महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 8,380,873

शहाजीराजांना कैद

By Discover Maharashtra Views: 5270 5 Min Read

शहाजीराजांना कैद…

राजमाता जिजाऊसाहेब ग्रंथमाला भाग १६…

पुण्यात जिजाऊंचे स्वराज्य स्थापनेसाठीचे प्रयत्न चालू होते, तर दुसरीकडे कर्नाटकात शहाजीराजांच्या मोहिमांही यशस्वी होत होत्या.इकडे शिवाजीराजे एक एक मोहीम फत्ते करून यश मिळवत होते .वडील शहाजीराजे व पुत्र शिवाजीराजे दोघेही यशाच्या शिखरावर विराजमान होऊ लागले होते .तोरणागड जिंकला, राजगड बांधला ,राजगडावर राजधानी सजविली ,शिवाजीराजांनी स्वराज्याचा कारभार मोठ्या जोमाने सुरू केला होता.यापुढे किल्ले जिंकण्याची जोरदार मोहीम राजांनी सुरू केली होती .कोंढाणा, पुरंदर, रायगड, प्रतापगड हे सर्व किल्ले भराभर मावळ्यांनी जिंकले. तिकडे शहाजीराजे कुतूबशहाकडे जाण्याच्या तयारीत होते .

आदिलशहा काळजीत पडला. त्याच्या राज्याचे अनेक भाग शिवाजीराजांनी काढून घेतले. शिवाजीराजांचा स्वराज्याचा वारू इकडे चौफेर उधळू लागला .त्यामुळे विजापुरी आदिलशहा संतापाने बेफाम झाला .रणदुल्लाखान हा सरदार शहाजीराजांचा जिवलग मित्र होता; पण त्याचे निधन झाल्यानंतर त्याचा मुलगा मुस्तफाखान आणि अफजलखान हा अत्यंत शक्तिमान बनले . त्यांनी आदिलशहाकडे शहाजीराजे, संभाजी राजे (जेष्ठ पुत्र) शिवाजीराजे यांच्याबद्दल तक्रारी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शहाजीराजे आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांना जायबंद करून त्यांचा बंदोबस्त करण्याचे आदिलशहाने ठरवले.

शहाजीराजांसारख्या शूर व एकनिष्ठ सरदाराच्या मुलाने चालवलेली बंडखोरी शहाजी ,संभाजी, शिवाजी हे तिघे मिळून करत आहेत ,अशी विजापूरकरांची खात्रीच होऊ लागली होती. म्हणूनच आदिलशहाने शहाजीराजांना धमकीचे पत्र देऊन शिवाजीराजांना आवरण्यासाठी ताकीद दिली .त्यांच्या दोन्ही पुत्रांचा चांगलाच बंदोबस्त करण्याचे आदिलशहाने ठरविले.आदिलशहाने त्यासाठी तिहेरी शक्कल लढवली .शहाजीराजांची अटक, संभाजीराजे यांचा पराभव आणि शिवाजीराजांचा बंदोबस्त. आदिलशहाने मुस्तफाखानाला शहाजी राजे यांच्या अटकेचे आदेश दिले ,तर फरदिखानास संभाजीराजांचा पराभव करण्यास सांगितले तर ,फत्तेखानास पुण्याकडे पाठवून शिवाजीराजांचा बंदोबस्त करण्याचा आदेश दिला.

शहाजीराजांना या कटकारस्थानाचा सुगावा लागू दिला नाही .कारण त्यावेळी ते जिंजीच्या वेढ्यात लढत होते .शहाजीराजांचे कर्तव्य मुस्तफाखान चांगलेच ओळखून होता .त्यामुळे त्याने मोठी सावधगिरी बाळगली होती. शहाजीराजांसारख्या शूर व लढाऊ योद्ध्याला समोर जाऊन अटक करणे कोणालाच शक्य नव्हते. तेव्हा कपटाने किंवा बेसावधपणे शहाजीराजांना कैद करण्याची योजना त्यांने आखली .मुस्तफाखानाने अफजलखान ,मुधोळचे घोरपडे वगैरे कित्येक हिंदू व काही मुसलमान सरदार शहाजीराजांच्या गोटावर पाठवून राजे झोपेत असतानाच त्यांच्या छावणीवर हल्ला करून पकडण्याचा प्रयत्न केला .हल्ला झाल्या नंतर झोपेत असल्यामुळे शहाजीराजे थोडे गोंधळले .मात्र लगेचच ते सावध झाले व घोड्यावर स्वार होऊन लढावयास तयार झाले .

छावणीवर गडबड -गोंधळ उडाला .या गोंधळात शहाजी राजे घोड्यावरून खाली कोसळले. याच संधीचा फायदा घेऊन मुधोळच्या बाजी घोरपडे यांनी शहाजीराजांना पकडून कैद केले .शहाजीराजांचा विश्वासू हस्तक कान्होजी जेधे त्यांच्याजवळच होता. त्यालाही खानाने कैद केले व कनकगिरीस नेऊन ठेवले ‘.स्वराज्य संकल्पक फर्जंद ‘म्हणजे ‘राजपुत्र,ही आदिलशहाने दिलेली पदवी धारण करणारे शहाजीराजे संकटाच्या भोवऱ्यात सापडले .अफजलखानाने याही अवस्थेत शहाजीराजांची जणू धिंडच काढली.

कैद झालेल्या शहाजीराजांना आणण्यासाठी अफजलखानाची नेमणूक झाली. त्याला तेवढेच हवे होते .त्याने ते काम मोठ्या आनंदाने चोखपणे राजांना बेड्या घालून मार्च १६४९ ला विजापुरात आणले. यापूर्वी सातशे वर्षे रूपनायकाचे पूर्वज जिंजीस नांदत होते. तेथे त्यांची अपार संपत्ती होती. ती सर्व संपत्ती सुमारे वीस कोटी रुपयांची आदिलशहाला मिळाली .ही सर्व संपत्ती व मौल्यवान सामान ८९ हत्तीवर लादून अफजलखान जिंजीतून निघून सन. १६४९ ला विजापूरास तीन महिन्यानंतर येऊन पोहोचला.

शहाजीराजांना कैद केल्याबरोबर बेंगलोर व कोंढाणा हस्तगत करण्यास आदिलशहाने फौजा रवाना केल्या. फरदीखान मोठ्या संख्येने संभाजीराजांच्या वर चालून गेला .पण संभाजीराजांच्या स्वतःच्या सतरा हजारांच्या फौजेस दक्षिणेतील हिंदू संस्थानिकांनी संभाजीराजांना पाठिंबा दिल्याने व त्यांचीही फौज येऊन संभाजीराजांना मिळाल्याने राजांच्या फौजेपुढे फरदीनखान यांची भंबेरी उडाली .संभाजीराजांनी फरदिखानाला सपशेल पराभुत केले. आदिलशहाचे मनसुबे धुळीला मिळत होते .परंतु हुकुमाचा एक्का म्हणजे शहाजीराजे आदिलशहाच्या ताब्यात होते .शहाजीराजांच्या अटकेची खबर राजगडावर आली.

मुस्तफाखानाने व बाजी घोरपडे याने दगा करून शहाजीराजांना अटक केली होती. माणसे मारून ,छावणी लुटून, शहाजीराजांना जखमा करून त्यांना कैद केले गेले होते. या बातमीने राजगड सुन्न झाला होता. जिजाऊंच्या सौभाग्यावर व त्यांच्या कुंकवावरच मुस्तफाखानाने घाला घातला होता. जिजाऊ आणि शिवाजीराजांच्या हृदयाचा थरकाप उडाला होता. मागचा सारा इतिहास आठवून दोघांच्याही तोंडचे पाणी पळाले होते. मुस्तफाखान व बाजी घोरपडे शहाजीराजांच्या बद्दल काय विचार करत होते , याचा अंदाज बांधणे कठीण झाले होते .केवढे भयंकर मोठे संकट स्वराज्यावर चालून आले होते. शहाजीराजांच्या अटकेने राजमाताा जिजाऊ साहेब यांना अत्यंत दुःख झाले होते.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

बाजींद कांदबरी

Leave a comment