महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,75,521

सुरसुंदरींचे गांव कोरवली | कोरवलीच्या सुरसुंदरी

By Discover Maharashtra Views: 263 2 Min Read

सुरसुंदरींचे गांव कोरवली –

कोरवलीच्या सुरसुंदरी लेख क्र.१ –

कोरवली हे एक महत्त्वाचे मोहोळ तालुक्यामधील आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये वसलेले गाव आहे. मुंबई विजापूर म्हणजेच महाराष्ट्र-कर्नाटक मुख्य महामार्गावर हे गाव २२ किमी अंतरावरअसून ,प्राचीन काळातील इतिहास त्याच्या असंख्य खाणाखुणा, अवशेष, मूर्ती आणि पडझड झालेली मंदिरे या गावात पहावयास मिळतात. या गावामध्ये यादव कालीन २ शिलालेख आहे. या गावात उत्तर चालुक्यकालीन एक देखणे व उध्वस्त होऊ पाहणारे शिवमंदिर आहे. या शिवमंदिराचा बरेचसा भाग पूर्णतः उद्ध्वस्त झालेला असून केवळ गर्भगृह मात्र सुस्थितीत आहे. या मंदिराच्या बाह्यभिंतीवर म्हणजे मंडोरावर स्वर्गीय देखण्या सुरसुंदरी यांच्या शिल्पाकृती आहेत.सुरसुंदरींचे गांव. मनमोहक, चित्तवेधक असणाऱ्या या स्वर्गीय अप्सरा कोणता ना कोणता तरी संदेश देत मंदिरात येणाऱ्या भक्तांना  बोलण्यासाठि उभ्या आहेत असे वाटते.

आपल्या भरगच्च केशसंभाराला  सांभाळणाऱ्या या मनमोहिनी आहेत. त्यांच्या उभे राहण्यात, अलंकार धारण करण्यात, वाद्य धारण करण्याच्या पद्धतीमध्ये सर्वत्र केवळ उच्च अभिरुची दिसून येते. माहिती नाही परंतु ज्या अनामिक कलाकारांनी यांची निर्मिती केली ,ती निर्मिती करत असताना खरोखरच  जीव ओतून त्यांची निर्मिती केल्याचे दिसून येते..मंदिराच्या मंडोवरावर एकूण १८ सुरसुंदरी व १ गोपालकृष्णाचे शिल्प आहे.महाराष्ट्रात असणार्‍या इतर मंदिरांच्या मंडोवरावर इतर देवतांची शिल्प आढळून येतात,पण केवळ आणि केवळ सुरसुंदरीचे अंकन असणारे एकमेव मंदिर म्हणजे कोरवलीचे मंदिर आहे.

वर्षानुवर्ष या स्वर्गीय अप्सरा कोणता ना कोणता तरी मौलिक संदेश देत भक्तांसाठी मंदिराच्या बाह्य भिंतीवर उभ्या असलेल्या दिसून येतात. त्यांचे विविध प्रकार व समूह असतात त्यामध्ये मर्दला, वाद्य वाजवण्यात तल्लीन झालेल्या सुरसुंदरी, सौंदर्यप्रसाधनात मग्न असणाऱ्या सुरसुंदरी, स्वर्गीय यौवना, संकीर्ण प्रकारातील सुरसुंदरी असे त्यांचे प्रकार आहेत.मंदिर सद्यस्थितीला पडझड झालेले आहे.मात्र अंतराळ व गर्भगृह मात्र सुस्थितीत आहे.मंडीराच्या ललाटबिंबावर गजलक्ष्मी आहे.गर्भगृहात शिवलिंग आहे.मंदिराच्या परिसरात इतरहि प्राचीन मंदिरांचे अवशेष आहेत.कोरवलीमध्ये गावाच्या बाहेर एका शेतामध्ये गणेशाचे मोठि मूर्ती आहे.गावाच्या वेशीवर असलेल्या मारूती मंदिच्या आवारात केशव विष्णू,शिवपार्वती,गणेश,सतीशीळा,वीरगळ इत्यादि शिल्प पाहवयास मिळतात. आजपर्यंत अनेक संशोधकांनी या स्थळाला भेट दिलेले आहे आणि त्यांनी त्यावर सुंदर लिखाण केलेले आहे. परंतु या मंदिराचे अधिक माहिती होण्यासाठी हा छोटासा खटाटोप आहे.

डाँ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

Leave a comment