स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना असलेली सातमजली पायविहीर

By Discover Maharashtra Views: 1727 2 Min Read

स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना असलेली सातमजली पायविहीर, महिमापूर, अमरावती –

आश्चर्याने तोंडात बोटे जावीत अशी स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेली, औरस-चौरस भव्य ऐतिहासिक सातमजली पायविहीर दर्यापूर तालुक्यातील महिमापूर या इवल्याशा गावात १४ व्या शतकापासून आजही दिमाखात उभी आहे. तथापि, महाराष्ट्र राज्याची संपत्ती आणि अमरावती जिल्ह्याचे वैभव असलेल्या या विहिरीकडे शासनाने सातत्याने केलेले दुर्लक्षही विहिरीइतकेच आश्चर्यकारक आहे.

अशी आहे रचनासंपूर्ण बांधकाम दगडाचे. आकार चौकोनी. खोली ८० फूट. रुंदी ४० मीटर बाय २५ मीटर. विहिरीत उतरण्यासाठी ८५ प्रशस्त पायऱ्या. पायऱ्यांच्या मार्गावर किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमान कमानी. प्रवेशद्वारावर दगडात कोरलेली दोन लक्षवेधी पुष्पे. पायऱ्यांमध्ये क्षणिक विसाव्यासाठी टप्पे. आत शिरल्यावर विहिरीच्या चारही बाजूंनी फिरता येईल, बसता येईल अशी व्यवस्था. बांधकाम संपल्यावर तळाशी चहुबाजूंनी ओट्यासमान रचना. आतमध्ये दोन कोरीव ध्यानस्थ मूर्ती.विहिरीचा इतिहास

१४४६ ते १५९० या १४४ वर्षांच्या कालखंडात बहामणी साम्राज्याच्या पाच पातशाही होत्या. अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदीलशाही, हैदराबादची कुतूबशाही, बिदरची बरीदशाही आणि अचलपूरची इमादशाही, अशा त्या पाच पातशाही होत. अचलपूरच्या इमादशाहीचे संस्थापक फते इमाद उल मुल्क हे होते. फते इमाद उल मुल्क यांनी आरंभीच्या काळात भरमसाठ बांधकामे केलीत. ठळक बांधकामात चिखलदऱ्यातील दोन मशिदी, गाविलगड किल्ल्याचा परकोट, परतवाड्यातील हौद कटोरा ही उदाहरणे देता येतील.

महिमापूरची विहीरही त्याच काळातील, असल्याचा निष्कर्ष इतिहास संशोधक अनिरुद्ध पाटील यांनी ठामपणे व्यक्त केला.या रचना कालौघात नष्टजमिनीपासून तीन-चार फूट उंचीपासून विहिरीच्या तळापर्यंतचे बांधकाम आजघडीला बघता येत असले तरी त्याशिवाय कालौघात नष्ट झालेली इतर अनेक वैशिष्ट्ये या विहिरीत होती, हे अभ्यासकांच्या शोधमोहिमेतून पुढे आले. पूर्वी या विहिरीवर दोन मजल्यांचे बांधकाम होते. पाहणाऱ्याला ही विहीर असल्याचे लक्षातच येणार नाही, अशी त्या बांधकामाची रचना होती. ते प्रमुख वैशिष्ट्यही होते. वरील दोन मजले पडल्यामुळे आता विहिरीच्या आतील बांधकाम वरून बघता येते. या विहिरीच्या आत आजदेखील कपाऱ्यांसमान भासणारी गूढ रचना आहे. कपारींचे गूढ काय, याबाबत जाणकारांमध्ये खल होत राहतो.

माहिती – Amar Bhagwat
फोटो – Devashish Shah

Leave a comment