महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

छत्रपती शिवाजींचे आरमार

By Discover Maharashtra Views: 3638 4 Min Read

छत्रपती शिवाजींचे आरमार…

१७३१ साली झालेल्या ‘वारणेच्या तहा’न्वये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याबरोबरच महाराजांनी स्थापिलेल्या मराठा आरमाराचेही विभाजन झाले. या तहानुसार सिंधुदुर्गपासून दक्षिणेकडील संपूर्ण कोकण प्रांत आरमार व जलदुर्गांसहीत श्रीमंत महाराज छत्रपती करवीर यांच्या सार्वभौम अखत्यारित आला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग हे एक प्रमुख व प्रबळ आरमारी स्थल करवीर छत्रपतींच्या ताब्यात आले. जंजिरे सिंधुदुर्ग करवीर छत्रपतींची आरमारी राजधानी म्हणून परकीय सत्तांच्या नजरेत आला. सातारकर छत्रपतींकडे गेलेले आरमार हे प्रत्यक्षात मात्र आंग्रेंच्या नियंत्रणाखाली होते मात्र कोल्हापूरचे आरमार हे स्वतः छत्रपती महाराजांच्या संपूर्ण नियंत्रणाखाली होते, हे या आरमाराचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.(छत्रपती शिवाजींचे आरमार)

सिंधुदुर्गसारखा भक्कम जंजिरा छत्रपतींच्या ताब्यात होता आणि हे ठिकाण पश्चिम किनाऱ्यावरील मोक्याचे ठिकाण असल्यामुळे पोर्तुगीज व इंग्रजांना या किनाऱ्यावर वाहतूक करताना या आरमाराचा धाक वाटायचा. त्याचमुळे छत्रपतींच्या या प्रबळ आरमाराने इंग्रज व पोर्तुगीजांची जहाजे अडविण्याचे व जप्त करुन ताब्यात घेण्याचे अनेक प्रकार होत होते. हि जहाजे परत मिळावित यासाठी पोर्तुगीज व इंग्रज हरप्रकारे छत्रपतींकडे विनवण्या करीत असत, मात्र त्यातून काहीच साध्य व्हायचे नाही. यामुळेच छत्रपतींच्या आरमाराने धरुन नेलेली आपली जहाजे परत आणण्यासाठी सन १७६३ साली पोर्तुगीजांनी तब्बल अठरा युद्धनौकांसह थेट सिंधुदुर्गावर हल्ला चढविला मात्र छत्रपतींच्या आरमारापुढे पोर्तुगीज आरमाराचा एक दिवसही टिकाव लागला नाही.

छत्रपतींच्या आरमाराने केलेल्या प्रतिहल्ल्यात पोर्तुगीज आरमाराची अपरिमित हानी होऊन त्यांना माघार घ्यावी लागली. अशा युद्धांत सिंधुदुर्गवरील छत्रपतींचे आरमार नेहमीच वरचढ ठरायचे. यामुळे पश्चिम किनारपट्टीवर छत्रपतींच्या आरमाराचा चांगलाच वचक बसला होता. पश्चिम किनारपट्टीवरील छत्रपतींच्या या प्रभावास आव्हान देण्यासाठी इंग्रजांनी १७६५ साली जंजिरे सिंधुदुर्गावर हल्ला चढविला. या हल्ल्याचा मराठा आरमाराने जोरदार प्रतिकार केला मात्र अचानक किल्ल्यातील दारुखान्यास आग लागून त्याचा सर्व भाग उध्वस्त झाला. मराठा आरमाराचे एक हुकूमी साधनच नाहीसे झाले. इंग्रजांकडून तोफांचा मारा सुरुच होता मात्र त्यांना उत्तर द्यायला गडावर दारुगोळाच शिल्लक नव्हता. अखेर सिंधुदुर्ग इंग्रजांच्या हाती पडला. लगेचच इंग्रजांनी सावंताच्या रेडी किल्ल्यावर हल्ला करुन तोदेखील सहजपणे ताब्यात घेतला.

“…इंग्रजाने मालवण घेतले त्यामुळे गर्व बहुत झाला आहे. सिंधुदुर्ग घेतल्यानंतर इंग्रज दुर्बुध्दीस प्रवर्तला आहे… त्याचा गर्व हत होऊन पूर्ववतप्रमाणे हाल खुद्द राहिला पाहिजे… पुढे राहिले जागेचे जतन होणे आणि गेलेले घेणे. कोवळा मोड आहे ते मोडिल्याने उत्तम. भारी जाहलेस सर्वांचे वाईट…” कोल्हापूरच्या महाराणी जिजाबाई साहेबांची ही वाक्ये खूप काही सांगून जातात. महाराणीसाहेबांनी आपले बोल सत्यात उतरवत १७६६ साली जंजिरे सिंधुदुर्ग इंग्रजांकडून परत मिळविला.

महाराणी जिजाबाईंनंतर कोल्हापूरच्या गादीवर आलेले छत्रपती शिवाजीराजे दुसरे यांनीदेखील आरमारी आघाडी उत्तमरित्या सांभाळली. पश्चिम किनारपट्टीवर आपला प्रभाव कायम राखत कोल्हापूरचे आरमार इंग्रज व पोर्तुगीज जहाजांकडून महसूल गोळा करीत असे. पोर्तुगीज कोल्हापूरच्या छत्रपतींना वार्षिक खंडणी द्यायचे. शिवाय याकाळात कोल्हापूरच्या आरमाराचे आखाती राष्ट्रांशी व्यापारी संबंध असल्याचे व यानिमित्ताने कोल्हापूरच्या छत्रपतींची जहाजे आखाती राष्ट्रांत जात असल्याचेही उल्लेख आढळतात.

आंग्रेंच्या पारिपत्यानंतर शिवरायांनी स्थापिलेले ‘मराठा आरमार’ नामशेष झाले असे अनेक इतिहासकार ठासून सांगत असतात. मराठा आरमार या संज्ञेतून अनेकांनी श्री शिवछत्रपतींचा वारसा असलेल्या करवीर छत्रपतींच्या आरमारास बेदखल केले आहे. आंग्रेंच्या आरमारानंतरही सुमारे अर्धे शतक पश्चिम किनारपट्टीवर अधिपत्य गाजविणाऱ्या करवीर राज्याच्या आरमाराचा वैभवशाली इतिहास दुर्लक्षित करुन चालणार नाही. करवीर राज्याच्या आरमारी इतिहासावर अद्याप म्हणावे असे संशोधन झालेले नाही. परकीय सत्तांवर वचक बसवत आपले स्वतंत्र अस्तित्व राखणाऱ्या व परकीयांमध्ये ‘शिवाजींचे आरमार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पराक्रमी आरमाराचा इतिहास सर्वांपुढे येणे गरजेचे आहे…

– Karvir Riyasat

Leave a comment