सिताबर्डी | Sitabardi Fort

By Discover Maharashtra Views: 3556 7 Min Read

सिताबर्डी | Sitabardi Fort

इंग्रजांनी महाराष्ट्रात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच किल्ले बांधले. या सर्व किल्ल्यांमध्ये शेवटी बांधलेला किल्ला म्हणजे नागपुर येथील सिताबर्डी किल्ला(Sitabardi Fort). नागपुरचे आप्पासाहेब भोसले यांच्या सैन्याने तीन दिवस दिलेल्या लढ्यानंतर २८ नोव्हेंबर १८१७ ला येथील टेकडी इंग्रजांच्या ताब्यात आली व त्यांनी या टेकडीचे रुपांतर किल्ल्यात केले. ब्रिटीश काळात या किल्ल्यावर तोफखाना व दारुगोळा असल्याने हा किल्ला लष्कराच्या ताब्यात होता. आजही हा किल्ला भारतीय सरंक्षण दलाच्या ताब्यात असुन वर्षातुन फक्त ३ वेळा २६ जानेवारी, १५ ऑगस्ट व १ मे या दिवशी किल्ल्याचा काही भाग जनतेसाठी खुला करण्यात येतो. सरंक्षण दलाच्या ताब्यात असल्याने किल्ला आजही सुस्थितीत असुन किल्ल्यावर भारतीय लष्कराच्या प्रादेशिक सेनेची ११८ वी तुकडी तैनात आहे. किल्ल्याला भेट देताना आत मोबाइल तसेच कॅमेरा वापरण्यावर सक्त मनाई आहे.

नागपुर शहरात असलेल्या सिताबर्डी किल्यास ठरलेल्या दिवशी भेट देण्यासाठी रेल्वे स्थानकातुन बस वा रिक्षा असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. किल्ला सरंक्षण दलाच्या हताब्यात असल्याने रस्त्याजवळ असलेल्या फाटकात आपले ओळखपत्र पाहुन व तपासणी करून नंतरच आत सोडले जाते. या फाटकाबाहेर आपल्याला सरंक्षण दलाच्या दोन तोफा पहायला मिळतात. येथुन डांबरी रस्त्याने टेकडीचा चढ चढुन आपण दुसऱ्या फाटकात येतो. या फाटकाबाहेर किल्ल्यावरील उत्खननात अलीकडील काळात सापडलेली एक भली मोठी तोफ ठेवलेली असुन आतील बाजुस किल्ल्याचा इतिहास सांगणारे फलक लावले आहेत. या फाटकातून किल्ल्याकडे जाताना वाटेच्या उजव्या बाजुस असलेल्या फाटकात दोन लहान पितळी तोफा पहायला मिळतात. येथुन पुढची चढण पार करत आपण थेट किल्ल्याच्या उत्तराभिमुख दरवाजात पोहोचतो.

किल्ल्याला एकुण दोन दरवाजे असुन यातील एका दरवाजाने प्रवेश दिला जातो तर दुसऱ्या दरवाजाने बाहेर सोडले जाते. आपण आता पोहचलो तो दरवाजा बाहेर येण्यासाठी असल्याने या दरवाजाच्या उजवीकडील वाटेने संपुर्ण तटबंदीला प्रदक्षिणा मारत आपण किल्ल्याच्या दुसऱ्या पुर्वाभिमुख दरवाजात पोहोचतो. मातीत गाडलेली किल्ल्याची तटबंदी सरंक्षण दलाच्या जवानांनी अलीकडील काळात पुर्णपणे मोकळी केली असुन हि तटबंदी काळ्या दगडात बांधलेली आहे. किल्ल्याचा आकार लंबाकृती असुन तटाला फेरी मारताना आपल्याला तटबंदीत असलेले एकुण चार बुरुज पहायला मिळतात. यातील तीन बुरुज गोलाकार असुन एक बुरुज चांदणीच्या आकाराचा आहे. या बुरुजात उतरण्यासाठी तटावर पायऱ्या असुन बुरुजाच्या आतील बाजुस ब्रिटीशकाळात सैनिकांच्या राहण्यासाठी खोल्या तसेच कोठारे बांधलेली आहेत.

बुरुजावर तसेच तटावर काही ठिकाणी बंदुकीचा मारा करण्यासाठी असलेल्या जंग्या पहायला मिळतात. सुरक्षेच्या कारणास्तव यातील केवळ एका बुरुजाच्या आतच प्रवेश दिला जातो. किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजातुन आत प्रवेश केल्यावर उजवीकडे एक कबर पहायला मिळते. हि कबर नौ गाजी म्हणुन ओळखली जाते. १८५७च्या उठावात सामील झालेल्या नऊ वीरांना ब्रिटिशांनी गांधीगेट येथे फाशी दिले व दहशत बसावी यासाठी त्यांची शरीरे ३ दिवस तेथेच लटकत ठेवली. या नऊ वीरांमध्ये एक वीर मराठा होता व एक टिपू सुलतानाचा नातु होता. या नऊ वीरांची हि कबर आहे. या कबरीसमोरच आपण बाहेरून पाहिलेल्या चांदणी आकाराचा बुरुज असुन त्यात दोन बाजुंनी आत उतरण्यासाठी पायरीमार्ग आहे. वाटेच्या आजुबाजुला सरंक्षण दलाच्या वास्तु असल्याने तेथे प्रवेश दिला जात नाही.

बुरुजाकडील वाटेने पुढे आल्यावर एक भलेमोठे भुमीगत टाके असुन त्यावर पाणी काढण्यासाठी सहा गोलाकार कठडे बांधले आहेत. या टाक्यात उतरण्यासाठी दोन ठिकाणी पायऱ्या बांधलेल्या आहेत. वाटेने सरळ पुढे आल्यावर आपण किल्ल्याबाहेर पडण्यासाठी असलेल्या दरवाजात येतो. या दरवाजाच्या वरील भागात तसेच तटावर जाण्यासाठी आतील बाजुने पायऱ्या बांधल्या आहेत. दरवाजाबाहेर पडल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. पायथ्यापासुन किल्ला पाहुन परत येण्यासाठी दोन तास पुरेसे होतात.

कन्हान नदीची उपनदी असलेल्या नाग नदीमुळे या नदीकाठी असलेल्या शहराला नागपूर नाव पडल्याचे मानले जाते. नागपूरचा पहिला उल्लेख वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे सापडलेल्या दहाव्या शतकातील ताम्रपटावर येतो. तिसऱ्या शतकाअखेर वाकाटक राजे विद्याशक्ती यांनी नागपूरवर राज्य केले. वाकाटक राजे पृथ्वीसेन (प्रथम) यांची नागपूर जवळ असलेली नगरधन (नंदीवर्धन) हि राजधानी होती. वाकाटकानंतर हा प्रांत बदामीचे चालुक्य,राष्ट्रकुट यांच्या ताब्यात आला. इ.स.८६२ मध्ये राष्ट्रकुट राजे कृष्णा (तृतीय) यांच्या काळात नागपूर आणि नंदीवर्धनाच्या विसाया गावाचा उल्लेख येतो. इ.स.१२९६ मध्ये यादवांच्या पराभवानंतर अलाउद्दिन खिलजीने देवगिरीचा ताबा घेतला व व या भागावर त्याची सत्ता आली. इ.स.१३१७ मध्ये येथे तुघलक साम्राज्य आले. सतराव्या शतकात या भागावर मुघलांचा अंमल असला तरी हा भाग त्यांचे मांडलिक असलेल्या गोंड राजांच्या ताब्यात होता.

नागपूर शहराची स्थापना गोंड राजा बख्तबुलंद शहा यांनी केल्याचे मानले जाते. त्यानंतर राजा चांद सुल्तानशहा याने नागपूरला आपली राजधानी निश्चित केले व शहराभोवती नगरदुर्ग उभारला. चांद सुल्तानशहा १७३९ला मरण पावल्यावर त्याचा अनौरस पुत्र वलीशाह राजा झाला पण चांद सुल्तानची पत्नी आपली दोन मुले अकबरशाह आणि बुरहानशाह यांचा गादीवरील हक्क मिळविण्यासाठी मराठा सरदार रघुजी भोसले यांना जाऊन मिळाली व १७४३ मध्ये रघुजी भोसले यांचा मराठयांचा वतीने नागपुरमधील राजकारणात शिरकाव झाला. देवगड, चांदा आणि छत्तीसगड या प्रांतांवर त्यांनी १७५१पर्यंत राज्य केले. १८०३ मध्ये राघोजी दुसरे इंग्रज मराठा युद्धात पेशव्यांना सामील झाले. १८१६ ला राघोजी दुसरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा पारसाजी याला मुधोजी दुसरे यांनी हद्दपार केले आणि त्याची हत्या केली. १८१७मध्ये मुधोजी इंग्रजांविरोधात पेशव्यांना जाऊन मिळाले.

मुधोजीराजे भोसले यांना २४ नोव्हेंबर १८१७ ला सेनापती पदाची सुत्रे हातात घेतली त्यावेळी ब्रिटीशानी ३००० सैन्य व तोफांसह नागपुरवर हल्ला केला. या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि २८ नोव्हेंबर १८१७ रोजी सीताबर्डीच्या दोन्ही टेकड्या ब्रिटीशांच्या ताब्यात आल्या. ब्रिटीशांनी मुधोजींना हद्दपार करून राघोजी दुसरे यांचा नातू राघोजी तिसरे यांना राजपद देऊन सत्तेची सुत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली. १८४० पर्यंत त्यांच्या सत्ताकाळात या प्रांताची प्रशासकीय सूत्रे इंग्रज रेसिडेंटच्या हातात होती. राघोजी यांच्या निधनानंतर १८५३ मध्ये ब्रिटिशांनी नागपूरची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि सेंट्रल प्रोव्हिअन्स अॅण्ड बेरारची राजधानी म्हणून नागपूरची घोषणा करण्यात आली. देशाची भाषा व प्रांतवार रचना केल्यावर नागपूरला महाराष्ट्राची दुसरी राजधानी करण्यात आले. नागपूर हे देशाचे मध्यवर्ती शहर असुन शुन्य मैल दर्शविणारा दगड नागपुरात आहे.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a comment