भोसले घराण्याचा उदय

By Discover Maharashtra Views: 4713 5 Min Read

भोसले घराण्याचा उदय

राजमाता जिजाऊ साहेब चरित्रमाला – भाग 4

भोसले घराण्याचा उदय – भोसले घराणे हे सूर्यवंशी होते. त्यांचे गोत्र कौशिक व निशानाचा रंग भगवा होता. उदयपूरचे शिसोदीया आणि दक्षिणेतील भोसले वंश एकच आहेत. सूर्यवंशात श्रीरामचंद्रापासून 125 व्या पिढीत शिसोदिया कुळाचा राजा भोसाजीचा वारस म्हणून त्यांचे नाव भोसले पडले .भोसले हे महाराष्ट्रात आणि वर्हाडात वस्ती करून होते.
छत्रपती शिवाजीराजे हे भोसल्यांच्या कुळात जन्मले.ते भोसले कूळ शहाण्णव कुळांपैकी एक क्षत्रिय कुळ आहे. देवगिरीच्या वैभवशाली यादव साम्राज्याची उपशाखा असलेले जाधवरावांचे घराणे जसे मराठ्यांमध्ये प्रतिष्ठित मानले जाते, त्याचप्रमाणे मेवाडच्या सिसोदिया वंशाच्या पराक्रमाचा वारसा सांगणारे महाराष्ट्रातील वेरुळचे भोसले घराणे हेही तेवढेच तोलामोलाचे मानले जाते.

वेरूळच्या बाबाजी भोसले यांचा जन्म सन 1430 चा समजला जातो.बाबाजी भोसले यांना दोन मुले.एक मालोजीराजे व दुसरे विठोजीराजे.हे दोघेही अत्यंत पराक्रमी निपजले.यानंतर काही काळ मालोजीराजे, विठोजीराजे हे बंधू वेरूळमधे वास्तव्य करू लागले .पुढे वणगोजी नाईक निंबाळकर(फलटण) यांच्या सैन्यात राहून तत्कालीन परिस्थितीत आवश्यक असे युद्ध शिक्षण घेतले. वणगोजी नाईक निंबाळकर त्यावेळी निजामाकडे सरदार होते .वणगोजींनी मालोजीराजे व विठोजीराजे या दोन बंधूंना घोडे ,शस्त्रे ,व बक्षीस म्हणून 2 हजार सरंजाम देऊन आपल्या सैन्यात रुजु करुन घेतले. वनगोजी नाईक निंबाळकर यांनी कोल्हापूर प्रांतात केलेल्या लढाईत मालोजीराजे व विठोजीराजे यांनी चांगलाच पराक्रम केला .

मालोजी राजांचा पराक्रम जेंव्हा निजामशहाला समजला तेव्हा त्यांनी खुश होऊन मालोजीराजे यांचे वडील बाबाजी भोसले यांची जप्त केलेली दीड हजारी मनसब पुन्हा मालोजीराजे व विठोजीराजे यांना परत दिली.मालोजीराजे भोसले हे निजामशाहीचे दीड हजारी मनसबदार झाल्याची बातमी लखुजी जाधवराव यांनी पत्राद्वारे वणगोजी नाईक निंबाळकर यांना दिली. पुढे लखुजीरावांच्या मध्यस्थीने वणगोजी नाईक निंबाळकर यांच्या बहिण दीपाबाई यांचा विवाह मालोजीराजांशी ठरवण्यात येऊन तो पार पाडण्यात आला.दीपाबाई यांचे नाव नंतर ऊमाबाई ठेवण्यात आले. लखुजीराजांची पत्नी म्हाळसाबाई आणि दिपाबाई या दोघी नात्याने आत्या आणि भाची होत्या.दोघीही नाईक निंबाळकर घराण्यातील असल्याने जाधवराव, भोसले, नाईक निंबाळकर या घराण्याचे नातेसंबंध जुळून आले. वणंगपाळ उर्फ वणगोजी नाईक निंबाळकर मोठे जबरदस्त व्यक्तिमत्व होते. विजापूरला अदिलशहाच्या दरबारात सरदार होते.लोक त्यांच्या शूरपणावरून म्हणत,’राव वणंगपाळ, बारा वजिराचा काळ!’

मालोजीराजांनी आपल्या पदरी हत्यारबंद मराठी जवान जमा केले.पागा सजवल्या .मालोजीराजे हत्यारबंद व फौजबंद बनले. दारात हत्ती झुलू लागले. वैभव प्राप्त झाले. आपल्या वतनी उत्पन्नाची व्यवस्था त्यांनी शहाण्या ,कर्तबगार कारभार्यांच्यावर सोपवली. स्वतंत्रपणे पदरी असा जमाव जमविणे म्हणजे धाडसाचेच होते.एरवी त्यांना बंडखोरच ठरवले असते,परंतु या वेळी मोगलांच्या सैन्यांचा निजामशाहीत धुमाकूळ चालला होता. या वेळी निजामशहाला व त्याचा वजीर मलिक अंबर याला चांगल्या लढाऊ मराठ्यांची गरज होती. निजामशहाला मालोजीराजे यांचे नाव समजल्यावर त्यांनी आपणहून मालोजीराजे यांना फर्मान धाडले.ताबडतोब मालोजीराजे दौलताबादमध्ये जाऊन हजर झाले. निजामशहाने मालोजीराजे यांना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी देऊन दोघांनाही पदरी ठेवले व पंचहजारी मनसब देऊ केली.ही. या जहागिरीमुळे हाती पडेल त्याचा चांगला उपयोग करायचा हे धोरण मालोजीराजे यांनी ठरवले. राजांचे देवावरचे आणि लोकांवरचे प्रेम कधीच कमी झाले नाही. त्यांच्या जहागिरीच्या मुलखातले मावळ मराठे सावलीसारखे सुखावले .राजाने परगण्याची आबादानी केली .

मालोजीराजांच्या आणि दिपाबाई उर्फ उमाबाईंच्या मनाला आता एकाच गोष्टीची रुखरुख लागून राहिली होती. यांना पुत्र नव्हता! दोघेही पती-पत्नी देवापाशी ‘उजवा’ कौल मागत होते. पुत्रप्राप्तीसाठी राजे व उमाबाई शिवाची आराधना करीत होते, व्रतवैकल्ये करीत होते ,उमाबाईं अत्यंत धार्मिक होत्या. त्यांचे एकच मागणे होते.मला एका सुपुत्राची आई कर! आणि लवकरचऊमाबाई यांना दिवस गेले. दोघेही आनंदले .शंभू शिखरीचा राजा प्रसन्न झाला. पुत्र झाला. मुलगा फार देखणा आणि सुदृढ होता. मुलाचे नाव शहाजी ठेवले. मालोजीराजांनी खूप मोठा दानधर्म केला. पुत्र उत्सव केला .दोन वर्षे उलटली आणि त्यांना दुसरा पुत्र झाला त्याचे नाव शरीफजी ठेवले. उमाबाईंच्या मांडीवर शहाजी आणि शरीफजी खेळू लागले.

रूईच्या कापसासारखे सुखाचे दिवस भुरूभुरू उडत होते.मालोजीराजे पुत्रांच्या गोड सहवासात आनंदात होते.या राजबिंड्या मुलांनी मालोजीराजे आणि उमाबाई यांच्या सुखात साखर घातली होती.भोसलेयांच्या कुळीचे हे राम- लक्ष्मण कलेकलेने वाढत होते. या लेकरांनी सार्या घराला लळा लावला होता.मुरमाड,खडकाळ,जमिनीत पाणी लागावे,तसा हा मायेचा ओघ पुणे प्रांताला देखील लागला होता.लोक भोसलेराजांना उदंड दुवा देत होते.
पुढे याच शहाजी राजे भोसले यांचा लखुजीराजे जाधवरावांच्या कन्या जिजाऊ यांच्याशी विवाह झाला.

– डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

Leave a comment