खरे, परंतु घोरपड माघारी आली. जणू ती पुढे घडणाऱ्या अशुभ प्रसंगाविषयी तानाजींना संकेत देत होती. परंतु त्या संकेताकडे दुर्लक्ष करीत तानाजींनी आपल्या साथीदारांसह किल्ल्यावर प्रवेश केला आणि शत्रू सैन्याला कात्रीत पकडले.

पुढे दरवाजावर आपले लोक असावेत म्हणून तानाजींनी पुणे बाजूकडील पहिल्या दरवाजावर जाऊन तेथील पहारेकर्‍यांवर अचानक हल्ला केला त्यांना कापून काढले.

दरवाजा ताब्यात घेतल्यावर दुसर्‍या व तिसर्‍या दरवाजांवर जाऊन तेथील पहारेकऱ्यांना यमसदनी पाठवून ते दरवाजे देखील ताब्यात घेतले. या अनपेक्षित गडबडीमुळे किल्ल्यावरील शत्रूची फौज जागी झाली. एव्हाना उदयभान देखील भानावर आला आणि त्याने सैन्य जमवण्यास सुरुवात केली. गडाचा सरनोबत सिद्दी हलाल हा सर्वप्रथम तानाजींना सामोरे गेला. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले आणि त्यात सिद्दी हलाल पडला. ज्या साखळदंडाच्या सहाय्याने मराठे सैन्य गडावर चढत होते, तो तुटल्याने सर्वजण सुर्याजीच्या नेतृत्वाखाली गडाच्या कल्याण दरवाज्याजवळ जमले आणि दरवाजा उघडण्याची वाट पाहू लागले. तानाजी हळूहळू कल्याण दरवाज्याकडे सरकत होते. इतक्यात उदयभानाने सर्व शक्तीनिशी तानाजींवर हल्ला केला. रात्रीचा प्रवास, किल्ल्यावर चढाई-हल्ला आणि मुख्य म्हणजे मोहीम फत्ते करण्याचे दडपण या गोष्टींमुळे तानाजी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचले होते. याउलट उदयभान मात्र ताजातवाना होता.

उदयभानाच्या जोरदार हल्ल्यामुळे तानाजींच्या शरीरावर जखमा झाल्या त्यांची ढाल देखील तुटली, परंतु अश्या परिस्थितीत हार न मानता शेल्याने आपला हात बांधून त्यावर ते उदयभानाचे वार झेलीत होते. परंतु नियतीला जणू तानाजींचा हा प्रकाराम बघवत नव्हता आणि उदयभानाच्या एका जबरदस्त वाराने त्यांच्या प्राणांचा ठाव घेतला आणि तानाजी धारतीर्थी पडले. पण मरता मरता त्यांनी असंख्य शत्रूंना कापून काढले आणि आपल्या मावळ्यांसाठी पुढील वाट मोकळी करून दिली होती. आपले सुभेदार पडल्याचे पाहूनही ८० वर्षांचे शेलारमामा खचले नाहीत, त्यांनी नेतृत्व आपल्या हाती घेतले आणि त्वेषाने लढत ते कल्याण दरवाज्यापर्यंत येऊन पोचले. दरवाज्याजवळ पोचताच त्यांनी तेथील पहारा कापून बाहेर असलेल्या सूर्याजीला आणि इतर मावळ्यांना आत घेतले.

सैन्याचा धीर खचू नये म्हणून तानाजी पडले ही वार्ता शेलार मामांनी मुद्दामच गुप्त ठेवली आणि पुढे सूर्याजीने उदयभानासह त्याच्या संपूर्ण सेनेचा फडशा पाडीत कोंढाणा ताब्यात घेतला. एका रात्रीत मराठ्यांनी स्वराज्याचे मौल्यवान रत्न ताब्यात घेतले. सूर्याजीने गवताच्या गंजीस आग लावून पाच तोफा केल्या, त्या महाराजांनी ऐकल्या. गड सर झाल्याचा तो संकेत होता. महाराजांना अत्यानंद झाला. पण जेव्हा त्यांना बातमी कळली की त्यांचा सिंह तानाजी मात्र लढता लढता मेला तेव्हा मात्र त्यांना अश्रू अनावर झाले नाहीत आणि त्यांच्या तोंडून तानाजींबद्दल ते ऐतिहासिक गौरवोद्गार निघाले,

गड आला पण स्वराज्याचा सिंह गेला

आजही कोंढाणा किल्ला ऊर्फ सिंहगड आणि त्याच्या आसपासचा परिसर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या साथीदारांच्या शौर्याच्या पाऊलखुणा कणाकाणात साठवून इतिहासाची साक्ष देत अभिमानाने उभा आहे.

धन्य ते तानाजी आणि धन्य त्यांचा पराक्रम!!!

Nitin Kemse

Leave a comment