छत्रपति शिवाजी महाराज यांचे मोगलाकडील राजकारण भाग १ –
राजे लखुजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठ पुत्र दत्ताजीराजे यांचे द्वितीय पुत्र ठाकुरजीराजे जाधवराव उर्फ पतंगराव उर्फ दखनी जदुराय द्वितीय.
राजे दत्ताजीराव राजे लखुजीराव जाधवराव
१) परिचय = हे राजे लखुजीराव जाधवराव यांचे थोरले पुत्र होत.
२) हे पराक्रमी असुन यांचा उल्लेख शिवभारतात आढळतो. हे नेहमी पिता राजे लखुजीराव यांच्या प्रत्येक लष्करी मोहिमेसोबत असत.याना पतंगराव हा किताब असुन या नावाची इ सन १६०६,१६१५,१६१७ सालची पत्रे देखिल उपलब्ध आहेत.
३) जन्म = यांच्या जन्माची नोंद आढळत नाही.
४) मृत्यु = २३ फेब्रुवारी १६२३ साली देवगिरीवर खंडागळे हत्ती प्रकरणात .
खंडागळे हत्तीप्रकरण हे एक आकस्मात घडलेला प्रसंग होता..यात राजे जाधवराव घराण्याने पराक्रमी दत्ताजीराव व राजे भोसले घराण्याने संभाजीराजे (शहाजीराजे यांचे चुलत बंधु) हे दोन पराक्रमी मोहरे गमावले..या दोन घराण्यातील हा प्रसंग हा आकस्मात घडलेला प्रसंग असुन यापुढे या दोन घराण्यानी एकमेकाविरुद्धच्या शाह्यात लढले परंतु एकमेकाचा रक्तपात कधी केला नाही.
२३ फेब्रुवारी १६२३ रोजी त्यांचा मृत्यू खंडागळे हत्ती प्रकरणात झाला.
५) कुटुंब = याना तीन पुत्र होत. 1.राजे यशवंतराव 2. राजे ठाकुरजी उर्फ पतंगराव 3. राजे लिंबाजी.
याचा उल्लेख खुद्द राजे लखुजीराव यांच्या समाधीवरील एका शिलालेखात आढळतो.
६) राजे यशवंतराव = हे राजे दत्ताजीराव यांचे थोरले पुत्र असुन हे सुरुवातीपासुन आजोबा राजे लखुजीराव यांच्या प्रत्येक लष्करी मोहिमेत असत. प्रसिद्ध भातवडी युद्धात देखिल सहभागी असल्याचा उल्लेख शिवभारतात आढळतो. हे पराक्रमी होते.
यांची हत्या देखिल आजोबा व चुलते राजे आचलोजीराव व राजे राघोजीराव यांच्या समवेत देवगिरीवर झाली. यासमयी याना ४००० जात व ३००० स्वार अशी मनसब होती. तसेच यांचा उल्लेख जाधवराव घराण्याचे ” सिपेसालार एवं पराक्रमी कुलवर्धक यौद्धा” अर्थात #युवराज असा केलेला आढळतो.
याना दोन पुत्र होत. राजे रतनोजी उर्फ रुस्तुमराव, राजे लखुजी दुसरे उर्फ लखमोजी.
राजे रतनोजी उर्फ रुस्तुमराव : यांचा उल्लेख इ सन १६३९ च्या एका अस्सल कौलानाम्यात आढळतो. हे सुरुवातीस शिवराय महाराजांसोबत होते, परंतु परत सिंदखेडराजा परिसरात आल्याचा उल्लेख सापडतो.
रतनोजी व यांचे चुलते राजे ठाकुरजी याना इ सन १६३३ च्या जाधवराव घराण्यातील वाटणीपत्रातील एक हिस्सा मिळाल्याचा उललेख असुन राजे लखुजीराव यांच्या म्रुत्युनंतर जाधवराव घराण्याचा “जाधवराव” हा वंशपरंपरागत किताब देखिल याच ठाकुरजीच्या व यशवंतरावांच्या थोरल्या शाखेत दिलेला आहे. यानी व चुलते ठाकुरजी यानी छत्रपती शिवराय महाराजांशी संधान बांधुनच कार्य केले. रतनोजी याना तीन पुत्र व एक कन्या होत.
रतनोजीराजे हे त्यांचे चुलते ठाकुरजीराजे जाधवराव यांच्यासोबत छत्रपति शिवाजी महाराज यांच्यासोबत संधान बांधून साल्हेर मोहिमेत मोगलांच्या बाजुने सामील होते.
* राजे रायाजीराव /रायभानजी = याना १५०० जात व ६०० स्वाराची मनसब असल्याची नोंद मिळते. यांच्या वंशजशाखा सिंदखेडराजा परिसरातील जवळखेड व चिखली परिसरातील करवंड व करणखेड येथे आहेत.
* राजेसुभानजी/सुर्यभानराव = याना ७०० जात व ३०० स्वार मनसब होती. यांची वंशजशाखा सिंदखेडराजा परिसरातील उमरद देशमुख (रुसुमचे) या गावी आहे.
* राजे लखुजी तिसरे = यांची वंशजशाखा ही जालना जिल्ह्यातील सारवडी येथे आहे.
* दुर्गाबाईसाहेब = या छत्रपती संभाजी महाराज यांच्या द्वितीय राणीसाहेब होत. यावर माझा स्वतंत्र शोधनिबंध प्रकाशित आहे.
इ सन १६६५ साली भाऊबिरादराच्या राजीनाम्यात रायभानवंश जवळखेडकर, सुर्यभानवंश उमरदकर, विठोजीवंश मेहुणेकर, देवराववंश आडगावकर व किनगावकर यांचा वतनातुन हिस्सा नाहीसा झाला होता.यानंतर या वंशजशाखांचे स्वतंत्र वतने होती, परंतु पुढे इ सन १७१० साली राणोजीराजे गिरजोजीराजे जाधवराव मेहुणेकर व बहादुरजीराजे रुस्तुमरावराजे जाधवराव किनगावकर यांनी पुढाकार घेऊन छत्रपति थोरले शाहु महाराजांच्या काळात महाराजांकडे देऊळगावकर शाखेकडे असलेल्या पुरातन घराण्याच्या वतनातील हिस्स्यासाठी तक्रार दाखल केली.
खुद्द छत्रपति थोरले शाहु महाराजांनी यासंदर्भात कागदपत्रे तपासून इ सन १७१९-२० साली जवळखेडकर, उमरदकर,मेहुणेकर,आडगावकर व किनगावकर वंशजशाखेस वतनात हिस्सा दिला. तो हिस्सा इ सन १६३३ च्या जाधवराव घराण्याच्या वाटणी नुसार एक हिस्सा दत्ताजीराजे यांच्या वंशजशाखेतील जवळखेडकर व उमरदकर यांना, दुसरा हिस्सा अचलोजीराजे यांच्या वंशजाचा मेहुणेकर व आडगावकर,तिसरा हिस्सा देऊळगावकर आणि चौथा हिस्सा किनगावकर यांना पुर्ववत करुन दिल्याचे काही पत्र तसेच सुरतमजलिस हा न्यायनिवडाचा साक्षीदारासह एक महत्वपूर्ण कागद उपलब्ध आहे. यावरून या सहाही वंशजशाखा छत्रपति थोरले शाहु महाराजांच्या काळात महाराजांकडे असल्याचे स्पष्ट होते.
राजे लखुजी दुसरे/लखमोजी प्रथम : लखमोजीराजे प्रथम यांना तीन पुत्र होते . खंडोजीराजे, बहिरजीराजे व येसाजीराजे .
खंडोजीराजे इ सन १६६५ पर्यंत शहाजी महाराज साहेब सोबत आदिलशहाकडे वेळापुर येथे होते. परंतु बहलोलखाना सोबतच्या युद्धात खंडोजीराजे यांनी छत्रपति शिवाजी महाराज यांच्याशी संधान बांधून काम केल्यामुळे इ सन १६६६ साली आदिलशहाने बहलोलखानास त्यांच्याविरोधात पाठवले.यासमयी रत्तोजी माने देशमुख यांनी त्यांना मदत केली. या संदर्भात एक अस्सल फारसी पत्र उपलब्ध आहे. खंडोजीराजे पुढे स्वराज्यात सामील झाले आणि इ सन १७०२ साली ते सिंहगडचे किल्लेदार होते . याच काळात मोगलाकविरोधात लढताना त्यांना वीरमरण आले,याची नोंद मोगल दरबाराच्या बातमीपत्रात आहे. खंडोजीराजे यांना एक पुत्र लखमोजीराजे द्वितीय. यांना छत्रपति ताराबाई राणीसाहेब यांनी त्यांच्या पुर्वजांची कारकीर्द पाहुन इ सन १७०३ साली भुईंज येथील वतन दिले.यासंदर्भात मोडी पत्र उपलब्ध आहे.त्यांची वंशजशाखा भुईंज सातारा येथे असुन ही शाखा शेवटपर्यंत मराठा स्वराज्यात राहिली.
छत्रपती थोरले शाहु महाराज यांच्या कार्यकाळात या शाखेने उल्लेखनीय कामगिरी केली. यांचे पुत्र सहा रायाजीराजे, काळोजीराजे, ज्योगोजीराजे,संताजीराजे, मानाजीराजे व संभाजीराजे. यापैकी प्रथम चार पुत्रांच्या विद्यमान वंशजशाखा भुईंज येथे आहेत,तर मानाजीराजे यांची वंशजशाखा राहुरी भागात अस्तित्वात होती.
बहिर्जीराजे हे लखमोजीराजे प्रथम यांचे द्वितीय पुत्र असुन हे देखील मराठा स्वराज्यातच कार्यरत होते. हे उंब्रज येथे होते.यांचे विद्यमान वंशज उंब्रज येथील चौबुर्जी वाड्यातील जाधवराव आहेत.
येसाजीराजे हे सुरुवातीपासूनच शहाजी महाराज साहेब सोबत दक्षिणेत कोटनुर येथे “तटसरनौबत” होते . या संदर्भात एक मोडी पत्र उपलब्ध आहे. ही शाखा शेवटपर्यंत दक्षिणेतच राहिली. त्यांचे वंशज दक्षिणेतच आहेत.
छत्रपति थोरले शाहु महाराजांच्या काळात भुईंजकर जाधवरावानी खुप पराक्रम गाजवला. ते छत्रपति थोरले शाहु महाराजांच्या खास हुजुराती फौजेत सरदार होते. तसेच छत्रपति थोरले शाहु महाराजांच्या मृत्यूनंतर संताजीराजे जाधवराव हे मराठा साम्राज्याचे उपसरसेनापती होते.
७) राजे ठाकुरजी उर्फ पतंगराव : हे राजे दत्ताजीराव यांचे द्वितीय पुत्र असुन यशवंतराव यांचे कनिष्ठबंधु असुन यांचा उल्लेख इ सन १६३३ च्या वाटणीपत्रात असुन हा हिस्सा यशवंतराव यांच्या पुत्रासोबत एकत्रीत आहे. हे इ सन १६६० सालच्या अफजल खानाच्या वधासमयी शिवराय महाराजांच्या सैन्यात मराठा सरदार म्हणुन पराक्रम केल्याचा उल्लेख शिवभारतात सापडतो. तसेच यानी महाराजांशी संधान बांधुन वेळेनुसार कधी स्वराज्यात तर कधी मोगलांकडे जाऊन स्वराज्याचे कार्य केले याचा उल्लेख एका इंग्रजांच्या पत्रात, तसेच मोगलसाहित्यात देखिल आढळतो. याना “दखनी जाधवराव” हा किताब होता. ठाकुरजी हे याच नावाने ओळखले जात. याना ५००० /५००० अशी मनसबदारी होती व हे इ सन १६७२ साली नाशीकचे ठाणेदार होते.यानी महाराजांशी संधान बांधुन साल्हेर मोहिमेत महाराजाना साथ देऊन परत स्वराज्यात आले.परंतु महाराजांच्याच सांगण्यावरुन ठाकुरजी व पुतणे रुस्तुमराव /रतनोजी परत मोगलांकडे गेले. याचा उल्लेख मोगल इतिहासकार भिमसेन सक्सेना याने त्याच्या साहित्यात तसेच इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड मध्ये आढळतो. ते देखिल दक्षिण दिग्विजयागोदर आपली खास माणसे महाराजानी मोगलाकडे पेरली होती त्यापैकी हे दोघे होत.
ठाकुरजीराजे यांच्या इ सन १६३१-१६८१ या काळातील कारकिर्दीवर माझा स्वतंत्र शोधनिबंध प्रकाशित आहे.
८) छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज तसेच पुढील पिढीतील छत्रपति घराण्याने जाधवराव घराण्याच्या प्रत्येक पिढीत नातेसंबंध आहेत. तसेच छत्रपति घराण्याने जाधवराव घराण्यातील पुरुषांशी संधान बांधून गरज असेल तेव्हा स्वराज्यात तर गरज असेल तेव्हा मोगलांकडे पाठवुन मराठा स्वराज्याचे राजकारण केलेले आहे. याचा हा पहिला भाग . यांचा मृत्यू ७ नोव्हेंबर १६८१ रोजी कोकणात झाला असुन त्यांचे पुत्र अचलोजीराजे द्वितीय याना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कन्या राणुबाई अक्कासाहेब दिलेल्या होत्या… (क्रमशः)
