महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,29,513

स्वराज्यलक्ष्मी | शिवराई आणि होन

By Discover Maharashtra Views: 2738 4 Min Read

स्वराज्यलक्ष्मी | शिवराई आणि होन –

स्वराज्य अर्थात रयतेचे राज्य. याचसाठी छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या रावळात शपथ घेतली होती आणि सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातून उभं राहिलेलं स्वराज्याचे साम्राज्य झाले. पण हे राज्य सार्वभौम आहे याची ग्वाही छत्रपती शिवरायांना समस्त शाह्यांना आणि स्वकीयांना द्यायची होती कारण हे सर्व जण अजूनही महाराजांना आदिलशहा चा मांडलिक च समजत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला म्हणजेच ६ जून १६७४ रोजी स्वतः चा राज्याभिषेक करवून घेतला आणि सगळ्या जगाला दाखवून दिले की एक हिंदू राजा सार्वभौम छत्रपती बनलाय. या युगी सर्व म्लेंच्छ बादशाह, मराठा राजा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य जाहली नाही. या शब्दात सभासद या घटनेचे वर्णन करतो.(स्वराज्यलक्ष्मी | शिवराई आणि होन)

सार्वभौम राजा म्हणजेच राज्यातील प्रत्येक गोष्टीच स्वतंत्र अस्तित्व असले पाहिजे, चलन सुद्धा. राज्याभिषेकासमयी महाराजांनी रायगडावर टाकसाळीतून तांब्याची शिवराई आणि सोन्याचे होन हे चलनी नाणे काढले. आणि त्याचबरोबर रुका, तिरुका, सापिका आणि ससगणी ही नाणीही त्याकाळी चलनात होती.

राज्याभिषेकासमयी हेन्री ओक्झिनटन रायगडावर कंपनीची काही कलमे मंजूर करण्यासाठी आला होता. त्यातील एकोणीसावे जे कलम होते ते म्हणजे इंग्रजांची कॉप ही नाणी स्वराज्यात चालू द्यावी. इंग्रजांचा धूर्त कावा महाराजांच्या लक्षात आला आणि दूरदृष्टी ओळखून हे कलम महाराजांनी ताबडतोब नामंजूर केले.

शिवराई –

सोन्याचे होन

( चित्र: सरकारवाडा संग्रहालय, नाशिक )

 

शिवराई –

शिवराई हे नाणे तांब्यापासून बनवलेले असत. यामध्ये आपण जर बघितलं तर पुढील बाजूस तीन ओळींमध्ये श्री / राजा / शिव ही अक्षरे आढळून येतात. आणि कडांना बिंदूमय वर्तुळं (dotted border) दिसून येते. याचा आकार वाटोळा गोल आहे. आणि मागील बाजूस दोन ओळींमध्ये छत्र/ पती ही अक्षरे आढळून येतात. याचे वजन जवळपास ११ ते १३ ग्रॅम भरते. या शिवराईची किंमत म्हणजे १ पैसा असे. आणि ६४ शिवराई मिळून १ रुपया होत.

अर्धी, पाव, पूर्ण असे शिवराईचे प्रकार होते पण सध्या ते खूपच दुर्मिळ आहे. आजच्या घडीला काही संग्राहकांकडे शिवराई सापडतात कारण ती जवळपास १९ व्या शतकापर्यंत वापरात होती. नंतर ब्रिटिश राजवटीत इंग्रजांनी शिवराई जप्त करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना सुद्धा सगळ्या शिवराई जमा करता आल्या नाहीत अजूनही बऱ्याच ऐतिहासिक ठिकाणी शिवराई सापडतात.

होन –

शिवराई होन हे नाणे सोन्याचे होते. व यामध्ये देखील आपण जर बघितलं तर पुढील बाजूस तीन ओळींमध्ये श्री / राजा / शिव ही अक्षरे आढळून येतात. आणि कडांना बिंदूमय वर्तुळं (dotted border) दिसून येते. याचा आकार वाटोळा गोल आहे. आणि मागील बाजूस दोन ओळींमध्ये छत्र/ पती ही अक्षरे आढळून येतात. याचे वजन जवळपास २.७ ग्रॅम इतके आहे.

होन हे नाणे सध्या इतके दुर्मिळ आहे की आजघडीला ७ – ८ होन सापडले आहेत. त्यामानाने शिवराई चे प्रमाण जास्त आहे आणि शिवराई अजूनही नदीच्या वाळूमध्ये ढिगाऱ्यात सापडतात.

रायगडावरही अनेकांना शिवराई सापडलेल्या आहेत. मागे एक दीड वर्षापूर्वी रायगडावर एकाला शिवकालीन सुवर्ण होन सापडले होते पण नंतर काही त्याबद्दल कळले नाही. होन दुर्मिळ असण्याचे कारण म्हणजे एकतर ते सोन्याचे होते आणि चोरी करून ते आटवण्याचा प्रयत्न पुष्कळदा केला गेला.

रायगडावर एका माणसाला सापडलेला होन.

(छायाचित्र : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत)

एका होनाची किंमत ३ -४ रूपये होती, एका पुतळीची किंमत ५ रूपये, तर १ मोहोर साधारण १५ रुपये किमतीची होती.

परकीय सत्तांना आणि सत्ताधीशांना झुगारून महाराजांनी आपले चलन जारी केले. परकीय सत्ता चलन, व्यापार यांद्वारे हळूहळू अक्खा देश गिळंकृत करतात हे महाराजांना माहीत होते त्यामुळे त्यांनी परकीय चलन नाकारून आपले चलन व्यवहारात आणून त्यावेळी एका अर्थी देशाची अर्थव्यवस्था बळकट केली होती हे निर्विवाद सत्य आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यलक्ष्मीमुळे आज आपण सर्वजण समृद्ध आहोत. आपण जी दिवाळी साजरी करतोय ती त्यांच्यामुळेच. या दिवाळीत पैश्यांचे (लक्ष्मीचे) पूजन करताना ज्यांच्यामुळे आपली तिजोरीची भरभराट झाली ती स्वराज्यलक्ष्मी अंधारात राहता कामा नये म्हणून ही माहिती लिहण्याचा खटाटोप. अनेकांना ज्ञात नसलेली, दुर्मिळ होत चाललेली ही स्वराज्यलक्ष्मी जपली पाहिजे, वाढविली पाहिजे. तिचे जतन, संवर्धन केले पाहिजे.

इतिहास वेड
रोहित पेरे पाटील

Leave a comment