सरदार पुरंदरे वाडा

सरदार पुरंदरे वाडा

सरदार पुरंदरे वाडा…

शके १६२५ (सन १७०३) मधील एका पत्रात ‘कसबे’ सासवडचे कुलकर्ण व कर्यात सासवडचे कुलकर्ण पदाबद्दल समस्त पुरंदरे यांनी अत्र्यांशी वाद घातले अशी नोंद आहे. शके १६१४ (सन १६९२) च्या फाल्गुन महिन्यात तुकोपंत पुरंदरे, धनाजी जाधवांबरोबर चंजीस (जिंजीस) जाऊन जमिनीच्या सनदा घेत आहे, अशी एका पत्रात नोंद आढळते. यावरून असे म्हणता येईल की, पुरंदरे घराण्याकडे परंपरागत कुलकर्ण वतन होते. या घराण्यातील अंबाजीपंत ही व्यक्ती धनाजी जाधवराव यांच्या बरोबरीचीच असल्याचे दिसते. शके १६१४ मध्ये पुरंदरे मराठ्यांचे साक्षात नोकर होते. शके १६२४ मध्ये ते सुखवस्तू रयत आहेत.

सासवड गाव कधी मोगलांकडे तर कधी मराठ्यांकडे असे. शके १६२३ मध्ये अत्रे आणि पुरंदरे यांचा वाद असल्याचे दिसते. रामचंद्रपंत अमात्य, सेनापती धनाजी जाधवराव, सचिव शंकराजी नारायण यांच्याशी पुरंदरे यांचा दृढ परिचय होता. या घराण्यातील ‘हेरंब’ नावाचा माणूस बराच महत्त्वाचा होता. तुको त्र्यंबक, अंबाजी त्र्यंबक या बंधुद्वयाखेरीज त्यांचे चुलत भाऊ काशी, गोमाजी, गिरमाजी, विश्वनाथ व भाऊबंद चिंतो महादेव पुरंदरे हेसुद्धा आपल्या बकूबाप्रमाणे राजकारणात वावरत होते. सेनापती धनाजी जाधवराव यांच्या कृपेने यांना थोर पद प्राप्त झाले.(सरदार पुरंदरे वाडा)

छ. शाहूमहाराज सुटून आल्यावर लांबकानी (खानदेश) येथे अंबाजीचा पुतण्या मल्हार तुकदेव हा शाहूराजांना भेटला. त्या वेळी काही अत्रेमंडळीही शाहूराजांकडे सामील झाली.

सन १७०८ मध्ये शाहूराजे सातारला विधियुक्त अभिषेक करून छत्रपती झाले. अंबाजीपंत व खंडो बल्लाळ यांचा स्नेह जुळला. पंतांच्या सहाय्याने बाळाजी विश्वनाथाने कर्ज काढून फौज बनविली. शाहूराजांनी सेनापति पदावरून चंद्रसेनास काढल्यावर पुढे त्याचा भाऊ संताजी यास नेमले. नंतर सन १७१२ मध्ये मानसिंग मोरे यास सेनापती नेमले व त्याचे दिमतीस आपल्या भरवशाचा अंबाजीपंत यास नेमले. बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर दि. १७ एप्रिल १७२० रोजी बाजीरावास छ. शाहूमहाराजांकडून पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्याच वेळी अंबाजीपंत पुरंदरे यांना मुतालिकीची वस्त्रे करून दिली. पुरंदरे मुतालिक म्हणून साताऱ्यास शाहूमहाराजांजवळ राहत असत. अंबाजीपंत, त्यांचा मुलगा.

महादेव, मल्हार तुकदेव ऊर्फ दादा, त्र्यंबक सदाशिव ऊर्फ नाना हे शाहू महाराजांजवळ राहून पेशव्यांची बाजू सांभाळीत. सन १७३७ मध्ये अंबाजीपंत, पिलाजी जाधव व राणोजी भोसले आणि आनंदराव पवार यांनी माळव्यात मोठी स्वारी करून दयाबहादुराशी कित्येक संग्राम व व्यवहार केले. कोल्हापूरकर
संभाजीराजे यांच्या व शाहू महाराज यांच्या भेटीच्या प्रसंगी जाखणवाडी गावच्या मैदानात अंबाजीपंत होते (१७३१). उमाबाई दाभाडे यांच्या भेटीसाठी शाहू महाराजांनी काही महत्त्वाची मंडळी पाठवली होती. त्यांत अंबाजीपंत होते.

बाजीराव पेशव्यांशी अधिकारवाणीने अंबाजीपंत बोलत असत. तरीसुद्धा त्यात आदब राखत असत. पेशवे लहान असले तरी अंबाजीपंतांस पत्रातून ‘चिरंजीव असे संबोधत असत. बाळाजी ऊर्फ नानासाहेब यांना जेव्हा दमाजी गायकवाडाने पकडले त्या वेळी अंबाजीपंतांनी त्यांना दंड भरून सोडविले. बाजीरावविरुद्ध कारस्थाने करणारी सरदारांना पत्रे लिहून त्यांचा बंदोबस्त केला. अंबाजीपंत पेशव्यांचे कारभारी व उपमंत्रीच होते. त्यांचा मृत्यू भाद्रपद शु।८ शके १६५६ (सन १७३५) ला माहुली येथे झाला. त्यांच्या सौभाग्यवती बयाबाई यांनी सहगमन केले. महादोबा व सदाशिव हे त्यांचे पुत्र. पानिपतच्या युद्धात बाबा पुरंदरे होते. त्यांना ग्वाल्हेरच्या दरम्यान व्यवस्थेसाठी मागे ठेवले होते. महादोबा पुरंदरे हे नानासाहेबांच्या वेळी एक अत्यंत सज्जन व पेशव्यांच्या गुरुस्थानासारखे होते. मराठ्यांच्या इतिहासात अत्यंत कर्तृत्ववान व निष्ठावंत अशी बहुमोलाची माणसे या घराण्याने दिली.

#संदर्भ-

१) पुरंदरे कृ.वा.- पुरंदरे दप्तर भाग १,२ २) सरदेसाई गो.स.- मराठी रियासत खंड ३,४
३) दक्षिणेतील सरदारांच्या कैफियती, यादी वगैरे

माहिती साभार – Vikas Chaudhari

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here