महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,64,702

सरदार विठ्ठलराव यशवंतराव पोतनीस वाडा

By Discover Maharashtra Views: 4094 10 Min Read

सरदार विठ्ठलराव यशवंतराव पोतनीस वाडा (उरवडे, ता.मुळशी पुणे)

श्रीमंत सरदार विठ्ठलराव यशवंतराव पोतनीस यांनी १९ मार्च १७७३ साली रायगड किल्ला पेशव्यांच्या ताब्यात दिल्यानंतर श्री छत्रपतींवरील निष्कलंक निष्ठा व स्वराज्याचा भगवा ध्वज रक्षिण्याची जबाबदारी व कर्तव्य म्हणजे हे निशाण उरवडे येथे आणून छत्रपतींची मानाची दौलत आदरपूर्वक वाड्यासमोर उभारली.’ पोतनीसांच्या देवघरात अष्टभुजा तुळजाभवानीची सुरेख मूर्ती असून म्हाळसाकांत, सातारची खवलाई, मळवलीची एकवीरा आणि कडाप्याचे बापूजीबुवा यांचे टाक आहेत. वाड्यापासून थोड्याच अंतरावर यशवंतराव पोतनीस यांची समाधी पूर्णावस्थेत असलेली पाहावयास मिळते.सरदार पोतनीस वाडा.

ऐतिहासिक रंग

महाराष्ट्राच्या इतिहासात एक शूर, मर्दाना, ईश्वराघरचा शिपाई म्हणून गाजलेला मुरारबाजी तसेच थोरले शाहू महाराज यांचे खासनीस व पोतनीस #यशवंतराव_पोतनीस यांचे वंशज असलेले पोतनीसांचे वीर घराणे आजमितीस #उरवडे या गावी
आपल्या पूर्वजांचा पराक्रम उरी बाळगून मोठ्या दिमाखाने नांदत आहे. भाग्वश्रीया सुललिताम् वसुपेटिकेव ।’ अशी अत्यंत श्रीमंत अशी जावळी ज्या चंद्रराव मोरे यांच्याकडे होती त्यांचाच मुरारबाजी हा एक मर्दाना सरदार! छ. शिवाजी महाराजांनी जयवल्ली ऊर्फ जावळी चंद्रराव मोरे यांच्याकडून घेतली. त्या वेळी मुरारबाजी देशपांड्यांचा पराक्रम पाहून महाराजांनी मोऱ्यांकडे मुरारबाजी व त्यांचे बंधू त्र्यंबकजी, शंकराजी व महादजी यांची मागणी केली. यांपैकी महादजी यांचे वंशज म्हणजे उरवडे येथील #पोतनीस_घराणे*! दि. ३१ मार्च १६६५ रोजी दिलेरखानाने पुरंदरला वेढा घातला त्या वेळी पुरंदरावर मराठ्यांची दोन हजारांची शिंदे होती. पुरंदर च्या संरक्षणासाठी चंद्रराव मोऱ्यांच्याकडून लाभलेले विररत्न मुरारबाजी यांची नेमणूक महाराजांनी केली. मुरारबाजींनी पुरंदरवर जो पराक्रम केला त्याला महाराष्ट्राच्या इतिहासात तुलना नाही. या पराक्रमाचे अतिशय रोचक असे वर्णन कृष्णाजी अनंत सभासदांनी आपल्या बखरीत केले आहे. ते त्यांच्याच शब्दात बाचकांपुढे दिल्यास त्यांचा पराक्रम समोर उभा राहील.

मुरारबाजी ईश्वराघरचा शिपाई! तेव्हा पुरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभू म्हणून होता. त्याजबरोबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे होते. त्यात निवड करून मुरारबाजी याणी सातशे माणूस घेऊन गडाखाले दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार, जोरावर, पठाण पाच हजार याखेरीज वैल वगैरे लोक ऐशी फौज गडास चौतर्फा चढत होती, त्यात जाऊन सरमिसळ जाहाले. मोठे घोरांवर युद्ध जाहाले. मावळे लोकांनी व खांसा मुरारबाजी यांनी निदान (निकराने) करून भांडण केले…खांसा मुरारबाजी दिलेरखानाच्या देवडीपावेतो साठी माणसांनिशी माहीत शिरले. दिलेरखान देवडी सोडून माघारा जाहला आणि लोकांस सांगून तोफखाना व तिरंदाज, बरच्या व आडहत्वारी एक हजार लोक यांजकडून मार करविला. त्यामध्ये साठी लोक पडले. मुरारबाजी परभू यांनी ढाल-फिरंगी घेऊन दिलेलखानावरी चालोन आले. ‘महाराजांचे नावाजलेले लोक ते खर्च जाहले, आता काय मुख दाखवावे? म्हणोन नीट चालोन जाये’ असे मनात आणोन खानाशी गाठ घातली. तेव्हा दिलेलखान बोलिला जे. अरे, तू कौल घे (शरण ये) मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो.’ ऐसे योलता मुरारबाजी बोलिला जे, ‘तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजीराजांचा शिपाई. तुझा कौल घेतो की काय?’ म्हणोन
नीट खानावरी चालिला. खानावर तलवारीचा वार करावा तो खानाने आपले कमाणतीर मारोन पुरा केला. मग खानाने तोंडात अंगोळी घातली की, ‘असा शिपाई खुदाने पैदा केला. ऐसे आश्चर्य केले.”

याच मुरारबाजींचे बंधू महादजी यांचे पुत्र यशवंत महादेव हे थोरल्या शाहू महाराजांजवळ पोतनिशी करीत होते. महाराजांनी उरवडे हा त्यांच्याकडेच पूर्वी असलेला परंतु नंतर जप्त झालेला गाव त्यांना परत दिला. त्यानंतर छ. शाहू महाराजांचे ते खासनवीस झाले. खासनविसाकडे महाराजांची अठरा कारखाने व पूर्ण खासगी कारभार ही कामे होती. त्यांना चाळीस हजारांचा सरंजाम देऊन सन १७३५ पासून रायगड तालुका हा हुजूरचा प्रदेश त्यांच्या अखत्यारीत देऊन त्यांच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली होती. तालुक्याचा पूर्ण जमाखर्च पाहणे, कारभाऱ्यांच्या नेमणुका करणे हे अधिकार पेशव्यांना न देता #यशवंत_महादेव यांना दिले होते. अशा या मातब्बर सरदारास सरंजामासाठी ९२ गावे व महादेवाच्या यात्रेसाठी लावून दिलेला हाशिलाचा एक गाव मिळून १०२ गावे चालत होती. इनाम गावे ७,२ गावांतील इनाम जमिनीही त्यांच्याकडे होत्या. आतील २४ गावे नारायणराव पेशव्यांच्या कारकीर्दीत, तर १८ गावे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कारकीर्दीत जप्त करण्यात आली.

थोरले बाजीराव पेशव्यांच्या कारकीर्दीत जी जंजिऱ्याची मोहीम झाली, त्या वेळी या मोहिमेस निघण्यापूर्वी बाजीरावांनी निजामाला गप्प बसविण्याचे ठरविले.

इमईच्या लढाईत जरी निजामाचा पराभव झाला होता तरीही त्याच्या कपटी स्वभावामुळे तो कधी डोके वर काढील, याचा नेम नव्हता; म्हणून बाजीरावाने अगोदर लातूरला जाण्याचे ठरविले. त्या वेळी मातोश्री राधाबाई त्यांना पत्र लिहून चांगली विश्वासू माणसे घेऊन जा म्हणून कळविले. त्या विश्वासू माणसांपैकी यशवंतराव पोतनीस यांच्याकडे शाहूराजांनी सिद्ध यांच्यामध्ये फूट पाडण्याची कामगिरी दिली होती. यशवंतराव पोतनीस यांनी शेख जी सिद्दी याला रायगडावर अधिकारपद देण्याचे आमिष दाखविले. त्याने योग्य वेळी बाजीरावाकडे वावे असे ठरले. निजामाचा बंदोबस्त करून बाजीराव जंजियाकडे आला. या वेळी प्रतिनिधी शाहू छत्रपती हे सुद्धा या मोहिमेत उतरले. सेखोजी आंग्रे यानेसुद्धा बाजीराव सहाय्य केले. या वेळी यशवंतराव पोतनीसांमार्फत लाच देऊन जंजिरा किल्ला मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

छ. शाहूमहाराजांच्या थोरल्या राणीसाहेब सकवारबाई व धाकट्या राणीसाहेब सगुणाबाई या दोघींच्या कलहात शाहूराजांची मनःस्थिती ठीक राहत नसे. त्यांचे वर्णन करणारे पत्र महादोबा पुरंदरे यांनी पेशव्यांना लिहिले. (दि. २ ऑगस्ट १७४६). त्या पत्रात यशवंतराव पोतनिसांचा उल्लेख आढळतो. ‘सांप्रत राजेश्री स्वामींच्या प्रकृतीत तिसऱ्या प्रहरापासून आंग मोडून येत असते. पोटावर दिव्याच्या फुल्या घातल्या आहेत. ऐसेही असता दोन्ही वाड्यांतील नित्य एक दुसरा कजया ठेवलेलाच आहे. कजिया असा जालीयास असे घाबरे होतात की गर्भगळीत! देव लौकर मरण देईल तर उत्तम म्हणतात. शरीरास उपाय करावयाची उपेक्षा करितात. हे गोष्ट फटकळ. दोन्ही वाड्यातून तुमचे इंगित समजावे, आणि तद्नुसार वर्तणूक करावी… यशवंतराव महादेव पोतनीस एक-दोन वेळा बोलले व गोविंदरावही बोलले, परंतु काहीसुद्धा जबाव दिला नाही. याउपरी वाचून काय करणे आहे?’ म्हणतात… या पत्रावरून हे लक्षात येते की, यशवंतराव व शाहूराजे यांचे संबंध अत्यंत निकटचे होते.

पुढे सांगोल्याची जी मोहीम झाली त्या मोहिमेच्या वेळी नानासाहेब पेशव्यांनी सदाशिवराव व रामराजे यांना फौज देऊन सांगोल्यावर पाठविले. त्या वेळी सल्लागार मंडळ रामचंद्र बुवा यांच्याबरोबर नाना पुरंदरे, गोविंदराव चिटणीस व यशवंतराव पोतनीस ही प्रमुख मंडळी होती.

रायगड व लिंगाणा किल्ल्यावर पोतनीसांची सत्ता होती. ती त्यांच्याकडून काढून घेण्याचा विचार माधवराव पेशव्यांनी केला. परंतु माधवराव पेशव्यांच्या अकाली निधनामुळे ते काम अर्धवट राहिले. नारायणराव पेशवे पेशवेपदावर आल्यावर परत रायगडाच्या मोहिमेचे काम हातात घेण्यात आले. छत्रपतींच्या आज्ञेशिवाय पोतनीस पेशव्यांना किल्ला देत नव्हते. पेशव्यांचे सैन्य रायगडाला येऊन भिडले.

रायगडावर यशवंतराव मोरे हा हवालदार व त्याच्या हाताखाली बालकाजीराव पालांडे हा सरदार होता. आपाजी हरी हा पेशव्यांचा सेनापती होता. त्याने साम दाम-दंड-भेद या सर्व उपायांनी रायगड जिंकला. (दि. १८ मार्च १७७३).छत्रपतींच्या तख्तास मुजरा करून नख्त पाच रुपये सिंहासनापुढे नजर म्हणून ठेवले रुप्याची फुले सिंहासनावर उधळली.

या मोहिमेचे सविस्तर वर्णन इतिहास संशोधक श्री. शांताराम आवळसकर यांनी त्यांच्या ‘रायगडची जीवनकथा’ या ग्रंथात केले आहे. रायगडावरील भगवा ध्वज पोतनीसांनी उरवडे या गावी चावडीवर उभा केला तेव्हापासून आजतागायत प्रतिवर्षी दसऱ्यास ध्वजाचे पूजन करून नव्याने ध्वज फडकविला आहे.

छ. थोरले शाहूमहाराज यांचे अत्यंत स्वामिनिष्ठ असलेल्या यशवंतराव पोतनीसांच्या पूर्वजांनी कर्नाटक येथून नामांकित कारागीर आणून महाड येथे वीरेश्वर मंदिर उभारले. महाशिवरात्रीच्या उत्सवाचे वेळी या मंदिरात छत्रपतींची गादी व समोर पोतनीसांची गादी ठेवून महापूजेचा मान आजपर्यंत दिनकर सदाशिवराव पोतनीस यांच्याकडे चालत आला आहे. ब्रिटिशांच्या कारकिर्दीत निर्माण झालेल्या भोर संस्थान गोपीनाथपंत बाळकृष्ण पोतनीस हे भोर संस्थानचे मुख्यमंत्री होते. त्यांचे बंधू दामोदर पंत हे गृहमंत्री पदावर होते. त्यांनीच श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यावरील नितांत भक्तीमुळे व प्रेरणेने उरवडे येथील पोतनीस वाड्यात श्रीराम मंदिराची स्थापना केली. त्या वेळी तेथे श्री गोंदवलेकर महाराज उपस्थित होते. त्यांनी पंक्तीत वाढण्याचे काम केले व पुढे रामनवमीचा उत्सव चालू केला. तो अव्याहतपणे चालू आहे. पुढे स्वातंत्र्यलढ्यात या घराण्यातील गोपीनाथ बाळकृष्ण पोतनीस व माधवराव पुरुषोत्तम पोतनीस यांनी स्वातंत्र्यसैनिक म्हणून कामगिरी बजावली.
त्यांचे नातेवाईक, व्याही घराण्यातील दिघे-देशपांडे, केशव महिपत व चिंतामण नारायण, गोपाळ महिपत यांनी स्वातंत्र्यासाठी कारावास भोगला. उरवडे या गावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ महिने मुक्काम होता.

आदिलशाहीत उदयास आलेल्या या घराण्याने छ. शिवाजी महाराज ज्वलज्वलनतेजस संभाजी महाराज, छ. राजाराम महाराज, छ. थोरले शाहू महाराज, छ. प्रतापसिंह महाराज यांच्या कारकीर्दीत आपली स्वामिनिष्ठा सिद्ध केली. बाळाजी आवजी चिटणीसांचे पुत्र स्वामिनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस यांचे जावई यशवंत महादेव पोतनीस यांचा यादगिरी आज उरवडे गावात सरदार पोतनीस वाडा वाड्याच्या दर्शनातून आल्यावाचून राहत नाही. या घराण्यातील सध्याचे वंशज श्री. संदीप पोतनीस सांगतात की, ‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी कै. मीनाताई ठाकरे व राज साहेब यांच्या मातोश्री या भगिनींचे आजोळ उरवडे (उरवडेकर देशपांडे) हे आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे अनेक वेळा उरवडे या गावी येऊन गेले आहेत. प्रबोधनकार ठाकरे यांच्या रंगो बापूजी या चरित्रग्रंथात उरवड़ेकर गोपीनाथराव पोतनीस यांचा उल्लेख आढळतो. उरवडे येथे मारणे-पाटील हा नामवंत घराणा असून उरवडे-आंबेगाव ची पाटीलकी त्यांना पोतनीसांनी दिली. या गावात मारणे, चोरगे, शेलार, बोत्रे, देशपांडे, बलकवडे, साळुंके, गाडे, खरात, आंबेगावकर, भंडलकर, पाखरे, रायरीकर, मुलाणी, मानकुंबरे, शिंदे ही घराणी गावची मानकरी असून पोतनीस घराण्याशी अत्यंत जिव्हाळ्याने संबंधित आहेत.सरदार पोतनीस वाडा.

संदर्भ-

१) श्री. सरदेसाई गो.स.- मराठी रियासत खंड ४
२) श्री. दीक्षित म.श्री.- प्रतापी बाजीराव
३) श्री. ठाकरे के.सी.- रंगो बापूजी
४) श्री. आवळसकर शा.बी.- रायगडची जीवनकथा
५) सभासद बखर

माहिती साभार – Vikas Chaudhari

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला

Leave a comment